ओरिजिनल बिग बॉस! (प्रवीण टोकेकर)

प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com
रविवार, 6 मे 2018

जे. एडगर हूव्हर. अमेरिकेच्या "फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन'चे (एफबीआय) संस्थापक आणि तब्बल 50 वर्षं या संस्थेचा कारभार सांभाळणारे सर्वेसर्वा. 2011 मध्ये या बिग बॉसचं बायोपिक प्रदर्शित झालं. त्याचं नाव : जे. एडगर. अमेरिकेच्या या "घाशीराम कोतवाला'च्या जीवनावरचा हा चित्रपट बघताना आपल्याला आपल्याच देशातल्या वर्तमानातल्या काही घटनांचा अर्थ लागतो. संगती लागून जाते...म्हणून तर हा चित्रपट आवर्जून बघायचा.

जे. एडगर हूव्हर. अमेरिकेच्या "फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन'चे (एफबीआय) संस्थापक आणि तब्बल 50 वर्षं या संस्थेचा कारभार सांभाळणारे सर्वेसर्वा. 2011 मध्ये या बिग बॉसचं बायोपिक प्रदर्शित झालं. त्याचं नाव : जे. एडगर. अमेरिकेच्या या "घाशीराम कोतवाला'च्या जीवनावरचा हा चित्रपट बघताना आपल्याला आपल्याच देशातल्या वर्तमानातल्या काही घटनांचा अर्थ लागतो. संगती लागून जाते...म्हणून तर हा चित्रपट आवर्जून बघायचा.

हे बिग बॉसचं घर आहे. प्रशस्त, अत्याधुनिक सुखसोईंनी युक्‍त. या घराला खिडक्‍या नाहीत. दाराला बाहेरून कुलूप आहे. बिग बॉसला कुणी पाहिलेलं नाही. त्याला कुणीही भेटलेलं नाही. त्याच्या आज्ञा फक्‍त ऐकू येतात. त्यानुसार सगळ्यांनी वागायचं असतं. ""बिग बॉस चाहते हैं की...,'' अशा दमदार आवाजातल्या सुरवातीनंतर एक टास्क सांगितलं जातं. ते पुरं करणं स्पर्धकाला बंधनकारक असतं. हरेकाला काटेकोर नियम पाळावे लागतात. शेकडो कॅमेरे चोवीस तास त्याच्यावर नजर ठेवून असतात. बिग बॉस खूश झाला तर बक्षीस, नाहीतर शिक्षा...किंवा थेट घराबाहेर काढलं जातं.
बिग बॉसच्या घरात शेवटपर्यंत टिकणारा जॅकपॉटचा धनी होतो...हे बिग बॉसचं घर आहे.

टीव्हीवरल्या या रिऍलिटी शोनं जगभर धुमाकूळ घातलाय. हिंदीत त्यानं जम बसवलाच, सध्या आपल्या मायमराठीच्या मुलखातही घर बांधलं आहे. म्हटला तर गमतीदार, म्हटला तर वैतागवाणा असा हा शो. सगळ्यांनाच आवडतो असं नाही; पण तरीही तो बघावासा वाटतो. का? तर कॅमेऱ्याच्या "गुप्त' नजरेतून खुद्द प्रेक्षकच करडी नजर या स्पर्धकांवर ठेवत असतो. त्यांचे राग-लोभ, विकार-विचार सगळं टिपत असतो. प्रेक्षकच खरा बिग बॉस असतो.

या रिऍलिटी शोची मूळ संकल्पना कशातून सुचली असावी? ते मूळ सापडतं गेल्या शतकातल्या एका खऱ्याखुऱ्या बिग बॉसच्या चरितकहाणीत. त्याचं नाव जे. एडगर हूव्हर. जॉन एडगर हूव्हर...पूरा नाम. अमेरिकेच्या सुविख्यात "फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन' याने की "एफबीआय'चा संस्थापक आणि तब्बल पाच दशकांचा कारभारी. द रिअल बिग बॉस. "शतकातला सर्वात शक्‍तिमान कारभारी' असं त्यांचं वर्णन अमेरिकेत केलं जायचं.

