वेळीच ओळखा पुढचा धोका

पैशांचे व्यवहार करताना कितीही दांडगा अनुभव असला, काळजी घेतली, अभ्यास केला तरी कधीकधी त्यात आपण फसतोच. त्यामुळे सर्व रक्कम एकाच ठिकाणी कधीच गुंतवायची नसते.
वेळीच ओळखा पुढचा धोका
Summary

पैशांचे व्यवहार करताना कितीही दांडगा अनुभव असला, काळजी घेतली, अभ्यास केला तरी कधीकधी त्यात आपण फसतोच. त्यामुळे सर्व रक्कम एकाच ठिकाणी कधीच गुंतवायची नसते.

पैशांचे व्यवहार करताना कितीही दांडगा अनुभव असला, काळजी घेतली, अभ्यास केला तरी कधीकधी त्यात आपण फसतोच. त्यामुळे सर्व रक्कम एकाच ठिकाणी कधीच गुंतवायची नसते. चार-पाच वर्षांपूर्वी माझे जवळचे मित्र परेशभाई यांना जी कंपनी कामं द्यायची, त्या कंपनीने मोठे एक्सपान्शन केले. त्यासोबतच यांनाही मोठा प्लांट टाकायला सांगितला. परेशभाईंनी स्वत:जवळची सर्व पुंजी लावली. भली मोठी जागा, मोठमोठ्या मशीन्स आणि भव्यदिव्य साजेशी फॅक्टरीही टाकली. पुढे काय झाले, त्याची ही कथा...

माझ्यापेक्षा दहा-बारा वर्षांनी मोठे परेशभाई (नाव बदललेय). परिचय झाला साधारणपणे १७-१८ वर्षांपूर्वी, त्यांच्या काही हिटिंग प्रोसेसमध्ये त्यांना नवे बदल करायचे होते म्हणून कंपनीने मला एनर्जी ऑडिट करण्यासाठी त्यांच्याकडे पाठविले. त्यांचा स्वभाव अत्यंत बोलका आणि हरहुन्नरी. नॉनटेक्निकल असले, तरी प्रत्येक गोष्टीकडे अगदी बारकाईने लक्ष देणार. परेशभाईंचा मुंबईतील सुखवस्तू गुजराती कुटुंबात जन्म, हायस्कूलपासून शिक्षण करतच वडिलांच्या किराणा मालाच्या दुकानात धंदा करायला शिकले. पुढे ‘नियमाप्रमाणे’ बी.कॅाम केलं आणि एखाद- दोन वर्षांत छोटासा गाळा घेऊन स्वत:चा फॅब्रिकेशनचा व्यवसाय सुरू केला.

व्यवसाय वाढविताना मोठ्या कंपन्यांसोबत ज्या ओळखी झाल्या, त्याचा पुरेपूर वापर करत त्यांचे व्हेंडर झाले. त्यांच्या समाजाकडून बिनव्याजी आर्थिक मदत घेतली. त्यांच्या वडिलांचे दुकानही सुरूच होते आणि त्यामुळे इकडे चांगला जम बसविला. त्यांनी एकाचे दोन, दोनाचे तीन आणि पुढे सलग चार ठिकाणी एका मोठ्या कंपनीसाठी जॉब वर्क करायला सुरुवात केली. हे सर्व ते एकहाती सांभाळत असत.

मी त्यांना त्यांच्या दुसऱ्या फॅक्टरीच्या वेळी जे भेटलो ते अगदी आजपर्यंत आमचे तसेच संबंध आहेत. मी खेडेगावातून येऊन मुंबईत हातपाय मारतोय, हे त्यांना फार आवडायचे. माझे इंग्रजी व मराठीवरील प्रभुत्व त्यांना खुप आवडायचे. माझ्यासोबत बोलताना ते मुद्दामहूनच मराठीत बोलायचे. त्यांच्या मराठीच्या गोडीने मला त्यांच्या गुजरातीकडे आकर्षित केले. आज मला जी काही थोडीफार गुजराती भाषा समजते वा थोडीफार बोलता येते, त्यात त्यांचा वाटा सिंहाचा. पुढे मी व्यवसाय सुरू केल्यानंतरही बऱ्याच वेळा आमच्या भेटीगाठी व्हायच्या. तसा आमच्या व्यवसायाशी त्यांचा फार काही संबंध नव्हता; पण दोघांनीही तो जिव्हाळा जपला. ते बऱ्याचदा नव्या मशीन खरेदी करताना माझा सल्ला घ्यायचेच. त्यांची बिनधास्त, बेधडक वृत्ती ही मलाही भुरळ पाडायची.

गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी परेशभाई ज्या कंपनीचे काम करायचे त्या पेरेंट कंपनीने मोठे एक्सपान्शन केले. त्यासोबतच यांनाही मोठा प्लांट टाकायला सांगितला. परेशभाईंनी स्वत:जवळची सर्व पुंजी लावली. भली मोठी जागा, मोठमोठ्या मशीन्स आणि भव्यदिव्य साजेशी फॅक्टरीही टाकली. अगदी पहिल्या दिवसापासून मी त्यांना जी हवी ती मदत करायचो, त्यांची प्रत्येक मशीन मी टेक्निकल क्लियरंन्स दिल्याशिवाय त्यांनी घेतली नाही.

