।। जय महाराष्ट्र ।। | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Martyr Monument
।। जय महाराष्ट्र ।।

।। जय महाराष्ट्र ।।

महाराष्ट्र राज्यासाठी बलिदान देणाऱ्या १०६ हुतात्म्यांची आठवण जागवणारे मुंबईतील स्मारक हे प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीसाठी प्रेरणास्रोत आहे. हुतात्म्यांच्या स्मरणार्थ येथे दिवसाचे चोवीस तास आणि वर्षाचे बाराही महिने अमर ज्योत जळत असते. स्मारकाच्या आजूबाजूच्या परिसराला लोखंडी कुंपण असून, आतील भागावर हिरवळ आहे. शिल्पाच्या मागच्या बाजूस चौथरा बांधला असून त्याच्या भिंतीवर १०६ हुतात्म्यांची नावे आणि चौथऱ्यावर मोठ्या अक्षरात लिहिलंय ‘जय महाराष्ट्र’...

एका बाजूला नव्याने निर्माण झालेल्या फोर्ट विभागाची शोभा वाढवण्यासाठी उभारण्यात आलेले कलात्मक शिल्प आणि दुसऱ्या बाजूला संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेले प्रेरणादायी शिल्प म्हणजे मुंबईचा इतिहास आणि वर्तमानाची घातली गेलेली उत्तम सांगड होय. हुतात्मा स्मारक चौक किंवा फ्लोरा फाऊंटन माहीत नसलेली व्यक्ती मुंबईत शोधूनही नाही. कारण मुंबई आणि महाराष्ट्राच्या जन्माची कथाच इथून सुरू होते.

चर्चगेट रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर दक्षिणेकडील टोकाकडून बाहेर पडून थेट पूर्वेला चालत गेल्यास रस्ता हुतात्मा चौकात येऊन संपतो. हा एक किलोमीटरचा रस्ता म्हणजे भटक्यांसाठी पर्वणीच आहे. चर्चगेटपासून चौकाच्या दिशेने चालताना डाव्या बाजूला पश्चिम रेल्वे मुख्यालय, क्रॉस मैदान गार्डन आणि उजव्या बाजूला ब्रेबॉर्न स्टेडियम, ओव्हल मैदान, मुंबई उच्च न्यायालय अशी एकाहून एक सरस ठिकाणं आणि वास्तू पाहायला मिळतात. या चौकाचे वैशिष्ट्य म्हणजे हा चौक जुन्या आणि नवीन अशा दोन्ही नावांनी ओळखला जातो. जुने नाव ‘फ्लोरा फाऊंटन’ आणि नवीन नाव ‘हुतात्मा स्मारक चौक’. नावं नमूद केलेली दोन्ही ठिकाणं एकमेकांना खेटून उभी असली, तरी आपलं स्वतंत्र अस्तित्व आणि महत्त्व टिकवून आहेत. फ्लोरा फाऊंटनपासून उत्तरेकडे पुढे जाणाऱ्या दादाभाई नौरोजी मार्गावर भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे पितामह दादाभाई नौरोजी यांचा पुतळादेखील आहे.

महाराष्ट्राला मोठा सामाजिक आणि राजकीय वारसा आहे. ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ असे राम गणेश गडकरी यांनी महाराष्ट्राचे वर्णन केले आहे; मात्र १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषेच्या निकषांवर राज्यांच्या सीमारेषा आखून महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना एकाच द्वैभाषिक राज्याचा दर्जा दिला गेला. मराठी माणसाच्या हे पचनी पडणारे नव्हते. त्याला सर्वांत मोठे कारण होते ‘बॉम्बे’ म्हणजेच आत्ताचं ‘मुंबई’ शहर. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा सुरू झाला. या लढ्याचा इतिहास मोठा आहे, त्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या असंख्य लोकांनी आपले योगदान दिले, परंतु फ्लोरा फाऊंटन परिसरात संयुक्त महाराष्ट्रासाठी निदर्शने करणाऱ्या निदर्शकांवर केलेल्या गोळीबारात काही जण मृत्युमुखी पडले आणि हा या आंदोलनाचा कळस ठरला. अखेर संयुक्त महाराष्ट्र समितीच्या साडेचार वर्षांच्या अथक प्रयत्नांना यश मिळून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीला पं. नेहरू सरकारने मान्यता दिली आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र राज्यासाठी बलिदान देणाऱ्या १०६ हुतात्म्यांची आठवण जागवणारे भव्य स्मारक हे प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीसाठी प्रेरणास्रोत आहे.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या केंद्रस्थानी शेतकरी आणि कामगार वर्ग होता. म्हणूनच या स्मारकाच्या शिल्पामध्ये शेतकरी आणि कामगार वेशातील दोन व्यक्ती हाती मशाल घेऊन दाखवण्यात आलेल्या आहेत. हुतात्म्यांच्या स्मरणार्थ येथे दिवसाचे चोवीस तास आणि वर्षाचे बाराही महिने अमर ज्योत जळत असते. स्मारकाच्या आजूबाजूच्या परिसराला लोखंडी कुंपण असून, आतील भागावर हिरवळ आहे. शिल्पाच्या मागच्या बाजूस चौथरा बांधला असून त्याच्या भिंतीवर १०६ हुतात्म्यांची नावे आणि चौथऱ्यावर मोठ्या अक्षरात ‘जय महाराष्ट्र’ लिहिलेले आहे.