हूव्हर या नावाला अमेरिकेचे अध्यक्षही वचकून असत. तो फारसा कुणाला दिसत नसे. वॉशिंग्टन सोडून हा माणूस कधीही कुठंही फारसा गेला नाही. सभा-समारंभात हातात गिलास घेऊन मिसळला नाही. कधी कुणाशी अघळपघळ गप्पा मारल्या नाहीत. अमेरिकेतल्या प्रत्येक नागरिकाची "फाइल' आपल्याकडं असावी, अशी त्याची ईर्ष्या होती. त्या ईर्ष्येनंच त्यानं एफबीआय चालवली. छुपे कम्युनिस्ट, पुढारी, दरोडेखोर, किडनॅपर्स, समलिंगी, राजकीय दलाल या साऱ्यांवर त्याची करडी नजर असे. कुणीही सुटले नाहीत. थोर प्रतिभावान कलावंत चार्ली चॅप्लिनला तर त्यानं देश सोडून पळायला भाग पाडलं. "आय हॅव अ ड्रीम' या अवघ्या 17 मिनिटांच्या भाषणानं क्रांतीचा उद्‌गार काढणाऱ्या मार्टिन ल्यूथर किंग यांच्यासारख्या देवदूताला त्यानं भंडावून सोडलं. राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडींच्या लोकप्रियतेला न डरता त्यांना थेट आव्हान दिलं.

हूव्हर यांची कहाणी इतकी गूढ रंगांनी भरलेली आहे की खरं काय नि खोटं काय, याबद्दल संभ्रम पडावा. अनेक विरोधाभासांनी त्यांचं आयुष्य भरलेलं आहे. नामवंतांच्या छातीत धडकी भरवणारे हूव्हर कायम आपल्या आईच्या मायेत राहिले. आई हे त्यांचं सर्वस्व होतं. त्यांनी लग्न केलं नाही. एफबीआयच्या एजंटांनी चारित्र्य लख्ख ठेवावं, बाईपासून दूर राहावं, दाढी-मिश्‍या वाढवणं टाळावं, असले त्यांचे आग्रह असत. समलिंगींवर त्यांचा विशेष राग होता. त्या काळी समलिंगी संबंध हा गुन्हा समजला जाई. अशा लोकांना डांबून ठेवून छळणारे हूव्हर स्वत:च एक एकनिष्ठ समलिंगीच होते, असं पुढं सिद्ध झालं. "स्पीड' हे त्यांचं लाडनाव होतं. बालपणी ते तोतरे होते. कमालीच्या वेगात बोलायचे. म्हणून त्यांना स्पीड हे नाव पडलं असावं, असं म्हणतात. राष्ट्रकार्यानं भारलेल्या या माणसानं आयुष्यभर मार्ग वापरला तो मात्र सूडभावनेचा. कट-कारस्थानांचा.

विख्यात हॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक क्‍लिंट इस्टवूडनं 2011 मध्ये या बिग बॉसचं बायोपिक निर्माण केलं. चित्रपटाचं नाव होतं : "जे. एडगर'. आयरिश लेखक आणि पत्रकार अँथनी ब्रूस समर्स यांनी हूव्हर यांचं चरित्र लिहिलं होतं.- "ऑफिशिअल अँड कॉन्फिडेन्शिअल : द सीक्रेट लाइफ ऑफ जे. एडगर हूव्हर'. लांबलचक नावाचं हे चरित्र म्हणजे अमेरिकी थाटाची ललित कादंबरी नव्हे. ते पुराव्यांच्या आधारे लिहिलेलं एक संशोधित चरित्र आहे. याच चरित्राचा आधार घेत इस्टवूडनं हूव्हर पेश केला. प्रेक्षकांनी त्याचं संमिश्र स्वागत केलं. कारण समर्स यांनी लिहिलेलं सगळंच खरं आहे, असं मानायला अजूनही बराच मोठा वर्ग तयार होत नाही. लोकांच्या किरकोळ आणि अतिव्यक्‍तिगत बाबीदेखील फायलीत सुरक्षित ठेवणाऱ्या हूव्हर यांनी स्वत:ची माहिती मात्र कडेकोट गोपनीय ठेवण्यात यश मिळवलं होतं.
अमेरिकेच्या या घाशीराम कोतवालाच्या जीवनावरचा हा चित्रपट बघताना आपल्याला आपल्याच देशातल्या वर्तमानातल्या काही घटनांचा अर्थ लागतो. संगती लागून जाते...म्हणून तर हा चित्रपट आवर्जून बघायचा.
* * *

