मराठी माणसांनो, व्यवहारी व्हा!

तसं पाहिलं तर हा विचार माझ्या मनात काही दशकं घर करून आहे. स्वानुभवानं आणि व्यवसायात असल्यानं याचा सोईस्कर अर्थ ‘आम्ही स्वार्थी व्हायचं का’, असा घेतला जाईल...पण तसं नव्हे.
practical
practicalsakal

- व्हॉट्सॲप मेसेज : ८४८४९ ७३६०२

तसं पाहिलं तर हा विचार माझ्या मनात काही दशकं घर करून आहे. स्वानुभवानं आणि व्यवसायात असल्यानं याचा सोईस्कर अर्थ ‘आम्ही स्वार्थी व्हायचं का’, असा घेतला जाईल...पण तसं नव्हे. समाजासाठी योगदान देणाऱ्या, आपलं जीवन अर्पण करणाऱ्या, निःस्वार्थी अशा अनेक लोकांबरोबर मी गेली ५५ वर्षं काम करतो आहे. त्यामुळे व्यवहार आणि स्वार्थ याची गल्लत करू नका.

जात-प्रांत-धर्म यांचा उपयोग लाखो तरुण हक्कासाठी करतात तेव्हा माझी अस्वस्थता आणखीच वाढते. माझा स्वभाव तुलनात्मक अभ्यास करण्याचा, प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा आणि त्यावर उपाय शोधण्याचा आहे. माझ्या मनात जातिभेद-धर्मभेद-प्रांतभेद या भावनात्मक गोष्टींना स्थान नाही; परंतु प्रश्नाचा विचार करताना या गोष्टी लक्षात घ्याव्याच लागतात. जसं मी एका लेखात ‘अतिरेकीपणा; जो दुर्दैवानं खपतो’ यावर विश्लेषण केलेलं आहे.

आज इथं थोडंसं स्पष्ट लिहिणार आहे. तुम्ही ते मान्य करावं किंवा कराल अशी अपेक्षा नाही. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा उद्देश नाही हे मात्र कृपया लक्षात घ्यावं. हे माझे व्यक्तिगत विचार आहेत.

आपण मराठी समाजाविषयी बोलू या. आमच्या कमतरता काय आहेत याचा विचार करणं आवश्यक आहे; विशेषतः आर्थिक क्षेत्रात. अहो, आम्हाला श्रीमंती म्हणजे काय हेच माहीत नाही! मी बिल गेट्स यांच्यासारख्यांची तुलनाही करू शकत नाही. अमेरिकेत व्यक्ती, संस्था जेवढ्या समृद्ध तेवढा त्यांना मान. आमच्याकडे बरोबर उलटं वातावरण.

महाराष्ट्रात परप्रांतीय व्यावसायिक, मारवाडी, गुजराती, पंजाबी, सिंधी वगैरेंच्या अनेक पिढ्या आहेत. त्यांच्यातल्या कुणी आत्महत्या केल्यात किंवा आरक्षण मागितलं आहे असं ऐकिवात नाही. त्यांचं व्यवहारीपण आपण शिकलं पाहिजे.

भारताचा व्यापार सोळाव्या किंवा सतराव्या शतकात जगाच्या चोवीस-पंचवीस टक्के होता. ब्रिटिशांनी लूट करत शंभर-दीडशे वर्षांत तो अर्ध्या टक्क्यावर आणला, तोही आपल्याच लोकांच्या साह्यानं!

सर्वसाधारण मराठी माणूस; मग तो शेती करणारा व्यावसायिक का असेना किंवा अभिनेता, तो फारसा व्यावहारिक नाही.

माझ्या अगदी लहानपणाची आठवण सांगतो. माझे एक वडीलबंधू शाळेतल्या त्यांच्या जिवलग मित्राकडे खेळायला, अभ्यासाला जात. त्या मित्राचे वडील व्यावसायिक होते; शिवाय ते शेतीही करत. एक दिवस माझ्या वडिलांकडे त्यांची चिठ्ठी आली : ‘आपले चिरंजीव आमच्याकडे येतात. माझ्या शेतातला चार पेंढ्या हरभरा त्यांनी खाल्ला (खरं तर त्यांच्या मुलानं दिल्यामुळे), त्याचे चार आणे पाठवावेत!’ व्यवहार! आम्हां शेतकरीकुटुंबात हा विचारही येणं शक्य नाही. शेतातली चार कणसं, हरभरा, फळं पाहुण्याला देण्याची आपली सहज प्रवृत्ती. ‘उरलेलं आपलं’ असा आपला स्वभाव.

आज तरी आमचा शेतकरी आपल्या शेतातल्या व्यवसायाचा ताळेबंद मांडतो का? खर्च कमी करणं, उत्पादन वाढवणं, उत्पादन परवडत नसल्यास कोणतं पीक केलं पाहिजे याचा सतत विचार करून तो अमलात आणणं हे तो कितपत करतो? भाव मिळत नाही, तर तो कुठं मिळेल याचा शोध घेऊन वैयक्तिक किंवा एकत्रित प्रयत्न करतो का?

