esakal | मन - मत जपावं !
sakal

बोलून बातमी शोधा

Pramod-Pawar

‘ज्या समाजात आपण राहतो तिथं त्यानुसार वागणं मला गरजेचं वाटतं. मुलांनी एखादी गोष्ट मागितली, तर मी ती लगेच कधीच दिली नाही; पण त्याच बरोबर काही वेळा त्यांनी न मागितलेली त्यांना आवडणारी वस्तूही अचानकपणे आणून दिली आहे. यामध्ये मी मुलांच्या मागण्या पूर्ण करण्याचा अतिरेक आणि अवचित मिळणारा आनंद याचा सुवर्ण मध्य साधला. अचानक घेऊन दिलेल्या गोष्टी मुलांच्या लक्षात राहतात, तर थोडं थांबून मिळालेल्या वस्तूची त्यांना किंमत राहते आणि हट्टाला चाप बसतो. हेच आत्ताच्या पिढीशी वागण्याचं महत्त्वाचं सूत्र आहे असं मला वाटतं.’’

मन - मत जपावं !

sakal_logo
By
प्रमोद पवार saptrang.saptrang@gmail.com

‘ज्या समाजात आपण राहतो तिथं त्यानुसार वागणं मला गरजेचं वाटतं. मुलांनी एखादी गोष्ट मागितली, तर मी ती लगेच कधीच दिली नाही; पण त्याच बरोबर काही वेळा त्यांनी न मागितलेली त्यांना आवडणारी वस्तूही अचानकपणे आणून दिली आहे. यामध्ये मी मुलांच्या मागण्या पूर्ण करण्याचा अतिरेक आणि अवचित मिळणारा आनंद याचा सुवर्ण मध्य साधला. अचानक घेऊन दिलेल्या गोष्टी मुलांच्या लक्षात राहतात, तर थोडं थांबून मिळालेल्या वस्तूची त्यांना किंमत राहते आणि हट्टाला चाप बसतो. हेच आत्ताच्या पिढीशी वागण्याचं महत्त्वाचं सूत्र आहे असं मला वाटतं.’’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोकणातील गुहागर जवळच्या एका छोट्या गावातून मी लहान असताना आईवडिलांसोबत मुंबईत आलो. त्यांच्यामुळं मी मुंबई हे महानगर बघू शकलो. वडील रेल्वेत नोकरीला होते. पहिली ते चौथी मी महापालिकेच्या शाळेत शिकलो. त्या सगळ्या शिक्षणाच्या काळात आई शेतीचं काम करण्यासाठी चार महिने गावी जायची. वडिलांची आत्या मुंबईत होती, तिच्या घरातच आम्ही राहायचो. आई गावी गेली, की मी, वडील व आत्या आम्हीच घरात असायचो. आई नसताना पाचवीपासून मी वडिलांना घरकामात मदत करू लागलो. कणीक मळणं वगैरेंसारखी सगळी कामं करू लागलो. कामाची सवय तेव्हापासून लागली.

आईला गाण्याची व वाचनाची आवड होती. ती व्यावसायिक गायिका नव्हती, पण ती उत्तम गायची. तसंच उत्तम पुस्तकं वाचण्याची तिला फारच आवड होती. एखादं पुस्तक हाती आलं, की ती ते दोन-तीन दिवसांत संपवत असे. माझ्यात वाचनाची आवड आईमुळं आली. मोठा झाल्यावर मी घरातच छोटेसं वाचनालय तयार केलं, आईनं त्यातली, माझ्यापेक्षा जास्त पुस्तकं वाचली होती. एखादं पुस्तक तिला आवडलं, तर तू हे नक्की वाच असं ती मला सांगायची. अशाप्रकारे माझ्यावर पुस्तकांचे संस्कार झाले. वडिलांचे सहकारी पांडुरंगशास्त्री आठवलेंच्या स्वाध्याय परिवाराशी जोडलेले होते. या परिवारातर्फे दर रविवारी माधव बागेत तत्त्वज्ञानावर व्याख्यान असायचं, तिथं मला वडील घेऊन जायचे. त्या वेळी त्यातलं मला कळायचं नाही, पण त्या सगळ्या वातावरणाचा, ते शब्द कानांवर पडल्याचा माझ्यावर जो काही परिणाम झाला, तो आजपर्यंत मला पुरतो आहे आणि शेवटपर्यंत तो राहीलच. ते संस्कार त्या वयात होणं गरजेचं होतं, ते वडिलांनी नकळतपणे केले. वडील खूप कडक होते, बोलणंही कडक होतं, पण माझ्या मुलांनी कुणीतरी बनावं असा एक आंतरिक ओलावा प्रत्येक वडिलांच्या मनात असतो, तो त्यांच्याकडं नक्कीच होता, फक्त ते बोलून दाखवायचे नाहीत. आजकाल मुलांची कलचाचणी घेऊन त्यांच्या भविष्याची दिशा ठरवली जाते. तसं त्या वेळी नव्हतं, पण आपल्या मुलानं चांगलं शिकलं पाहिजे ही भावना मात्र पालकांच्या मनात ओतप्रोत असायची.

