बंडखोरीचे दिवस !

बंडांचे दिवस शिवसेनेला नवे नाहीत. शिवसेनेची स्थापना शिवाजी पार्क परिसरातल्या ‘७७, कदम मॅन्शन’ या पत्त्यावरील प्रबोधनकारांच्या एका छोटेखानी घरात १९ जून १९६६ रोजी झाली.
Shiv Sena
Shiv SenaSakal
Summary

बंडांचे दिवस शिवसेनेला नवे नाहीत. शिवसेनेची स्थापना शिवाजी पार्क परिसरातल्या ‘७७, कदम मॅन्शन’ या पत्त्यावरील प्रबोधनकारांच्या एका छोटेखानी घरात १९ जून १९६६ रोजी झाली.

बंडांचे दिवस शिवसेनेला नवे नाहीत. शिवसेनेची स्थापना शिवाजी पार्क परिसरातल्या ‘७७, कदम मॅन्शन’ या पत्त्यावरील प्रबोधनकारांच्या एका छोटेखानी घरात १९ जून १९६६ रोजी झाली, तेव्हा तिथं आणि पुढं बाळासाहेब ठाकरे यांचा ‘मातोश्री’ हा टुमदार बंगला वांद्र्याच्या कलानगरात उभा राहिला, तिथं संध्याकाळी त्यांच्या सहकाऱ्याबरोबर रंगीन मैफली झडत. दिलखुलास गप्पा होत. ...आणि बघता बघता मराठी माणसांची ‘अभेद्य’ असं विशेषण मोठ्या अभिमानानं मिरवणारी संघटना उभी राहिली.

मात्र, या सुखद वातावरणाचं रूपांतर पुढे धाक, दरारा आणि दहशत यांच्यात होऊन गेलं. संघटनेचं विशेषण ‘अभेद्य’ असलं, तरी तिथल्या चिऱ्यांना थोडे फार तरी तडे अधून-मधून पडत असत. आजच्या शिवसैनिकांना बाळासाहेबांना आव्हान देणारे छगन भुजबळ, शिवसेनेवर घणाघाती आरोप करणारे नारायण राणे आणि पुढे बाळासाहेबांचं वर्णन ‘विठोबा’ असं करून संघटनेला ‘अखेरचा जय महाराष्ट्र!’ करणारे राज ठाकरे असोत; या सर्वांनी फडकवलेल्या बंडाच्या निशाणाच्या आठवणी आज एकनाथ शिंदे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे जागा झाल्या आहेत. मात्र, त्यापूर्वीच्या काळात, जेव्हा महाराष्ट्राची सत्ता तर सोडाच, मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्याचं स्वप्नही कोणी बघितलं नसेल, तेव्हाही अशी छोटी छोटी बंडं झालीच होती की...

शिवसेनेत मनोहर जोशी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, दत्ताजी नलावडे आदी पहिल्या फळीचे बिनीचे शिलेदार स्थापनेनंतर वर्ष सव्वा वर्षांनं दाखल झाले. त्याआधीच्या अगदी सुरुवातीच्या काळात बळवंत मंत्री. माधव देशपांडे, श्याम देशपांडे, अरूण मेहता आणि बंडू शिंगरे आदी ‘सैनिक’ बाळासाहेबांचे जिवाभावाचे सहकारी होते.

संघटनेची उभारणी आणि लिखापढी आदी काम बळवंतराव मंत्रीच करत होते. मात्र, संघटनेत कोणताही निर्णय हा लोकशाही पद्धतीने व्हावा, अशी त्यांची विचारधारा होती. नेमक्या याच मुद्यावर त्यांचे बाळासाहेबांशी मतभेद झाले आणि त्यांनी आपल्या विचारांशी सहमत असलेल्या ‘सैनिकां’ची दादरमध्ये एक बैठक बोलवली. सत्तरचं दशक उजाडण्याआधीचा तो काळ होता. या बैठकीची कुणकुण दादरमधील ‘निष्ठावान’ सैनिकांना लागली आणि संतप्त होऊन त्यांनी तिथं घुसून मंत्रींची दादर परिसरात चक्क धिंड काढली.

