जनतेला बेडूकउडया अजूनही आवडत नाहीत!

प्रकाश दांडगे
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

अखेर निकाल लागला.
सुरेश कलमाडी यांचा पराभव झाला. काँग्रेसचे विठ्ठल तुपे विजयी झाले.
कलेक्टर निकाल जाहिर करत असतांना मला आठवत होते ते ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू.

सध्याच्या घडामोडी सुरु असताना माझी एक पोस्ट पुन्हा टाकतो आहे. या पोस्टमध्ये ज्यांचा संदर्भ आहे ते अरुण साधू सर आज नाहित.. शरद पवार पुन्हा केंद्रस्थानी आहेत, तेव्हा ते काँग्रेसमधे होते, राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झालेला नव्हता, सुरेश कलमाडीही आहेत पण एकाकी पडले आहेत तर विठ्ठल तुपे यांचे निधन झाले आहे. त्यांचा मुलगा चेतन राष्ट्रवादीकडून आमदार झाला आहे. अविनाश धर्माधिकारी मध्ये शिवसेनेत गेले होते, आता राजकारणात फार सक्रिय दिसत नाहीत.

मुळ पोस्ट अशी होती...
1998 पुणे लोकसभा निवडणुक... शरद पवार, सुरेश कलमाडी आणि अरुण साधू....

पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे विठ्ठल तुपे, भाजप-सेनेच्या पाठिंब्यावर पुणे विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार सुरेश कलमाडी आणि भाजपनं तिकिट नाकारलेले अविनाश धर्माधिकारी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होते. तेव्हा सोनिया गांधी राजकारणात सक्रिय झालेल्या नव्हत्या. राहुल आणि प्रियंका राजकारणापासून दूर होते. शरद पवार काँग्रेसमध्येच होते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म व्हायचा होता. काँग्रेसचे अध्यक्ष होते सीताराम केसरी !

पुण्यात तेव्हा कलमाडींची हवा होती. पुणे महापालिका कलमाडी गटाच्या ताब्यात. क्रीडा विश्वावर कलमाडींचा वरचष्मा. पुण्यात जे काय व्हायचे त्याचा निर्णय कलमाडी हाऊसवर व्हायचा. कर्वेरोडला लागून असलेलं दोन मजली कलमाडी हाऊस म्हणजे सत्तेचं केंद्र होतं. कार्यकर्ते तिथं जमायचे. कलमाडी विमानतळावर यायचे तेव्हा त्यांच्या स्वागताला जणू जत्रा भरायची. कलमाडी आपल्या केबीनमध्ये झुलत्या खुर्चीत बसून सूत्र हलवायचे, तिथूनच पदांचे वाटप व्हायचे, असा तो काळ. कलमाडींचा पुणे फेस्टिवल म्हणजे डोळे दीपवणारा अनुभव असायचा. हेमा मालिनीपासून अमरीश पुरींपर्यत ते गुरुदास मानपासून जगजितसिंग पर्यंत सगळे तिथं यायचे. प्रायोजकांची कमी नव्हती कारण कलमाडी सत्तेत होते. काँग्रेस हाऊसचं महत्व कमी होऊन कलमाडी हाऊसचं महत्व वाढल्याची चिंता खऱ्या काँग्रेसजनांना होती. विठ्ठलराव गाडगीळ आणि त्यांचा गट याविरुद्ध आवाज उठवायचा. आता अनंत गाडगीळ हा वारसा चालवात. तर कलमाडी गट जोरात होता.....

पण दिल्लीची हवा ओळखण्यात तरबेज असलेल्या कलमाडींनी उडी मारली. काँग्रेस कमजोर झाली आहे असा त्यांचा समज झाला. मग कलमाडींनी बंड केलं आणि ते बाहेर पडले. भाजप-सेनेच्या पाठिंब्यावर अटल बिहारी वाजपेयींचे हात मजबूत करायला सुरेश कलमाडींनी उमेदवारी जाहिर केली! काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पुणे विकास आघाडीही स्थापन केली होती.. पुण्याचा विकास करायचा आहे... हे त्याचं प्रत्येक भाषणात पालुपद असे. कलमाडी बाहेर पडल्यानंतर पुणे काँग्रेसची सगळी सूत्र शरद पवारांनी हाती घेतली. आपले विश्वासू हडपसरचे विठ्ठल तुपे यांना पवारांनी रिंगणात उतरवले. एकेकाळी पवारांनींच राजाकारणात पुढे आणलेल्या कलमाडींना धुळ चारण्याचा विडाच शरद पवारांनी उचलला. कलमाडी गेले तरी काहीच फरक पडत नाही, पुण्यात काँग्रेस लढेल आणि विजयी होईल असा विश्वास कार्यकर्त्यांना देत पवारांनी पुणे पिंजून काढायला सुरवात केली.

तर, दुसरीकडे कलमाडींचा वारू चौफेर उधळला होती. पुण्याचा विकास करायचाय...पुणे विकास आघाडीच्या सुरेश कलमाडींना मत द्या... वाजपेयींचा हात मजबूत करा... असा नारा गल्लोगल्ली दिला जात होता. अटलबिहारी वाजपेयींनी कलमाडींसाठी सभाही घेतली. त्यात त्यांनी कलमाडींना विजयी करण्याचं आवाहन करण्याबरोबरच अविनाश धर्माधिकारींनी उमेदवारी मागे घ्यावी असं आवाहनही धर्माधिकारींचं नाव न घेता केलं.(धर्माधिकारींनी निवडणूक का आणि कशी लढवली तो एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.) शिवसेनेनं मात्र कलमाडींना पाठिंबा देतांना खास ठाकरी शैलीत दणके दिले. पाठिंबा मिळवण्यासाठी मातोश्रीवर गेलेल्या कलमाडींना...’तिकडून बेडकासारखी उडी मारुन इकडे आलात.. विजयी झाल्यावर पुन्हा उडी मारुन तिकडे जाऊ नका…. ‘ असा दमच बाळासाहेबांनी कलमाडींना भरला... कलमाडी आणि बेडूक अशी तुलना करुन बाळासाहेबांनी विरोधकांना एक मुद्दाच मिळवून दिला...