ठरल्याप्रमाणे घड्याळाच्या काट्यावर कचेरीत येऊन बसलेल्या वृद्ध जे. एडगर हूव्हर यांच्या मनात आलं, की आपली स्वत:ची कहाणी पुढच्या पिढीला सांगण्याची वेळ आता आली आहे. त्यांनी खासगी सचिव हेलन गॅंडीला फोन करून सांगून ठेवलं : "जनसंपर्क विभागातल्या कुणाला तरी टाइपरायटरसह पाठव. मला माझी स्टोरी सांगायची आहे...'

तो 1919 चा सुमार होता. पहिलं महायुद्ध संपून वर्षदेखील झालं नव्हतं. वातावरण ढवळून निघालं होतं. मूलतत्त्ववाद्यांनी उच्छाद मांडला होता. युद्धावरून परतलेल्या सैनिकांचे दिवसाढवळ्या मुडदे पडत. त्यात कोळसाखाणीतल्या कामगारांनी आंदोलनं करून ठिकठिकाणी जाळपोळ सुरू केली. दंगली होत होत्या. छुप्या कम्युनिस्टांनी डोकं वर काढलं होतं. न्याय विभागाचे प्रमुख म्हणजेच ऍटर्नी जनरल ए. मिचेल पामर यांच्यासाठी ती डोकेदुखीच होती. पोलिस खातं त्यांच्या अखत्यारीत काम करायचं. एके रात्री त्यांच्या राहत्या घराच्या आवारातच एक शक्‍तिशाली बॉम्ब फुटला. मिचेल पामर मरता मरता वाचले; पण प्रकरण हाताबाहेर जात आहे, हे सत्ताधाऱ्यांना कळलं.
पामर यांना मारण्याचा कट कुणी केला असेल? पोलिसांनी तपास सुरू केला खरा; पण त्याला काही अर्थ नव्हता. मूलतत्त्ववाद्यांपर्यंत पाळंमुळं खणत जाण्याची पोलिस दलात क्षमताच नव्हती. विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर तपासात करून घेण्याची बुद्धीही नव्हती. साध्या संशयावरून कुणाला अटक करण्याचे अधिकार पोलिसांना नव्हते. हातात शस्त्रं नव्हती. न्याय विभागात काम करणाऱ्या जॉन एडगर हूव्हर या तरुण अधिकाऱ्याला या बाबी खटकत असत. जॉन हा कमालीचा शिस्तशीर, काटेकोर, आणि कमालीचा शिष्ट इसम होता. "लायब्ररी ऑफ कॉंग्रेस'मधल्या ग्रंथांचं आणि दस्तावेजांचं वगींकरण करून त्याची मांडणी करण्यात त्यानं मोठी भूमिका पार पाडली होती. त्यासाठी एक कार्ड कॅटलॉग व्यवस्था त्यानं तयार केली होती. त्याला त्याचा प्रचंड अभिमान वाटायचा. अशा प्रकारची व्यवस्था अमेरिकी नागरिकांच्या संदर्भात तयार व्हायला हवी, अशी त्याची अनिवार इच्छा होती. प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र क्रमांक देणं, त्यावर त्याचं नाव, पत्ता, इतकंच नव्हे तर बोटांचे ठसे जतन करणं...ही व्यवस्था उभी करायला हवी, असं त्याचं मत होतं.

