
जगात कुठंही फिरलो तरी साधारणपणे शिक्षणप्रणालीबद्दल असमाधान व्यक्त केलं जातं. सुमारे ३० वर्षांपूर्वी मी लंडनच्या ‘फायनान्शिअल एक्स्प्रेस’मध्ये एक लेख वाचला होता.
शिक्षणपद्धती आमची आणि त्यांची..!
जगात कुठंही फिरलो तरी साधारणपणे शिक्षणप्रणालीबद्दल असमाधान व्यक्त केलं जातं. सुमारे ३० वर्षांपूर्वी मी लंडनच्या ‘फायनान्शिअल एक्स्प्रेस’मध्ये एक लेख वाचला होता. शिक्षणपद्धतीबरोबर जे शिकवलं जातं त्यावर त्यांनी परखडपणे टीका केली होती. त्यांचं म्हणणं असं होतं की, ‘पुस्तक लिहिणारी व्यक्ती ही सुमारे त्याआधी ३० वर्षांपूर्वी पदवीधर झालेली असते. त्या वेळच्या अनुभवांवर हे पुस्तक लिहिलेलं असतं; जे पुढची तीस वर्षं वापरलं जाणार आहे, म्हणजे पुढील विद्यार्थ्यांना ३० ते ६० वर्षं जुनं ज्ञान शिकावं लागणार आहे.’ यात मला खूपच तथ्य वाटलं. आपल्या शिक्षणपद्धतीत काहीच बदल झालेला नाही. ‘रट्टा मारो, पास हो जाओ...’ हे सुरूच आहे.
यानिमित्तानं एक अनुभव सांगावासा वाटतो. कदाचित काही लोकांना तो माहीत असावा. तो म्हणजे, पुण्याचे डॉ. निळकंठराव कल्याणी यांचे वडील प्रसिद्ध व्यापारी. त्यांनी डॉ. निळकंठरावांना पुण्याला कॉमर्स शिकायला पाठवलं. त्यांनी पाच ते सहा महिन्यांनंतर पुण्यात येऊन, आपला मुलगा काय शिकतो, हे त्याच्याकडून समजावून घेतलं. वडिलांनी निळकंठरावांना विचारलं : ‘‘व्यवसायातील धोके कसे स्वीकारायचे आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी काय करायचं हे इथं शिकवतात का?’’
उत्तर अर्थातच ‘नाही’ असं आलं.
वडील म्हणाले : ‘‘चल घरी, या शिक्षणात काहीच अर्थ नाही. कारण, तू जे शिकणार आहेस ते मी तुला घरीपण शिकवेन!’’
त्यांनी निळकंठरावांना सरळ कऱ्हाडला नेलं. पुढचा ‘भारत फोर्ज’चा इतिहास सर्वांना ज्ञात आहेच. ती जगातील या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट औद्योगिक संस्था आहे.
‘सकाळ’च्या ‘एज्युकॉन परिषदे’च्या निमित्तानं अनेक देशांमध्ये जाणं होत असतं. अनेक तज्ज्ञांशी विचारविनिमय होत असतो. यामध्ये विसरता येणार नाहीत असे काही अनुभव आले. त्यातील इस्राईलमधील एक अनुभव प्रथमतः सांगावासा वाटतो. तिथल्या एका बिझनेस आणि आंत्रप्रेन्युअरशिप विद्यापीठातील प्रमुख आपलं वेगळेपण सांगत होते. त्यांनी सांगितलं की, ‘आमच्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांपैकी ७० ते ८० टक्के विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण पूर्ण होण्यापूर्वी, म्हणजे पदवीधर होण्यापूर्वीच, व्यवसायात यशस्वीपणे पदार्पण करतात!’ हे समजण्यापलीकडचं होतं. या वेळी माझी नात माझ्याबरोबर होती. ती मुंबईच्या प्रथितयश महाविद्यालयात याच प्रकारचं शिक्षण घेत होती. तिनं इस्राईलच्या विद्यापीठात शिकण्याची इच्छा व्यक्त केली. अर्थात्, आमची त्याला मान्यता होती. आता ती पदवीधर झाली आहे आणि तिथल्या सर्व अपेक्षांपेक्षा तिनं अधिक यश मिळवलं आहे.
