लोकसंस्कृतीत भेद कशाचा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pratima Joshi writes What difference in folk culture

एका बाजूला सोशल मीडियावर परधर्मीयांना सणासुदीच्या शुभेच्छा द्यायच्या, शासनप्रमुखांनी सर्वधर्मीयांचं अभीष्टचिंतन करायचं; पण समाजजीवनात मात्र जातीधर्माचे कप्पे बंदिस्त ठेवायचे, ही विसंगतीच आहे

लोकसंस्कृतीत भेद कशाचा?

- प्रतिमा जोशी

देश स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करत असताना जाती-धर्मावरून आजही देशाचे नागरिक आपण भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, असं म्हणायला तयार नाही. मिळून-मिसळून राहायला राजी नाहीत. एका बाजूला सोशल मीडियावर परधर्मीयांना सणासुदीच्या शुभेच्छा द्यायच्या, शासनप्रमुखांनी सर्वधर्मीयांचं अभीष्टचिंतन करायचं; पण समाजजीवनात मात्र जातीधर्माचे कप्पे बंदिस्त ठेवायचे, ही विसंगतीच आहे. त्यातून बाहेर पडण्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही, हे आपण कधी लक्षात घेणार?

भिन्न भिन्न धर्म असलेल्या समूहांची संस्कृती एक असू शकते का? या प्रश्नाचं उत्तर निखालस ‘होय’ असं आहे. एकसलग भूप्रदेशात, देशात राहणाऱ्या लोकांची एक संमिश्र अशी सामुदायिक संस्कृती विकसित झालेली असते. काही काही बाबतीत तर सांस्कृतिक साम्य जागतिक पातळीवरही अस्तित्वात असलेलं दिसतं. उदाहरणार्थ जगभरातील कोणत्याही देशातील विवाह सोहळा पाहा, नातेवाईक/ आप्त मित्र यांच्या उपस्थितीत होणारा तो आनंद सोहळा असतो. भाषा, धर्म कोणताही असो, वधू छान नटलेली दिसते.

जमलेले वऱ्‍हाडी त्या त्या प्रांतातील खाद्यपदार्थांची मेजवानी झोडत असले, तरी त्यात गोडाधोडाचा घास असतोच. आनंदाच्या प्रसंगी तोंड गोड करणं आणि दुःखद प्रसंगाचा शोक विशिष्ट पद्धतीनं प्रदर्शित करणं, पूर्वजांची आठवण वर्षातील विशिष्ट कालावधीत करणं हे सर्वत्र आढळतं. कारण हे माणसाच्या जन्म-मरणाशी आणि दुःख-आनंदाशी निगडित असे सार्वत्रिक अनुभव आहेत.

भूगोलीय रचना आणि प्रदेशविशिष्ट वातावरण, ऋतू आणि लोकजीवन यांतून संस्कृती आकार घेते, रुजते आणि माणसांना एकमेकांशी बांधून ठेवते. खाणंपिणं, पेहराव, चालीरीती, विविध कला/ साहित्य आणि सणवार ही संस्कृतीची मुख्य अंगं आणि त्यांचा ऋतूमानाशी दाट संबंध असतो. आपले बहुतांशी सण हे कृषिसंस्कृतीशी जोडले गेले आहेत. संक्रांतीला ऊब देणारा तीळगुळ खाणं-वाटणं असो, की आश्विनात तयार झालेलं धान नि मोकळं झालेलं निरभ्र आकाश यांच्या साक्षीनं होणारी नवान्न पौर्णिमा असो किंवा पावसाळी महिन्यांत बैलपोळा साजरा करून त्या मुक्या प्राण्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणे असो. असे सण हे हवामान, शेती यांच्याशी निगडित असतात. ते साजरे करणं हे त्या त्या प्रदेशातील सर्वच लोकांच्या आनंदाचा, सेलिब्रेशनचा भाग असतो... असायला हवा. विशेषतः शेतकरी कुटुंबाचं जीवन धर्म कोणताही असला, तरी थोड्याफार फरकानं सारखंच असतं नि असणारही. धर्मानं हिंदू असणाऱ्या शेतकऱ्याला बैल जितके मोलाचे तितकेच ते धर्माने बौद्ध किंवा मुस्लिम किंवा ख्रिश्चन किंवा शिख किंवा कोणत्याही अन्य धर्मीय शेतकऱ्यालाही मोलाचेच असणार. महाराष्ट्रातील कोणत्याही शेतकऱ्याला आपल्या बैलजोडीला पोळ्याचा/ बेंदराचा मान आपणही दिला पाहिजे, असं वाटणारच. ती लोकसंस्कृती आहे. शेती या पेशाशी संबंधित असलेला शेतीशी संबंधित असलेल्या घटकांचाच तो सण आहे. बैल हा शेतकऱ्यांशिवाय अन्य कोणाचा पाळीव प्राणी असणार? तेव्हा बेंदराला बैलांना खाऊ घालणं, सजवणं, त्यांची मिरवणूक काढणं हा कोणत्याही शेतकऱ्याचा सण आहे.