""माणसं पुस्तकासारखी हुडकता यावीत. पुस्तकांसारखी वाचता यावीत...समाजातली गुन्हेगारी या व्यवस्थेमुळं कमी होईल,'' हा त्याचा लाडका सिद्धान्त होता. न्याय विभागात नव्यानं नोकरीला आलेल्या टायपिस्ट हेलेन गॅंडीला भेटल्यावर तो हुरळला होता, त्यानं तिला डेटसाठी निमंत्रण दिलं आणि नेलं कुठं? तर लायब्ररीत! आपली कार्ड कॅटलॉग व्यवस्था दाखवायला. तिथं त्यानं तिला चक्‍क मागणी घातली. तिनं नकार दिला; पण त्याची खासगी सचिव म्हणून तहहयात काम करायची तयारी दर्शवली.
हेलेन गॅंडीनं तिचा शब्द अखेरपर्यंत पाळला.
* * *

मूलतत्त्ववाद्यांची पाळंमुळं खणून काढायची असतील तर पोलिस खात्याकडं अमर्याद अधिकार हवेत, त्यात ढवळाढवळ आणि राजकारण नको, देशांतर्गत गुप्तहेर खातंही कार्यरत असलं पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. ऍटर्नी जनरल पामर यांनी एक दिवस त्यांना भेटायला बोलावलं, आणि "ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन'चा ओनामा केला. जे. एडगर हूव्हर हे मिथक तेव्हाच जन्माला आलं.

ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनची टीम त्यांनी स्वत: निवडली. त्यांच्या काटेकोर परीक्षा घेऊन...आणि मग धडाधड छाप्यांचं सत्र सुरू झालं. छुपे कम्युनिस्ट सापडू लागले. पोलिसांच्या हातात शस्त्रास्त्रं आली; पण सर्वात मोठं शस्त्र ब्यूरोकडं होतं ते म्हणजे माहिती...अनेकांची वैयक्‍तिक माहिती.
* * *

जे. एडगर हूव्हर यांच्या ब्यूरोचा दबदबा वाढत होता; पण देशविरोधी कारवाया करणाऱ्या मूलतत्त्ववाद्यांची माहिती मिळूनही फारसा उपयोग होत नव्हता. पुरावा नसताना निव्वळ संशयावरून कारवाई करायला देशाचं मजूर खातं परवानगी देत नसे. एम्मा गोल्डमन हे असंच एक प्रकर्ण होतं. कमालीची तिखटजाळ आणि अराजकवादी महिला-पुढारी. भांडवलदारांच्या हत्येचेही काही आरोप तिच्यावर होते. मूळच्या लिथुआनिआच्या असलेल्या गोल्डमनबाईंचा अमेरिकी पतीबरोबरचा विवाहच मुळात बेकायदेशीर असल्याचं सिद्ध करत हूव्हर यांनी तिला रशियाला पाठवून दिलं.
बॅंकदरोडे आणि इतर गुन्ह्यांत कुख्यात झालेल्या जॉन डिलिंजर आणि अल्‌ कॅपोनच्या गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध हूव्हर यांनी आघाडीच उघडली. चित्रपटगृहात त्यांच्या भाषणाच्या चित्रफिती दाखवल्या जात. ते सांगायचे : ""ब्यूरो हा तुमचा साथीदार आहे. तुमच्या टेलिफोनइतकाच जवळचा आहे. तुमच्या सुरक्षिततेसाठीच त्याची स्थापना झाली आहे. ब्यूरोला घाबरू नका...'' थिएटरात हशा पिकत असे.
हूव्हर यांच्या धडाक्‍यामुळं ऍटर्नी जनरल पामरना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्याजागी आलेल्या हार्लन स्टोन यांनी हूव्हर यांना फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचा संचालक करून टाकलं.
त्याच काळात एक चौकस, तरुण वकील हूव्हर यांच्या मनात भरला. त्याचं नाव होतं क्‍लाइड टोल्सन. साहजिकच हूव्हर यांनी टोल्सनला आपल्या टीममध्ये समाविष्ट करून घेतलं.
...टोल्सननं अखेरपर्यंत हूव्हर यांची सावलीसारखी साथ केली.
* * *
1, 1932 या दिवशी विख्यात अमेरिकी वैमानिक चार्ल्स लिंडबर्ग याच्या दीड वर्षाच्या मुलाचं अपहरण झालं. बारा दिवसांनी त्या पोराचं शव घराजवळच एका शेतात आढळलं. न्यूयॉर्क ते पॅरिस असं उड्‌डाण एकेरी इंजिनाच्या छोट्याशा विमानातून करणारा लिंडबर्ग अमेरिकेत हीरो होता. त्याच्या मुलाचं असं झालं म्हटल्यावर अमेरिका हादरली. खुद्द राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांनी लक्ष घालून मध्यरात्री हूव्हर यांना उठवलं आणि खुनाचा छडा लावण्याची आज्ञा दिली.
हूव्हर यांच्या ताब्यातला "वैयक्‍तिक माहिती'चा साठा इथं कामी आला. गुन्हे-वैद्यकावर त्यांचा विश्वास होता. खंडणी मागणाऱ्या पत्रांवरच्या हस्ताक्षराचा अभ्यास झाला. ब्रूनो हॉप्टमन नावाचा गुन्हेगार सापडला. केस उभी राहिली. ब्रूनोला फासावर चढवण्यात आलं.

