esakal | नेता, नेतृत्व आणि बंडखोरी!
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaja Munde

नेता, नेतृत्व आणि बंडखोरी!

sakal_logo
By
प्रकाश अकोलकर akolkar.prakash@gmail.com

बंडखोरीचा रोग कोणत्याच राजकीय पक्षाला नवा नाही आणि सत्तापदांच्या अकटोविकट संघर्षात पराभूत झालेले नेतेच मग बंडाचं निशाण घेऊन कसे उभे राहतात हे महाराष्ट्रानं तर अनेकदा अनुभवलं आहे. असाच एक बंडाचा झेंडा काल-परवा पंकजा मुंडे यांनी खांद्यावर घेतला होता. अर्थात्, ही अशी फुसकी बंडखोरी त्यांना नवी नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच आहे!’ असे उद्गार पंकजा यांनी काढले होतेच आणि मध्यंतरी एकनाथ खडसे यांना बरोबर घेऊन थेट भगवानगडावरच त्यांनी ते बंडाचं निशाण परत एकदा फडकवून बघितलं होतं.

मात्र, बंडखोरीचा हा वारसा त्यांना मिळाला तो अर्थातच आपले वडील गोपीनाथ मुंडे यांच्याकडून. पक्षात कोंडी होतेय असं दिसू लागताच गोपीनाथ मुंडे यांनीही एकदा ते निशाण हातात घेतलं होतंच. मात्र, गोपीनाथ मुंडे आणि पंकजा यांच्या बंडातील फरक असा की, तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला गोपीनाथ मुंडे यांच्यापुढं माघार घ्यावी लागली होती आणि तडजोडीचा उमेदवार म्हणूनच मग फडणवीस यांची महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करणं भाग पडलं होतं.

मात्र, पंकजा यांनी हे बंडाचं निशाण परत एकदा बाजूला ठेवताना काढलेले उद्गार तीन दशकांपूर्वीच्या काही आठवणींना उजाळा देऊन गेले. ‘नरेंद्र मोदी, अमित शहा तसंच जे. पी. नड्डा हेच माझे नेते आहेत,’ असं सांगत त्यांनी फडणवीस तसंच चंद्रकांत पाटील यांच्या संबंधांतील प्रश्नांना बगल दिली. ते पाहून शरद पवार तसंच ए. आर. अंतुले यांच्या ‘हृद्य’ संबंधाची आठवण माझ्या मनात उमलून आली.

इंदिरा गांधी यांच्या विरोधात सत्तरच्या दशकात फडकवलेलं बंडाचं निशाण खांद्यावरून उतरवत पवारांनी १९८६ मध्ये थेट राजीव गांधी यांच्याच उपस्थितीत औरंगाबादेत आपला ‘एस काँग्रेस’ मूळ काँग्रेसमध्ये विलीन करून टाकला. त्यानंतरच्या दोन वर्षांनी अखेर त्यांच्या हाती मुख्यमंत्रिपद आलं, तेव्हा ‘पवार भले मुख्यमंत्री झाले असोत, ते माझे नेते नाहीत!’ अशा आशयाचं अंतुल्यांचं विधान मोठीच खळबळ उडवणारं ठरलं होतं आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणाला काही वेगळं वळण लागतं की काय असं वातावरण उभं राहिलं होतं. तेव्हा अंतुले यांची मुलाखत घेणं हाच एकमेव पर्याय होता. बरेच आढेवेढे घेत त्यांनी वेळ दिली. मरीन ड्राइव्हवर थेट चौपाटीच्या समोर ‘अल् सबाह’ या इमारतीत असलेल्या त्यांच्या निवासस्थानी त्यानिमित्तानं एका सहकाऱ्याबरोबर जाणं झालं.‌ मुलाखत सुरू झाली आणि त्यांनी सांगून टाकलं : ‘महाराष्ट्रात एकदा बाळासाहेब खेरही मुख्यमंत्री झाले होते; पण ते आमचे नेते होते काय? तर बिलकूलच नाही. आमचे नेते हे अर्थातच ‘वीर’ नरीमन होते. खेर यांची मुख्यमंत्रिपदी निवड ही केवळ राजकीय तडजोडीपोटी झाली होती.’

अंतुले यांच्या विधानाला एक कडवट अशी झालर होती.आणि पवारांची निवडही केवळ राजकीय तडजोड म्हणूनच झाल्याचं ते सूचित करत होते. खरं तर अंतुले यांनी स्वत:ही १९८० च्या दशकात सिमेंटवाटप आणि ‘प्रतिभा प्रतिष्ठान’ यांच्यातील परस्परसंबंधांवर मुंबई उच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केल्यावर काँग्रेस हायकमांडविरोधात बंडाचा झेंडा फडकवला होताच आणि त्यानंतर अल्पावधीतच ते स्वगृहीही परतले होते.

