मैत्रीचा अनोखा 'पॅटर्न' (प्रवीण तरडे)

pravin tarde
pravin tarde

डेव्हलपमेंट जन्माला आली, की शेतकरी शहरात येतो आणि मग तिथंच जन्म घेतो "मुळशी पॅटर्न'सारख्या चित्रपटाचा विषय. हा चित्रपट मी लिहिला- कारण मी स्वत: मुळशी तालुक्‍यातल्या जातेडे गावचा रहिवासी. ध्यानीमनी नसताना एक दिवस अचानक शेतकऱ्याच्या जमिनींना सोन्याचा भाव आला. ज्यांनी जमिनी द्यायला विरोध केला, त्यांच्या जमिनी वेगवेगळ्या पद्धतीनं घेण्यात आल्या आणि भरपूर पैसेसुद्धा देण्यात आले; पण ते पैसे खर्च करायची अक्कल मात्र दिली नाही. हातात रोख पैसा म्हणजे कोलीतच. त्यामुळं घरदार पेटायला वेळ नाही लागला. जमीन विकलेला हा शेतकरी पैसा संपला, म्हणून दहा-बारा वर्षांतच शहराच्या दिशेनं आला आणि हळूहळू शहरातल्या झोपडपट्ट्या वाढू लागल्या....

कुठलीही डेव्हलपमेंट ही देशाच्या समृद्धीसाठीच असते. निदान सुरवातीला तरी राज्यकर्त्यांचा मूळ हेतू हाच असतो; पण नदीचं मूळ, ऋषीचं कूळ आणि राज्यकर्त्यांचा मूळ हेतू विचारू नये हेच खरं! कुठल्याही विकासकामासाठी जमीन लागते आणि ती सध्यातरी फक्त शेतकऱ्यांकडंच आहे किंवा होती असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे जर शेतकऱ्यानी त्याची जमीन विकासकामांसाठी म्हणजे आयटी पार्क, एमआयडीसी, विमानतळ, धरणं यासाठी सरकारला दिली नाही, तर कुठलीच डेव्हलपमेंट प्रत्यक्षात येऊच शकत नाही. आधुनिक भारताचा पाया हा शेतकऱ्याच्या शेतातून जातो; पण जेव्हा तो त्याच्या घरादारावरून गेला, तेव्हा शेतकरी थेट सिक्‍युरिटी गार्ड किंवा हमाल झाला आणि वाढलेल्या शहरांमधून तो गेटवर उभं राहून लोकांना सॅल्युट मारू लागला. सिक्‍युरिटी गार्ड असणं हे काही वाईट काम नाही- एक अत्यंत इमानदार नोकरी आहे ती... पण ती शेतकऱ्याच्याच वाट्याला का? कारण कुठंतरी फसलेली डेव्हलपमेंट जन्माला आली, की शेतकरी शहरात येतो आणि मग तिथंच जन्म घेतो "मुळशी पॅटर्न'सारख्या चित्रपटाचा विषय.

