आघाडीसाठी कसोटीचा काळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavikas Aghadi

आघाडीसाठी कसोटीचा काळ

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून या सरकारबद्दलचं अस्थैर्य सातत्यानं चर्चेत आहे. विशेषतः महाराष्ट्रात विरोधी पक्ष संघटित आणि सत्ताधारी आघाडीला विरोध करणारा आहे, त्यामुळं सत्ताधारी सरकारपेक्षा विरोधी पक्षाबद्दलची चर्चा जास्त होते. ही महाराष्ट्रातील वस्तुस्थिती असताना महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर परिणाम होईल अशा चर्चा घडविणाऱ्या महत्त्वाच्या तीन घटना घडल्या आहेत. त्या तीन घटना अर्थातच महाविकास आघाडीतील तीन पक्षांबद्दलच्या आहेत.

शिवसेना हा पक्ष भविष्याचा वेध घेत आहे. शिवसेना गैरभाजप व गैरकाँग्रेस अशा प्रकारच्या आघाडीच्या शोधात आहे, असा एक सूर संजय राऊत यांनी प्रस्थापित केला आहे. तसंच, उद्धव ठाकरे यांनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नैतिक आत्मबळ देत हा मुद्दा भक्कम केला. परंतु, मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले, तेव्हा त्यांची वैयक्तिक भेट झाली. ती भेट त्या दोघांमध्ये सुरुवातीला झाली. त्या भेटीत अजित पवार आणि अशोक चव्हाण यांना सामील केलं नव्हतं. यामुळं भाजपनं शिवसेनेबद्दल संदिग्धता निर्माण केली. यानंतर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची निश्चित भूमिका कोणती, हा प्रश्न राजकीय चर्चेचा झाला. या पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांनी भाजपशी जुळवून घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना हा नैसर्गिक मित्र, असा आशादायक सूरही व्यक्त केला. यामुळं महत्त्वाचे दोन निष्कर्ष निघतात. एक - भाजपमध्ये शिवसेनेबरोबर पुन्हा युती करण्याबद्दल पुनर्विचार सुरू झालेला दिसतो. भाजपची राष्ट्रीय प्रतिमा अडचणीत असताना या निर्णयाकडं भाजप वळलेला असावा. दोन - भाजप केवळ महाविकास आघाडीच्या सरकारला अस्थिर करण्यासाठी हे डावपेच वापरत आहे. म्हणजेच थोडक्यात, भाजप-शिवसेनेचं नातं शत्रुभावी आहे, हादेखील मुद्दा दिसतो. परंतु हे दोन्ही निष्कर्ष अजूनही पूर्ण सत्य म्हणून आकाराला आले नाहीत. परंतु या गोष्टीचा काँग्रेस आणि शिवसेना यांच्या संबंधांवर परिणाम होत आहे, असं दिसतं.

काँग्रेस पक्षानं स्वबळावर निवडणुका लढविण्याचा विचार महाराष्ट्रात मांडला आहे. विशेषतः नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून हा विचार आक्रमकपणे पुढं आला आहे. जळगाव आणि अमरावती येथे नाना पटोले हे स्वबळावर निवडणुका लढवण्याबद्दल जास्त आक्रमक होते. नाना पटोले यांनी भाजपविरोध हा मुद्दा आक्रमकपणे मांडलेला आहे.

त्यांनी फैजपूर येथे कृषी कायद्यांची होळी केली. तसंच, इंग्रजांपेक्षाही जास्त अत्याचारी भाजप सरकार आहे, अशी विरोधाची भूमिका नाना पटोले यांनी मांडली. हीच भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांचीदेखील आहे. चव्हाण यांनी स्वबळावर निवडणूक लढवणं गैर नसल्याचं स्पष्ट केलं. तसंच, त्यांनी महाराष्ट्रात भाजपला दूर ठेवण्यासाठी महाआघाडीचा निर्णय घेण्यात आला, हा मुद्दा पुनःपुन्हा मांडला, त्यामुळं काँग्रेस पक्षामध्ये भाजपविरोध हाच मुख्य मुद्दा आहे. शिवसेना पक्ष हा भाजपला विरोध करतो; परंतु भाजप आणि शिवसेनेमध्ये दोन मुद्द्यांवरून साम्य आहे अशीही चर्चा होते. एक - भाजप-शिवसेनेचा हिंदुत्व हा समान विचार आहे, त्यामुळं काँग्रेसचा भाजपला विरोध आहे, तसाच शिवसेनेच्या हिंदुत्वालाही विरोध आहे. दोन - शिवसेनेमध्ये एक प्रवाह भाजपबरोबर जुळवून घेण्याचा आहे, त्यास काँग्रेसचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी त्यांचा भाजपविरोध जास्त आक्रमकपणे मांडण्यास सुरुवात केली आहे.

