

Pravasayan Marathi Book Review
esakal
आपल्या प्रवासातील अनुभवांना शब्दरूप देऊन वाचकालाही त्या स्थळांची सफर घडवण्याचे कसब फार थोड्या लेखकांकडे असते. माजी प्राचार्य डॉ. नारायण टाक यांनी आपल्या ‘प्रवासायन’ या पुस्तकातून हे कसब समर्थपणे दाखवून दिले आहे. ‘निसर्ग, कला आणि संस्कृतीची अनुभूती’ ही या पुस्तकाची ‘टॅगलाइन’च पुस्तकाचा आशय नेमकेपणाने सांगणारी आहे.
देशाच्या विविध भागांत केलेल्या प्रवासातून आलेले अनुभव, तेथील निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा, कलावैभव आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये यांचा सुरेख मिलाफ या पुस्तकात अनुभवायला मिळतो. डॉ. टाक यांची लेखनशैली ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांच्या ‘रिपोर्ताज’ची आठवण करून देणारी आहे. जे पाहिले, जे अनुभवले, जे मनाला भावले, ते साध्या आणि ओघवत्या भाषेत मांडण्यावर लेखकाचा भर आहे. त्यामुळे लेखन कृत्रिम वाटत नाही.
पुस्तकाची रचना तीन भागांत केली आहे. पहिला भाग हा ‘हिमशिखरांच्या सान्निध्यात’ असून, काश्मीर आणि हिमालयाच्या परिसरातील निसर्गसौंदर्याची अनुभूती देणारा आहे. हिमशिखरे, नद्या, सरोवरे, हिरव्यागार दऱ्या आणि निसर्गाच्या विविध रूपांचे वर्णन करताना लेखक केवळ दृश्यांचे चित्रण करीत नाहीत, तर त्या परिसराशी जोडलेली संस्कृतीही उलगडतात. काश्मीरचे सौंदर्य असो किंवा हिमालयाचे भव्य रूप, लेखकाच्या नजरेतून ते पाहताना वाचकही त्या वातावरणात हरवून जातो. निसर्गाकडे पाहण्याची त्यांची संवेदनशील दृष्टी प्रकर्षाने जाणवते.