बळवंतराव मंत्री हे नाव शिवसेनेच्या नोंदीतून कायमचं पुसलं गेलं. पुढे १९७० मध्ये म्हणजे काँग्रेसमध्ये पहिली मोठी फूट पडल्यानंतर काँग्रेसच्या मुंबई महापालिकेतील दोन गटांपैकी कुणा ना कुणाशी हातमिळवणी करून शिवसेना काही पदं मिळवायला लागली. तेव्हा एकदा अचानक शिवसेनेकडे चक्क महापौरपद चालत आलं आणि त्या पहिल्या-वाहिल्या मोठ्या पदासाठी बाळासाहेबांनी डॉ. हेमचंद्र गुप्ते या सत्शील कार्यकर्त्याची निवड केली. मात्र, पुढच्या पाच-सात वर्षांतच ते संघटनेतील कार्यपद्धतीला म्हणजेच बाळासाहेबांच्या ‘एकाधिकारशाही’ला कंटाळले आणि संघटनेतून बाहेर पडले. आणीबाणीनंतर स्थापन झालेल्या जनता पक्षात ते दाखल झाले. १९७८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनोहर जोशी यांचा पराभव केला.

अरूण मेहता हे शिवसेनेच्या स्थापनेनंतरच्या पहिल्या वर्ष-दोन वर्षांतच बाळासाहेबांचे विश्वासू सहकारी बनले होते. त्याच काळात बाळासाहेबांनी ‘भारतीय कामगार सेना’ स्थापन केली आणि अरूणभाईंना सरचिटणीसपदी नियुक्त केलं. मात्र, त्यांचेही बाळासाहेबांशी मतभेद झाले. त्यास अर्थातच संघटनेची बाळासाहेबांनी घालून दिलेली कार्यपद्धती कारणीभूत होती. पुढे हे मेहता काँग्रेसमध्ये जाऊन शरद पवार यांचे निष्ठावान सहकारी बनले. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री म्हणूनही काही काळ त्यांनी उत्तम काम केलं होतं. बाळासाहेबांना पुढे ‘आव्हान’ देण्याचं काम माधव देशपांडे या त्यांच्या सुरुवातीच्या काळातील सहकाऱ्याने केलं होतं. बाळासाहेबांना ‘सेनापती’ ही पदवी आपणच दिली, असं ते अखेरपर्यंत सांगत आणि म्हणून ते स्वत:ला ‘सरसेनापती’ म्हणवून घेत ! तसं त्यांनी आपल्या व्हिजिटिंग कार्डावर चक्क छापूनही घेतलं होतं ! १९९० च्या आसपास त्यांनीही एकदा शिवसेनेत लोकशाही असावी म्हणून दादरमध्ये एक सभा बोलवली.

संघटनेत घराणेशाही आहे, वगैरे आरोपही त्यांनी मोठा आवाज लावून केले. तेव्हा बाळासाहेबांनी तमाम नेते आणि शिवसैनिकांना गाफील अवस्थेत पकडलं आणि एका भल्या सकाळी ‘सामना’मध्ये ‘शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र!’ या शीर्षकाचा अग्रलेख पहिल्या पानावर बाळासाहेबांच्या सहीनिशी प्रसिद्ध झाला.

संघटनेत मोठंच वादळ उठलं. शिवसैनिकांचे जत्थेच्या जत्थे ‘मातोश्री’भोवती जमा झाले. संघटनेच्या सर्वच बड्या नेत्यांनी बाळासाहेबांनी (हा तथाकथित) राजीनामा मागे घ्यावा, म्हणून सेनाभवनात धरणं धरलं. संध्याकाळी सेनाभवनासमोरच झालेल्या सभेत बड्या नेत्यांना धक्काबुक्की झाली. ‘सैनिकां’नी त्यांच्या ‘लाडक्या’ साहेबांशिवाय कोणालाही व्यासपीठावर जाऊ दिलं नाही. मग खुशीत आलेल्या ‘साहेबां’नी माधव देशपांडे यांचे सारे आरोप खोटे आहेत, असं शिवसैनिकांकडूनच वदवून घेतलं आणि मोठ्या आनंदानं साहेब परत शिवसेनेत आले !