काही प्रमाणात जरूर केलं जातं हे. साखरकारखाने, दुग्धव्यवसाय हा एकत्रित जरूर निर्माण केला गेला; परंतु सातत्यानं खर्च कमी करणं, वाया जाणाऱ्या गोष्टींमधून संपत्ती निर्माण करणं, गुणवत्ता वाढवणं, जागतिक स्पर्धेत उतरता येईल अशी गुणवत्ता निर्माण करण्याचा सातत्यानं ध्यास घेणं हे कितपत केलं जातं? पूर्वीपेक्षा खूपच सुधारणा आहेत; मात्र व्यवसायात या गोष्टींचं महत्त्व कायमच असतं.

व्यवहारात साध्या गोष्टींमधून पैसे निर्माण करता येतात. दुसऱ्यांची पिळवणूक न करता.

एक स्वानुभव सांगतो. ‘सकाळ’मध्ये आर्थिक क्षमता कमी होती. माझ्याकडेही खूप मर्यादा होती. वर्तमानपत्राला लागणारा कागद हा सर्वांत मोठा खर्च होता. तो बहुतांश रोखीनं घ्यावा लागायचा. मी सर्व पुरवठादारांना बोलावून ‘नव्वद दिवसांच्या उधारीवर माल द्यावा,’ अशी विनंती केली. ‘या दिवसांचं व्याज जरूर लावावं’, असंही त्यांना सांगितलं.

बहुतेकांनी ते साफ नाकारलं; परंतु एक-दोन छोट्या पुरवठादारांनी सव्याज देण्याचं मान्य केलं. सर्वसाधारणपणे आपण जेव्हा, ‘नव्वद दिवसांनी पैसे देऊ,’ असं सांगतो तेव्हा ते एकशेवीस ते दीडशे दिवसांत मिळतात. हीच भीती सर्वांच्या मनात होती. ज्यांनी पुरवठा केला त्यांना एकोणनव्वदाव्या दिवशी डिमांड ड्राफ्टनं पैसे मिळतील अशी काटेकोर व्यवस्था केली. हा त्यांना मोठा सुखद धक्का होता.

मग त्यांनी ‘आणखी माल घ्याल का,’ अशी विनंती केली. ‘अवश्य,’ असं आमचं उत्तर होतं. त्यांचा पुरवठा वाढू लागला तशी इतर पुरवठादारांनी ‘हा काय प्रकार आहे,’ याची चौकशी सुरू केली. वस्तुस्थिती समजल्यावर तेही पुढं आले. त्यांच्यात स्पर्धा निर्माण झाली. त्यामुळे किमती रास्त, म्हणजे कमी, झाल्या. मग मी दोन धोरणात्मक निर्णय सर्वांना सांगितले.

एक म्हणजे, ‘ही किंमत मला परवडते, यात तुम्ही सर्वोत्तम गुणवत्तेचा माल द्या.’ दुसरं, ‘मला मालाची ही गुणवत्ता हवी आहे, त्यासाठी तुमची सर्वोत्तम किंमत सांगा.’ पैसे वेळेवर, म्हणजे एक दिवस आधीच, मिळतात याची खात्री असल्यानं भराभर किमती खाली आल्या. हे आजही सुरू आहे.

मी एवढ्यावरच थांबलो नाही. आता आमच्याकडे फक्त चार दिवसांचा माल असेल अशी व्यवस्था केली. तसं होईल याची खातरजमा करून घेतली. त्यामुळे आम्हाला एकोणनव्वद वजा चार म्हणजे पंचाऐंशी दिवस फुकट पैसे वापरायला मिळाले. याचा उपयोग उद्योगाची वाढ, त्यातून अधिक पुरवठ्याची मागणी हे व्हायला लागलं. शिवाय पुरवठादारांना, व्यवसाय दिला आणि वेळेआधी एक दिवस पैसे मिळतात यातून उपकार केल्याची भावना निर्माण झाली होतीच!

आम्ही सर्व उत्पादक प्रत्येक पैशावर नियंत्रण ठेवतो. म्हणजे असलेल्या जागा, मशिनरी, मनुष्यबळ वगैरेंकडून सर्वोत्तम उत्पादन होतं का ते रोज पाहणं...तसंच सर्वार्थानं खर्चात बचतीवर कायम काम करत राहणं...शक्य झाल्यास रोजचा हिशेब किंवा आर्थिक आढावा घेणं...

बिर्ला कुटुंबीयांमध्ये ‘पडता’ नावाची पद्धत आहे. कंपनी केवढीही मोठी असो, रोजचा नफा-तोटा रोजच समजला पाहिजे. मग दुसऱ्या दिवशीच दुरुस्त्या करण्यावर भर देणं. मी ‘सकाळ’मध्ये ही पद्धत सुरुवातीपासून घालून दिलेली आहे. मला वर्षाच्या अखेरीस ताळेबंद नको आहे. रोजचं समजलं पाहिजे. ‘पैशाची काळजी घ्या, रुपया आपोआप आपली काळजी घेईल.’ हा व्यवहार आहे.

