मनोवृत्तीचा लढा...!

माझं काही कामानिमित्तं २०२३ मधल्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लंडनला जाणं झालं.
pratap pawar writes about india development education student london
pratap pawar writes about india development education student londonSakal

माझं काही कामानिमित्तं २०२३ मधल्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लंडनला जाणं झालं. यादरम्यान काही लोकांच्या नेहमीप्रमाणे भेटी झाल्या. त्यांत उद्योगपती होते, ऑक्सफर्ड, केम्ब्रिज इथले प्राध्यापक होते, मराठी उद्योजक होते आणि मित्रपरिवार. या भेटीगाठींत पाच-सात दिवस कसे जातात हे समजतही नाही.

माझ्या अशा भेटींमध्ये मोकळ्या वेळात, प्रवासात माझं विचारचक्र सुरू राहतं. सवयीप्रमाणे मी, माझा देश, माझा समाज, त्यातले मला वाटणारे गुण-दोष यांची तुलना, ज्या देशात मी जातो त्यांच्याबरोबर करताना, विचारमंथन सुरू होतं. सध्याची आपली सामाजिक, राजकीय परिस्थिती याबद्दलही तुलनात्मक विचार सुरू होतात.

पहिल्यांदा आपण इंग्लंड या देशाबद्दल पाहू या. मला हे नेहमी आढळतं की, त्या देशातील नागरिक आणि त्या देशाचं सरकार हे पूर्णतया वेगळे असतात. याकडे ‘इंग्रज माणूस’ आणि ‘ब्रिटिश सरकार’ असं दोन विभागांत पाहावं लागतं. इंग्रज माणूस हा सर्वसाधारणतः जगात ‘जसा सामान्य माणूस चांगला असतो’ तसाच आहे आणि असतो.

साहित्य, संशोधन, शिक्षणसंस्था, खेळ यांमध्ये आयुष्य झोकून दिलेली परंपरा दिसते. अगदी खेळ घ्या. टेनिस, बॅडमिंटन, क्रिकेट, घोड्यांची रेस इत्यादी...या प्रत्येक खेळासाठी नियमावली आणि शास्त्र आहे. त्यात सातत्य आणि सुधारणा आपल्याला दिसतील. यामुळे जगभर याचा प्रसार झाला तरी नियम इंग्रजच असतात. सर्व काही शिस्तबद्ध.

आपण शिक्षणावर येऊ या. इंग्रजांनी जगभर राज्य केलं ते आपल्या मूठभर लोकांच्या साह्यानं. त्यांच्या पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थी तयार केले गेले. विद्यापीठात उच्च शिक्षण दिलं गेलंच; परंतु काळाबरोबर त्याचा दर्जाही त्यांनी उंचावत गेला.

सहज उदाहरणादाखल सांगावंसं वाटतं. माझे एक स्नेही डॉ. अजित जावकर आपल्याकडचेच. ऑक्सफर्ड विद्यापीठात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरचे तज्ज्ञ प्राध्यापक. त्यांना दरवर्षी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये चर्चा, सल्लामसलत यांसाठी बोलावलं जातं. युरोपीय पार्लमेंटमध्ये ते सहभागी होतात.

मग हे भारतातल्या प्राध्यापकांबाबत का होत नाही, याचा साकल्यानं विचार व्हायला हवा. विद्यापीठात फक्त पुस्तकी शिकवण्याबरोबरच आधुनिक शास्त्रं, त्यांचा वापर यावरचं संशोधन किती आहे? शाळेतून अथवा विद्यापीठातून बाहेर पडणारा विद्यार्थी कितपत स्वावलंबी आहे?

केम्ब्रिज विद्यापीठात माझ्या एका मराठी स्नेह्याच्या मुलाला प्रवेश मिळाला. अर्थात् त्यासाठी विद्यापीठानं आग्रह धरला, फी माफ केली; शिवाय, शिष्यवृत्तीही दिली. तिथं त्याच्या विषयासाठी फक्त इंग्लंडमधून निवड झालेले तीनच विद्यार्थी आणि त्यांच्या मागं एक अनुभवी, तज्ज्ञ प्राध्यापक.

अशा प्राध्यापकांकडे उद्योजक अनेक विषयांवर संशोधन करण्यासाठी मदत मागतात. त्यासाठी भरपूर पैसेही देतात. लक्षात आलं की, केम्ब्रिज विद्यापीठाला सरकार आणि उद्योजक यांच्याद्वारे वर्षाला सुमारे दहा हजार कोटी रुपये मिळतात.

नोबेल पारितोषिक मिळणारे प्राध्यापक ऑक्सफर्डमध्ये तयार होतात. आपल्याकडे काय परिस्थिती आहे? मी ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे’मध्ये (सीओईपी) जवळपास दोन दशकं झोकून देऊन काम केलं.