हा चित्रपट मी लिहिला- कारण मी स्वत: मुळशी तालुक्‍यातल्या जातेडे गावचा रहिवासी. पुण्याला खेटून असलेला हा एक समृद्ध तालुका. वारकरी सांप्रदाय आणि मोठे पैलवान ही आमच्या तालुक्‍याची खरी ओळख. मुळशी सत्याग्रह हा आमचा अभिमानास्पद भूतकाळ. समृद्धीचं वारं आमच्या तालुक्‍यात नव्वदच्या दशकात घुसलं. "घुसलं' असंच म्हटलं पाहिजे- कारण ध्यानीमनी नसताना एक दिवस अचानक शेतकऱ्याच्या जमिनींना सोन्याचा भाव आला. ज्यांनी जमिनी द्यायला विरोध केला, त्यांच्या जमिनी वेगवेगळ्या पद्धतीनं घेण्यात आल्या आणि भरपूर पैसेसुद्धा देण्यात आले; पण ते पैसे खर्च करायची अक्कल मात्र दिली नाही. जो पैसा दिला तो रोखीनं. बॅंकेत शेतकऱ्याचं खातं कुणी काढलंच नाही. हातात रोख पैसा म्हणजे कोलीतच. मग त्यामुळं घरदार पेटायला वेळ नाही लागला. जमीन विकलेला हा शेतकरी दहा-बारा वर्षांतच पैसा संपला, म्हणून शहराच्या दिशेनं आला आणि हळूहळू शहरातल्या झोपडपट्ट्या वाढू लागल्या. हे फक्त इथंच चाललं नव्हतं, तर देशभर परिस्थिती सारखीच होती. पोती पोती धान्य पिकवणारे भूमिपुत्र दुसऱ्यांसाठी ज्यावेळी पोती वाहू लागतात, तेव्हा परिस्थिती भयाण होते. भले शेतकऱ्याकडं एक एकर शेती असली, तरी ती त्यानं देव्हाऱ्यातल्या टाकासारखी जपली पाहिजे. देव्हाऱ्यातले टाक आपण कधी विकतो का? नाही ना? मग शेती पण विकायची नसते- ती राखायची असते! शेतकरी जमिनीचा मालक कधीच नसतो, तो "राखणदार' असतो.

शेतकऱ्यांचा हाच प्रश्‍न डोळ्यासमोर ठेवून "मुळशी पॅटर्न'ला सुरवात झाली. लेखन पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष चित्रपटाच्या निर्मितीला सुरवात केली, तेव्हा किरण दगडे-पाटील या मुळशीतल्या तरुणाबरोबरच पुनित बालन यांनी चित्रपटाच्या निर्मितीचं शिवधनुष्य त्यांच्या खांद्यावर घेतलं. मात्र, जसजसा चित्रपट पुढं जाऊ लागला, तसतशी आर्थिक संकटं वाढतच गेली आणि शूटिंगच्या पहिल्या टप्प्यातच चित्रपट बंद पडला. निर्माते सर्वोतोपरी प्रयत्न करत होते; पण संकटं संपतच नव्हती. रमेश परदेशी आणि विशाल चांदणे खर्च करताना एक एक रुपया वाचवत होते. उपेंन्द्र लिमये, महेश लिमये हे दोघं तर पैशांपलीकडं जाऊन काम करत होते. संगीतकार नरेंद्र भिडेसुद्धा बरेच दिवस तग धरून राहिला. महेश मांजरेकर, मोहन जोशी कोणीच पैशासाठी अडून राहिलं नव्हतं. सगळ्यांना प्रामाणिकपणे वाटत होतं, की काही करून हा चित्रपट पूर्ण झालाच पाहिजे. या चित्रपटाच्या नादात मागच्या दोन वर्षांत मी एक रुपयाही कमावला नव्हता. चित्रपट बंद पडल्यापासून तर एक दिवसही नीट झोपलो नव्हतो. वैतागून कित्येकदा बंद खोलीत बसून एकटा रडलोयसुद्धा. या अशा काळात सुनील अभ्यंकर, पुष्कर सोहनी, अनिल नाईक, कैलास वाणी, सतीश करंजकर, केदार सोमण हे मित्र थोडी थोडी आर्थिक मदत करत होतेच. इतके दिवस उराशी बाळगलेलं स्वप्न फिस्कटणार असं वाटत असतानाच अभिजित भोसले मदतीला धावून आला. या तरुण उद्योजकामुळंच "मुळशी पॅटर्न' पुन्हा जोमात सुरू झाला. फक्त माझ्या चेहऱ्यावर आनंद दिसावा म्हणून या मुलानं स्क्रिप्टसुद्धा न वाचता मला एवढी मोठी आर्थिक मदत केली आणि शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्‍न जगासमोर आला.

चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यावर मयूर हरदास, रमीज दलाल आणि मी आम्ही तिघांनी दिवस-रात्र जागून एडिटिंग संपवलं. "डॉन' स्टुडिओतले संकेत, तुषार, ईशान, अद्वैत शेवटच्या क्षणापर्यंत राबत होते. सगळं काही सुरळीत चाललंय, असं वाटत असतानाच एका कायदेशीर वादात सिनेमा अडकला. चित्रपट रिलीज होणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. "दुष्काळात तेरावा महिना' आला. कोणाच्याच खिशात एव्हाना पैसे शिल्लक राहिले नव्हते, कोर्टाचा खर्च करणार कुठून? आणि मग कुठलं तरी जुनं पुण्य मदतीला धावून आलं. माझ्या "अवगुंठन' एकांकिकेत कृष्णाची भूमिका केलेला ऍड. सुकृत खुडे माझ्यासाठी कोर्टात उभा राहिला. एरवी अमिताभ बच्चन, रामगोपाल वर्मा, नागराज मंजुळे, अजय-अतुल यांच्यासारख्या दिग्गजांचं कायदेशीर काम तो पाहतो. त्यामुळं त्याची फी काय असेल या भीतीनंच पोटात गोळा आला; पण एक रुपयाही न घेता हा पठ्ठा शेतकरी प्रश्‍नांसाठी आमच्या बाजूनं कोर्टात लढू लागला. त्या वेळची त्याची प्रभावी वकिली पाहून पुढचा चित्रपट अशाच एखाद्या वकिलावर लिहावा असं मला क्षणभर वाटून गेलं. कदाचित कधीतरी मी लिहीनसुद्धा. त्याच्यासोबत ऍड. मानस शिंदे आणि ऍड. अतुल मानकामे "मुळशी पॅटर्न'साठी खूप झटले... आणि अखेर चित्रपट सर्व संकटांना पराभूत करून सेन्सॉरच्या दारात उभा राहिला. एकामागून एक संकटांचे काळे ढग नेम धरून "मुळशी पॅटर्न'वरच कोसळत होते. सेन्सॉर नावाच्या महाभयंकर हट्टी मुलानं तर आदल्या दिवसापर्यंत आमचा घाम काढला. मी, विनोद सातव, विशाल चंदणे आणि अभिजीत भोसले आम्ही चौघं दोन दिवस उपाशीतापाशी, न झोपता त्या सेन्सॉरच्या इमारतीबाहेर एखाद्या आश्रितासारखे उभे होतो. सेन्सॉरकडून जो काही बदल सांगण्यात येइल, तो नरेंद्र भिडे इकडं पुण्यात लगेच बदलून पाठवत होता. "एक ते चार बंद' अशा संस्कारांत वाढलेला नरेंद्र चोवीस तास काम करत होता. "पुण्यात उद्याचे सर्व शो हाऊसफुल झालेत' अशा बातम्या तिकडून येत होत्या, तर दुसरीकडं सेन्सॉर म्हणत होतं ः "बहुदा तुमचा चित्रपट उद्या रिलीज होणार नाही!' तीन वर्षं कैक अडथळे पार करून आम्ही शेवटच्या अडथळ्यावर डोकं आपटत होतो... आणि शेवटी "ए' सर्टिफिकेट असलेला सेन्सॉरचा तो पिवळा आयताकृती कागद आमच्या हातात पडला. दहावीच्या मार्कशीटपेक्षाही भयंकर आनंद देणारं काहीतरी असतं, हे त्या सर्टिफिकिटाकडं पाहून मला कळलं. आमच्या सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी होतं.

