pravin tokekar write article in saptarang
pravin tokekar write article in saptarang

मुक्‍या मेंढरांचा आकांत सारा... (प्रवीण टोकेकर)

"सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ज्‌' हा सार्वकालिक अभिजात चित्रपट आहे. भूत-पिशाच्च, छातीचे ठोके वाढवणारं संगीत, विद्रुप ओंगळ चेहरे असं काहीही नसताना खुर्चीत बसलेल्या प्रेक्षकाच्या हाता-पायातलं बळ काढून घेण्याची ताकद या चित्रपटानं दाखवली. याला भयपट म्हणावं की थरारपट? लेबलं कुठलीही लावली तरी हा सिनेमा त्यातून हळूच सटकतो. "चोराची पावलं चोराला ठाऊक असतात' या मराठी म्हणीला अनुसरूनच "खुन्याचा छडा लावण्यासाठी खुन्यासारखा विचार करणारा मेंदू हवा' हेच हा चित्रपट सांगतो.

When thou art at thy table with thy friends,
Merry in heart, and filled with swelling wine,
I'll come in midst of all thy pride and mirth,
Invisible to all men but thyself,
And whisper such a sad tale in thine ear
Shall make thee let the cup fall from thy hand,
And stand as mute and pale as death itself.
- विल्यम शेक्‍सपीअर, नाटक : "मॅक्‍बेथ' (अंक पाचवा), 1607.

मनाची विकारविलसितं उजागर करावीत तर शेक्‍सपीअरनंच. खोल मनाच्या तळात साचलेलं काळंबेरं शेक्‍सपीअर बरोब्बर हुडकून काढतो. एखाद्या सफाईकामगारानं नाल्यातला काळाकुट्ट चिखलकाठीनं ढवळावा तसा. माणसाच्या मनातले हे विकार त्याच्या फार ओळखीचे असावेत. त्याच्या "मॅक्‍बेथ' या नाटकात ही खदखद फार प्रभावीपणाने फसफसून वर आली आहे. त्या नाटकात बांकोचं भूत मॅक्‍बेथला छळत असतं. त्याला म्हणतं : दोस्तांबरोबर मेजवानीत रमलेला असशील, दिलखुलास हसत असशील, टाळ्या देत-घेत असशील, तेव्हाच येईन मी अदृश्‍यमान होऊन...तुझ्या कानात अशी दु:खाची कहाणी सांगेन की हातातला प्याला जाईल गडगडत, मूक उभा राहशील पुतळ्यासारखा नि मृत्यूसारखा पांढराफटक पडशील....

...तसं बांकोचं भूत तुम्हा-आम्हालाही छळत असतं. कारण, ते तर आपल्याच मनात राहत असतं. मॅक्‍बेथ आठवायचं कारण 27 वर्षांपूर्वी याच सुमाराला "सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ज्‌' आला होता आणि बांकोचं भूत बघितल्यासारख्या सगळ्यांच्या जिभा लुळ्या पडल्या होत्या. "सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ज्‌' हा सार्वकालिक अभिजात चित्रपट आहे. भूत-पिशाच्च, छातीचे ठोके वाढवणारं संगीत, विद्रुप ओंगळ चेहरे असं काहीही नसताना खुर्चीत बसलेल्या प्रेक्षकाच्या हातापायातलं बळ काढून घेण्याची ताकद ह्या चित्रपटानं दाखवली. ह्याला भयपट म्हणावं की थरारपट? लेबलं कुठलीही लावली तरी हा सिनेमा त्यातून हळूच सटकतो. चोराची पावलं चोराला ठाऊक असतात ह्या मराठी म्हणीला अनुसरुनच "खुन्याचा छडा लावण्यासाठी खुन्यासारखा विचार करणारा मेंदू हवा' हेच हा चित्रपट सांगतो.

