भाजपचा नवभारत

प्रकाश पवार 
रविवार, 26 मे 2019

नेमस्त राष्ट्रभक्ती, हिंदुत्व दहशतवाद या संकल्पना जनता नाकारते, हे नवभारत संकल्पनेद्वारे लक्षात घेऊन भाजपने आक्रमक राष्ट्रवाद आणि आक्रमक हिंदुत्वास जनमान्यता आहे, अशी भूमिका घेतली. त्यांची ही भूमिका किरकोळ मतभेद होऊन सरतेशेवटी जनतेने मान्य केली, असे दिसते. 

सोळावी-सतरावी लोकसभा निवडणूक ही नवभारताची निवडणूक झाली. नवभारत ही भाजपची संकल्पना आहे. नरेंद्र मोदींच्या पुढाकारातून ती आकाराला आली. नवभारताच्या संकल्पनेची किंवा राजकारणाची चार वैशिष्ट्ये दिसतात. सोळाव्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे सतरावी लोकसभा निवडणूकदेखील भारतीय निवडणूक इतिहासातील मैलाचा दगड ठरली आहे. याचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे भाजपने दोन लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवले (२०१४ आणि २०१९). दुसरे वैशिष्ट्य म्हणजे विरोधी पक्षाचे स्थान सोळाव्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे सतराव्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपेत्तर पक्षांना मिळवता आले नाही. विरोधी पक्षांपैकी एकाही पक्षाला पंचावन्न जागा मिळालेल्या नाहीत. तिसरे खास वैशिष्ट्य म्हणजे सोळाव्या लोकसभा निवडणुकीत भाजपने एकपक्ष वर्चस्वाची सुरवात केली होती. सतराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपने एकपक्ष वर्चस्वाची व्यवस्था घडवलेली आहे. त्यावर शिक्कामोर्तब झाले. चौथे वैशिष्ट्य म्हणजे प्रादेशिक पक्षांची ताकद घटली. त्यांचे राजकारण मर्यादित झाले. ही सतराव्या लोकसभा निवडणुकीची रोचक कथा पुढे आली. 

मोदींनी भाजपला सलग दोनदा बहुमत मिळवून दिले. त्यांच्या नेतृत्वाची सलग दोनदा लाट दिसून आली. सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत सतराव्या लोकसभा निवडणुकीत ही लाट जास्त शक्तिशाली होती. हा मुद्दा भाजपला बहुमताकडे घेऊन गेला. उमेदवार, जात, शेतकऱ्यांचे प्रश्‍न, आघाड्या, काँग्रेसची हिंदुस्थानियत संकल्पना, सौम्य हिंदुत्व हे मुद्दे जवळपास मोदींच्या नेतृत्वापुढे टिकले नाहीत. बहुमताचे स्वरूप एकपक्ष पद्धतीचे आहे. या बहुमताचा अर्थ ‘उग्र राष्ट्रवाद’ असा काँग्रेसने लावला. परंतु केवळ उग्र राष्ट्रवाद हा एकमेव बहुमताचा अर्थ होत नाही. उग्र राष्ट्रवादाखेरीज भाजपचे वर्चस्व हादेखील अर्थ या बहुमताचा आहे. कारण विरोधी पक्षांना दुसऱ्या वेळी विरोधी पक्षाचे स्थान मिळवता आले नाही. त्यामुळे भारत सलग दहा वर्षे विरोधी पक्षाशिवाय संसदीय राजकारण करणारा ठरणार आहे. 