प्रोजेक्ट खुपच मोठा होता; पण परेशभाईंचा एकंदर इतिहास पाहता त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या यशाबद्दल शंका असण्याचे कारण नव्हते. त्यामुळे सर्वच निर्धास्त होतो. आमच्या एका उपकंपनीकडूनही त्यांनी काही मशीन्स खरेदी केल्या. त्यामुळे आपसूकच आम्हीही जोडले गेलो होतो.

साधारण २०१५ ला संपूर्ण फॅक्टरी तयार झाली, पूजा पार पडली, ट्रायल्स झाल्या. सहा महिने तास- दोन तासचच फॅक्टरी चालायची. मी बऱ्याचदा यावर चिंता व्यक्त करायचो; पण हे मात्र एकदम आत्मविश्वासाने ‘सर्व ठीक होईल’ म्हणत दिवस काढत होते. तणाव तर त्यांनाही होताच; पण ते दाखवत नव्हते आणि पुढे अचानक पेरेंट कंपनीतील मॅनेजमेंट बदलली. नव्या मॅनेजमेंटने सर्व प्रोसेस स्वत:च्या कारखान्यात (इनहाऊस) करण्याचा बोर्ड मीटिंगमध्ये ठराव पास केला आणि परेशभाईंवर समस्यांचा डोंगरच कोसळला.

मुंबईतील पहिले चार युनिट्स, ही महाकाय कंपनी आणि सर्व काही या एकाच कस्टमरभोवती होते... मोठ्या कंपनीच्या आजूबाजूलाही असे दुसरे युनिट नव्हते ज्यांचे हे काम करू शकतील. ते गांगरून गेले. बीपी, शुगर इतकेच काय एक हृदयविकाराचा झटकाही येऊन गेला; पण नवी मॅनेजमेंट बधली नाही. चारपैकी तीन युनिटला टाळे लागले. महाकाय युनिटची तर अवस्था आता पाहावत नाही. बॅंकाचे हप्ते थांबले, त्यांना लोन नवे/जुने केले, सर्व मार्ग वापरले, समाजाकडून घेतलेले कर्ज काही जमिनी/गाळे विकून फेडले; तरीही बॅंकांच्या कचाट्यातून सुटका होत नाहीये.

एक युनिट कसेबसे एका शिफ्टवर आप्तस्वकीय, मित्रांच्या आधाराने चालू आहे आणि गेल्या चार वर्षांत तर सगळी रयाच गेली. कोण बरोबर, कोण चूक, हा प्रश्नच नाही. खरंतर त्यांच्या रक्तात उद्योग-व्यवसाय; पण ते आंधळ्या विश्वासावर राहिले... एकाच कंपनीच्या जीवावर पाच-पाच फॅक्टरीज टाकल्या, खरंतर खुप पूर्वी त्यांनी इतरही काही क्लायंट जोडायला हवे होते; पण त्यांचे सबकॉन्सियस माइंड निवांत झाले होते. अशी अवस्थाच मुळात धोकादायक असते. त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांचा प्लांट टाकताना हा फेल झाला तर काय? याची कोणतीच योजना आणि उत्तर नव्हते.

मित्रहो, पैशांचे व्यवहार करताना कितीही दांडगा अनुभव असला, काळजी घेतली, अभ्यास केला तरी कधीकधी त्यात आपण फसतोच. त्यामुळे सर्व रक्कम एकाच ठिकाणी कधीच गुंतवायची नसते. मग ती शेअरमार्केटमधील गुंतवणूक असो, जमिनीशी निगडित व्यवहार असो वा अशी पेरेंट कंपनी किंवा एकाच बॅंकेतील एफडी वा अन्य गुंतवणूक!

या सर्वांची परिणिती म्हणून त्यांना आज एवढ्या कष्टाने बनविलेल्या सोन्यासारख्या फॅक्टरीरूपी दागिन्यांची विक्री करायला लागली. आर्थिक व्यवहार करताना प्रत्येक वेळी दक्ष राहणे खूप गरजेचे असते. पैशांचे खेळ सोपे नसतात.

आता पुढची गंमत ऐका. आमचे परेशभाई शांत होतील का, तर कधीच नाही! त्यांचा ‘डीएनए’च व्यावसायिक वृत्तीचा. एवढं सगळं होऊनही भाई पुन्हा कामावर यायला लागलेत. मला म्हणतात, पेरेंट कंपनीच्या नाकावर टिच्चून उभा राहणार. बॅंकेकडून पुन्हा कर्ज घेतलेय, नवी जागा घेतली. परेशभाई राखेतून भरारी घेतील, यात मला काहीच शंका वाटत नाही.

आपले मराठी लोक बुद्धिमत्ता, शिक्षण, कष्ट, प्रामाणिकता यात जागतिक दर्जाचे आहेत; पण झोकून काम करण्याच्या वृत्तीचा अभाव जाणवतो. असं मोठं संकट/रिस्क असेल, तर आपली मंडळी थोडं मागे सरतात. दुसरं कोणी करावं, आपण सपोर्ट करू, असं धोरण पत्करतात. जग जिंकायचे असेल, तर आपलीही कार्यसंस्कृती बदलायला हवी!

wankhedeprafulla@gmail.com

(लेखक प्रख्यात केल्विन आणि लिक्विगॅस या औष्णिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com