तिथं कसं शिकवतात? तर महत्त्वाचे म्हणजे, तिथं कुणीही शैक्षणिक पात्रतेनुसार शिकवणारे प्राध्यापक नाहीत. तिथं शिकवणारे शंभर टक्के प्राध्यापक हे उद्योगपती, यशस्वी उद्योजक, उद्योग संस्थांचे सर्वोच्च अधिकारी असतात. ते त्यांना दिलेल्या विषयाशी संबंधित आपल्या अनुभवांवर विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करत असतात. तेही आपल्या सोईच्या वेळेनुसार. यामुळे पुढील आठवड्यात कोण, काय शिकवणार आहे ते आदल्या आठवड्यात समजतं. हे शिकवणारे प्राध्यापक, काय वाचून यायला पाहिजे, याची यादी विद्यार्थ्यांना पाठवतात. शिकवताना आणि नंतर प्रश्नोत्तरं होतात व शंकासमाधान केलं जातं.
यामुळे विद्यार्थ्याला वस्तुनिष्ठ शिक्षण मिळतं. हे शिकताना विद्यार्थ्यांना एखाद्या सेमिस्टरमध्ये आपल्या विषयातील एखाद्या कंपनीत अनुभव घ्यावा लागतो. यामुळे काही विद्यार्थी उत्तम प्रगती करतात. त्यांना वेगवेगळ्या सेमिस्टर लेक्चर्सला जाण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. यानंतर शेवटच्या वर्षात विद्यार्थ्यांना स्पर्धेत भाग घ्यावा लागतो. सर्वोत्तम प्रबंधाला सुमारे एक लाख रुपये मिळतात. त्याला आर्थिक मदत करणाऱ्या संस्थांची ओळख करून दिली जाते आणि व्यवसायात पदार्पण करायला उद्युक्त केलं जातं. इतरही काही गोष्टी आहेत. यामुळे विद्यार्थी हा खऱ्या अर्थानं तावून-सुलाखून विद्यापीठातून बाहेर पडतो ते भरारी मारण्यासाठीच!
सुदैवानं भारतामध्येही अशा पद्धतीची ‘प्रोफेसर इन प्रॅक्टिस’ योजना सुरू झाली आहे. तीत १२ ते १५ वर्षं अनुभव असलेले उद्योजकांमधील तज्ज्ञ शिकवू शकतात. याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत.
यानिमित्तानं मला आणखी एक अनुभव सांगावासा वाटतो. मी पिलानी इथं शिकायला असतानाचा हा अनुभव आहे. त्या काळी प्रत्येक वर्षी आपल्या विषयाशी संबंधित कंपनीत प्रशिक्षण घेणं आणि त्याचा अहवाल करणं अनिवार्य होतं. त्यासाठी शंभर गुणही दिले जायचे. प्रशिक्षण घेत प्रत्येक वर्षी मी मन लावून काम केलं. त्याचा परिणाम असा झाला की, प्रत्येक कंपनीनं मला शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘आमच्याकडे या’ असं सांगितलं. शिक्षण पूर्ण होत असतानाच माझ्या हातात नोकऱ्यांचे चार पर्याय उपलब्ध होते. एक मराठी मुलगा म्हणून मला त्याचं खूप महत्त्व होतं. त्याच बरोबर मला स्पष्टपणे ध्यानात आलं की, आणखी शिक्षण घेण्यापेक्षा मी व्यवसायात पदार्पण केलं पाहिजे. थोडक्यात, या प्रशिक्षणांमुळे मला माझ्या बलस्थानांची आणि उणिवांचीही जाणीव झाली.
‘एज्युकॉन परिषदे’च्या निमित्तानं सिंगापूरला जाणं झालं. तिथल्या एका विद्यापीठात जगातील उत्कृष्ट संस्थांची संशोधनकेंद्रेच सुरू करायला उद्युक्त केलेलं असल्याचं जाणवलं. उदाहरणार्थ : रोल्स राईस, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज बेंझ आदी. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना संशोधनासाठी काम करण्याची संधी तर मिळतेच; शिवाय, भविष्यकाळात कोणती तंत्रज्ञाने येणार आहेत त्याचं प्रशिक्षण आणि अनुभवही मिळतो. त्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांना जगभरातून मागणी असते.
आपल्या देशातही शिक्षणक्षेत्रात अनेकजण वेगवेगळे प्रयोग करत असतात. गुरुकुल पद्धतीच्या तत्त्वावर मंगळूर इथल्या एका शिक्षणप्रेमीनं वेगळाच विचार केला आहे. तो मला खूपच उद्बोधक वाटला. सनी थरप्पन असं या शिक्षणप्रेमीचं नाव. त्यांनी जरा हट के विचार केला आणि प्रत्यक्षात अमलात आणला.