शिक्षणाच्या संदर्भात फारसं काही मार्गदर्शन घरातून वा आजूबाजूच्या वातावरणातून नाही मिळालं कारण आम्ही कामगार वसाहतीत राहत होतो. तिथं फक्त सण आणि सणच साजरे व्हायचे. पण त्यातूनही खूप चांगले संस्कार आमच्यावर नकळतपणे घडत गेले. ते संस्कार सांगून झाले नाहीत, तर बघून झाले. मी चौथीत असताना एकदा शाळेतून घरी आलो, तेव्हा माझ्या अंगावर नवा टी शर्ट होता आणि हातात एक रुमाल. ते बघून आई म्हणाली, “हे कुठून आणलं तू?” मी म्हणालो, "बाईंनी आज वाढदिवस आहे असं सांगितलं आणि मला हे दिलं, बाकी मला माहीत नाही. ते ऐकून आईला आश्चर्य वाटलं आणि वाढदिवस नावाची गोष्ट साजरी करायची असते हे तेव्हा तिला कळलं, त्यातही शिक्षकांनी तो केला हे विशेष होतं. 

त्यानंतर आईनं त्या शिक्षिकांना घरी बोलावलं, त्यांना खाऊ- पिऊ घातलं आणि त्यांची ओटी भरली. तिनं जे काही तेव्हा केलं, त्याचा अर्थ त्या वेळी मला समजला नाही, पण आपल्यासाठी कोणीतरी काही केलं आहे आणि ते आपल्याला भावलेलं आहे ही कृतज्ञतेची जाणीव समोरच्याला करून देणं गरजेचं असतं ही महत्त्वाची गोष्ट त्या वेळी मला समजली. या गोष्टीला पन्नासपेक्षा जास्त वर्षं झाली, पण अजूनही ती मला ठळकपणे आठवत आहे. समोरच्यानं हात दिला, की आपणही सहकार्याचा हात पुढे करायचा असतो हा संस्कार त्या वेळी नकळतपणे झाला.

मला मॅट्रिकमध्ये पहिला वर्ग मिळाला होता, ही गोष्ट त्या वेळी खूप मोठी होती. मला चांगले गुण मिळाले म्हणून मी डॉक्टर होणार असं वडिलांना वाटलं, त्यामुळं त्यांनी मला रूपारेल महाविद्यालयात विज्ञान शाखेला घातलं. मला खरंतर चित्रकलेची आवड होती. जे. जे .स्कूलमध्ये मला जायचं होतं. पण त्या वेळी तिथं जाण्याचा विचार फारसं कुणी करत नव्हतं. मार्गदर्शनही नव्हतं. शिकून चांगली नोकरी करावी व घर चालवावं हाच सर्वसामान्य विचार असायचा. कारण आमचं पाच जणांच कुटुंब असलं, तरी आमच्या बरोबर आणखी दहा जण राहायचे. त्यातली काही माणसं आईकडची होती, काही आत्याकडची होती. असे सर्व जण त्या दहा बाय बाराच्या खोलीत राहायचे. विशेष म्हणजे आम्हाला त्याचा त्रास नाही व्हायचा. आज आमचं एवढं मोठ घर आहे, प्रत्येकाची एक खोली आहे, पण मला त्याचा खूप त्रास होतो. कारण माणसांमध्ये मी वाढलो आहे.

