गरजेचे मूल्यांकन

कोविडने आपण किती साधेपणात राहू शकतो, हे अगदी स्पष्टपणे दाखवून दिले. मित्र, शेजारी, सहकारी, नातेवाईक यांच्याशी तुलना करून किंवा प्रतिष्ठेच्या हव्यासापायी आर्थिक अडचणीत अडकू नका.
Need assessment
Need assessmentsakal
Summary

कोविडने आपण किती साधेपणात राहू शकतो, हे अगदी स्पष्टपणे दाखवून दिले. मित्र, शेजारी, सहकारी, नातेवाईक यांच्याशी तुलना करून किंवा प्रतिष्ठेच्या हव्यासापायी आर्थिक अडचणीत अडकू नका.

कोविडने आपण किती साधेपणात राहू शकतो, हे अगदी स्पष्टपणे दाखवून दिले. मित्र, शेजारी, सहकारी, नातेवाईक यांच्याशी तुलना करून किंवा प्रतिष्ठेच्या हव्यासापायी आर्थिक अडचणीत अडकू नका. आजही आपल्याकडे अनेक आर्थिक व्यवहार भावनेच्या आहारी जाऊन प्रसिद्धीपोटी, खोट्या प्रतिष्ठेसाठी किंवा फक्त ब्रॅंड पाहून होतात. इतरांकडे चैनीच्या वस्तू आहेत, आपल्याकडे का नसाव्यात म्हणून नको तो खर्च टाळा. त्या खर्चाच्या पैशांची बचत कठीण काळातही आनंदात जगण्याचं बळ देईल.

माझा एक वर्गमित्र जगप्रसिद्ध जनरेटर बनविणाऱ्या कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट आहे. आम्ही दोघे खूप जुने आणि चांगले मित्र. मुंबईत काही वर्षे रुममेट म्हणून एकत्रही राहिलो. तो सुरुवातीपासून एकाच कंपनीत. प्रचंड मेहनती, अत्यंत हुशार आणि प्रामाणिकपणामुळे कंपनीने त्याला भरभरून दिले. तो मुंबई, दिल्ली, बंगलोर करत पुन्हा मुंबईतच स्थायिक झाला. आज तो त्याच्या क्षेत्रात कमी वयातही उत्तम काम करतोय आणि बक्कळ पैसेही कमावतो.

त्याचे त्रिकोनी कुटुंब. मुलगी, बायको आणि तो. बायको एका बॅंकेत चांगल्या उच्च पदावर होती. दोघांचे मिळून वर्षाला आठ आकडी उत्पन्न. दहा-बारा वर्षांपूर्वीच त्याने मुंबईत तीन बेडरूमचा फ्लॅट विकत घेतला होता. तोही सुखवस्तू भागात आणि आता परत आल्यावर तो तिथेच राहत आहे.

तीन वर्षांपूर्वी तो मुंबईत आला तेव्हा त्याला कंपनीतील सर्व सहकारी, मित्र, शेजारी नातेवाईक एसयूव्ही किंवा जर्मन सेडान कार घ्यायचा हट्ट करत होते. त्याच्या बिल्डिंग, ॲाफिसमध्ये, सर्वांकडेच मोठ्या गाड्या होत्या. अगदी त्याची मुलगीही त्याच्या मागे मोठी गाडी घ्यावी यासाठी मागे लागली होती.

एक दिवस आम्ही जेवायला दादरला जिप्सीत भेटलो, तेव्हा त्याने हा विषय माझ्याकडे काढला आणि म्हणाला- ‘अरे, आमच्या कंपनीत हल्ली प्रत्येकजण मोठी कार आणि पेंट हाऊसच्या मागे लागलेत. मी कन्फ्युज झालोय, काय करावे काही सुचत नाही.’

त्याच्याकडे आधीपासून एक खाजगी कार आहे आणि कंपनीनेही त्याला एक चांगली सेडान गाडी दिलेलीच आहे. त्यामुळे मी म्हणालो, ‘‘हे पाहा, तुला तशी विकेंडसाठीच या कारची गरज लागेल आणि दुसरे म्हणजे स्टेटस सिंबॉल... बाकी तुझे आर्थिक गणित जर जुळत असेल, मनाला खरंच पटत असेल आणि गरजही असेल तर तुझा तू निर्णय घे.’’

