सुरक्षा कवच

आपण कमावते झाल्यानंतर पैशाला पाय फुटतात, असं सहज बोललं जातं. पैसे आले की खर्चही आपोआपच येतात. आपल्या गरजाही वाढतात.
Safety shield
Safety shield sakal
Summary

आपण कमावते झाल्यानंतर पैशाला पाय फुटतात, असं सहज बोललं जातं. पैसे आले की खर्चही आपोआपच येतात. आपल्या गरजाही वाढतात.

आपण कमावते झाल्यानंतर पैशाला पाय फुटतात, असं सहज बोललं जातं. पैसे आले की खर्चही आपोआपच येतात. आपल्या गरजाही वाढतात. त्या पूर्ण करणे आपले कर्तव्य असेल तर केलेच पाहिजे. पण आपली आर्थिक परिस्थिती सुरक्षित करण्यासाठी आपण त्यासाठी काय करायलंाहवं, हे समजण्यासाठी आपण आर्थिक साक्षर होणं गरजेचं आहे. त्याच सुरक्षा कवचाविषयी...

एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबातील तरुण-तरुणी पैसे कमवायला लागले की त्या पैशांचं काय करायचं, हा प्रश्नच नसतो. कारण त्याला आधीच इतक्या वाटा ठरलेल्या असतात की, तसा विचार करणेही मूर्खपणाचे वाटते. बहुंताश वेळा जर कुटुंबात कोणी उच्चशिक्षित, कमावते वा त्यातल्या त्यात आर्थिक साक्षर वा सज्ञान असेल तर बऱ्यापैकी मार्गदर्शन मिळते. नाहीतर सर्रास पैसे कमविणाऱ्यांनाच घरात कर्त्याचा मोठा मान मिळायला सुरुवात होते आणि मग त्यांना वाटेल तसेच निर्णय बरोबर आणि ते म्हणतील तीच पैशांच्या खर्चाचीही पूर्वदिशा ठरायला सुरुवात होते.

खरं तर गरिबीतून वर आलेल्या किंवा निम्न मध्यमवर्गीय कुटुंबासाठी त्यांच्या घरात चार पैसे जास्त आले की आनंद होणे ही नैसर्गिक घटना असते. मग त्यातून आई-वडील, भावंडांसाठी किंवा स्वतःसाठी नवे कपडे, चप्पल-बूट, घरातले उपयोगी इलेक्ट्रॉनिक्स सामान, काही मोबाईल फोन्स किंवा आई-वडील, बहिणीसाठी दागदागिने केले जातात. कुटुंबाच्या आनंदासाठी हे करणं रास्त आणि गरजेचंही आहे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं.

काही तरुण-तरुणी याच पैशांचा वापर व्यसनं करण्यासाठी किंवा इतर अन्य नॉन प्रॅाडक्टिव्ह बाबींसाठीही करतात आणि त्यात वहावत जातात. यात जर योग्य वेळी त्यांना जाग आली नाही किंवा योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर ते स्वतःचे आणि कुटुंबाचेही कायमचे नुकसान करून घेतात.

एकदा का काही फिक्स्ड, पण चांगले इन्कम सुरू झाले की पुढे लग्न, भाड्याचे वा स्वतःचे नवे घर, मुलंबाळं, त्यांचं शिक्षण, आई-वडिलांची दुखणीखुपणी, सणसुद, आप्तस्वकियांची लग्नं, उत्सव, समारंभ यात आयुष्य अडकून जाते. यातच कधीतरी ओळखीपाळखीचे किंवा कोणत्यातरी रेफरन्सने कोणीतरी एकजण आपल्याला इन्शुरन्सबद्दल बोलतो. खरं तर बऱ्याच जणांच्या आयुष्यात आर्थिक गुंतवणुकीबद्दल बोलणारे पहिले कोणी असेल तर हे इन्शुरन्स एजंटच असतात.