आई सुगरण होती. दोनशे माणसांचा स्वयंपाक ती सहज करायची. त्या वेळी केटरिंग सेवा फारशी प्रचलित नव्हती त्यामुळे आईला सगळीकडं बोलवायचे. पुढे मला कळायला लागलं तसं मी तिला जाण्यासाठी मनाई करू लागलो. कारण लोक तिला राबवून घ्यायचे. आई व वडिलांनी आमच्या नात्यातील सतरा लग्न लावून दिली. त्यांची सर्व व्यवस्था त्यांनी स्वतः केली होती. हे सगळं करताना ते आम्हा भावंडांना कामं सांगायचे. अमुक ठिकाणहून हे घेऊन या, इतक्या किमतीत आणा, वगैरे गोष्टी सांगितलेल्या असायच्या. यामुळे आम्ही ‘इव्हेंट मॅनेजमेण्ट शिकलो. माझा भाऊ आज स्वतः हे काम मोठ्या प्रमाणात करतो. त्याची स्वतःची संस्था आहे. कुठल्याही शैक्षणिक संस्थेत व्यवस्थापनाचे धडे न घेता आम्ही या सर्व गोष्टी आईवडिलांकडून शिकलो, आमचं ते विद्यापीठ होतं. वडील रेल्वेत बाईंडिंग विभागात सुपरवायझर होते. घरी येताना ते सोबत बाहेरची चार कामं घेऊन यायचे आणि घरी येऊन पुन्हा ती जास्तीची कामं करायचे. कष्ट करून संसाराला हातभार लावायचे. कष्ट करण्याची ती सवय आम्हालाही लागली.

मी पालक झाल्यानंतरच्या काळात खूप बदल झालेला आढळतो. आम्हांला आईवडिलांचा धाक होता. आता मात्र मुलांशी मित्रत्वाच्या नात्यानं वागावं लागतं. मुलं सहजपणं आपलं एखाद विधान खोडतात, आपण चुकीचे वाटलो तर तसं स्पष्टपणे सांगतात. पण पूर्वी असं काही बोलायची हिंमतच आमच्यात नसायची. आताची पिढी पूर्णपणे वेगळ्याच वातावरणात वाढलेली आहे. आम्ही एकावेळी पंधरा-सोळा माणसांच्या घरात वाढलो, तर आता आम्ही घरात चारच माणसं आहोत. शिवाय चारही माणसं आपापल्या कामात व्यस्त असतात. त्यामुळं मी घरात नियमच केला आहे, घरी एकत्र जेवताना कोणीही हातात मोबाइल घ्यायचा नाही, गप्पा मारत जेवायचं. मुलं ही गोष्ट पाळतात. आत्ताच्या मुलांचं पालकत्व फार वेगळ्या पद्धतीनं सांभाळावं लागतं. त्यांची मानसिक अवस्था खूप सांभाळावी लागते. आमच्या वेळी असं काही नव्हतं. आपल्याला मन असतं, त्याच्यासाठी काही गोष्टी घडाव्या लागतात किंवा आपल्याला राग येतो, रडायला येतं, या सगळ्या गोष्टीचा, जाणिवेचा फारसा संबंधच नव्हता.

आता या सगळ्याच्या पलीकडं जाऊन आपल्याला मुलांची मनं सांभाळावी लागतात. त्यांना कसं वाटेल, ते काय म्हणतील असा विचार सतत करावा लागतो. काळानुसार झालेले हे बदल पालक म्हणून आम्ही स्वीकारले आहेतच, त्याच बरोबर मुलांवर आवश्यक ती जबाबदारी टाकण्याचाही मी सतत प्रयत्न करत असतो. सध्या माझ्या एका घराच्या इंटेरिअरचं काम सुरू आहे, ते पूर्णपणे माझी दोन्ही मुलं पूर्वा आणि चैतन्य हेच बघत आहेत. मी त्यांना पैसे दिले आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं काम करायचं, त्यानंतर मात्र घरात कोणत्याही प्रकारची तक्रार नको असं सांगितलं आहे. व्यवहार पूर्णपणे तुम्हीच करायचा असंही सांगितलं आहे. अशाप्रकारे त्यांचं एकप्रकारे घडवणं सुरू आहे. पैसे किती लागतात, ते कुठून आणावे लागतात, खर्च करताना कसे खर्च केले पाहिजेत या गोष्टी ते शिकत आहेत.