या चित्रपटाच्या पोस्टरनं साऱ्या जगताचं लक्ष वेधून घेतलं होतं. विभोर डोळ्यांच्या जोडी फोस्टरचा क्‍लोजअप आणि तिच्या ओठांवर एक फुलपाखराची प्रतिमा. त्या फुलपाखराच्या अळीदेहावर एक मानवी कवटीचा आकार...मानवी कवटी वगैरे ठीक आहे; पण जरा बारकाईनं पाहिलं की दिसतं की ती कवटी नाहीच. सात अनावृत युवतींनी कवटीच्या आकाराची एक समूहरचना केली आहे.

विख्यात चित्र-शिल्पकार, कल्पक रचनाकार साल्वादोर दालीची ही रचना होती. या स्पॅनिश कलावंतानं पॅरिसमध्ये असताना अचानक छायाचित्रकार फिलिपी हाल्समनला बोलावून घेतलं आणि सात तरुण स्त्रीदेहांची रचना करून कवटीचा आकार साधला. हे छायाचित्र in Voluptas Mors या नावानं जगभर गाजलं. "मांसल मृत्यू' असं काहीसं मराठीत त्याला म्हणता येईल. सन 1989 मध्ये दाली निवर्तला. त्याच्या प्रतिभेला हा सलाम होता. या छायाचित्राचा पोस्टरमध्ये उपयोग करून दिग्दर्शक जोनाथन डेमीनं पहिली दाद मिळवली होती. पुढं तर "सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ज्‌'नं इतिहास घडवला. शतकातल्या उत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत मानाचा पाट धरून बसलेला हा चित्रपट रसिकांनी कधीही सोडू नये, असा आहे.
* * *
अमेरिकेच्या पश्‍चिम तटाशी वसलेल्या व्हर्जिनियामध्येच क्‍वांटिकोचा तळ आहे. क्‍वांटिको म्हटलं की फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन ऊर्फ एफबीआयचा तळ हे अमेरिकेत कुणीही सांगेल. तळाला लागूनच असलेल्या तुरळक रानात सकाळ उगवत होती...

...क्‍लॅरिस स्टार्लिग धावतेय. जॉगिंगचा हा मार्ग जवळ जवळ रानातूनच जातो. पक्ष्यांचा किलबिलाट, गार हवा. स्टार्लिंग घामाघूम धावतेय. तिच्या चेहऱ्यावर दिसणारी तारुण्यातली तडफ आणि तजेला आणखीच खुलून दिसतोय. किंचित अपरं नाक. पातळ ओठ. उत्सुक डोळे. केस मागे बांधलेले. अंगात जॉगिंगसाठीचा ट्रॅकसूट. पायात स्पोर्टस शूज...ती व्हर्जिनिया विद्यापीठाची पदवीधर आहे. एफबीआयमध्ये शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाली आहे. खूप मोठं करिअर पुढं उभं आहे. मनाशी उमेद आहे. तेवढ्यात तिच्या प्रशिक्षकानं निरोप दिला की वर्तनशास्त्र विभागाचे प्रमुख जॅक क्रॉफर्डनं तिला बोलावलंय. काय काम असेल?
एफबीआयचा वर्तनशास्त्र विभाग हे एक प्रस्थ आहे. गुन्हेगारांच्या मानसिकतेचा मागोवा घेणारा, त्यांच्या वर्तनाचे अर्थ लावणारा, त्यांच्यावर आवश्‍यक ते उपचार करणारा हा विभाग आहे. अर्थात त्यायोगे गुन्हे रोखण्याचे मार्गही उघडत जातात, हे वेगळं सांगायला नको. गुन्हेगाराची गुन्हा करण्याचीही एक शैली असते. म्हणजे असं की एखादा सीरिअल किलर खून पाडत सुटतो, तेव्हा जीव घेण्याची त्यानं एक मेथड शोधून काढलेली असतेच. त्याच्याच मनोव्यापाराचा तो एक उघड आविष्कार असतो. अशा गुन्हेगारी मनाचा छडा लावला की गोष्टी सोप्या होतात.