अनेक नियमावलींमुळे त्याचा श्लेष काढून सरकारनं सरकारी मदतीला चाप लावला. याबाबत आता मी तिथं नसल्यानं अधिक बोलणं योग्य नाही; परंतु आपल्याकडच्या एका नामवंत, तसंच सुमारे १५० वर्षं जुन्या शैक्षणिक संस्थेची, काहीशे वर्षं जुन्या असलेल्या या ऑक्सफर्ड किंवा केम्ब्रिज या विद्यापीठांशी आपण तुलना तरी करू शकतो का?

परंतू, तिथं गेलेले डॉ. जावकर मात्र आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवतात. आपल्याकडेही त्यांच्या बुद्धिमत्तेचे अनेक ‘डॉ. जावकर’ नक्की असतील; परंतु आपल्याकडचं वातावरण काय? साधनसामग्री काय?

इंग्लंडनं संशोधनात सातत्यानंआघाडी ठेवत वाफेच्या इंजिन-रेल्वेपासून दारूगोळा, बंदुका, तोफा, चारचाकी वाहनं वगैरे तयार केली.

जिंकलेल्या प्रदेशाच्या ते नेहमी १०० वर्षं पुढं राहिले. प्रशासनाची शिस्त, नियम वगैरेंमध्ये ते वेळोवेळी सुधारणा करत गेले. हे करताना त्याला त्यांनी देशप्रेमाची जोड दिली. जगातल्या इतक्या देशांवर राज्य करूनही इंग्रजांचा एकतरी माणूस फितूर झाला का? किंवा एखाद्यानं तरी बंड केलं का? पाचशे, हजार मैलांवर असलेले देश, खंड त्यांनी शेकडो वर्षं आपल्या ताब्यात ठेवले.

तिथली खनिजं, जंगलं साफ केली. बंगालमधलं सर्व धान्य इंग्लंडला नेलं, त्यामुळे सुमारे दहा लाख जणांचा भूकबळी गेला. सर्व देशांमध्ये, खंडांमध्ये तिथल्या स्थानिकांची कत्तल केली; मग तो ऑस्ट्रेलिया असो वा अमेरिका, कॅनडा वगैरे.

हे सर्व ब्रिटिशांनी केलं. हाच फरक मी ‘इंग्रज’ आणि ‘ब्रिटिश’ यांच्यात करतो. मानवतेची महती सांगणाऱ्या इंग्रजांच्या ब्रिटिश यंत्रणेनं लाखो आफ्रिकी लोकांना गुलाम तर केलंच; पण त्यांना वागणूकही जनावरासारखीच दिली, अगदी लिलाव करण्यापर्यंत. अब्राहम लिंकन यांनी याविरुद्ध भूमिका घेतली तेव्हा त्यांच्या दक्षिण आणि उत्तर अमेरिकेत जीवघेणं युद्ध झालं.

याच अमेरिकी लोकांच्या सरकारनं व्हिएतनाम, इराक, लिबिया इथं अकारण प्रचंड नरसंहार आणि विध्वंस केला. काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडवलेल्या आहेत. स्वतः अत्यंत चंगळवादी जीवन जगून जगाला तुम्ही दूषित करणारे म्हणून दोष देण्यात हे अमेरिकी सरकार आघाडीवर आहे.

अहो, साधं पाणी प्यायचं असलं तरी ते ॲल्युमिनियमचा कॅन वापरतात. पी पाणी आणि फेकून दे कॅन. हा कॅन तयार करण्यासाठी प्रचंड ऊर्जा वापरलेली असते. आपण एखादा पेला आयुष्यभर वापरतो. संशोधनांतून अणुबॉम्ब, विमानं करणारे हेच. जपानवर अणुबॉम्ब टाकणारे हेच; परंतु आपला स्वार्थ साधत मानवतेचे, वसुंधरेच्या संरक्षणाचे धडे देणारे लोकही हेच! जे बंदुका, दारूगोळा मोठ्या प्रमाणावर तयार करतात तेच ते वापरणार किंवा विकणार ना?

हे लोक, मुख्यतः युरोपीय, जगभर का पसरले? त्यांनी लिमिटेड कंपन्या सुरू केल्या. ईस्ट इंडिया कंपनीला युद्धासाठी, वाढीसाठी कर्ज काढणं सोपं गेलं...नुकसान झालं तरी ते एकट्याचं नसे. आपल्या पेशव्यांना युद्धासाठी कर्ज काढावं लागायचं. पानिपतसारखं युद्ध हरल्यावर दुहेरी नुकसान होतं. आर्थिक घडी बसवण्यास बराच काळ लागायचा.