चैतन्यने ‘टुर्स अॕण्ड ट्रॅव्हल्समध्ये एमबीए केलं आहे, तर पूर्वा अभिनय क्षेत्रात काम करत आहे. सध्या चित्रपटांप्रमाणेच टुरिझम विभागाला कोरोनाचा फटका बसला आहे. अशा पार्श्वभूमीवर ते कशाप्रकारे गोष्टी हाताळतात ते महत्त्वाचं ठरेल. मुलांशी वागताना माझ्या आई-वडिलांनी आम्हाला कसं सांभाळलं? याचा मी आता विचार करतो. कारण पालक म्हणून माझ्या मुलांचं मी सगळं ऐकतो, त्यांना काय हवं नको ते बघत असतो. त्यांची मनं दुखावली, तर त्यांचं मानसिक सबलीकरण करणं, ही आजच्या काळाची गरज आहे. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं त्यांना सांभाळावं लागतं. आमच्या लहानपणी असं काहीच नव्हतं. पण काळ कुठलाही असो एक गोष्ट नक्की आहे, की आपण मुलांना जे प्रेम, काळजी घेणं, पाठिंबा यांसारख्या गोष्टी देतो, ते आपल्याला त्याच स्वरूपात, किंबहुना अधिक प्रमाणात नक्कीच परत करतात. काही दिवसांपूर्वी मी आजारी होतो, मला डेंगी झाला होता. त्या काळात माझ्या दोन्ही मुलांनी माझी खूप शुश्रूषा केली. त्या वेळी मला खात्री पटली, की आपण केलेले संस्कार कुठेतरी रुजलेले आहेत.

पालकांनी मुलांना नेहमी परिस्थितीची जाणीव करून दिली पाहिजे. आपण कोण आहोत, कुठे आहोत, आपली गरज काय आहे, त्याच्यासाठी लागणारा पैसा कुठून निर्माण करायचा, त्यासाठी काय करायचं, कमीत कमी खर्च कसा करता येईल याचं प्रशिक्षण त्यांना देणं गरजेचं आहे. कारण आजकालची परिस्थिती अशी आहे, की जे काय हवं आहे ते मोबाइलवर टाकलं की घरी येतं. त्याची सवय मोडणं गरजेचं आहे. कधी तरी अशा गोष्टी करणं चुकीचं नाही, पण अतिरेक टाळलाच पाहिजे. कोरोनानं ही जाणीव बऱ्यापैकी करून दिली आहे. त्याचप्रमाणे माणसाला माणसाची गरज असते ही जाणीव मुलांना करून देणं गरजेचं असतं. घरात मित्र परिवार येतो, आप्तेष्ट येतात त्यांच्याकडूनही मुलांवर संस्कार होत आसतात. त्यामुळं आपण आत्मकेंद्री होत नाही. लोकांचा विचार करणं ही समाजाची गरज आहे, कारण ज्या समाजात आपण राहतो तिथं त्यानुसार वागणं मला गरजेचं वाटतं. मुलांनी एखादी गोष्ट मागितली, तर मी ती लगेच कधीच दिली नाही; पण त्याच बरोबर काही वेळा त्यांनी न मागितलेली त्यांना आवडणारी वस्तूही अचानकपणे आणून दिली आहे. यामध्ये मी मुलांच्या मागण्या पूर्ण करण्याचा अतिरेक आणि अवचित मिळणारा आनंद याचा सुवर्ण मध्य साधला. अचानक घेऊन दिलेल्या गोष्टी मुलांच्या लक्षात राहतात, तर थोडं थांबून मिळालेल्या वस्तूची त्यांना किंमत राहते आणि हट्टाला चाप बसतो. हेच आत्ताच्या पिढीशी वागण्याचं महत्त्वाचं सूत्र आहे असं मला वाटतं.