अमेरिकेच्या पूर्वतटावर एक माथेफिरू मोकाट सुटला होता. पाच तरुण मुली दिवसाढवळ्या गायब झाल्या होत्या. काही दिवसांनी त्यांचे मृतदेह सापडले. छिन्नभिन्न अवस्थेत. अंगावरची कातडी सोललेली. तोंडात फुलपाखराचा एक अर्धवट कोष. उभी अमेरिका शहारली. घाबरली. पोरी घराबाहेर पडायला तयार होईनात. माथेफिरू सापडत नव्हता. वर्तमानपत्रांनी आणि टीव्हीमाध्यमांनी एफबीआयला धारेवर धरलेलं होतं. सीरिअल किलरला माध्यमांनी नाव देऊन टाकलं ः बफेलो बिल.
तेवढ्यात खबर आली की अमेरिकेच्या सिनेटर श्रीमती रुथ मार्टिन यांची तरुण मुलगी कॅथरिन हिला बफेलो बिलनं पळवलं आहे. वॉशिंग्टनपासून कळ फिरली. एफबीआयला आता काहीतरी करणं भाग होतं.
* * *

बाल्टिमोरच्या कडेकोट तुरुंगात आणखी एक सिरिअल किलर गेली आठ वर्षं बंद होता. डॉ. हनिबल लेक्‍टर त्याचं नाव. पेशानं एकेकाळी मानसोपचारतज्ज्ञ असलेला लेक्‍टर आता आयुष्यभर तुरुंगात राहणार आहे. कमालीचा बुद्धिमान; पण त्याच्या बुद्धीला सर्पासारखा विषार होता. त्याला "हनिबल द कॅनिबल' असंच म्हणत. आपल्या बळींची यकृतं खाण्यात त्याला प्रचंड आनंद मिळायचा म्हणे. तो मनोरुग्ण असल्याचं सिद्ध झाल्यानं साहजिकच त्याला कायद्यानं फासावर चढवणं शक्‍य नव्हतं. तीक्ष्ण नजर. सावजावर रोखलेली सर्पनजर जणू. पापणी क्‍वचितच फडफडून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देते. समोरच्याचा झटक्‍यात अदमास घेत सावचित्त बोलणारा लेक्‍टर हा घातक कैदी मानला जाई. आठ वर्षांपूर्वी एका इस्पितळात रुटिन वैद्यकीय तपासणीच्या वेळी त्याच्या तोंडावरचा कुलूपबंद मुखवटा काढावा लागला. तेवढ्या काळात त्यानं तिथल्या नर्सच्या गळ्याचा, जिभेचा, ओठांचा लचका तोडला...आणि हे करताना त्याच्या हृदयाचे ठोके फक्‍त 85 पडत होते, असं कार्डिओग्राम काढणारं यंत्र सांगत होतं.

क्‍लॅरिस स्टार्लिंगनं लेक्‍टरची तुरुंगात गाठ घ्यावी, त्याच्या विश्‍लेषणामधून बफेलो बिलचं प्रोफाइल तयार करावं, अशी कामगिरी वर्तनशास्त्र विभागाचा प्रमुख जॅक क्रॉफर्ड यानं तिला दिली. काम तसं "अकॅडमिक' स्वरूपाचं. एफबीआयच्या प्रशिक्षणार्थींना गुन्हेगारांच्या मुलाखती नव्या नसतात. तो शिक्षणाचाच भाग असतो; पण वेळप्रसंग पाहून लेक्‍टरला जरा सुसह्य तुरुंगात हलवण्याचं आमिषही दाखवायला हरकत नाही, असं क्रॉफर्डनं क्‍लॅरिसला सुचवलं.
...एका भयानक नाट्याला इथं प्रारंभ होतोय, हे तिला कळलंदेखील नाही.
* * *