चांगल्या काळात सगळेच तुमच्याबरोबर असतात; पण या अशा कठीण प्रसंगात जे तुमच्यासोबत उभे राहतात ते तुमचे खरे मित्र. खूप जण माझ्यासाठी उभे राहिले. महेश लिमयेसारखा बॉलिवूडमधला दिग्गज छायाचित्रकार मोठ्या भावासारखा कायम सोबत राहिला. विनोद सातव, कुशल आणि अश्‍विनीनं पब्लिसिटी प्रमोशन सांभाळतानाच टीमचे "इमोशन्स' पण सांभाळले. पिट्या आणि देवेंद्र गायकवाड लहान भावासारखे दिवस-रात्र पायाला भिंगरी लावून माझ्याबरोबर पुणे-मुंबईला धावले. माधव सुर्वे, श्रीपाद चव्हाण, महेश हगवणे, अमोल धावडे "जिथं कमी तिथं आम्ही' म्हणून होतेच. विनोद वनवे, राम खाटमोडे, सुनील पालकर, दत्ता दंडवते कित्येक महिने ऑफिसवरच राहत होते. काही गुन्हेगारांकडून माझ्या ऑफिसवर हल्ला झाला तेव्हा क्राईम एसीपी भानुप्रताप बर्गे आणि सुनिल पवार हे रोज न चुकता विचारपूस करत होते आणि माझी भेटगाठ घेत होते. बालपणीचा मित्र शेखर जावळकर तर सतत दिवस-रात्र माझ्याबरोबर राहिला. त्या हल्ल्यानंतर त्यानंच ऑफिसबाहेर सीसीटीव्ही बसवले. माझ्या गैरहजेरीत दोन वर्षं संपूर्ण घर स्नेहलनं सांभाळलं. या सगळ्या मित्रांनी कित्येक संकटं माझ्यापर्यंत येऊच दिली नाहीत- आधीच स्वत:च्या अंगावर घेतली. "मुळशी पॅटर्न' साकारताना हा मैत्रीचा अनोखा पॅटर्न कळत नकळत तयार होत गेला.

... आणि अखेर या सगळ्या संकटांना सणसणीत थोबाडीत मारली ती बॉक्‍स ऑफिसवरच्या चित्रपटाच्या कमाईनं. पहिल्याच दिवशी "मुळशी पॅटर्न'चे महाराष्ट्रातले सर्वच्या सर्व शो हाऊसफुल्ल झाले होते. पुढं सलग दोन आठवडे हेच वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात होतं. मग वाजतगाजत सलग नऊ आठवडे चित्रपट चालला. चित्रपटातले संवाद तर प्रेक्षकांनी अक्षरश: तोंडपाठ केले. शहरांत, खेड्यापाड्यांत, गल्लीबोळात "मुळशी पॅटर्न' पाहिला गेला. माझ्याबरोबरच पुनीत बालन आणि किरण दगडे-पाटीलनं लावलेल्या छोट्याशा रोपट्याचा महाकाय वटवृक्ष खऱ्या अर्थानं अभिजित भोसलेनं केला. त्याला खऱ्या अर्थानं "मुळशी पॅटन' समजला.

ज्यांनी चित्रपट बघितलाय त्यांना माझी तळमळ काय आहे ते समजेलच; ज्यांनी नाही बघितला त्यांना ते जेव्हा कधी बघतील तेव्हा समजेल. या सदराच्या निमित्तानं मला आज व्यक्त तरी होता आलं. नाही तर माझ्याव्यतिरिक्त "मुळशी पॅटर्न'साठी राबलेल्या या शिलेदारांची नावं तुम्हाला कधीच कळली नसती. खूप जण हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून प्रयत्न करत होते; पण त्यापेक्षा कितीतरी जास्त मित्र चित्रपट प्रदर्शित व्हावा म्हणून झटत होते. या भल्या माणसांपैकी कोणी तुम्हाला कुठं भेटलं, तर "मुळशी पॅटर्न'च्या यशासाठी जेवढी मला कडकडून मिठी माराल तेवढीच त्यांनाही मारा. त्यांचा अधिकार आहे तो!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com