यामुळं काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीपेक्षा वेगळी भूमिका मांडत आहे, असंच चित्र सुस्पष्टपणे पुढं आलं आहे. परंतु महाविकास आघाडीच्या सरकारला स्थैर्य पाच वर्षांचं असेल, अशी भूमिका नाना पटोले आणि पृथ्वीराज चव्हाण या दोघांचीही आहे. महाविकास आघाडीला सोनिया गांधी यांचा पाठिंबा आहे; परंतु राहुल गांधी यांची भूमिका सुस्पष्ट नाही, अशी एक संदिग्धता सतत राजकीय चर्चाविश्वात राहिली आहे. यामुळं शिवसेना म्हणजे सोनिया सेना असाही डावपेचात्मक प्रचार भाजप करतो. थोडक्यात, कच्चे दुवे भाजपनं समाजात आणि माध्यमांमध्ये पेरलेले आहेत, त्याबद्दल खुद्द काँग्रेसश्रेष्ठींनी स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.

शिवसेना पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये सर्वांत मोठा समन्वयाचा पूल उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे आहेत. याखेरीज राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री शिवसेना पक्षाबरोबर जुळवून घेत आहेत. विशेषतः शिवसेना पक्षाप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसदेखील आघाडीबद्दल भविष्यवेधी विचार करत आहे. त्यामुळं गैरभाजप व गैरकाँग्रेस अशी चाचपणी त्यांचीही सुरू आहे. राज्यामध्ये शिवसेनेबरोबर आघाडी करून शहरी आणि ग्रामीण स्थानिक संस्था, विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुका लढवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार आहे. ही गोष्ट अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मांडलेली आहे.

परंतु, तरीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये काही मतभिन्नता आहेत. याबद्दलची काही उदाहरणं सातत्यानं पुढं आली आहेत. विशेषतः टाटा कॅन्सर रुग्णालयाला शंभर सदनिका देण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली. तसंच, अजय चौधरी हे शिवडीचे आमदार आहेत, त्यांनीदेखील ड्रीम प्रोजेक्टला विरोध केला. जितेंद्र आव्हाड यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता, त्यामुळं ठाणे परिसरात व शहरी भागात शिवसेना अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जुळवून घेत नाही असंच दिसतं. परंतु मुख्यमंत्री यांनी डॅमेज कंट्रोल अशीही भूमिका विकसित केली. मुख्यमंत्री यांनी बॉम्बे डाइंगमधील सदनिकांचा मुद्दा सुचविला. याचा मथितार्थ म्हणजे, महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांची पक्षविस्तारासाठी राजकीय स्पर्धा सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारचं स्थैर्य यामुळं पक्षविस्ताराच्या स्पर्धेवर अवलंबून आहे. पक्षविस्तार हा नाना पटोले यांचा मुख्य कार्यक्रम आहे.

तसंच, शिवसेना पक्षाचा पक्षविस्तार होत नाही, त्यामुळं शिवसेना पक्षाला या मुद्द्यावर नव्यानं काम करावं लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार होत आहे, ही गोष्ट काँग्रेस आणि शिवसेना पक्षातील अनेकांना काळजीची वाटते.

तसंच, महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचा थोडाबहुत विस्तार झाला, तर त्याचा सर्वांत मोठा परिणाम भाजपवर होणार आहे, यामुळं भाजपमध्येदेखील चलबिचल सुरू झाली. कारण आरक्षणाचे मुद्दे भाजपला आता थेट फायद्याचे राहिलेले नाहीत, त्यामुळं भाजपपुढं महाविकास आघाडीचं मोठं आव्हान आहे, तर महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना स्वतःचं आत्मबळ विकसित करण्याचं मोठं आव्हान आहे. परंतु, केवळ सत्तेच्या स्पर्धेत कायमस्वरूपी मित्र वा कायमस्वरूपी शत्रू या संकल्पना फार महत्त्वाच्या ठरत नाहीत. याबद्दलची चर्चाही खूप घडते. त्यामुळं खरंतर सरकारला स्थैर्य आणि पक्षविस्तार या दोन्ही मुद्द्यांवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचीच कसोटी आहे असं दिसतं.