कोणतंही आवश्यक तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी अथवा सुधारणा करण्यासाठी ब्रिटिश सरकारला इंग्रज जनता पूर्ण पाठिंबा देत असे. आपल्याकडे हा विचारच नव्हता. तलवारींच्या पुढं आमची मजल गेली नाही.

माझ्या माहितीनुसार, कोकणातल्या आपटे नावाच्या गृहस्थांनी अग्निबाण यशस्वीपणे निर्माण केले. ते बहुतेक टिपू सुलतानाच्या बरोबर झालेल्या युद्धात वापरलेही गेले. पेशव्यांनी अथवा आपल्या लोकांनी त्याची दखल घेतली नाही; परंतु ब्रिटिशांनी त्या गोष्टी लगेच इंग्लंडला संशोधनासाठी पाठवल्या.

आपल्यातल्या आणि इंग्रज किंवा युरोपीय लोकांमधल्या शास्त्रीय प्रगतीबद्दल हा फरक होता. आपण कर्मकांडात गुंतलो, ते संशोधनात गुंतले. पाणी दूषित आहे म्हणून सोडावॉटर तयार केलं. मलेरिया होऊ नये म्हणून टॉनिक वॉटर तयार केलं; परंतु गोरे लढले तेही जगभर. मी अनेक वर्षं इंग्लंडला जातो आहे.

मला काही काळ असा प्रश्न पडला होता की, हे इंग्रज जगभर बाहेर का पडले? काय कारणांनी त्यांना उद्युक्त केलं? त्यांच्या कौटुंबिक संस्थेत कुटुंबाची सर्व मालमत्ता थोरल्या मुलाला मिळते. मग बाकीच्या भावंडांनी काय करायचं? हे सर्व समुद्रात शिरले. व्यापारात प्रचंड पैसा होता आणि शिक्षणातून इतर देशांचा कारभार पाहणारे अधिकारी हवे होते. त्यांना पगारपाणी, पेन्शन वगैरे भरपूर फायदे होते. यामुळे इंग्रज जगभर कुठंही जायला तयार होते.

हा वृत्तीचाही प्रश्न असतो. मला आठवतं, पिलानी इथला माझा एक वर्गमित्र पुण्यात नोकरीसाठी आला होता. मी त्याला मराठी वृत्तीनं म्हटलं : ‘अरे, इतक्या लांब तू नोकरीसाठी आलास?’ तो पंजाबी होता. त्यानं मला पंजाबीत उत्तर दिलं : ‘काय फरक पडतो...कुठंतरी रोजीरोटी कमवायचीच आहे ना?’ आपल्या मराठी तरुणांना हे समजायला हवं.

विमा ही अशीच एक गोष्ट बँकांबरोबर इंग्लंड, युरोपमध्ये निर्माण झाली. यामुळे उद्योजकांचा धोका आणखी कमी झाला. इंग्लंडमध्ये लोकशाही खोलवर रुजली गेली. कायदेकानून, प्रशासन आणि इतिहासाचं जतन हा त्यांचा अविभाज्य भाग झाला. आजही आम्हाला आपल्या इतिहासासाठी इंग्लंडची मदत लागते. आपल्याला इतिहास लिहिणं तर दूरच; परंतु आहेत ते किल्ले, लेण्या यांचं जतन करण्यातही रस नाही.

मी काही महिन्यांपूर्वी ‘एज्युकॉन’च्या निमित्तानं फिनलंडला गेलो होतो. तिथं काय दिसतं? प्रत्येक नागरिक हा उत्पादक, देशोपयोगी कसा होईल अशी शिक्षणप्रणाली. आपली उत्पादनं जगात सर्वश्रेष्ठ होतील यासाठी त्या गुणवत्तेचे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञान निर्माण करण्याचं सुयोग्य वातावरण.

यात सरकारपासून सर्वांचा सहभाग. आपल्यापेक्षा त्यांचं दरडोई उत्पन्न वीस पटींपेक्षा जास्त आहे, आपल्याकडे संपन्न निसर्ग, बुद्धिमत्ता असूनही! राजकीय पक्ष तर विरोधकांना नामोहरम करण्यातच सर्व शक्ती वापरतात.

एकोप्यानं देशसुधारणेचा प्रश्न येतो कुठं? यामुळे आपल्या क्षमतेच्या काही टक्केच निर्मितीमध्ये यश मिळतं. चांगलं सरकार आणि चांगलं प्रशासन हे आपणच जागरूकतेनं निर्माण करायचं आहे. जनतेच्या धाकानं हे नक्की शक्य आहे.

करू या प्रयत्न. नक्की जमेल. जनता भारतीय आहे, सरकार इंडियन आहे तेही आपल्याच जनतेसाठी. बदलू या ही मनोवृत्ती. मग येईल सुवर्णकाळ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com