बाल्टिमोरच्या सरकारी इस्पितळाचा एक स्वतंत्र वॉर्ड महाघातकी गुन्हेगारांसाठीच होता. डॉ. फ्रेडरिक चिल्टन यांच्या देखरेखीखाली ही भयानक माणसं तिथं ठेवली गेली होती. सगळ्यात टोकाची कोठडी लेक्‍टरची. खोलीत कागदाचा तुकडासुद्धा नाही. एकही खिडकी नाही. गजांबरोबरच जाडजूड काचेचं तावदानही सभोवार होतं.
स्वच्छ आणि प्रकाशमान कोठडीत पांढऱ्याशुभ्र पोशाखात डॉ. हनिबल लेक्‍टर उभा होता. त्याच्या थिजलेल्या सर्पनजरेत हिंस्र छटा मधूनच दिसे. देह असा ताठ की जणू कुणी एखादी गिटार उभी करून ठेवली आहे. भाषेत कमालीचं मार्दव. अत्यंत उच्च दर्जाचं इंग्लिश.
त्यानं सहकार्य केलं तर बफेलो बिलला पकडता येईल, असा प्रस्ताव क्‍लॅरिसनं ठेवला. लेक्‍टरनं मग उंदरा-मांजराचा एक मानसिक खेळच सुरू केला. नाही म्हटलं तरी लेक्‍टर हा खुन्यांची मानसिकता कोळून प्यायलेला नामवंत मानसोपचारतज्ज्ञ होता.
क्‍लॅरिस आणि लेक्‍टरचं संभाषण डॉ. चिल्टननं गुपचूप रेकॉर्ड केलं. गुन्हेगारांशी हे असलं भयानक "डील' केल्याचं खापर क्‍लॅरिसचा बॉस क्रॉफर्डवर फोडण्यात आलं. क्‍लॅरिसला लेक्‍टरच्या भेटी बंद करायला फर्मावण्यात आलं. उलट चिल्टननं स्वत:च पुढाकार घेऊन सिनेटर मार्टिनची मर्जी संपादन करण्याचे उद्योग सुरू केले.
बफेलो बिलचा पत्ता दिलास तर तुला टेनेसीच्या कैदखान्यात आरामात ठेवीन, असं आश्‍वासन चिल्टननं लेक्‍टरला दिलं. लेक्‍टरनं बफेलो बिलचं नाव खरं नाव, पत्ता सिनेटर मार्टिनना सांगितला आणि कडेकोट बंदोबस्तात हसत हसत तो टेनेसीच्या विमानात चढला.
* * *

टेनेसीच्या कोर्टाच्या इमारतीतच एक अभेद्य कोठडी तयार करून शेकडो पोलिस शिपायांच्या पहाऱ्यात लेक्‍टरला ठेवलं गेलं होतं. अर्थात लेक्‍टरनं बफेलो बिलबद्दल चिल्टन आणि सिनेटर मार्टिनला खोटीच माहिती दिली होती. क्‍लॅरिसला हे कळलं होतं. यापाठीमागे लेक्‍टरच्या विकृत; पण बुद्धिमान मेंदूचा काहीतरी डाव असणार हे तिनं ओळखलं होतं. तिनं हिकमतीनं त्याला टेनेसीच्या अत्याधुनिक तुरुंगकोठडीत गाठलं आणि जाब विचारला.
""तू खूप मनमोकळी आहेस क्‍लॅरिस...चल, आपण सोडवू या ही कोडी. तू मला तुझ्याबद्दल खासगी माहिती द्यायचीस...बदल्यात मी तुला क्‍लूज देईन...चालेल? आपलं तसं ठरलं होतं...'' लेक्‍टरनं पुन्हा प्रस्ताव ठेवला. विचारात पडलेल्या क्‍लॅरिसनं लहानपणीची आठवण सांगितली.
""तुझे वडील कशानं गेले, क्‍लॅरिस?'' लेक्‍टर.
""गेले नाहीत...त्यांचा खून झाला,'' क्‍लॅरिस.
""हं...तेव्हा तू दहा वर्षांची होतीस. मग तू चुलत्यांच्या रॅंचवर मोंटानामध्ये राहायला गेलीस. तिथं मेंढ्या आणि घोडे होते...हो नं? तिथं काय पाहिलंस?''
""मी...मी...पळाले...पहाटेच्या अंधारात.''
""अंहं...नीट सांग...तुला जाग कशानं आली, ते सांग!''
""लहान मुलाच्या रडण्याच्या आवाजानं...ती किंचाळी असू शकेल. जिना उतरून मी आवाजाच्या दिशेनं गेले.''
""कुठं?''
""मेंढ्यांच्या पालात. तिथं अनेक मेंढ्या ओरडत होत्या. त्यातलं एकतरं मेंढरू वाचवायचं म्हणून मी एक उचललं; पण ते खूप वजनदार होतं. तरीही मी तशीच पळाले. उपाशीतापाशी, तहानेली पळत राहिले. शेवटी शेरीफच्या गाडीनं मला बेशुद्धावस्थेत उचललं. मग मी बोझमनच्या अनाथालयात राहिले...'' क्‍लॅरिस कसंबसं सांगत राहिली. इच्छा नसताना.
""तुझ्या त्या मेंढराचं काय झालं, क्‍लॅरिस?''
""त्याला त्यांनी मारलं!''
...क्‍लॅरिस स्फुंदून स्फुंदून रडू लागली.
क्‍लॅरिसला त्याला भेटण्याची परवानगी नव्हती. तिला तिथून जायला सांगण्यात आलं. निघता निघता लेक्‍टरनं बफेलो बिलची केस फाइल तिच्याकडं फेकली.
* * *