थरप्पन यांच्या म्हणण्यानुसार, मूल जन्मल्यावर शाळेत जाईपर्यंत आईच त्याची शिक्षिका असते. त्या मुलाचा त्याच्या स्वभावानुसार सर्वांगीण विकास कसा होईल, हाच तिचा ध्यास असतो. नंतर शाळेत ते मूल शिक्षकांकडून शिकत राहतं. एका वर्गात साधारणपणे ५० ते ६० मुलं असतात. मग सर्वांची गुणवत्ता कशी सुधारणार? मात्र, आपण शिक्षकाचं परिवर्तन आईच्या स्वरूपात केलं तर शिक्षक प्रत्येक मुलाला त्याचा कल, गुण-दोष पाहून घडवण्याचा प्रयत्न करेल.
थरप्पन गेली ३० ते ४० वर्षं हा ध्यास घेऊन कार्य करत आहेत. हा विचार मला खूपच भावला. आम्ही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे (COEP) इथले ४० प्राध्यापक, बारामतीमधील हायस्कूलचे १८० शिक्षक, कॉलेजचे १७० प्राध्यापक यांना थरप्पन यांच्या मार्फत या कोर्सचं प्रशिक्षण दिलं. यात अनेक चर्चासत्रं एकत्र बसून केलेली असतात. तीन दिवसांच्या अशा प्रशिक्षणानंतर सर्वांमध्ये खूप चांगला बदल दिसला. सर्वांना एक नवीन दिशा मिळालीच; परंतु त्यांच्या वैयक्तिक जीवनातही चांगला उपयोग झाला. यामुळे याचा आम्ही सतत प्रचार करत असतो. उत्तम शिक्षक निर्माण केल्यामुळे चांगला विद्यार्थी निर्माण होईल, हे या प्रशिक्षणामागचं उद्दिष्ट आहे.
‘एज्युकॉन’च्या निमित्तानं पॅरिस विद्यापीठात गेलो असता तिथला अनुभवही वेगळेपणा सांगणारा आहे. फ्रान्स आणि जर्मनीमध्ये १८७२ च्या सुमारास युद्ध झालं. त्यात फ्रान्सचा दारुण पराभव झाला. त्यामुळे तेथील विचारवंत एकत्र आले आणि पराभवाची कारणं व उपाय यांवर विचारविनिमय सुरू झाला. त्यातून पॅरिस विद्यापीठाचा जन्म झाला. आपल्याकडे योग्य नेते, संशोधक यांची वानवा आहे, असं त्यांच्या ध्यानात आल्यामुळे या पॅरिस विद्यापीठाची आखणी केली गेली. या विद्यापीठानं आतापर्यंत १२ राष्ट्राध्यक्ष आणि १५ नोबल पारिषोतिकविजेते निर्माण केले आहेत.
आताशी आपण NEP म्हणजेच नवीन शिक्षण प्रणालीचं धोरण ठरवलं आहे. स्थानिक सरकार, शिक्षणखातं फ्रान्सप्रमाणे समाजाची कितपत चिंता करतं? की सरकारी नियमावलीत गुंतून मदत करण्याऐवजी दोषारोप करत राहतं? दुर्दैवानं दोषारोप, असहकार्य ही बाजू मजबूत आहे! मग उत्तम नेते, शास्त्रज्ञ कसे निर्माण होणार?
पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं फर्ग्युसन महाविद्यालय, रयत शिक्षण संस्था, कर्वे शिक्षण संस्था, विद्यार्थी सहाय्यक समिती, तसंच अन्य ठिकाणच्या शिक्षणसंस्था अशाच प्रेरणेतून निर्माण झाल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. काळानुसार त्यांची शैक्षणिक धोरणं पूर्वीच्याच तळमळीतून पुढं यायला हवीत अशी अपेक्षा असते; परंतु शासकीय नियम, बाबूशाहीचे अडथळे पार करण्यातच बहुतांश शिक्षणसंस्थांची शक्ती संपते. या पार्श्वभूमीवर, आपण आपल्याच पूर्वीच्या त्यागी लोकांकडून पुनश्च काही तरी शिकू या. तसं झालं तर आपण बलशाली व्हायला फार काळ लागणार नाही. पटतंय का तुम्हाला?