हे असे एजंट बऱ्याच मध्यमवर्गीय कुटुंबात विनोदाने, त्यांना टाळण्याच्या उपायांनी किंवा त्यांच्या कमिशन्सबद्दलच्या कथांनीच जास्त ओळखले जातात. बऱ्याचदा ते लोकही पूर्ण माहिती देत नसल्याने अनेक लोक थोडं अंतर ठेवतात; पण खरं तर यावर योग्य रीतीने प्रबोधन होणे गरजेचं आहे. तसेच मल्टिलेव्हल मार्केटिंग करणाऱ्या दलालांमुळे चांगले इन्शुरन्स एजंटही नाहक बदनाम झालेत आणि त्याचाही फटका उगीचंच त्यांच्या विश्वासार्हतेवर बसतो.

बहुतांश वेळी ते सुरुवात करतानाच तुम्ही अमुकअमुक लाईफ इन्शुरन्समध्ये गुंतवणूक करा, असे सांगतात. मग सर्वसामान्य माणूसही अगदी जुजबी माहितीवर आणि विश्वासापोटी एजंट जे सांगेल त्याला हो म्हणून ‘गुंतवणूक’ करून टाकतो.

खरं तर लाईफ इन्शुरन्स हा गुंतवणुकीसाठी म्हणून कधीच घ्यायचा नसतो तो कायम आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठीच घ्यायचा असतो. घरात जो कमविणारा माणूस आहे त्याला यदाकदाचित काही झाले आणि त्याचा मृत्यू झाला तर त्यांची मुलबाळं, पती अथवा पत्नी तसेच आई-वडील यांना मृत्यूपश्चातही चांगले आयुष्य जगता यावे यासाठी नंतर योग्य प्रमाणात पैसे मिळावेत या हेतूने तो काढावा.

माझा नेहमी नवतरुणांना, जे नुकतेच कमावते झालेत त्यांना सल्ला असतो की, अगदी पहिल्या पगारात स्वतःचा लाईफ इन्शुरन्स, स्वतःचा आणि कुटुंबाचा योग्य रकमेचा मेडिक्लेम काढून घ्यायला हवा.

आता प्रश्न पडतो नक्की कोणता विमा आपण विकत घ्यावा? कोणत्या कंपनीचा विकत घ्यावा? त्याचा प्लान नक्की कसा असावा? विम्याची रक्कम नक्की कशी ठरवायची? इन्कमटॅक्समध्ये याचा फायदा कसा आणि किती मिळतो? आणि सर्वात महत्त्वाचे खरंच माझ्या घरच्यांना नंतर त्याचा मोबदला मिळेल काय? एजंट आणि विमा कंपनीने नंतर त्यांना फसविले तर काय?

खरं तर हे सर्व प्रश्न सामान्य माणसाला पडतात आणि योग्य उत्तर न मिळाल्याने म्हणा किंवा सिस्टिमवर असलेल्या अविश्वासाने म्हणा किंवा या विषयावर योग्यरीत्या न झालेल्या प्रसार आणि प्रचारामुळे सहसा लोक या भानगडीत पडत नाहीत.

हल्ली सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण अत्यल्प आहे, खाजगी क्षेत्रातही पर्मनंट नोकऱ्यांचं प्रमाण घटत चाललंय आणि कॉन्ट्रॅक्टर फक्त पैसे उकळण्यासाठीच जणू काम करतात, इथपर्यंत वाईट परिस्थिती झाली. फार कमी ठिकाणी या बेसिक गोष्टींची काळजी घेतली जाते, त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी टर्म इन्शुरन्स घेणं ही काळाची गरज बनली आहे.

लाईफ इन्शुरन्स काही बेसिक प्रकार जे असतात त्यात प्लेन टर्म इन्शुरन्स हा अत्यंत चांगला आणि लोकप्रिय प्रकार आहे.