टेनेसीच्या अभेद्य कोठडीत असलेल्या लेक्‍टरनं दोन्ही पहारेकऱ्यांना घात करून मारलं. एकाची आतडी काढून त्यानंच त्याला कोठडीच्या गजांना अडकवलं. दुसऱ्याच्या चेहऱ्याचे हजारो चावे घेतले. मग थोडा वेळ व्हायोलिन वाजवल्यासारखं करून तो थंड बसला.
बऱ्याच वेळानं आलेल्या दुसऱ्या पहारेकऱ्यांनं दृश्‍य पाहिलं आणि ते हादरले. कोठडी रिकामी होती. लेक्‍टर पळाला होता. एक पहारेकरी टांगलेल्या अवस्थेत, तर दुसरा चेहरा ओळखू येण्यापलीकडं तडफडत होता. शिट्या वाजल्या. पोलिस धावले. जायबंदी पहारेकऱ्याला ऍम्ब्युलन्समधून इस्पितळाकडं नेण्यात आलं. पाठोपाठ लेक्‍टर पळाल्याची बातमीही फुटली.
त्या इमारतीच्या लिफ्टच्या टपावर दुसऱ्या पहारेकऱ्याचा मृतदेह सापडला. मग ऍम्ब्युलन्समधून नेलेला जखमी पहारेकरी कोण होता?
...लेक्‍टरनं दिलेल्या केसफाइलमधल्या क्‍लूजच्या जोरावर क्‍लॅरिस स्टार्लिंगनं तुफान वेगात एकांडी मुसंडी मारली आणि खरा बफेलो बिल शोधून काढला. पुढं काय झालं? सिनेटरची मुलगी सुखरूप सुटली? बफेलो बिल जिवंत सापडला? डॉ. हनिबल लेक्‍टरचं काय झालं? ते सगळं चित्रपटात बघणंच उत्तम.
* * *