उदाहरणार्थ : आपली मराठी डॉक्टरमंडळी असा काही विचार करतात का? पुण्यातील केईएम, रुबी हॉल, जहाँगीर, संचेती यांच्याकडे हा काटेकोरपणा असतो. गुणवत्तेत तडजोड न करता. त्यामुळे ते सतत वाढत असतात. कारण व्यवहारी. परंतू, वाढ करायची असेल तर आपल्या मर्यादेचं भानही ठेवावं लागतं. भान नसलेले अनेक बांधकाम-व्यावसायिक आहेत.

आणखी एक प्रकार म्हणजे, आपल्या व्यवसायातले जे सर्वोत्तम आहेत ते काय करतात, त्यांच्या तुलनेत आपण कुठं आहोत हे सातत्यानं तपासणं. त्या दर्जाला पोहोचणं किंवा त्यांच्यापेक्षा चांगलं निर्माण करणं. उदाहरणार्थ : ‘सकाळ’मध्ये खरेदी केलेल्या कागदापैकी आठ-दहा टक्के कागद अनेक कारणांनी वाया जात असे.

म्हणजे चाळीस रुपये किलोचा कागद आठ-दहा रुपये किलोच्या भावानं रद्दी म्हणून विकावा लागे. सुरुवातीला शेकडो, नंतर हजारो टन कागद आम्ही घेत असू. यावर विचारपूर्वक सर्वांना विश्वासात घेऊन नियंत्रणं आणली. आता गेली काही दशकं वाया जाण्याचं हे प्रमाण कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांतून अडीच-तीन टक्क्यांवर आणलं आहे (जे जागतिक पातळीवरील आहे). यातून खर्चात बचत, नफ्यात वाढ.

मी कामगारांना सांगत असतो, ‘ही लक्ष्मी आहे; सरस्वतीबरोबर लक्ष्मीचीही पूजा, सेवा करा.’ अर्थात्, हे सर्वांच्या सहकार्यानं शक्य झालं. तरीसुद्धा, कुठं वायफळ खर्च होत नाही ना, याचा आढावा आजही सातत्यानं घेतला जातोच. कारण, व्यावहारिक भान.

शेतीत, व्यवसायात, नोकरीत आता स्मार्ट पद्धतीनं काम करण्याचे दिवस आले आहेत. ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून सातत्यानं शेतकऱ्यांना नवनवीन माहिती दिली जाते. ऑक्सफर्ड वगैरेंच्या मदतीनं बारामतीत स्मार्ट ॲग्रिकल्चरवर संशोधन सुरू आहे. शेतीक्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खर्चात कपात, अधिक गुणवत्तेचं अधिक उत्पादन ही आव्हानं स्वीकारून काम सुरू आहे.

यशस्वी झाल्यास काही हजार कोटींनी उत्पादन वाढेल. शेतमालावर कमीत कमी औषधं मारली जातील; ज्यामुळे निर्यातीला मोठा वाव मिळेल, समाजाचं आरोग्य सुधारेल. आजमितीला जुन्नर भागात शेकडो लोक औषधांच्या फवाऱ्यामुळे आजारी पडत आहेत.

व्यवहारात सर्वांगीण विचार करत कायम प्रगतीचं धोरण असतं. पैसा ही प्रगतीसाठी आवश्यक गोष्ट आहे. ती कष्टानं, प्रयत्नानं, व्यावहारिक दक्षता घेऊन शक्य असते. वेळ लागतो; परंतु ते शाश्वत असतं. जमिनी विकल्यावर आलेला पैसा हा घरं, गाड्या, समारंभ आणि काही वेळा राजकीय महत्त्वाकांक्षेत उडवला जातो. व्यावसायिक लोक असं कधीच करणार नाहीत. तो पैसा कुठं, कसा गुंतवावा, ज्यातून त्यात भरच पडेल, असा विचार व्यावसायिक करत असतो. शेतकरीबंधूंनो, यातून बाहेर पडा.

थोडंसं वैयक्तिक. आम्ही सात भाऊ. एकालाही आई-वडिलांनी उपजीविकेसाठी शेतावर येऊ दिलं नाही. शिक्षण संपल्यावर आम्ही मुकाट्यानं आमचे मार्ग शोधले. ज्याला जे जमेल तसं. मान्य कराल, आमचं कल्याणच झालं. मात्र, गमतीनं असं म्हणावंसं वाटतं की, महाराष्ट्र सहा राजकीय पुढाऱ्यांना मुकला!

मार्ग शोधा, जगात कुठंही जाण्याची तयारी ठेवा. आत्महत्या, आरक्षण यांची गरज पडणार नाही, यासाठी प्रयत्नशील राहू या. भविष्यकाळ तुमच्या किंवा पुढच्या पिढीचा उज्ज्वल होईल. करू या विचारपूर्वक प्रयत्न. आपण हे करू शकतो हा विश्वास आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com