बंडू शिंगरे हेही परळ-लालबाग या शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातील बालेकिल्ल्यातील एक निष्ठावान शिवसैनिक. मात्र, पुढे शिवसेनेत मनोहर आणि सुधीर जोशी, नवलकर आदींबरोबरच छगन भुजबळ यांचा शब्द अधिक वजनदार ठरू लागला आणि संघटनेतून बाहेर पडून, त्यांनी ‘प्रति-शिवसेना’ स्थापन केली. मात्र तोपावेतो बाळासाहेबांचा करिष्मा वाढत चालला होता आणि मग त्या झंझावातात ही ‘प्रति-शिवसेना’ बघता बघता वाऱ्यावर उडून गेली. १९९० याच दशकातील महापालिका निवडणुकीत निष्ठावान शिवसैनिकांना डावलल्याचे आरोप झाले आणि वाइरकर ‘मास्तरां’बरोबरच अनेकांनी बंडाचं निशाण फडकवलं. मात्र, बाळासाहेबांच्या करिष्म्यापुढे त्यांचीही पत्रास मतदारांनी राखली नाही.

अशी अनेक छोटी-मोठी बंडं पहिल्या दोन दशकांत शिवसेनेनं बघितली. मात्र, शिवसेनेतील खऱ्या अर्थानं पहिलं धक्का देणारं बंड हे छगन भुजबळ यांचंच होतं. १९९१ मधील भुजबळांच्या या उठावानंतर पुढच्या १५ वर्षांतच नारायण राणे तसंच राज ठाकरे हेही शिवसेनेतून बाहेर पडले. मात्र, या तीन नेत्यांच्या बंडात आणि आधीच्या तुलनेनं छोट्या नेत्यांच्या बंडखोरीत मूलभूत फरक आहे. बाळासाहेबांच्या कार्यपद्धतीला आव्हान देणारे ते सारे निष्ठावान सैनिकच होते आणि एका विशिष्ट ध्येयानं त्यांनी शिवसेनेला वाहून घेतलं होतं. ‘सत्ता’ नावाचं स्वप्न त्यांना त्या काळात कधी पडणंच शक्य नव्हतं. सेना उभी करण्यासाठी त्यांनी हाडाची अक्षरश: काडं केली होती. कधी दुसऱ्या पक्षात जाण्याचा साधा विचारही त्यांच्या मनात येणं शक्य नव्हतं. ते फक्त त्यांच्यापैकी अरुण मेहता यांनी केलं. शिवाय, ही सारी बंडखोरी शिवसेना सत्तेच्या आसपासही नसताना झाली होती आणि ती केवळ बाळासाहेबांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात होती.

या पार्श्वभूमीवर भुजबळ असोत की राणे की राज यांची बंडखोरी निव्वळ सत्ताकारणासाठी झाली होती, हे एका झटक्यात ध्यानात येतं.... मात्र, या तिघांनी फडकवलेल्या बंडखोरीच्या निशाणापेक्षाही एकनाथ शिंदे यांचं निशाण अगदीच वेगळं आहे. आपण शिवसेना विरोधात बंडखोरी केलेलीच नाही, तर आमचीच खरी शिवसेना आहे, असं हे एकनाथराव सांगत आहेत... याचा अर्थ स्पष्ट आहे आणि तो म्हणजे त्यांना शिवसेनेची संघटना हवी आहे... आणि शिवाय हवा आहे तो केवळ नेतृत्व बदल! -म्हणजेच उद्धव ठाकरे नको आहेत... अर्थात, शिंदे यांनी हा डाव अर्थातच केवळ आणि केवळ सत्तेतील मोठ्या पदासाठी टाकला आहे आणि त्याची गोळीबंद पटकथा ही भाजपनंच लिहिलेली आहे!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com