प्रेरणादायी स्मारक!

मुंबईहून मुलुंडमार्गे नवी मुंबईत प्रवेश करताना ठाणे खाडी पूल ओलांडल्यानंतर लगेच डाव्या बाजूस नजरेत भरणारी वास्तू आकर्षित करते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानसंपन्न कर्तृत्वाचे प्रतीक म्हणून वास्तूला पेनाच्या नीबचा आकार देण्यात आला
Prashant Nanavare writes Inspirational monuments memorial of dr Babasaheb Ambedkar Navi Mumbai Municipal Corporation
Prashant Nanavare writes Inspirational monuments memorial of dr Babasaheb Ambedkar Navi Mumbai Municipal Corporationsakal
Summary

महापुरुषांचे कर्तृत्व आणि समाजासाठीचे योगदान लक्षात घेऊन स्मारक उभारल्यास त्या व्यक्तीचे कार्य लोकांपर्यंत पोहोचून अनेकांना त्यापासून प्रेरणा मिळू शकते. असाच एक नावीन्यपूर्ण प्रयोग नवी मुंबई महानगरपालिकेने केलाय. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, जागतिक कीर्तीचे कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रिसूत्रीचा प्रसार करणारे थोर समाजउद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आगळेवेगळे स्मारक नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आले आहे.

मुंबईहून मुलुंडमार्गे नवी मुंबईत प्रवेश करताना ठाणे खाडी पूल ओलांडल्यानंतर लगेच डाव्या बाजूस नजरेत भरणारी वास्तू आकर्षित करते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानसंपन्न कर्तृत्वाचे प्रतीक म्हणून वास्तूला पेनाच्या नीबचा आकार देण्यात आला आहे. या डोमची उंची ५० मीटर आहे. स्मारकाच्या चारही बाजूंनी आयताकृती आकारात आकर्षक नक्षीकाम केलेल्या ग्रील बसवण्यात आल्या असून आकाशातून वास्तू पाहिली असता शाईच्या पेनाच्या पुढील भागासमान ही वास्तू भासते. सभोवतालचा परिसरही सुशोभित करण्यात आला असून रात्रीच्या वेळी नयनरम्य विद्युत रोषणाईत ही वास्तू धारदार लेखणीप्रमाणे तळपलेली दिसते.

स्मारकात प्रवेश करताना समोरील बाजूचे अर्धगोलाकार प्रवेशद्वार लक्ष वेधून घेते. स्मारकाची वास्तू दोन भागांत विभागली असून प्रवेशद्वारासमोरील भागात बहुउद्देशीय इमारत असून अडीचशे आसनक्षमता असलेले वातानुकूलित अद्ययावत सभागृह आहे. ज्याचा वापर सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम तसेच चर्चासत्रे, परिसंवाद, विविध कलाविष्कार सादर करण्यासाठी केला जातो. या वास्तूचा सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे मागील बाजूस असलेला डोम. ज्याच्या तळमजल्यावर समृद्ध ग्रंथालय आणि ई-लायब्ररी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास दर्शवणारे, तपशीलवार माहिती देणारे छायाचित्र दालन, चलचित्र कक्ष व पहिल्या मजल्यावर ध्यानकेंद्र या सुविधा आहेत. ग्रंथालयात ज्याप्रमाणे एकमेकांना खेटून पुस्तकं ठेवलेली असतात, त्याप्रमाणे भव्य प्रवेशद्वाराची रचना करण्यात आली आहे. पुस्तक उघडल्याचा आभास निर्माण करणाऱ्या काचेच्या दरवाजातून आत प्रवेश करताच उजव्या बाजूस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे पोर्ट्रेट दिसते. ज्यावर ते ज्या विविध भूमिकांद्वारे लोकांना परिचित आहेत; उदा. लेखक, समाजशास्त्रज्ञ, घटनातज्ज्ञ, तत्त्वज्ञानी, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार इत्यादींचा उल्लेख आहे. डोमच्या मध्यभागी अशोक चक्राची आकृती आहे. डाव्या बाजूस ई-लायब्ररीसह समृद्ध ग्रंथालय आहे. स्वतः बाबासाहेबांनी लिहिलेल्या तसेच देशी-परदेशी लेखकांनी त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके या ग्रंथालयात ठेवण्यात आली आहेत. चरित्र अभ्यासकांना एकाच ठिकाणी त्यांच्याशी निगडित मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील सर्व संदर्भग्रंथ एकाच ठिकाणी उपलब्ध असणारे हे एकमेव दालन म्हणता येईल.

या ग्रंथालयात डॉ. आंबेडकरांवरील शासकीय प्रकाशने, चरित्र, संविधान, आंबेडकरी चळवळ, डॉ. आंबेडकरांची भाषणे व समीक्षा, बुद्ध आणि धम्म, अनुवादित पुस्तके, नियतकालिके असा समृद्ध वाचनीय ऐवज ठेवण्यात आलाय. छापील पुस्तकांसोबतच ई-लायब्ररीअंतर्गत ई-बुक्स, ऑडिओ बुक्स तसेच बाबासाहेबांवरील कार्यक्रमाच्या चित्रफिती पाहण्याची सुविधा आहे. या ग्रंथालयातच ग्रंथप्रेमींसाठी बसण्याची व्यवस्था केली असून दिवसभर शांततामय वातावरणात वाचनाचा आनंद घेता येतो.

ग्रंथालयाच्या समोरील बाजूस डॉ. आंबेडकरांचा प्रेरणादायी जीवनप्रवास उलगडणारे छायाचित्र दालन आहे. बाबासाहेबांचे बालपण, शिक्षण, राजकीय, सामाजिक कर्तृत्व आणि बौद्ध धम्माची दीक्षा अशा चार महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये ठळक घटना व प्रसंगांची छायाचित्रे मराठी आणि इंग्रजी भाषेत सविस्तर तपशिलासह लावण्यात आली आहेत. आधुनिकतेची कास धरत परदेशातील ग्रंथालये आणि वस्तुसंग्रहालयांप्रमाणे या दालनातील तपशील क्यूआरकोडद्वारे स्कॅन करून मराठी, हिंदी व इंग्रजी यापैकी तुम्हाला हव्या असलेल्या भाषेत ऐकण्याचीही व्यवस्था आहे. स्मारकातील खास आकर्षण म्हणजे ‘आभासी चलचित्र कक्ष’. आभासी वास्तवदर्शी चित्रण प्रणालीद्वारे भाषण करतानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर बघण्याची सुवर्णसंधी येथे मिळते. नीबच्या आकारातील उंच डोमच्या खाली ‘ध्यानकेंद्र’ विकसित करण्यात आले असून लवकरच इगतपुरी अथवा गोराई पॅगोडामध्ये असणाऱ्या ध्यानसत्रांच्या धर्तीवर नागरिकांसाठी विशेष सत्रे आयोजित केली जाणार आहेत.

डॉ. आंबेडकरांचे हे स्मारक त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला वाहिलेली सर्वोत्तम आदरांजली म्हणावी असे आहे. महापुरुषांची स्मारके उभारताना यापुढे या स्मारकाचा आदर्श समोर ठेवल्यास खऱ्या अर्थाने समाजप्रबोधन हेण्यास मदत होऊन व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाला साजेशी स्मारके देशभर उभी राहण्यास मदत होईल. आपल्या आयुष्यातील सर्वाधिक काळ ज्यांनी ग्रंथांच्या सान्निध्यात घालवला त्यांच्या या आयकॉनिक स्मारकाला भेट द्यायलाच हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com