esakal | गप्पा ‘पोष्टी’ : साड्यांचे रंग!
sakal

बोलून बातमी शोधा

Bag

गप्पा ‘पोष्टी’ : साड्यांचे रंग!

sakal_logo
By
प्रसाद शिरगावकर

‘ही लिंबू-पारवा कॉम्बिनेशनची साडी कशी वाटतीये?’’ बायकोने विचारलं.

‘लिंबू आणि पारवा? हे रंग आहेत?’’ माझा प्रश्न.

'बरं, ही जाऊ दे. ती श्रीखंडी कशी आहे?" बायकोचा प्रतिप्रश्न.

‘श्रीखंडी? नको, चिकट असेल!’’ मी उगाच विनोद करायचा प्रयत्न केला. त्यावर बायको आणि तिला उत्साहानं साड्या दाखवणारा सेल्समन दोघांच्या चेहऱ्यावरची सुरकुतीही हालली नाही.

‘बरं, ते ही जाऊ दे, चिंतामणी किंवा गुलबक्षी रंगात काही बघू का यंदा?’’ बायकोनं विचारलं. आता मला माझ्या अज्ञानाची प्रकर्षानं जाणीव व्हायला लागली. जगात ‘ता ना पि हि नि पा जा’ हे एवढेच सातच रंग असतात ही माझी पक्की समजूत होती आणि आहे. त्यातल्याही, तांबड्या आणि नारंगीत किंवा निळ्या आणि जांभळ्यात मला पटकन फरक समजत नाही. या शिवाय पारवा हे रंगाचं नसून कबुतरासारख्या दिसणाऱ्या पक्ष्याचं नाव आहे अशी माझी अनेक वर्षं समजूत आहे. हे सात रंग आणि सरधोपट पांढरा किंवा काळा हे रंग सोडले रंगांच्या इतर छटा एकतर मला ओळखता येत नाहीत किंवा काहीतरी वेगळं आहेच असं वाटलं तर त्यांची नावं मला समजत नाहीत.

माझा अजून एक प्रॉब्लेम म्हणजे, मला हिरवा रंग हिरवाच दिसतो, त्यातल्या कशाला पोपटी म्हणायचं, कशाला सी ग्रीन म्हणायचं आणि कशाला बॉटल ग्रीन हे कळत नाही. तेच निळ्या रंगाचं. निळा म्हणजे निळा. त्यात स्काय ब्लू कोणता आणि मोरपंखी कोणता याचंही मला आकलन होत नाही. या शिवाय, ‘डाळिंबी’ हा रंग नसून ते ‘मोसंबी’ सारखं देशी दारूचं नाव असावं, ‘तपकिरी’ हे तपकीरचं अन् ‘शेवाळी’ हे शेवाळ्याचं अनेक वचन असावं आणि मोतिया हे एखाद्या नबाबाघरच्या पांढऱ्या कुतियेचं नाव असावं अशीही माझी अनेक वर्षं समजूत होती.

परंतु बायकोबरोबर साड्यांच्या दुकानात गेलं की या साऱ्या समजुतींना सुरुंग लागतो. अन या सुरुंगाच्या स्फोटातून लाल, तांबड्या, नारंगी, चिंतामणी, पिवळ्या आणि लिंबू रंगांच्या ज्वाला उसळायला लागून त्यातून राखाडी, पारवा, तपकिरी, किरमिजी रंगांच्या धुराचे लोट उसळायला लागतात. तर मी असा माझ्या अज्ञानाच्या गर्तेत गटांगळ्या घेत असतानाच बायकोचा पुढचा प्रश्न आला...

‘ही केतकी रंगाची साडी कशी आहे? बघ ना. आमसुली काठ आहेत.’’

‘आमसुली?’’ माझा शेवटचा प्रश्न असतो.

त्याकडे दुर्लक्ष करून बायको ती साडी अंगावर लपेटून आरशात स्वतःला न्याहाळायला लागते. अन आपल्याला आवडलेली साडी अंगावर लपेटून आरशात स्वतःकडेच बघत असताना, तिच्या चेहऱ्यावर जो रंग उजळलेला दिसतो त्या रंगाचं नाव काय असावं याचा मी विचार करत बसतो.

loading image
go to top