आठवडाभरात त्याचा फोन आला की, मी गाडी घेत नाही. पुढे काही वर्षांनी विचार करतो. तूर्तास मुलीच्या शिक्षणासाठी ते पैसे ठेवतोय. काही म्युचुअल फंड आणि उरलेले एफडी करतोय. काही दिवसांनी योग्य ठिकाणी गुंतवतो म्हणाला.

डिंसेबर २०१९ मध्ये त्याच्या पत्नीने मुलीच्या शिक्षणासाठी, तसेच अन्य काही कारणांनी नोकरीतून ब्रेक घेतला. तोही अगदी आनंदाने... त्यांच्या कुटुंबाच्या तशा लायबिलीटीज काही नव्हत्याच. बऱ्यापैकी पैसे असल्याने ती घरूनच शेअर मार्केटचेही काम पाहत होती आणि तिघेही आनंदात राहताहेत.

त्यानंतर आलेल्या कोविड लाटेने जेव्हा अर्थव्यवस्थेचे बारा वाजवले, कित्येक जणांच्या नोकरीवर गदा आली, त्या वेळी खरं तर त्या मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोकांची अवस्था पाहवत नव्हती. अत्यंत वाईट वेळ होती. त्यातले बरेच जण आजही डिप्रेशनमध्ये गेलेत. काहींचे घटस्फोटाचे अर्ज तयार झाले. काहींच्या अचानक नोकऱ्या गेल्यामुळे, व्यवसाय पूर्ण बंद झाल्यामुळे या स्टेट्स सिंबॉल जपण्याच्या नादात उडालेली भंबेरी, त्रेधातिरपिट स्पष्ट जाणवली.

माझा मित्र, वहिनींची नोकरी नव्हती तरी पूर्णत: तणावमुक्त! कंपनीशी त्याचे अत्यंत चांगले संबंध (ऋणानुबंधच म्हणा) असल्याने कसलेही टेन्शन नाही... वर कंपनीनेच त्याला जुना, प्रामाणिक व हुशार माणूस म्हणून त्या काळात खूप जपले. तेही अत्यंत प्रेमाने, कोणतीही आर्थिक बंधनं किंवा ताणतणाव हा प्रकार नव्हता.

आजही त्याच्याशी बोलणं होतं तेव्हा पुन:पुन्हा आर्थिक साक्षरता या विषयाची आपल्या देशातल्या कित्येकांना किती नितांत गरज आहे, ते जाणवत राहतं. आर्थिक साक्षरता म्हणजे खरंतर Need Vs Wants ची खरी लढाई आहे. आपल्या गरजेचे मूल्यांकन आपण स्वत:च करणे खूप महत्त्वाचे आहे...

मित्र, शेजारी, सहकारी, नातेवाईक यांच्यापुढच्या दिखाव्याने, तुलनेमुळे किंवा प्रतिष्ठेच्या हव्यासापायी कोणीच आर्थिक अडचणीत सापडू नये. हे पूर्णपणे आपल्या स्वत:च्या हाती असते. कोविडने आपण किती साधेपणात राहू शकतो, हे अगदी स्पष्टपणे दाखवून दिले. त्या काळात प्रत्येकाला फक्त कुटुंबासोबत जगण्याची इच्छा प्रबळ होती... कित्येक दिखाव्याचे खर्च प्रकर्षाने जाणवले व कमीही झाले. आजही आपल्याकडे अनेक आर्थिक व्यवहार भावनेच्या आहारी जाऊन (मुलाबाळांच्या इच्छेखातर) प्रसिद्धीपोटी, खोट्या प्रतिष्ठेसाठी किंवा फक्त ब्रॅंड पाहून होतात.

Need Vs Wants ची लढाई विचारपूर्वक लढायला हवी. सर्वात महत्त्वाचे ‘आनंद, सुख कोणत्याही वस्तूत न शोधता तो आपल्या मनात आणि आपल्या कुटुंबात शोधायचे, जीवन सुखी होईल.’’

wankhedeprafulla@gmail.com

(लेखक प्रख्यात केल्विन आणि लिक्विगॅस या औष्णिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com