कर्मकांड म्हणजे धर्म नव्हे

आपल्या समाजव्यवस्थेत बहुधा सर्वजातीय महिलांवर प्रथा-परंपरांचं सर्वाधिक ओझं धर्माच्या नावाखाली लादलं गेलेलं आहे.
कर्मकांड म्हणजे धर्म नव्हे
Updated on
Summary

आपल्या समाजव्यवस्थेत बहुधा सर्वजातीय महिलांवर प्रथा-परंपरांचं सर्वाधिक ओझं धर्माच्या नावाखाली लादलं गेलेलं आहे.

- प्रतिमा जोशी pratimajk@gmail.com

आपल्या समाजव्यवस्थेत बहुधा सर्वजातीय महिलांवर प्रथा-परंपरांचं सर्वाधिक ओझं धर्माच्या नावाखाली लादलं गेलेलं आहे. प्रथा, रुढी आणि परंपरा म्हणजेच धर्म अशी समजूत तर स्वतःला वरचे समजणाऱ्यांपासून खालचे समजले जाणाऱ्यांपर्यंत बव्हंशी सर्वांमध्ये आहे. त्यामुळे या चालीरीतींमुळं कोणाचा अपमान होऊ शकत असेल, त्यांचं जीणं असह्य होत असेल अशी पुसटशी शंकादेखील कोणाला येत नाही आणि सहन करणारी व्यक्ती धर्माचीच आज्ञा मानून सारं सोसत राहते.

सह्याद्रीच्या पल्याड असलेल्या कोल्हापुरातील हेरवाड ग्रामपंचायतीनं जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव केला. हेरवाडच्या गावकऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक सर्व स्तरांवर झालं. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वारसा असलेल्या कोल्हापूरनं पुरोगामी पायंडा पाडला, अशी शाबासकीची थाप हेरवाडकरांच्या पाठीवर पडली. महाराष्ट्र शासनानं या निर्णयाचं स्वागत करत परिपत्रक काढलं आणि या सर्व घडामोडींना सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्रात सुमारे १००च्या आसपास ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंद करत असल्याचे ठराव केले. अन्य ग्रामपंचायतींत या विषयावर चर्चा, विचारविनिमय सुरू झाला.

देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचं वेगळेपण पुन्हा एकदा अधोरेखित झालं असा सूर निघतो न् निघतो तोच जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सह्याद्रीच्या पल्याड असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमधून हेरवाड ठरावावर टीका करत शासनानं परिपत्रक रद्द करावं असा सूर जाहीरपणं उमटला. हिंदू धर्मातील विधवा प्रथा बंद करण्याचा घाट कोणीतरी ठरवून करत आहे; परंतु अशा प्रथा बंद करून कोण आमच्या धर्माशी खेळत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला. त्यांचं म्हणणं असं आहे, की हिंदू समाजामध्ये कुठल्याही विधवा भगिनीवर कुठल्याही प्रकारची सक्ती किंवा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय केला जात नाही. हिंदू समाजाला कमी लेखण्यासाठी हा प्रकार केला जात आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील ग्रामस्थ, गावकरी मंडळींनी या गोष्टीला वेळीच विरोध करावा व हिंदू धर्मासाठी उठाव करावा. सरकारनेही परित्रक रद्द करून ग्रामसभेत झालेले ठराव रद्द करण्यासाठी ग्रामसभा घेऊन जनजागृती करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

खरं काय आहे... विधवा महिलेला सन्मानानं जगता येतं की नाही...

डोळे उघडे ठेवून वावरलं, तरी सगळंच स्वच्छ दिसतं असं नाही. त्यासाठी मनाचे आणि काळजाचे दरवाजे उघडे असावे लागतात. साध्या नजरेला जे दिसत नाही, ते संवेदनशील बुद्धीला जाणवतं. दाबलेले हुंदके ऐकू येतात. अपमानात जळणाऱ्या आयुष्याची धग जाणवू लागते. एरव्ही ज्या निव्वळ प्रथा वाटतात त्या प्रत्यक्षात माणसाचं माणूसपण हिरावून घेणाऱ्या वेदना असल्याचं लक्षात येतं. जी कर्मकांडं अंगवळणी पडलेली आहेत, ती बरेचदा श्वास घुसमटवणारी वेटोळी आहेत हे समजू लागतं. सोसणारा मूक आहे याचा अर्थ ते सोसणं त्याला गौरवास्पद वाटतं असं समजण्याचं कारण नाही. बोलून काही उपयोग नसेल, उलट अपमानाची तीव्रता वाढणारच असेल किंवा बोलण्याची हिंमत व्हावी अशी स्थितीच अवतीभवती नसेल तर माणसं अत्यंत अमानुष प्रथाही मुकाट सहन करत राहतात. आपल्या समाजव्यवस्थेत जातींच्या उतरंडीतील तळाला ढकलल्या गेलेल्या जातींतील माणसं आणि बहुधा सर्वजातीय महिला यांच्यावर प्रथा-परंपरांचं सर्वाधिक ओझं धर्माच्या नावाखाली लादलं गेलेलं आहे. प्रथा, रूढी आणि परंपरा म्हणजेच धर्म अशी समजूत तर स्वतःला वरचे समजणाऱ्यांपासून खालचे समजले जाणाऱ्यापर्यंत बव्हंशी सर्वांमध्ये आहे. त्यामुळे या चालीरीतींमुळं कोणाचा अपमान होऊ शकत असेल, त्यांचं जीणं असह्य होत असेल अशी पुसटशी शंकादेखील कोणाला येत नाही आणि सहन करणारी व्यक्ती धर्माचीच आज्ञा मानून सारं सोसत राहते.