मी आणि माझी पत्नी निमा आम्ही दोघंही नोकरी करत होतो आणि नाटकातही काम करत होतो. मी ‘एमटीएनएल’ मध्ये नोकरीला होतो. माझ्या अभिनयाच्या करिअरसाठी माझ्या ऑफिसमधल्या लोकांनी खूप सहकार्य केलं आणि मला सांभाळून घेतलं. तो काळच तसा होता, माणसं एकमेकांवर निर्व्याज प्रेम करायची. पत्नीची नोकरी व्हीटीला होती. खूप कष्टाचा काळ होता तो. दोघंही नोकरी करत असल्यानं पूर्वाला पाळणाघरात ठेवावं लागायचं. तिचा तो पहिला दिवस अजूनही मला आठवतो. आमच्या तिघांच्या डोळ्यांत पाणी होतं. पूर्वाला सोडून आम्ही ऑफिसला गेलो, पण खूप अस्वस्थ वाटत होतं. पुन्हा तिला भेटायला आलो, खूप कठीण गेलं हे सर्व. हळूहळू तिला सवय होत गेली, पण तो परीक्षेचा काळ होता. आता मात्र खूप समाधानाचं आयुष्य जगतो आहे. मुलांना त्यांच्या मनाप्रमाणं जगू द्यावं या मताचा मी आहे. त्यांनी त्यांच्याच इच्छेनुसार करिअर निवडलं आहे. पूर्वा मनस्वी कलाकार आहे, तिनं मालिका नाही करायच्या असं ठरवलं आहे. त्यामुळे ती मोजकेच पण चांगले चित्रपट करते. तिच्या या निर्णयाबाबत ती आनंदी आहे.

मुलं लहान होती तेव्हा त्यांना वेळ देता यावा, म्हणून मी त्यांना काही वेळा नाटकाच्या दौऱ्यावर घेऊन जायचो किंवा दौरा संपला की त्यांना लगेच त्या ठिकाणी बोलावून घ्यायचो आणि पुढे एखाद्या ठिकाणी फिरायला जायचो. मी व निमा आम्ही दोघं अशाप्रकारे मुलांना जास्तीत जास्त चांगला वेळ देण्यासाठी प्रयत्न करायचो. मुलं पुरेशी मोठी झाली, त्यांना गरज वाटू लागली तेव्हा त्यांना मोबाइल दिला. तोपर्यंत त्यांना मोबाइल का व कसा उपयोग करायचा हे समजलं होतं. अलीकडं माझा फोन जुना झाला म्हणून मुलांनी मला नवा फोन आणून दिला आणि आता हा वापरायचा असं सांगितलं. ही माझ्यासाठी खूप मौल्यवान भेट होती. मुलांना आपली गरज, ओळखता येऊ लागली, आपली काळजी वाटू लागली, यासारखं दुसरं समाधान कोणतं आहे? सध्याची परिस्थिती पाहता घरं मोठी झाली आहेत आणि माणसं कमी ! घरातील एका खोलीत आपले आपणच असतो आणि मुलं त्यांना वेळ असतो तेव्हा भेटतात. अशा वेळी आपल्या हिंदू संस्कृतीमधल्या सणांच्यानिमित्ताने जपलं गेलेलं जे आहे ते पालकत्व मला हवंसं वाटतं. इतकंच नाही, तर प्रत्येक धर्मातील सण हे पालकत्व जपण्यासाठी आहे असं मला वाटतं. त्या निमित्तानं तुमच्या घरातील माणसं तुम्हालाच नव्यानं ओळखू येऊ लागतात, त्यांची गरज काय आहे हे कळायला लागतं. माणूस वाचता येणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. हे जमलं तर चेहेऱ्यावरूनच काहीतरी बिनसलंय हे समजून घेता येईल आणि गरजेनुसार मुलांचे मित्र बनून त्यांना समजून घेता येईल. परस्परांचं मन, मत जपणं, त्याचा आदर करणं, माझ्या मते हे ‘पालकत्व’ आहे. अन्यथा, पालकत्व या शब्दाशी कितीही लढाई केली तरी ती अर्थहीन आहे.

(शब्दांकन : मोना भावसार)

Edited By - Prashant Patil

loading image