हूव्हर आणि क्‍लाइड या दोघांनी वाढवलेला एफबीआयचा पसारा आता प्रचंड विस्तारला होता. ""जगातला सर्वात शक्‍तिमान आणि प्रसिद्ध मनुष्य कोण आहे?'' असं हूव्हर दर्पोक्‍तीनं सहकाऱ्यांना विचारी. उत्तर देण्याचं कारण नसे. ते सर्वांनाच ठाऊक होतं. हूव्हर कोणाला डरत नसत. ऍटर्नी जनरल बॉबी केनेडी हे वास्तविक त्यांचे बॉस होते; पण त्यांना भेटून हूव्हर यांनी एकदा शांतपणे सांगितलं की तुमचा धाकटा भाऊ नसत्या ठिकाणी जाऊन रंग उधळतोय. राष्ट्राध्यक्ष व्हायला निघालेल्या उमेदवाराला असं शोभत नाही. ही घ्या त्याची फाइल. ठेवा तुमच्याकडंच... माझ्याकडं रेकॉर्डसाठी एक आहेच.''

-मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनिअर) यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला तेव्हा हूव्हर यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. गांधीजींची अहिंसा आणि ख्रिस्तपुराणातल्या सहवेदनेच्या तत्त्वावर अदम्य विश्‍वास असलेल्या मार्टिन ल्यूथर किंग यांनी वर्णविद्वेष आणि दमनयंत्रणेविरुद्ध लढा पुकारला होता. त्यांची लोकप्रियता शिगेला पोचली होती; पण "हा किंग एक नंबरचा खोटारडा आहे' हे हूव्हर यांचं मत कायम होतं. किंग यांनी नोबेल स्वीकारू नये, म्हणून त्यांनी जंग जंग पछाडलं...
एफबीआय ही यंत्रणा कायम वादग्रस्त राहिली. त्याबाबत हूव्हर काही करू शकले नाहीत; किंबहुना त्यांना यंत्रणेची प्रतिमा अशीच हवी होती. त्या काळात क्‍लाइड आणि हूव्हर दोघंच गुपचूप दौऱ्यावर निघत. एकत्र राहत. त्यातून गुंतागुंत वाढत गेली. हूव्हर अधिक हट्‌टी आणि दुराग्रही बनत गेले. या दोघांमधलं नातं कुजबुजीला कारणीभूत ठरत होतं; पण दोघंही शेवटपर्यंत एकमेकांना साथ देत राहिले. पुढं तर क्‍लाइडलाही पक्षघाताचा झटका आला; पण त्याला हूव्हर यांनी ब्यूरोतून काढलं नाही. तो तसाच कामावर येत राहिला.
जे. एडगर हूव्हर यांचं निधन झालं, त्या दिवशी त्यांची खासगी सचिव हेलेन गॅंडी हिनं कित्येक फायली आणि कागदपत्रं जाळून टाकली. इतिहास मुका झाला तो झालाच.
* * *