शेजारील फ्लोरा फाऊंटन म्हणजेच कारंजे हे मुंबई शहराचा मानबिंदू असून रिचर्ड नॉर्मन शॉ यांच्या संकल्पनेतील या कारंज्यांची निर्मिती शिल्पकार जेम्स फोर्सित यांनी केलेली आहे. पोर्ट लॅण्ड दगडामध्ये बांधकाम केलेली ही शिल्पाकृती तब्बल २५ फूट उंच असून तीन टप्प्यांतील या कारंज्याचा मूळ प्रस्ताव ‘ॲग्रो हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया’ या संस्थेने तत्कालिन व्हिक्टोरिया उद्यानात (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान) बसवण्याकरिता मांडला होता, परंतु त्या वेळी नव्याने निर्माण झालेल्या फोर्ट विभागाची शोभा वाढवण्यासाठी १८ नोव्हेंबर १८६९ रोजी या शिल्पाचे मुंबई शहरासाठी लोकार्पण करण्यात आले. प्रारंभी तत्कालिन गव्हर्नर बार्चल फ्रेर यांच्या नावे ‘फ्रेर फाऊंटन’ या नावाने ओळखले जाणारे हे कारंजे, या शिल्पाच्या शिखरावर उभ्या स्वरूपात असलेल्या रोमन देवता ‘फ्लोरा’च्या पुतळ्यावरून ‘फ्लोरा फाऊंटन’ म्हणून प्रसिद्ध झाले. निओ गॉथिक आणि निओ क्लासिकल शैलीत आरेखित केलेल्या या कारंज्याच्या खालील बाजूस असलेली चार शिल्पे ही भारतातील औद्योगिक, अन्नधान्य, वनस्पती व फळांची प्रतीके असून, वरच्या बाजूला चार दैवी माश्यांची शिल्पे आहेत. फाऊंटनच्या रचनेत रोमन देवता, डॉल्फिन मासे, शिंपल्याच्या आकारातील अलंकृत कुंड, मध्यवर्ती गोलाकार कारंजे व मानवी आकारातील विलोभनीय शिल्पांचा अनोखा संगम असलेले मुंबईतील एकमेव वास्तुशिल्प असावे. कारंज्यातील पाण्याचा प्रवाह रोमन देवतेच्या पायाशी अल्लडपणे रेंगाळणाऱ्या लोभस डॉल्फिन मत्स्याच्या मुखातून सुरू होतो व शिंपल्यातून तिसऱ्या टप्प्यातील कुंडावरील सिंहमुखातून गोलाकार हौदामध्ये पाण्याचे निर्गमन होते. त्या क्रमवारीत पाण्याचा भिंतीला स्पर्शही होणार नाही याची काळजी घेतली आहे. तसेच शिल्पाच्या मध्य भागातील चक्राकार कारंजेही लक्ष वेधून घेते.

हुतात्मा स्मारक चौक आणि फ्लोरा फाऊंटनच्या मधोमध असलेल्या पदपथावरून दररोज अनेकजण ये-जा करतात. चारही दिशांनी येणाऱ्या वाहनांसाठी अनेकदा हा केवळ दुसऱ्या दिशेला जाण्यासाठीचा चौक असतो, परंतु रहदारी आणि वाहतुकीच्या पलीकडे या चौकाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. एरव्ही मुंबईच्या गर्दीत दुर्लक्षित होणाऱ्या या चौकाला सुट्टीच्या दिवशी निवांत भेट दिली पाहिजे- ब्रिटिशांचे शहर नियोजन व कलाप्रेम पाहण्यासाठी आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्यात हुतात्मा झालेल्यांचे स्मरण करण्यासाठी!

nanawareprashant@gmail.com