सुरेश कलमाडी समर्थकांसाठी कलमाडी निवडून आल्यात जमा होते. पुण्यात भाजप-सेनेची हुकमी तीन सव्वातीन लाख मतं होती. कलमाडींसोबत पुणे महानगरपालिकेतले जवळपास पन्नास नगरसेवक होते. प्रत्येकाची दोन हजार मतांची ताकद जरी धरली तरी लाखभर मतं त्यांनी मिळवून दिले असते. आणि कलमाडी यांनी आपल्या खास तंत्राचा वापर करुन काही मतं नक्कीच खेचली असती... म्हणजे चार-साडेचार लाख मतांचा हिशोब तयार होता... कलमाडी समर्थकांच्या मते निवडणूक सहज होती...

तर दुसरीकडे शरद पवारांनी आपली सगळी ताकद विठ्ठल तुपेंच्या मागे उभी केली होती. विठ्ठल तुपेंची प्रतिमाही चांगली होती. काँग्रेस परंपरेतला मतदार काँग्रेस सोडून भाजप-सेनेला मतदान करणे शक्य नव्हते... पण ताकद ‘मी म्हणजेच पुणे’ म्हणणा-या सुरेश कलमाडींशी होती...प्रचाराची रणधुमाळी जोरात झाली... दोन्ही बाजुंनी जोर लावला... अखेर निकालाचा दिवस उजाडला.... काँग्रेसचे विठ्ठल तुपे 1998 च्या पुणे लोकसभा निवडणुकीत विजयी झाले... कलमाडींचा पराभव झाला.

आता मुख्य मुद्दा. कलमाडींचा पराभव होणार हे आधीच ठामपणे सांगणं शक्य होतं का? कलमाडींनी बंड केले त्या दिवशी मी पत्रकार-लेखक सुरेश कलमाडी काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडले आणि त्यांनी भाजप-सेनेच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्याच दिवशी मी एका ज्येष्ठ पत्रकाराची भेट घ्यायला गेलो होतो. हा पत्रकार म्हणजे मराठीतला नामवंत कथा-कादंबरीकार अरुण साधू ! त्याच्या राजकीय कांदबऱ्या म्हणजे क्लासिकच. मुख्यमंत्री कुणीही येवो...मंत्री कुणीही होवो.. राजकीय परिस्थिती काहीही असो सगळ्याचं चित्रण त्यांच्या कादंबऱ्यात असणारच....त्यांची इंग्रजी पत्रकारिताही राष्ट्रीय पातळीवरची... पण स्वभावानं मितभाषी..व्यक्तिमत्व सौम्य पण बोलणे ठाम. पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविभागाचे ते प्रमुख म्हणून अरुण साधू आले होते. मला त्यांच्याबद्दल नेहमीच आदर वाटत आला होता. आवडता लेखक म्हणून मी त्यांना भेटायला गेले होतो. तेव्हा मी पुण्यात एका इंग्रजी वृत्तपत्रात बातमीदारी करत होतो.

बोलता बोलता कलमाडींचा विषय निघाला. ‘’कलमाडी पडणार...’ अरुण साधू सहजपणे पण ठाम स्वरात म्हणाले.
मी चमकलो.

‘’कसे काय?” मी कलमाडी कसे जिंकणार याचा हिशोब मांडत म्हणालो.. भाजप-सेनेचे 3 लाख हुकमी मते.. कलमाडींचा माहौल वगैरे वगैरे...
“कलमाडी पडणार”
ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू आपल्या निष्कर्षावर ठाम होते.
“तुम्ही असं का म्हणता,’ मी विचारले.
‘’हे पहा,” अनेक निवडणुका आणि अनेक राजकारण्यांना जवळून पाहिलेले अरुण साधू उत्तरले.

‘मतदारांना असा धोकेबाज उमेदवार आवडत नाही. काल कलमाडी काँग्रेसमध्ये होते. लगेच उडी मारुन भाजप-सेनेचे उमेदवार झाले. पुण्यातील मतदारांना हे आवडणार नाही, कलमाडी हरणार,.. ’ अरुण साधूंनी अंतिम निर्णय दिला.

वृत्तपत्रविद्या विभागासमोरच्या रुपालीच्या नेहमीच्या अड्यावर चहा पिऊन मीही प्रचार कव्हर करायला मग बाहेर पडलो. जोरदार प्रचार झाला. आरोप प्रत्यारोप झाले. निवडणुकीत होतात तसे वाद झाले. जोरदार सभा झाल्या. अटलबिहारी वाजपेयी आले. सोनिया गांधी आल्या. शरद पवारांनी सगळी सुत्रं हलवली.

अखेर निकाल लागला.
सुरेश कलमाडी यांचा पराभव झाला. काँग्रेसचे विठ्ठल तुपे विजयी झाले.
कलेक्टर निकाल जाहिर करत असतांना मला आठवत होते ते ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prakash Dandge writes about rabel in Politics and Sharad Pawar