गोंजारल्याने वाघाची जखम भरेल? 

गुरुवार, 22 मार्च 2018

देशातील वातावरण मोदी विरोधात आहे असे नाही. आजही लोकांना असे वाटते की मोदी पुन्हा सत्तेत यावेत. पण, त्यांचा भाजपच मित्रांना दुय्यम वागणूक देत आहे. त्याचे परिणाम जे व्हायचे ते होत आहे. जरी मित्र स्वतंत्र लढले तरी भविष्यात ते एकत्रही येऊ शकतात. शिवसेनेबरोबर महाराष्ट्रात तरी कॉंग्रेस राष्ट्रवादी जावू शकत नाही. आमच्याशिवाय तुमचे काही चालू शकणार हे शिवसेनेला पुन्हा एकदा भाजपला दाखवून द्यायचे आहे. 
 

आणखी दीड वर्षानी महाराष्ट्रात विधानसभेचे रणांगण सुरू होईल. या रणांगणांत पूर्ण ताकदीनिशी उतरण्याची तयारी आतापासून शिवसेनेसह सर्वच पक्षांनी केलेली दिसते. 2014 मध्ये जसे तोंडघशी पडावे लागले, विश्वासघात झाला तसे यावेळी होणार नाही याची दक्षता शिवसेना घेत असावी. त्यामुळेच की काय गेल्या साडेतीन वर्षापासून सत्तेत असलेल्या शिवसेनेने भाजपला झोड झोडण्याची एकही संधी सोडली नाही. 

देशात भाजप सुसाट असली तरी यूपी आणि बिहारमधील निकालाने या पक्षाच्या नेत्यांचे पाय जमीनवर आले आहेत. तर दुसरीकडे विरोधाकांच्या बाहूत लढण्याचे बळ आले आहे. भाजपचा पराभव झाला की अत्यानंद इतर कोणाही पेक्षा शिवसेनेला तो अधिक होतो हे वारंवार दिसून आले आहे. हा पक्ष 2019चीच प्रतीक्षा करतो आहे. 2014 चा वचपा शिवसेनेला काढायचाय आणि त्यासाठी जिवाचे रान ती करेल असे चित्र सध्या तरी दिसते आहे. 

हे सर्व येथे कथन करायचे कारण असे की 2014 मध्ये भाजपची जी हवा होती. ती राहिली नाही असे विरोधकांना वाटते त्यामुळे विरोधक कधी नव्हते तितके आक्रमक बनले आहे. त्यामुळेच की काय महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनाही आता शिवसेना खूप जवळची वाटत आहे. आगामी निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढतील असा विश्वास या भाजपचे एक वजनदार नेते आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंठीवार यांनी व्यक्त केला. कॉंग्रेस, राष्ट्रवादीला सत्तेपासून रोखण्यासाठी आम्ही एकत्र येऊ. भले आमच्यात काही मतभेद असले तरीही असेही सुधीरभाऊंनी म्हटले आहे. जे भाऊंना वाटते या पक्षाच्या अन्य नेत्यानाही वाटत आहे. 

भाऊंचे उदात्त विचार ऐकून तसे बरे वाटले. त्यांचे हे विचार 2014 मध्ये कुठे गेले होते. त्यावेळी शिवसेना हा आपला जिवश्‍चकंठश्‍च मित्र आहे. त्याला असे वाऱ्यावर सोडणे योग्य नाही. गेल्या पंचवीस वर्षापासूनच्या मैत्रीचा क्षणात कंडका पाडला. त्यावेळी या मित्राच्या मनाला काही तरी वाटायला पाहिजे होते. इतके निष्ठूर मन मित्राचे का बनले. काही झाले तरी युती तोडायची नाही असे भाऊंना 2014 मध्ये का वाटले नाही अशी भावना शिवसेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली तर ते चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही. 