हूव्हर यांचं दोन मे 1972 रोजी वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालं. (गेल्याच आठवड्यात त्यांचा मृत्युदिन होता...) त्यांच्या निधनाची वार्ता ऐकून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्‍सन बसल्या खुर्चीतच पुटपुटले होते : ""मेला का तो म्हातारडा ***!'' अर्थात राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत श्रद्धांजलीत मात्र हूव्हर हे "आभाळाएवढं मोठं' व्यक्‍तिमत्त्व होतं, हा भाग अलाहिदा.

क्‍लिंट इस्टवूड यांनी पेश केलेला हा हूव्हर म्हणजे एक कोडं आहे. आता सुटेल असं वाटेपर्यंत पुन्हा गुंतागुंतीचं होणारं कोडं. अर्थात हूव्हर यांचं व्यक्‍तिमत्त्चच तसं होतं. त्यांच्या कारभाराबद्दल अनेक प्रवाद असतील; पण त्यांची अमेरिकाभक्‍ती मात्र वादातीत होती. लिओनार्दो डिकॅप्रिओनं साकारलेला हूव्हर कमालीचा प्रभावी वाटतो. दिग्दर्शक इस्टवूड यांनी संपूर्ण चित्रपटात फ्लॅशबॅक तंत्राचा वापर वारंवार केला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं संगीतही इस्टवूडनंच दिलं आहे! तरुण हूव्हर आणि आपली कहाणी डिक्‍टेट करणारा म्हातारा हूव्हर यांची सांगड घालण्याचा केलेला प्रयोग प्रेक्षकाला खिळवून ठेवतो. आपण जुनी, कालबाह्य कहाणी ऐकत नसून हे आत्ताच तर सारं घडतंय, असं वाटायला लागतं. अर्थात याचं श्रेय पटकथाकार डस्टिन लान्स बॅक यांना द्यावं लागेल. विख्यात अभिनेत्री ज्युडी डेंचनं हूव्हर यांची आई साकारली आहे, तर नओमी वॅट्‌सनं हेलेन गॅंडीची एकनिष्ठ व्यक्‍तिरेखा उभी केली आहे. क्‍लाइड टोल्सनची भूमिका खूप नाजूक आहे. हूव्हर यांचा जन्मसखा म्हणून आयुष्यभर मिरवलेल्या क्‍लाइडच्या गुंतागुंतीच्या भूमिकेत आर्मी हॅमरनं खूपच समंजस अभिनय केला आहे.

या चित्रपटाला ऑस्करबिस्कर नाही मिळालं. गोल्डन ग्लोबसाठी नामांकन मिळालं तेवढंच. प्रेक्षकांचा प्रतिसादही तसा ग्रेट मिळाला नाहीच. समीक्षकांनीही "भरपूर मेकपवाला ड्रामा' म्हणून काहीसं हिणवलं. तरीही या चित्रपटाचं महत्त्व कमी होत नाही. कारण, इतिहासालाही हुलकावण्या देणाऱ्या जे. एडगर हूव्हर नावाच्या एका जबरदस्त व्यक्‍तिमत्त्वाचा हा एक चित्रपटीय दस्तावेज ठरतो. यातून हूव्हर पुरते उलगडले नसले तरी फारसं बिघडत नाही.
...बिग बॉस दिसतो कसा, यात कुणाला इंटरेस्ट असतो?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pravin tokekar write article in saptarang