esakal | ममता - केजरीवालांची नवी महत्त्वाकांक्षा | Ambition
sakal

बोलून बातमी शोधा

Mamta and Arvind
ममता - केजरीवालांची नवी महत्त्वाकांक्षा

ममता - केजरीवालांची नवी महत्त्वाकांक्षा

sakal_logo
By
प्रा. प्रकाश पवार prpawar90@gmail.com

भारतीय राजकारणात नव्याने राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी धामधूम सुरू झाली आहे. या धामधुमीत आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांनी सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे. देशात सुरुवातीला काँग्रेस हा एकच राष्ट्रीय पक्ष होता. नव्वदीच्या दशकानंतर काँग्रेस पक्षाचा ऱ्हास झाला. त्यानंतर हळूहळू भाजपचा राष्ट्रीय पक्ष म्हणून उदय होत गेला. भाजप २०१४ पासून देशातील राष्ट्रीय पक्ष झाला. काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाच्या नियमानुसार राष्ट्रीय पक्ष असला तरी वस्तुस्थिती तशी नाही. यामुळे छोटे छोटे पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयाला येण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत. यामध्ये नव्यानेच तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने उडी घेतलेली आहे. हे दोन्ही पक्ष राष्ट्रीय पक्ष होतील का? हा एक गंभीर प्रश्न आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्यांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली तर भारतीय राजकारणात बदल होईल का? असे महत्त्वाचे प्रश्न नव्याने उभे राहिले आहेत.

गोवा आणि पंजाब या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत. या दोन्ही राज्यात तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्ष चाचपणी करत आहेत. आम आदमी पक्षाने याआधी गोवा आणि पंजाब या दोन्ही राज्यात विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या. तृणमूल काँग्रेसच्या तुलनेत आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते या दोन्ही राज्यात जास्त आहेत. तर तृणमूल काँग्रेस नव्याने राजकीय संघटन करण्याच्या मनस्थितीत आहे.

यामुळे खरेतर तृणमूल काँग्रेसच्या तुलनेत आम आदमी पक्षाचा राजकीय इतिहास या दोन राज्यांच्याबद्दल बऱ्यापैकी आहे. परंतु या दोन्ही राज्यात काँग्रेस आणि भाजप अशी स्पर्धा होत राहिली आहे. पंजाबमध्ये भाजपबरोबर अकाली दल हा पक्ष होता. अकाली दल आणि भाजप यांची युती मोडलेली आहे. पंजाबमध्ये काँग्रेस अंतर्गत गटबाजी आहे. यामुळे काँग्रेस अंतर्गत गट तृणमूल काँग्रेसशी हातमिळवणी करतो का ? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. तृणमूल काँग्रेस हाच मूलतः काँग्रेसमधील एक गट होता. तेवीस वर्षापूर्वी ममता बॅनर्जी काँग्रेस पक्षात होत्या. त्यांनी १९९८ मध्ये १ जानेवारीला काँग्रेस पासून वेगळे होऊन तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. आजच्या घडीला त्यांनी पश्चिम बंगालमध्ये राजकीय वर्चस्व निर्माण केले आहे.

पश्चिम बंगालमधून बाहेर पडून त्यांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवावयाची आहे. हे त्यांचे एका अर्थाने सीमोल्लंघन आहे. या त्यांच्या हेतूला प्रतिसाद पंजाबमध्ये काँग्रेसमधील एका गटाने दिला तर तृणमूल काँग्रेसचा विस्तार होण्याच्या शक्यता वाढतात. परंतु अशा प्रकारची राजकीय पोकळी पंजाब राज्यात निर्माण झाली आहे. त्याचा राजकीय फायदा उठवण्याचे कौशल्य तृणमूल काँग्रेस दाखवते का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. दिल्लीच्या बाहेर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा पाठिंबा कमी होत गेला. त्यामुळे आम आदमी पक्षाला प्रतिसाद कमीच मिळण्याची शक्यता आहे. परंतु एकूण पंजाबची निवडणूक बहुधुवी होणार आहे. यामुळे तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी मतांचा वाटा आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांना बऱ्यापैकी मिळू शकतो.