खरेतर शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष वेगळे असले तरी ते कॉंग्रेसविरोधात हातात हात घेऊन नेहमीच लढले आहेत. त्यांनी बलाढ्य अशा कॉंग्रेसला लोळविले आहे. मात्र मोदींच्या लाटेत परममित्राशी भांडण उखरून काढले आणि तडकाफडकी मैत्री तोडून टाकली. एकदोन जागेवरून नेहमीच या दोन्ही पक्षात वाद झाले होते. यापूर्वीही युती तुटण्याचे प्रसंग आले होते. तरीही ती अखंड राहिली. किरकोळ कारणांसाठी युती तुटणार नाही याची काळजी नेहमीच बाळासाहेब ठाकरे गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांनी घेतली होती. पण, पुढे राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदींचा उदय झाला आणि देशाच्या राजकारणाची समीकरणेच बदलली. युतीवरही त्याचा जो परिणाम व्हायचा होता तो झालाच. 

त्रिपुरातील विजयाचा आनंद भाजप देशभर लुटत असताना यूपीतील विशेषत: गोरखपूरच्या पराभवाने या विजयात विरजण टाकले. त्यामुळे आतापासून कर्नाटकात विजयी झालो या थाटात वावरत असलेल्या भाजप नेत्यांचे चेहरेही काळवंडले. या सर्व घडामोडीनंतर भाजप नेत्यांना शिवसेना जवळची वाटू लागली. त्यांना मैत्री आठवत आहे. मित्र धर्म आठवला. याची आठवण त्यांना 2014 मध्ये का आली नाही ? हा प्रश्‍न शिवसेना करू शकते. 

सुधीरभाऊंच्या युतीसंदर्भातच्या विधानाचा जो समाचार घ्यायचा आहे तो शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी घेतला आहे. ते म्हणाले, आमच्या टेकूवर सत्ता उपभोगत असताना तुम्ही आम्हाला जी वागणूक दिलीय ती कधीच विसरता येत नाही. यूपी, बिहारमध्ये पराभव झाल्यानंतर भाजपला युतीची आठवण होऊ लागली. पण, आम्ही स्वबळावर लढू. युतीबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील, भाजप नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले. 

केंद्रात भाजप बहुमतात आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांची त्यांना गरज नाही असे त्यांना वाटत होते. 2019 मध्ये आणखी जागा वाढतील असा अतिआत्मविश्वास निर्माण झाला होता. अतिआत्मविश्वासाबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही बोलले आहेत. त्यामुळे मित्र पक्षांबरोबर थोड सबुरीने घ्यायला हवे हे त्यांना सांगणार कोण ? तिकडे "टीडीपी' "एनडीए'तून बाहेर पडली आहे. इकडे शिवसेनेसह कमीअधिक प्रमाणात सर्वच मित्र नाराज आहेत. आपले रामदास आठवले साहेबही भाजप बहुमताने सत्तेवर येणार नाहीत असे कधी तरी बोलून जातात. ज्या भाजपला सत्तेवर आणण्यासाठी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टीही रणांगणात उतरले होते ते आता कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. 

देशातील वातावरण मोदी विरोधात आहे असे नाही. आजही लोकांना असे वाटते की मोदी पुन्हा सत्तेत यावेत. पण, त्यांचा भाजपच मित्रांना दुय्यम वागणूक देत आहे. त्याचे परिणाम जे व्हायचे ते होत आहे. जरी मित्र स्वतंत्र लढले तरी भविष्यात ते एकत्रही येऊ शकतात. शिवसेनेबरोबर महाराष्ट्रात तरी कॉंग्रेस राष्ट्रवादी जावू शकत नाही. आमच्याशिवाय तुमचे काही चालू शकणार हे शिवसेनेला पुन्हा एकदा भाजपला दाखवून द्यायचे आहे. 

सुधीरभाऊंना भले कितीही वाटत असले की युती व्हावी. तरीही त्यांच्या हातात फार काही आहे असे वाटत नाही. आगामी दीड वर्षात देशात काय घडते यावरच युतीचे भविष्य अवलंबून असेल. भाजपवाले काही सांगत असले तरी शिवसेना त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही हे रामदासभाईंसह शिवसेना नेत्यांच्या विधानावरून लक्षात येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prakash Patil writes about Shiv Sena BJP alliance