छत्रपती शिवरायांच्या विचारांचा मागोवा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rayari book

आजवर साहित्यविश्वात शिवचरित्रपर अनेक पुस्तकं उपलब्ध झाली आहेत; परंतु ‘रायरी’ ही कादंबरी त्या सगळ्यांपेक्षा वेगळी ठरते, ती त्यातील कथानकावर असलेल्या शिवचरित्राच्या प्रभावामुळे.

छत्रपती शिवरायांच्या विचारांचा मागोवा...

आजवर साहित्यविश्वात शिवचरित्रपर अनेक पुस्तकं उपलब्ध झाली आहेत; परंतु ‘रायरी’ ही कादंबरी त्या सगळ्यांपेक्षा वेगळी ठरते, ती त्यातील कथानकावर असलेल्या शिवचरित्राच्या प्रभावामुळे. आजच्या युवापिढीला साहित्यातून जे टॉनिक देणं गरजेचं वाटतं, तेच लेखक विशाल गरड यांनी अतिशय नेमकेपणाने ‘रायरी’तून देण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या पानापासून शेवटपर्यंत कादंबरी कुठंही भरकटत नाही. लेखकाला जे सांगायचं आहे, त्याच वाटेने ती पुढं पुढं सरकत राहते. या कादंबरीत ग्रामीण मराठी बोलीभाषेला दिलेलं स्थान अधोरेखित होतं. आजच्या विस्कटलेल्या आणि विचारांची भेळमिसळ झालेल्या राजकीय परिस्थितीत नव्याने नेता होऊ पाहणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ‘रायरी’ पथदर्शक आणि दिशादर्शक आहे. सर्वच महापुरुषांच्या अनुयायांना विचार करायला लावण्याचं सामर्थ्य ‘रायरी’त आहे.

लेखकाने काल्पनिकतेचा आधार घेऊन समाजातील जळजळीत वास्तव मांडण्याच्या उद्देशाने कादंबरीचं कथानक रचलं आहे. चांगलं आणि वाईट, स्वार्थी आणि निःस्वार्थी, अशा दोन्ही व्यक्तिरेखा यात दाखवल्या आहेत. सदर कादंबरीत शिवरायांचं चरित्रपर थेट वर्णन नसून, त्यांचे विचार आत्मसात करून वाटचाल केलेल्या युवकांची ही गोष्ट आहे. डुगारवाडीसारख्या एका छोट्याशा गावात अप्पा, संत्या, पत्या, राहुल्या, आमल्या आणि नान्या हे सहा मित्र राहत असतात. त्यांपैकी अप्पा हा शिवरायांचे विचार अंगीकारून उर्वरित मित्रांना स्वार्थी राजकारण्यांच्या आणि व्यसनांच्या जाळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. हे करत असताना त्याने मित्रांना सोबत घेऊन घडवलेली दुर्गराज रायगडाची सफर सर्वांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरते. महाराजांचा गनिमी कावा वापरून अप्पा गावपातळीवरील सरपंचापासून ते मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांना शह देतो. गावातील वाईट प्रवृत्तीच्या विरोधात लढता लढता अप्पा जनतेच्या मनातला नेता होतो. गलिच्छ आणि मतलबी पुढाऱ्यांना पराजित करून तो स्वतःच कसा सत्तेचा वजीर होतो, हे ‘रायरी’त अनुभवायला मिळतं.

शासनदरबारी होणारी शेतकऱ्यांची फरफट, गावातील युवकांना निवडणुकीसाठी दाखवलं जाणारं आमिष, महापुरुषांच्या होणाऱ्या विटंबना, शिवरायांच्या विचारांपासून दूर चाललेले मावळे आणि त्याच विचारांचं स्फुल्लिंग पेटवून पुन्हा चांगल्या वळणाला लागलेले मावळे... या सर्व गोष्टी कादंबरीतील कथानकाचा भाग आहेत. एकविसाव्या शतकातील युवक नेमका कशाच्या आहारी जातोय? महापुरुषांबद्दल तो काय विचार करतोय? गावपातळीवरील राजकारणात त्याचं अस्तित्व काय आहे? महिलांवरील अत्याचार कसे पाठीशी घातले जातात? युवाशक्तीचा वापर कोण व कसा करून घेतोय? महापुरुषांच्या अस्मितांचा वापर स्वार्थासाठी कसा होतोय? शेतकऱ्यांना राजा मानणाऱ्या समाजात सध्या त्याचं स्थान कुठं आहे? सर्वसामान्य जनतेवर अन्याय का केला जातोय? राजकारण नावाचं शस्त्र रयतेच्या संहारासाठी का संरक्षणासाठी? रयतेला नासवायचं आणि नागवायचं पाप कुणाचं? लोकशाहीतली खुर्ची कोण ठरवतं? खरं प्रेम काय? सामान्य जनतेने ठरवलं तर काय होऊ शकतं? काळ बदलण्याचं सामर्थ्य कुणामध्ये आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजे ‘रायरी’ आहे. व्यसनाधीनतेच्या आणि स्वार्थी राजकारण्यांच्या विळख्यातून बाहेर पडून, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगीकारून इतिहास घडवण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ‘रायरी’ वाचलीच पाहिजे.

पुस्तकाचं नाव : रायरी

लेखक : विशाल गरड

प्रकाशक :

न्यू एरा पब्लिशिंग हाउस, पुणे

पृष्ठं : २४३ मूल्य : २५०

Web Title: Pravin Doke Writes Rayari Book On Chhatrapati Shivaji Maharaj

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top