थॉमस हॅरिस हे इंग्लिश नॉवेल वाङ्‌मयातलं एक आघाडीचं आणि तितकंच गूढ नाव. या लेखकानं उत्तमोत्तम भय-थरारकथा रसिकांना दिल्या. त्यापाठीमागं निव्वळ थरार किंवा भय कधीच नव्हतं. तर्कबुद्धीची त्याला जोड असे. डॉ. हनिबल लेक्‍टर ही काळी-करडी व्यक्‍तिरेखा त्यांनी जन्माला घातली. खलवृत्तीचा हा नायक रसिकांना भावला नसता तरच नवल. चारशे वर्षांपूर्वी अशा छटांच्या अगणित व्यक्‍तिरेखा शेक्‍सपीअरनं उभ्या केल्या होत्या. त्यादृष्टीनं लेखक हॅरिस यांची जातकुळी त्याच खानदानाशी नातं सांगते. लेक्‍टरची व्यक्‍तिरेखा असलेले किमान पाच चित्रपट निघाले. एक टीव्ही-मालिकाही आली. सन 1986 मध्ये मायकेल मान दिग्दर्शित "मॅनहंटर' आला. त्यात पहिल्यांदा डॉ. हनिबल लेक्‍टरचं दर्शन घडलं. ब्रायन कॉक्‍स या नावाजलेल्या अभिनेत्यानं त्यात प्रमुख भूमिका केली होती. नंतर आलेल्या "सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ज्‌'नं 1991 मध्ये ऑस्कर ग्रॅंड स्लॅम साधला; म्हणजेच सर्वोत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट नायक, नायिका, दिग्दर्शन आणि पटकथा असे पाचही ऑस्कर पुरस्कार उचलून नेणं. पुढं 2001 मध्ये रिडली स्कॉटनं "हनिबल' आणला. पाठोपाठ पुढच्याच वर्षी ब्रेंट रॅटनरचा "रेड ड्रॅगन' पेश झाला. सन 2007 मध्ये आलेल्या "हनिबल: अपरायजिंग'ची पटकथासुद्धा खुद्द थॉमस हॅरिस यांनीच लिहिलेली होती; पण "सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ज'चा अनुभव यातला एकही चित्रपट देऊ शकला नाही.
टेड टॅली नामक अत्यंत हुशार पटकथालेखकानं "सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ज्‌'ची पटकथा सिद्ध केली. दिग्दर्शन होतं जोनाथन डेमी यांचं. खरंतर हॅरिस यांच्या कादंबरीवर लोकांच्या उड्या पडतातच. नायिकेचा बेजोड रोल करणाऱ्या जोडी फोस्टरला या कादंबरीचे हक्‍क विकत घ्यायचे होते; पण विख्यात नट जीन हॅकमननं ते आधीच करून टाकलं होतं. शेवटी त्यांनी हे हक्‍क विकले. हॅरिस यांना या मारामारीशी काहीच सोयरसुतक नव्हतं. ते शूटिंगच्या ठिकाणीही फिरकले नाहीत. कुणालाही मार्गदर्शन वगैरे केलं नाही. वास्तविक डॉ. हनिबल लेक्‍टरची अजरामर भूमिका साकारणारे सर अँथनी हॉपकिन्स यांना त्यांना भेटण्याची खूप इच्छा होती. लेक्‍टर कसा वागेल, दिसेल हे शोधण्यासाठी त्यांनी तुरुंगात जाऊन काही सीरिअल किलर्सना निरखलं होतं. काही वकील, मानसोपचारतज्ज्ञांशी बोलून माहिती करून घेतली होती. हॅरिस यांनी मात्र त्यांना दाद दिली नाही. चित्रपट रिलीज झाल्यावर सगळ्या कलावंतांसाठी त्यांनी महागड्या वाइनची एक आख्खी केस मात्र आवर्जून पाठवली! हॉपकिन्स यांनी हनिबल लेक्‍टर साकारण्यासाठी घेतलेली मेहनत हा जगातल्या अनेक कलावंतांसाठी एक वस्तुपाठ ठरावा. त्यांची देहबोली, उच्चार, नजर सारं काही प्रेक्षकाला मुळासकट हादरवणारं होतं. त्यांच्यासाठी तरी हा चित्रपट बघायलाच हवा. मुळात सर हॉपकिन्स हे शेक्‍सपीरिअन जातकुळीतले अभिनेते. त्यामुळेही त्यांना भूमिकेची नस सापडली असावी.

विकारविलसितांचा हा खेळ पडद्यावर बघताना एकाच वेळी असह्य होतो आणि पाहावासाही वाटत राहतो. सुधीर मोघे यांच्या एका गाण्यात "मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ...मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल...' असं मनाचं वर्णन केलेलं आहे. हनिबल लेक्‍टरची तल्लख विकृतबुद्धी बघताना मनातला चिखलगाळ ढवळला जातो. काहीतरी काळंबेरं आम्लपित्तासारखं वर वर घशाशी येतं. बघता बघता वाटून जातं ः आपणच मॅक्‍बेथ आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com