गप्पा ‘पोष्टी’ : सोशल मीडियावरील ‘दगड का माती’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Social Media
गप्पा ‘पोष्टी’ : सोशल मीडियावरील ‘दगड का माती’

गप्पा ‘पोष्टी’ : सोशल मीडियावरील ‘दगड का माती’

आम्ही लहानपणी ‘दगड का माती’ नावाचा खेळ खेळायचो. अगदी सोपा खेळ. अंगणात, गच्चीवर जिथं कुठं हा खेळ खेळायचा तिथं एक रेषा मारून दोन भाग करायचे. एकाचं नाव दगड आणि दुसऱ्याचं माती. ज्याच्यावर राज्य येतं त्याने दोनपैकी एक भाग निवडून त्या भागाची राखण करायची. दुसऱ्या भागातले लोक राज्य असलेल्याच्या भागात यायचा प्रयत्न करणार, ते आले की त्यांना पकडून ‘आउट’ करायचं. जे आउट होतील त्यांनीही मग राज्य असलेल्याच्या भागाची राखण करायला लागायचं. आपल्या लहानपणचा एकदम सोपा, बिनखर्चीक आणि धमाल खेळ काळाच्या ओघात नाहीसा झाला असेल असं मला वाटत होतं. मात्र सोशल मीडियाच्या युगात हा खेळ सध्या अहोरात्र खेळला जातो आहे!

सोशल मीडियावर हा खेळ खेळताना एक काल्पनिक दुभाजक रेषा मारायची असते. जात, धर्म, राजकीय पक्ष, भाषा, लिंग अशी कोणतीही माणसांना विभागणारी गोष्ट घ्यायची. त्या गोष्टीच्या आधाराने एक खणखणीत व्हर्च्युअल रेषा आखायची. त्या रेषेची एक बाजू दगड अन दुसरी बाजू माती. आपण एक बाजू निवडायची अन् ती पकडून ठेवून त्याची ऑनलाइन राखण करत बसायचं. आपल्या बाजूच्या समर्थनार्थ अहोरात्र पोस्ट्स किंवा फॉरवर्ड्स करत बसणं, आपल्या ‘साइड’च्या लोकांच्या पोस्ट्सना बदाम वाटत फिरणं, विरुद्ध पार्टीच्या लोकांना आऊट करून आपल्या साइडला आणणं किंवा ऑनलाइन धुलाई करून खेळातूनच बाद करायचा प्रयत्न करणं. या आणि अशा असंख्य गोष्टी सोशल मीडियावरच्या ‘दगड का माती’ खेळात केल्या जातात.

अर्थात, कुठंही चार माणसं जमली की काहीतरी एक दुभाजक रेषा आखून ‘आम्ही विरुद्ध ते’ असे दोन गट पाडून ‘दगड का माती’ खेळणं हा माणसाचा खूप जुना छंद आहे. आदिमानव टोळ्यांमध्ये राहायचा तेव्हापासूनचा हा छंद असावा. तेव्हा खऱ्याखुऱ्या टोळ्या असायच्या अन् त्यांच्यात खऱ्याखुऱ्या टेरिटोरियल फाइट्स व्हायच्या. हजारो वर्षांनंतर, आदिमानवाचा ‘आयटी’मानव झाल्यानंतर टोळी-युद्धांनी ऑनलाइन ‘दगड का माती’ खेळाचा अवतार घेतला आहे कदाचित. आपल्याभोवती असंख्य प्रकारच्या दुभाजक रेषा आखून असंख्य प्रकारचे ‘आम्ही विरुद्ध ते’चे सामने आधी आपल्या मनात अन् मग सोशल मीडियावर खेळत राहणं हा सध्याच्या युगाचा महत्त्वाचा गुणधर्म बनला आहे.

हे खेळ आपण का खेळतो आहोत? सगळं करून आपण नेमकं काय साधतो आहोत? हे साधे प्रश्नही कोणी स्वतःला अन एकमेकांना विचारत नाहीये. शिवाय, सोशल मीडियावर राहून हा खेळ न खेळायचाही कोणाला पर्याय राहिलेला नाहीये. कारण आपण रेषा मारून दुभाजन केलं नाही, तरी कोणीतरी केलेलं असतंच अन् तुम्हाला त्यांच्या बाजूच्या वा विरुद्ध गटात ढकलेलं असतंच. आपली इच्छा असो वा नसो, आपण ठरवलं असो वा नसो, आपण या खेळात ओढले जातोच.

हा खेळ किमान आपण आपल्यापुरता थांबवायला हवा. थांबवू शकू का? माहीत नाही.

loading image
go to top