अशा वेळी थोडं मागं वळून पाहावं. आपल्या पूर्वजांच्या काळच्या प्रथा आठवाव्या. आठवावं की बाईला पती निधनानंतर कसं सती जावं लागत होतं. आठवावं की तथाकथित उच्चवर्णीय विधवा महिलांना जळवा लावून डोईवरचे केस भादरून लाल आलवण नेसूनच अख्खं आयुष्य काढावं लागे. आठवावं की आजही नकोशी कुत्री-मांजरी सोडून द्यावी तसं वृंदावनमध्ये विधवा महिलांना त्यांचेच कुटुंबीय कसे वाऱ्यावर सोडून देत असतात ते. आठवावं की आपल्याच देशाच्या काही भागांमध्ये नुकत्याच जन्मलेल्या मुलीला दूधपाण्याच्या परातीत बुडवून मुक्ती दिली जात असे आणि आजही आधुनिक तंत्राचा वापर करून तिला जन्मही घेऊ दिला जात नाही ते...

हे सारं आठवण्याबरोबरच डोळे उघडे ठेवून आणि मनाचे दरवाजे उघडून अवतीभवतीचं वर्तमानही न्याहाळावं. आवर्जून पाहावं की विधवा बाईला लग्नकार्यात, हळदी-कुंकवात किंवा खरं तर कोणत्याही शुभकार्यात कसं वागवलं जातं.. तिचा मानसन्मान होतो की तिला बाजूला सारलं जातं... नवरा गेलेली बाई थोडी जरी नीटनेटकी राहिली तरी तिच्या वाट्याला कशी नालस्ती येते ते... हिरवा रंग सृजनाचा, तो तिनं कोणत्याही रूपात वापरायचा नाही, डोईत फुलं माळायची नाहीत, तिच्या पदरात मुलं-बाळं असली तरी भरल्या घराचं प्रतीक म्हणून तिची ओटी भरली जात नाही की मरेपर्यंत नवऱ्याचंच नाव लावत असली नि त्याचीच मुलं खंबीरपणं वाढवत असली तरी त्याच्या नावाच्या कुंकवाचं बोट तिच्या भाळी टेकवलं जात नाही. साध्या सभासंमेलनांमध्ये पाहुण्यांना ओवाळायला पाच सवाष्णीच लागतात आणि प्रमुख पाहुणी जर विधवा बाई असेल तर तिच्या भाळी कुंकुमतिलक रेखताना हात आडवा घेतला जातो. आजही बहुसंख्य महिलांच्या अंतरीची इच्छा काय, तर अहेवपणी मरण यावं. का असं वाटावं त्यांना... तर सौभाग्य हे शुभ नि वैधव्य अशुभ हा विचार असतोच, पण त्याहीपेक्षा नवऱ्याच्या माघारी अपमानास्पद जीवन जगावं लागेल याची भीती अधिक असते. पती निधनाचं दुःख ताजं असताना, ठाव सुटलेला असताना धीर देण्याऐवजी हातातील हिरव्या बांगड्या फुटत असतील, कपाळीचं कुंकू पुसलं जात असेल, गळ्यातील मंगळसूत्र हिसके मारून ओढून काढलं जात असेल तर तो धक्का मरणाच्या धक्क्याइतकाच मरणप्राय असतो याची जाणीव असण्यासाठी डोक्याच्या कवटीत जिवंत मेंदू आणि छातीच्या बरगड्यांच्या आड संवेदनशील हृदय धडधडत असावं लागतं.. एरव्ही त्या हृदयाचा फक्त पंपासारखाच उपयोग आणि मेंदूचं अस्तित्व फक्त खाण्यापिण्याच्या संवेदना जागवण्यापुरतंच असंच म्हणायला हवं.

आता जाता जाता हेही आठवून पाहा की राजा राममोहन रॉय नसते तर सती प्रथा गेली असती का... हेही आठवून पाहा की जोतिराव आणि सावित्रीबाईंनी शेणगोटे झेलले नसते तर या देशातल्या महिला शिकून इतक्या पुढे गेल्या असत्या का... हेही आठवून पाहा की र. धों. कर्वे नसते तर कुटुंब नियोजन हा शब्दसुद्धा अब्रह्मण्यम ठरून महिला केवळ मुलं जन्माला घालणारी यंत्रच उरल्या असत्या की नाही... रॉय, फुले आणि कर्वे यांना त्यांच्या समकालीन समाजानं अतिशय असंस्कृतपणं वागवलं आहे. त्रास दिला आहे. आमच्या धर्मात ढवळाढवळ करू नका, असा दम दिला आहे. कर्वेंना तर अपमानपत्र जाहीरपणं दिलं गेलं आहे. फुलेंवर मारेकरी घातले गेले आहेत. आमचा धर्म असं म्हणणाऱ्या लोकांनी माणुसकीचा धर्म सांगणाऱ्या ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत आणि चक्रधरांपासून आंबेडकरांपर्यंत सर्वांना तुच्छतेची, अवमानाची वागणूक दिलेली आहे, पण त्यांच्याच पुढच्या पिढ्यांना सुखानं जगण्यासाठी हेच ग्यानबा तुकाराम, फुले, कर्वे, रॉय कामी आलेले दिसतात. भारतीय लोकांनी हे कायम स्मरणात ठेवायला हवे.

(लेखिका ज्‍येष्ठ पत्रकार आणि सुपरिचित कथाकार असून, सामाजिक प्रश्नांवर सातत्याने लेखन करतात.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com