नरेंद्र मोदी-अमित शहांनी नवीन भाजप घडवला. त्याची संघटनात्मक ताकद वाढवली. त्यांच्या ताकदीचे चार नवे गुणधर्म दिसून आले. एक, नवीन भाजप आणि नवभारत या दोन संकल्पनांचा त्यांनी मेळ घातला. यामध्ये त्यांनी नवभारतातील राजकीय संकल्पनांचे अर्थ मुळापासून बदलून घेतले. नवभारताशी संबंधित संकल्पनावर खूप टीका झाली. त्याच्या प्रमाणाच्या दुप्पट-तिप्पट भाजपची ताकद वाढत गेली. काँग्रेसने जम्मू-काश्‍मीरमध्ये काश्‍मिरीयत, पंजाबमध्ये पंजाबियत, बिहारमध्ये बिहारीयत, पश्‍चिम बंगालमध्ये बंगालीयत अशा संकल्पनावर भर दिला होता. त्यांना या निवडणुकीत मतदारांनी नाकारले. या संकल्पनेशी सुसंगत अशी महाराष्ट्रात राष्ट्रीय मराठा ही संकल्पना वापरली गेली. मात्र त्यासदेखील प्रतिसाद मिळाला नाही. या उलट नेमस्त राष्ट्रभक्ती, हिंदुत्व, दहशतवाद या संकल्पना जनता नाकारते हे नवभारत संकल्पनेद्वारे लक्षात घेऊन भाजपने आक्रमक राष्ट्रवाद आणि आक्रमक हिंदुत्वास जनमान्यता आहे, अशी भूमिका घेतली. त्यांची ही भूमिका किरकोळ मतभेद होऊन सरतेशेवटी जनतेने मान्य केली, असे दिसते. दोन, भाजपला जवळपास तेरा राज्यांत पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मते मिळालीत. त्यामुळे भाजप हा मतांच्या आधारेदेखील वर्चस्वशाली पक्ष झाला. तीन, भाजप सोळाव्या लोकसभा निवडणुकीआधी पूर्णपणे संघावर अवलंबून होता. सोळाव्या आणि सतराव्या लोकसभा निवडणुकीमधून भाजपने पक्षसंघटना मजबूत केली. भाजपने जुन्या पक्षसंघटनेची केवळ डागडुजी केली नाही; तर जवळपास नवीन संघटना बांधणी केली. पेज प्रमुख, अर्ध पेज प्रमुखपासून ते कोअर टीमपर्यंत नवीन कार्यपद्धती विकसीत केली. अर्थातच, या आघाडीवर शहांच्या जोडीला भूपेंद्र यादव, कैलाश विजयवर्गीय, अरुण सिंह, विनय सहस्रबुद्धे असे नेते होते. यापेक्षा विशेष म्हणजे आयटी सेलचे अमित मालवीय आणि मीडिया सेलचे अनिल बलुनी यांनी भाजप संघटनेची पुनर्बांधणी केली. राम माधव, सुनील देवधर यांनीदेखील नवीन पद्धतीने भाजप उभी केली. त्यामुळे भाजपला पूर्व, पश्‍चिम, उत्तर अशा तीन भागांत उठावदार आणि वर्चस्वशाली यश मिळाले. चार, भाजपला जवळपास प्रत्येक भागात यश मिळाले. तसेच भाजपला सर्व वर्गांतून आणि जातींमधून मतं मिळत गेली. भाजपने जात हा घटक दुर्लक्षित केला नाही. परंतु त्यांनी जातीवरील लक्ष आक्रमक राष्ट्रवादाकडे वळवले. त्यामुळे जातलक्षी संघटन करण्याची पद्धती दुबळी झाली. मध्यम शेतकरी जाती आणि ओबीसी-दलित, मुस्लिम यांच्यातील अनुग्रहाचे राजकारण भाजपने मोडून काढले. म्हणजेच भाजपने काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांची पितृसत्ताक संबंधाची साखळी तोडली. भाजपने पितृसत्ताक संबंध म्हणजे घराणेशाही आणि गुलामगिरी आहे, असा सरळ घणाघाती हल्ला केला. त्यामुळे जुने पितृसत्ताक संबंध राजकारणात रद्दबाद ठरले. नवीन पितृत्ताक संबंध उदयास आले. भाजप हा पितृसत्तेच्या शिखरस्थानी आला. त्यांच्या नियंत्रणाखाली भारतातील सर्व समाज गेला. या फेरबदलाला जनतेची सहमती मिळाली. यामुळे भाजप ही पुनर्बांधणी केलेली संघटना ठरली. विकास, हिंदुत्व, उग्र राष्ट्रवाद अशा नवीन गोष्टींचे रसायन भारतीयांच्या मनावर परिणाम करते. अल्पसंख्याकांची पक्षीय धरसोड आणि हिंदूचे ऐक्‍य या गोष्टींमुळे भाजपच्या संघटनेला ताकद मिळाली. त्यामुळे भाजपला वेगळे बहुमत मिळालेले नाही तर त्यांचे वर्चस्व हिंदूनी मान्य केले. त्यामुळे बहुमत व वर्चस्वानंतरची पुनर्जुळणी भाजपने सुरू केली असे दिसते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prakash pawar article writes navbharat

टॅग्स