याशिवाय Endowment Assurance Plan, Whole life insurance Plan, Unit Linked Insurance Plan, Variable life insurance, Money Back Policies, Various Child Plan, Group life insurance असे वेगवेगळे प्रकार आहेत. यामधून आपल्या गरजेप्रमाणे त्याचा मासिक वा वार्षिक हप्ता पाहून तसेच आपल्या कुटुंबाच्या गरजांप्रमाणे आपण प्लान निवडावा.

माझा सल्ला असा राहील की, सुरुवातीला प्रत्येकाने प्लेन टर्म इन्शुरन्स घ्यायला हवा, यात अत्यंत कमी रकमेत मोठा इन्शुरन्स कव्हर होतो आणि याचा फार मोठा आर्थिक बोजाही वाटत नाही. तसेच वरील आणि इतर सर्वच प्लान्सबद्दल तुम्हाला इंटरनेट आणि एजंट्सकडून सविस्तर माहिती मिळेल. त्याचा अभ्यास करून, व्यवस्थित तुलना करून मगच पुढे जायला हवे.

बऱ्याचदा आपल्याकडे फायदे अत्यंत मोठ्या आणि ठळक अक्षरात दाखवले जातात आणि तोट्यांसाठी किंवा धोक्याचे इशारे अगदी दिसणारही नाहीत इतक्या लहान अक्षरांत दडविले जातात. त्यामुळे कोणावरही पूर्ण विश्वास न ठेवता संपूर्ण वाचून, खात्री करूनच पैशांचे व्यवहार करायला हवेत.

या टर्म इन्शुरन्सशिवाय अजून एक एक्सिडेंटल / अपघात विमा नावाचा प्रकार येतो, तोही पुढे जाऊन ॲड करू शकता. यात कोणत्याही कारणाने अपघात झाल्यास, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास वा त्या अपघातामुळे तुमच्या उद्योग-व्यवसाय वा उत्पन्नावर परिणाम होणार असेल तर त्याचाही विमा काढता येतो. म्हणजे यात मृत्यू न होता जीव वाचतो, पण त्यामुळे होणारे भविष्यातले आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते. त्याला सुरक्षितता देता येऊ शकते.

खरं तर विमा हा कधीच गुंतवणुकीसाठी काढायचा नसतो, गुंतवणुकीसाठी इतर अनेक हजारो मार्ग आहेत. तो सुरक्षिततेसाठीच काढायचा असतो. उगीचंच त्याला गुंतवणुकीत समाविष्ट करू नये, असे माझे वैयक्तिक मत आहे. पुढच्या काही भागांत आपण हेल्थ इन्शुरन्स, मुलांच्या शिक्षणासाठी काही चांगले प्लान्स आणि त्यामुळे इन्कम टॅक्समधून मिळणाऱ्या सुटीबद्दल माहिती घेऊ.

आता सर्वात महत्त्वाचे. आपले मित्र, नातेवाईक, सहकारी, राजकीय पक्ष असो की सरकार हे सर्व आपण आजारी असताना, अपघातावेळी वा आपल्या पश्चात कुटुंबाला फक्त सांत्वन देऊ शकतात, ते आपल्या कुटुंबाची पूर्णवेळ जबाबदारी घेऊ शकत नाहीत.

हेल्थ आणि टर्म इन्शुरन्स कोणतेही कारण न देता स्वत:च्या व कुटुंबाच्या काळजीपोटी, जबाबदारीपोटी घ्यायलाच हवा.

तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स नसेल तर आज, आत्ता, ताबडतोब काढा आणि जर असेल तर त्यात ॲक्सिडेंटल किंवा इतर अधिक रकमेचा काळानुरूप बदल करत गरजेचा विमा ॲड करा. या आर्थिक वर्षाची सुरुवात आपल्या कुटुंबाला सुरक्षेचं कवच देऊन करा. पाहा आयुष्याची लढाई मग कशी बिनधास्त लढता येते ते.

wankhedeprafulla@gmail.com

(लेखक प्रख्यात केल्विन आणि लिक्विगॅस या औष्णिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com