esakal | गप्पा ‘पोष्टी’ : ड्रग्जच्या विळख्याचा वेकअप अलार्म I Drugs Trap
sakal

बोलून बातमी शोधा

Drugs

गप्पा ‘पोष्टी’ : ड्रग्जच्या विळख्याचा वेकअप अलार्म

sakal_logo
By
प्रसाद शिरगावकर

कुठल्याशा सिनेस्टारचा मुलगा ड्रग्ज घेताना सापडला, अशी बातमी आली आणि सोशल मीडियावर एक जोरदार हलकल्लोळ कम हिस्टेरिया माजला! कोणत्याही सेलिब्रिटीचं किंवा त्यांच्या कुटुंबीयांचं अधःपतन ही सोशल मीडियावर व्हायरल जाणारी अन् चर्चेचीच गोष्ट असते. ‘‘ही इतकी प्रसिद्ध-श्रीमंत-यशस्वी व्यक्ती, पण तिचा मुलगा-मुलगी-भाचा-पुतणी किंवा ढमुक कोणी कसा वाया गेला आहे बघा!’’ हा तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसासाठी चार क्षण गॉसिप करण्याचा प्रसंग असतो. ‘‘ह्या प्रसिद्ध-श्रीमंत-यशस्वी माणसांच्या तुलनेत आपलं कसं बरं चाललं आहे,’’ असं मानून चालण्याचा एक आभासी चेकपॉइंट असतो. पण, आपल्या मुला-मुली-भाचा-पुतणी वगैरे मंडळींचं खरोखर बरं चाललं आहे का? ड्रग्जसारख्या भीषण गोष्टींपासून ते खरोखर सेफ आहेत का? ड्रग्जच्या जाळ्यासंबंधी आपण खरोखर जागरूक असतो का? आपल्या पुढच्या पिढीतल्या मुला-मुलींना, ‘‘ड्रग्ज’ किती ‘सॉलिड कूल’ असतात,’’ हे कोणी सांगत नाहीये किंवा त्यांच्यापर्यंत ड्रग्ज पोचत नाहीयेत ह्याची आपण खात्री करत असतो का?

आपल्याला बारा ते अठरा वर्षांचा मुलगा-मुलगी असेल, तर भीषण काळजी वाटली पाहिजे असा सध्याचा काळ आहे. देशातल्या कोणत्याही शहरात, कोणत्याही रँडम कोपऱ्यावर अत्यंत नशीले जीवघेणे ड्रग्ज विकणारी मंडळी उभी असू शकतात, हे आजचं सत्य आहे. त्यांच्या जवळ विकायला असलेली शे-पाचशे रुपयांची ‘पुडी’ विकत घेण्याइतके पैसे आपल्या पोरांपाशी आपणच दिलेले असतात. अशी नशा करणं ‘कूल’ असतं हे चोवीस तास त्यांच्या हातात असलेल्या ‘ओटीटी’वरच्या मुक्त कंटेंट संस्कृतीने दिलेलं असू शकतं. ह्या अशा परिस्थितीत, ‘मित्र-मैत्रीण म्हणत आहेत किंवा घेत आहेत म्हणून आपणही घेऊन बघुया,’ म्हणून आपली मुलंही ह्या जाळ्यात अडकू शकतात. अशात, कोपऱ्यावरच्या माणसाकडून एखादी ‘पुडी’ घेऊन तर बघुया म्हणून आपल्या जिवलगानं घेतली तर आपल्याला काय वाटंल? असं घडलंच तर आपल्या आयुष्यात काय भीषण उलथापालथ होईल?

प्रश्न फक्त कुठल्याशा सिनेस्टारच्या मुलानं ड्रग्ज घेण्याचा अन् त्यावर आपण गॉसिप करत बसण्याचा उरला नाहीये. प्रश्न ह्या जीवघेण्या ड्रग्जची पुडी तुमच्या-माझ्या जिवलगांपर्यंत अत्यंत सहजपणे पोहोचू शकते, हा आहे. ह्या पुड्या आपल्या मुलांपर्यंत पोहोचल्याच तरी त्या ते घेणार नाहीत, ह्यासाठी आपण काय करू शकतो असा आहे. अन् त्याही पुढं जाऊन, मुळात अशा पुड्या त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाहीत याच्यासाठी कोणती समाजव्यवस्था तयार करतो आहोत हा देखील आहे. प्रसिद्ध व्यक्तीच्या अधःपतनाबद्दल ‘ख्या ख्या’ करणं सोपं आहे. पण त्यांच्या जिवलगांना होरपळून टाकणारा वणवा आपल्या जिवलगांपर्यंत पोहोचू नये म्हणून आपण काय करतो आहोत हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा आहे.

ड्रग्जच्या विळख्याचा हा वेकअप अलार्म आहे. तुमच्यामाझ्यासारख्या प्रत्येक पालकानं खडबडून जागं होणं गरजेचं आहे.

loading image
go to top