हेच तर सगळं धुळ्यातील मेहेरगाव येथील पोळा सण साजरा करणाऱ्या दलित समूहाचं म्हणणं होतं आणि आहेही. २६ ऑगस्ट रोजी त्यांनी सण साजरा केला, बैलांची मिरवणूक काढली आणि त्यावरच तुम्ही बौद्ध आहात, आमचा सण का साजरा करता, असा गावकऱ्यांनी आक्षेप घेत त्यांना मारहाण केली. केवळ इथवरच गावकरी थांबले नाहीत, तर त्यांनी गावातील संपूर्ण दलित वस्तीवर बहिष्कार घातला. त्यांना वाळीत टाकलं. जातीवाचक टीका करत दलितांना किराणा देऊ नये, सालदार व शेतात कामाला ठेवू नये, न्हाव्यानं दलित व्यक्तींची दाढी व कटिंग करू नये, असं जाहीर केलं. जो दुकानदार किराणा देईल, त्याला गावात बोलावून चौकात ठोकायचं आणि त्याच्याकडून एक ते पन्नास हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करायचा, असा निर्णय गावातील दलितेतर समाजानं घेतला. पाोलिसांनी दलित तरुणांवरच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले.

याबाबत आता उलटसुलट खुलासे येऊ लागलेत. अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हे नोंदही झाली आहे. मात्र वातावरण तणावाचं आहे. सवर्णांच्या संतापाची आग, दलितांना झालेल्या मारहाणीच्या जखमा... दोन्हीकडं ताण आहे. सरकार, न्यायालय, सामाजिक संघटना यांमुळं कालांतरानं सारं कोमट होईल. वरवर तरी मिटल्यासारखं वाटेल; पण अशी धुम्मस दीर्घ काळ मनांत, समाजव्यवहारांत रेंगाळत राहते हाच आजवरचा इतिहास आहे. सर्वात दुःख देणारी बाब जर कोणती असेल, तर देश स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करत असताना जाती-धर्मावरून आजही देशाचे नागरिक आपण भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, असं म्हणायला तयार नाहीत. मिळून-मिसळून राहायला राजी नाहीत. एका बाजूला सोशल मीडियावर परधर्मीयांना सणासुदीच्या शुभेच्छा द्यायच्या, शासनप्रमुखांनी सर्वधर्मीयांचं अभीष्टचिंतन करायचं; पण समाजजीवनात मात्र जातीधर्माचे कप्पे बंदिस्त ठेवायचे, ही विसंगतीच आहे. त्यातून बाहेर पडण्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही, हे आपण कधी लक्षात घेणार?

जातीय विषमता, माणूस म्हणून किंमत नसणे, पदोपदी उपहास, अवहेलना, मानहानी यांच्याशी दीर्घ काळ झगडून आणि पूर्ण क्षमतेने सामाजिक न्यायावरील आपला न्याय्य दावा सिद्ध करूनही समाज जातींची उतरंड मोडायला तयार नाही. जन्मजात उच्च-नीचता नि त्यावर जोपासलेला तुच्छताभाव सोडायला तयार नाही, याची खात्री पटल्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेवटी धर्मांतराचा निर्णय घेतला होता. भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराला हा निर्णय ज्या कारणांसाठी घ्यावा लागला, ती कारणं आजही आपल्या समाजात आपली मुळं रोवून पसरली आहेत, याची प्रचीती ठायी ठायी यावी, अशा घटना आपल्या सभोवताली सातत्यानं घडताना दिसतात. तेव्हा आपण अजून सुधारणांच्या आरंभबिंदूपाशीच रखडलो आहोत, वरवर बदललो तरी अंतरंग आजही धर्मभेद, जातीभेद यांच्या अंधारात खितपत पडले आहेत, याबाबतची खिन्नता दाटून येते. असा ताणतणावात जगणारा, भेदाभेदाच्या गुंत्यात सापडलेला, एकीची भावना मनापासून न स्वीकारलेला, जातीधर्मात विभागला गेलेला समाज देशाला पुढं कसा नेणार आणि स्वतःचीही प्रगती कशी साधणार? देश म्हणजे देशातले लोक. घरोघरी तिरंगा लावायला हवाच; पण घराघरात देशाचं संविधानही असायला हवं. भारत नावाच्या स्वतंत्र, सार्वभौम लोकशाही देशातील प्रत्येक नागरिकाचा तोच मार्गदर्शक ग्रंथ आहे.

Web Title: Pratima Joshi Writes What Difference In Folk Culture

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :saptarang