esakal | गप्पा ‘पोष्टी’ : आरत्या आणि रुळांचे खडखडाट!
sakal

बोलून बातमी शोधा

Ganpati

गप्पा ‘पोष्टी’ : आरत्या आणि रुळांचे खडखडाट!

sakal_logo
By
प्रसाद शिरगावकर

‘हां, करा सुरू,’ असं कोणीतरी म्हणतं आणि जमलेले वीस-पंचवीस जण आपापल्या स्वतंत्र ताला-सुरात ‘सुखकर्ता-दुखहर्ता’ म्हणायला लागतात. साधारणपणे ‘नुरवी पुरवी प्रेम’च्या ओळीला सगळ्यांची पट्टी आणि लय एकत्र मिसळून जाते. ‘कंठी झळके माळ’च्या ओळीला, तर एकदम फिट बसवलेल्या कोरससारखे सगळे एकासुरात आरती म्हणत असतात.

'जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती’ची ओळ येते. इथपर्यंत सगळं बेस्ट सुरू असतं. मंगलमूर्ती शब्दानंतर हातात पुस्तक घेऊन म्हणणारे लोक थेट ‘दर्शनमात्रे मन’ ला जायला लागतात, पण काहीजण मात्र, ‘हो श्रीमंगलमूर्ती’ अशी लहानपणी ऐकलेली ॲडिशन तिथे टाकतात. ट्रॅक बदलताना रेल्वेचा खडखडाट होतो, तसा आरतीच्या सुरा-लयीचा खडखडाट होतो. पण थेट ‘दर्शनमात्रे मन’वाली मेजॉरिटी ‘हो श्रीमंगलमूर्ती’वाल्यांना ॲडजस्ट करून घेते. आता ही मेजॉरिटी ‘दर्शनमात्रे मन’नंतर ‘कामनापूर्ती’ म्हणणार, इतक्यात काही जण, ‘हो स्मरणेमात्रे मन’ची ॲडिशन टाकतात. पुन्हा रुळ बदलल्याचा खडखडाट, पुन्हा लयीत बदल, पुन्हा ॲडजेस्टमेंट!! पुढच्या कडव्याच्या शेवटापासून मात्र,

जय मंगलमूर्ती नंतर श्री मंगलमूर्तीची आणि दर्शनमात्रेनंतर स्मरणेमात्रे येण्याची आणि रुळांचा खडखडाट होण्याची सगळ्यांना सवय होते!!

अशा ॲडिशन्स सगळ्या आरत्यांमध्ये असतात. ‘दुर्गे दुर्गटभारी’ म्हणताना काहीजणांना ‘क्लेषांपासून’ सोडवी इतकं पुरेसं असतं, तर काहीजण ‘दुःखां’पासून सोडवण्याचीही पुरवणी जोडतात. ‘लवथवती विक्राळा’मध्ये बहुसंख्यांना ‘जय श्री शंकरा’ पुरेसं असतं, तर काहीजण ‘हो स्वामी शंकरा’ही जोडतात. पांडुरंगांची आरती मात्र त्याच्या रुपाप्रमाणेच साधी. इथे ‘जय पांडुरंगा’ला पुरवणी जोडत नाही कोणी. मात्र, ‘ओवाळू आरत्या’ नंतर जे ‘चंद्रभागेमाजी सोडुनिया देती’ असतं, तेच बिचाऱ्या ‘आषाढी कार्तिकी आलेल्या भक्तजनां’नंतर पुन्हा जोडलं जातं आणि शेवटची दोन कडवी इनफायनेट लूपमध्ये जाऊ शकतात! पण हे सगळे रुळांचे खडखडाट आपोआप सावरले जातात आणि ‘घालीन लोटांगण’ला पुन्हा एका तालासुरात प्रार्थना सुरू होते, ‘हरे राम हरे राम’पर्यंत तर खोलीतल्या सगळ्यांचा मिळून एक मोठा आवाज आहे, का काय असं वाटायला लागलेलं असतं!! मंत्रपुष्पांजलीला मात्र ९०% आवाज बंद होऊन, नुसतंच ‘लाला लालाला’ असं असं चालीवर पुटपुणटणं सुरू होतं, अन् सगळ्यांत शेवटी ‘एकदंताय विध्न हे’ हे एका तालासुरात म्हणून पुन्हा सगळे एकाच रेल्वेचे प्रवासी असल्यासारखा आणि आपलं शेवटचं स्टेशन आल्यासारखा जल्लोष करतात!

सगळे एकत्र गात असताना कोणी थोडं वेगळ्या पद्धतीनं गात असेल, तर ॲडजस्ट करून घेणं, कोणी तालासुरात म्हणत नसल्यास आपले तालसुर वाकवून त्यांना सामावून घेणं, आपल्याला काही येत नसेल तर इतरांना म्हणू देणं आणि आपण फक्त टाळ्या वाजवत ‘लालालाला’ करत त्यांना साथ देणं हे सारं सारं आपण आरत्या म्हणताना करत असतो. रुळांचे कितीही खडखडाट झाले, तरी आपण गाडी ॲडजस्ट करून घेतो, रुळावरून घसरून देत नाही!

एकेकाळी सर्वच बाबतीत असलेली आपल्यातली ही सामावून घेण्याची वृत्ती, हल्ली फक्त आरत्या म्हणण्यापुरतीच उरली आहे की काय, असं वाटतं उगाचच. खऱ्या आयुष्यातले रुळांचे खडखडाट, हल्ली संपता संपत नाहीत....

loading image
go to top