पण काळाचा महिमा अगाध असतो हेच खरं!

पवारांच्या खांद्यावर मुख्यमंत्रिपदाची धुरा आल्यानंतर लगोलग आलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अंतुल्यांना काँग्रेसनं तिकीट दिलं होतं. तेव्हा आपल्या प्रचारासाठी ‘नेते नसलेल्या’ पवारांनाच बोलावणं त्यांना कसं भाग पडलं होतं तेही मग बघायला मिळालं.

पंकजा यांनी आपल्या तथाकथित नाराज कार्यकर्त्यांसमोरच्या भाषणात अनेक सूचक विधानं केली. त्यातलं एक आहे : ‘भागवत कराड आज ६५ वर्षांचे आहेत आणि मी लहान आहे...केवळ ४० वर्षांचीच आहे...’ असं त्या म्हणाल्या. या विधानालाही एक संदर्भ आहे असं म्हणता येईल आणि तो म्हणजे, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख यांनी शरद पवार यांच्याच विरोधात केलेल्या बंडाचा. पवार तेव्हा मुख्यमंत्री होते आणि या मंत्रिगणानं त्यांच्या पुढं १९९१ मध्ये मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर आव्हानाचा पवित्रा घेतला होता. पवार अर्थात त्यामुळे जराही विचलित झाले नाहीत. सुधाकरराव नाईक यांना सोबत घेऊन ते आमदारांची जुळवाजुळव करत राहिले. इकडे सुशीलकुमार-विलासराव आदी ‘बंडखोर’ तर ‘आपल्याला थेट राजीव गांधी यांचाच पाठिंबा आहे आणि त्यामुळे ‘आता झालीच की पवारांची मुख्यमंत्रिपदावरून उचलबांगडी!’ ’ अशा थाटात वावरत होते. मात्र, प्रत्यक्षात आठ-पंधरा दिवसांतच ते बंड फसलं.

आमदारांचा भरभक्कम पाठिंबा हा पवारांनाच आहे, असं राजीव गांधी यांच्या लक्षात आलं आणि या बंडखोरांना पांढऱ्या शेल्यात हात बांधून पवारांच्या पुढं जाऊन उभं राहावं लागलं. तेव्हा विलासरावांपेक्षा त्यांचे समर्थकच अधिक नाराज झाल्याचं, त्यांच्या ‘रामटेक’ या निवासस्थानी जमणाऱ्या गर्दीवर एक नजर टाकली तरी, लक्षात यायचं. त्या समर्थकांना दिलासा देण्यासाठी विलासराव तेव्हा एकच वाक्य उच्चारायचे : ‘एज इज ऑन माय साईड... तुम्ही काय टेन्शन घेताय...’

आज भागवत कराड यांना मंत्री केल्यानंतर पंकजा जे काही वयाचे दाखले देत आहेत त्यातूनही हेच सूचित होतंय. त्या आज चाळिशीत प्रवेश करत आहेत आणि त्यामुळे भाजपनं राजकारण्यांसाठी जाहीर केलेली ७५ ही वयोमर्यादा लक्षात घेतली तर वयाच्या हिशेबानं पुढचं मैदान आणखी काही दशकं त्यांच्या बाजूचं असेल हेही खरंच. मात्र, पंकजा यांनी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी...सुशीलकुमार-विलासराव यांचं बंड पवार का मोडून काढू शकले? - आणि गोपीनाथ मुंडे यांच्या बंडाची दखल घेणं भाजपनेतृत्वाला का भाग पडलं होतं? तर पवार असोत की गोपीनाथ मुंडे असोत, दोघंही खऱ्या अर्थानं ‘लोकनेते’. त्यांचा प्रभाव हा राज्यव्यापी...आणि मुख्य म्हणजे, नेतेपद हे त्यांना ना वारसा हक्कानं मिळालं होतं, ना पक्षश्रेष्ठींच्या आशीर्वादानं. नेतेपदाचे उपजत गुण अंगी असल्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाला राज्यव्यापी मान्यता मिळाली.

त्यापलीकडची बाब म्हणजे राज्यात मोठ्या संख्येनं आमदार निवडून आणत ताकद दाखवण्याची कुवत हे या दोन्ही नेत्यांचं वैशिष्ट्य.

त्यामुळेच राजकारणात बंडाचा झेंडा खांद्यावर घेताना, नेता आणि नेतृत्व यांच्यातील फरक जाणून घेणं जितकं महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर आपली राजकीय ‘पत’सुद्धा आपण खुशमस्कऱ्यांच्या गोतावळ्यातून बाहेर पडून समजून घ्यायला हवी.

पवारांनी मोडून काढलेलं बंड आणि गोपीनाथ मुंडे यांचं यशस्वी बंड या दोहोंचा अर्थ हाच आहे!

loading image