गप्पा ‘पोष्टी’ : पैसा अत्यंत गंमतशीर गोष्ट! | Money | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Money
गप्पा ‘पोष्टी’ : पैसा अत्यंत गंमतशीर गोष्ट!

गप्पा ‘पोष्टी’ : पैसा अत्यंत गंमतशीर गोष्ट!

sakal_logo
By
प्रसाद शिरगावकर

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. खिशात भरपूर पैसा असल्यावर आपण आनंदी असण्याची काहीही शाश्वती नसते, पण जवळ पुरेसा पैसा नसल्यास दुःख ग्यारंटेड असतं!! याची उप-गंमत म्हणजे ‘पुरेसा’ म्हणजे काय, हे आयुष्यात कधीही समजत नाही. उप-उप-गंमत अशीये, की पुरेसा म्हणजे किती हे ठरवलं आणि तेवढा मिळवलाच तरी तो ‘पुरत’ नाही आणि पुरेसाची व्याख्या पुन्हा बदलते!

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. आपल्याला आपल्या शिक्षण आणि कष्टांच्या मानानी कमीच मिळतो आहे, असं वाटत असतं. आपल्यापेक्षा कमी शिक्षण असलेल्या आणि नगण्य कष्ट करणाऱ्यांना खूप जास्त मिळतोय, असंही वाटत असतं. आपल्याला जो मिळतो तो टिकत नाही, इतरांकडं मात्र टिकतो, असं वाटत असतं. आपल्याला बेसिक गरजांनाही पुरत नाही, इतरांकडं उधळपट्टी करायला असतो, असं वाटत असतं. आणि हे असं म्हणजे असंच सगळ्या सगळ्यांनाच वाटत असतं! इतरांच्या तुलनेत आपला पैसा ही फार म्हणजे फार गंमतशीर गोष्ट आहे!! पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. तो एका दरवाज्यानं येतो आणि हजार खिडक्यांवाटे पसार होतो! आला की खूप छान, भारी, मस्त, बरं वगैरे वाटतं. पण तो नुसताच येऊन थांबल्यानं आणि घरात साचून राहिल्यानं त्यातून काही म्हणजे काही मिळत नाही. म्हणजे आपल्याकडं खूप पैसा आलाय हे भारी वाटलं तरी त्यानं पोट भरायचं आणि इतर सुखं मिळवायची तर पैशाला अनंत खिडक्यांमधून बाहेरच जाऊ द्यावं लागतं. पैसा आपल्यामुळं मिळणारं सुख मोठं का खर्चल्यामुळं मिळणारं हे ठरवता येत नाही!

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ‘दैव देतं आणि कर्म नेतं’ म्हण पैशाला लागू होत नाही. पैसा कष्ट केल्यानं, म्हणजे ‘कर्मानं’च मिळतो. क्वचित कधी दैवामुळंही मिळू शकतो, लॉटरी वगैरे लागल्यावर, पण तो काही शाश्वत मार्ग नाही. नियमितपणे पैसा मिळवायचा तर अफाट कष्ट पडतात. पण ‘कर्मानं’ मिळालेला पैसा ‘दैवा’मुळं एका क्षणात नाहीसा होऊ शकतो. चोरी म्हणू नका, टॅक्स म्हणू नका, आजारपणं म्हणू नका, अपघात म्हणू नका, भूकंप म्हणू नका, काय वाट्टेल ते ‘दैव’ किंवा योगायोग समोर उभे ठाकतात आणि कर्मानं कमावलेल्या पैशाचं क्षणार्धात होत्याचं नव्हतं होऊ शकतं. ‘कर्म कमावतं अन् दैव हिसकावतं’ ही पैशाच्या बाबतीतली म्हण असायला हवी!

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ‘पैशापाशी पैसा जातो!’ जिथं ऑलरेडी खूप पैसा आहे तिथं अजून अजून पैसा जात राहातो. जिथं खूप कमी पैसा आहे तिथून पैसा जमेल तेवढ्या लवकर कल्टी मारत राहातो. पैसा मिळवण्यासाठी आयुष्यभर आपण खपतो. मग एक दिवस आपण ‘खपल्यावर'', आपण निघून जातो, पैसा इथंच रहातो!!

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे!

loading image
go to top