esakal | गप्पा ‘पोष्टी’ : खरा ‘इको फ्रेंडली’ गणेशोत्सव
sakal

बोलून बातमी शोधा

Eco Friendly Ganeshotsav

गप्पा ‘पोष्टी’ : खरा ‘इको फ्रेंडली’ गणेशोत्सव

sakal_logo
By
प्रसाद शिरगावकर

‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’ऐवजी शाडूच्या मातीचा गणपती जास्त ‘इको फ्रेंडली’ असतो ही सध्याची एक लेटेस्ट अंधश्रद्धा आहे! म्हणजे असंय बघा, प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे एकदम चकाचक इंग्रजी आणि फॉरिनचं वगैरे नाव असलं तरी हा पदार्थ पॅरिसमध्ये कृत्रिमरीत्या तयार होत नाही. हे नैसर्गिकरित्या खाणींमधून मिळणारंच खनिज आहे. हे मंगळ किंवा इतर कोणत्याही ग्रहावरून इथं येत नसून, पृथ्वीवरच सापडतं. तसंच, शाडूची माती हा देखील निसर्गतः आढळणारा मातीचा एक प्रकार आहे. मग गणपतीची मूर्ती शाडू मातीची असेल, तर ‘इको फ्रेंडली’ अन् प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असल्यास पृथ्वीची दुश्मन, हा काय खुळचटपणा आहे? अन् हा कोणी पसरवला आहे?

कदाचित असं असेल की, प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पाण्यात विरघळत नाही, शाडू पाण्यात विरघळतोय, असं दिसतं. ह्या ढळढळीत दिसणाऱ्या फरकामुळं पीओपी काहीतरी भीषण असतं अन् शाडू नाही, असा समज झाल्याने पीओपी वर्ज्य असल्याचे निवाडे दिले गेले अन् मूर्ती त्याच्या नसाव्यातच असे आदेश दिले गेले असावेत. इथं दोन कॉमन सेन्सच्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. एकतर नदीच्या वाहत्या प्रवाहात माणसानं कृत्रिमरीत्या काहीही टाकलं, अन् ते मोठ्या प्रमाणात टाकलं तर नदी दूषित होतेच होते आणि दुसरी म्हणजे, त्यातल्या त्यात विचार करायचा तर, पाण्यात न विरघळणारी गोष्ट पाण्याचं कमी प्रदूषण करते कारण ती वेगळी काढणं खूप सोपं असतं. पण अशा कॉमन सेन्सचा विचार सरकार वगैरे यंत्रणा करत नाहीत!

खराखुरा इको फ्रेंडली गणेशोत्सव करायचा तर आपल्या गावा-शहरातल्या नदीच्या वाहत्या पाण्यात कोणत्याही म्हणजे कोणत्याही बाह्य पदार्थांचं विसर्जन न करणे, हा एकमेव मार्ग आहे. तुम्ही काच, कागद, माती, लाकूड, धातू असा कशाचाही गणपती करा, कशाचीही आरास करा, जे तुमच्या भाविक अन् श्रद्धाळू मनाला पटतं ते करा. पण यातलं काहीही, काहीही म्हणजे काहीही, गावा-शहरातल्या वाहत्या नदीत विसर्जन करू नका. आपल्या घरच्या घरी विघटन होईल किंवा आपल्या घरात-बागेत पुनर्वापर करता येईल अशा मटेरियलपासून बनलेली गणेश मूर्ती आणणं किंवा तयार करणं अन् ती वाहत्या नदीत सोडून न देता उत्सवानंतर त्या मूर्तीचं पार्थिव आपल्याच घरात वा बागेत विलीन होऊ देणं, हा खरा ‘इको फ्रेंडली’ गणेशोत्सव असतो.

आपल्या गावा-शहरातल्या नदीचा श्वास घुसमटू न देताही आपल्या श्रद्धांना जपणारा पर्यावरणस्नेही उत्सव साजरा करणे हा खरा बुद्धीच्या बाप्पाचा उत्सव! असा उत्सव साजरा करण्याची बुद्धी सगळ्यांना मिळो ही मनोमन प्रार्थना!

loading image
go to top