पंजाबच्या तुलनेत गोवा हे छोटे राज्य आहे. गोव्यामध्ये काँग्रेस आणि भाजप अशी स्पर्धा आहे. परंतु राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस राजकारण घडवण्यात फार रस घेत नाही. त्यामुळे गोव्याच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांना आशेची किरणे दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष यांना मतांचा काही वाटा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे औपचारिक पातळीवरील राष्ट्रीय पक्ष होण्याच्या महत्त्वाकांक्षा वाढीस लागत आहेत. तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयाला आले तर राष्ट्रीय राजकारणात फार काही बदल होत नाही. कारण त्यांना मतांचा काही वाटा मिळेल. परंतु मतांच्या बरोबर जागा मिळण्याचे प्रमाण फारच कमी असणार आहे. यामुळे काँग्रेस पक्ष राष्ट्रीय असून नसल्यासारखाच आहे. त्याची अवस्था मात्र पहिल्यापेक्षा जास्त खराब होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत खुली स्पर्धा असते. त्यामुळे काँग्रेस पक्ष हा स्पर्धक या रूपात निवडणुकीचे राजकारण करत नाही. त्यामुळे स्पर्धा करण्याची संधी आम आदमी आणि तृणमूल काँग्रेस या दोघांनाही उपलब्ध झाली आहे. भाजपशी निवडणुकीत संघर्ष करण्याचा या दोन्ही पक्षांना अनुभव आहे. त्यामुळे भाजप विरोधातील राजकीय पक्ष अशी या दोन्ही पक्षांची प्रतिमा भारतभर सध्या आहे. त्या प्रतिमेचा आधार घेऊन हे पक्ष निवडणुकीचा आखाडा तयार करू शकतात. परंतु त्यांचे कार्यकर्ते कोण? हा पुन्हा प्रश्न उपस्थित होतो. काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते आणि काँग्रेसमधील नेते हे आम आदमी आणि तृणमूल काँग्रेस यांना आपल्या हितसंबंधांचे वाहन समजणार का? असे होण्याची शक्यता जास्त आहे. यामुळे दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची काँग्रेसमधील प्रवृत्ती या दोन्ही पक्षांकडे येण्याची शक्यताच जास्त आहे.

निवडणुकांसाठी साधन सामुग्री विपूल लागते. आम आदमी पक्षाच्या तुलनेत तृणमूल कॉंग्रेसकडे साधन सामग्री जास्त आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने तृणमूल काँग्रेसला अबोल परंतु उघडपणे पाठिंबा दिलेला होता. हा एक नैतिकतेचा प्रश्न तृणमूल काँग्रेसच्या पुढे आहे. निवडणुकीच्या राजकारणात नैतिकता सोयीस्करपणे बाजूला ठेवली जाते. यामुळे काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये नैतिकतेचा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. तरीही यामुळे मतांचा काही वाटा मिळवून हे दोन्ही पक्ष राष्ट्रीय पक्ष झाले तरी या पक्षाचे बळ मर्यादित असेल. या पक्षांनी बाळसे धरण्याच्या ऐवजी त्यांना सूज आलेली जास्त दिसेल. ही अवस्था या दोन्ही पक्षांची होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्ष राजकारण घडवत नसल्यामुळे तो स्वतःलाच दुसऱ्या पक्षांना त्यांच्या विरोधात कृती करण्यास संधी उपलब्ध करून देणार आहे. म्हणजेच भाजपच्या विरोधातील राजकारणातील सावळा गोंधळ आहे तसाच शिल्लक राहणार असे चित्र दिसते. मात्र या राजकारणाच्या तळाशी तीन प्रकारचे दृष्टिकोन घर करून बसलेले दिसतात. एक, हिंदुत्वाच्या राजकारणाला मतदार कंटाळतील आणि कॉंग्रेसकडे वळतील हा काँग्रेसचा सिद्धांत आहे. दोन, काँग्रेस राजकारण घडवत नाही त्यामुळे काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते प्रादेशिक पक्षांकडे वळतील हा प्रादेशिक पक्षांचा सिद्धांत आहे. तीन, भाजपविरोधी पक्षांमध्ये सावळागोंधळ आहे. त्यामुळे भाजपला भारतीय राजकारणात स्पर्धक पक्ष नाही. हा भाजपचा आवडता सिद्धांत आहे. या तीन मिथकामुळे प्रत्येक पक्ष आपल्याला हवी तशी चर्चा घडवून आणतो. वस्तुस्थितीत सरतेशेवटी मतदार या बद्दलचा निर्णय घेणार आहेत.

(लेखक राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून राजकीय घडमोडींचे विश्‍लेषक आहेत.)

loading image
go to top