दुभंग! (प्रवीण टोकेकर)

pravin tokekar
pravin tokekar

"ब्यूटिफुल माइंड" हा चित्रपट म्हणजे रसेल क्रो याच्या कारकीर्दीतला लखलखता मेरुमणी आहे. त्याहूनही अधिक तो पटकथालेखक अकिवा गोल्डमन यांच्या प्रतिभेचा आविष्कार आहे. मूळ जीवनकहाणीतल्या वास्तव घटनांना त्यांनी बगल दिली आहे हे खरंच; पण गणित ही भाषाही होऊ शकते, हे त्यांनीच दाखवून दिलं.

- महाभारताच्या तेलगू संहितेत वेगळाल्या गोष्टी आहेत. त्यातलीच ही एक.
सहदेव हा सर्वात धाकला पांडव. नकुलाचा सहोदर. माद्रीचा मुलगा. पंडूनं मृत्युशय्येवर आपल्या मुलांना सांगितलं होतं ः "माझं शरीर जाळू नका, ते खाऊन टाका. ते खाल, तर त्रिकालज्ञानी व्हाल. भूत, वर्तमान आणि भविष्याचं भान तुम्हाला येईल...' काही काळातच पंडूनं अखेरचा श्वास घेतला; पण पित्याचं कलेवर खाण्याचं हे अघोरी और्ध्वदैहिक करणं पांडवांना जड झालं. पित्याची आज्ञा मोडणार कशी? पण तरीही त्यांनी मनाची तयारी केली. तेवढ्यात श्रीकृष्ण तिथं आला आणि "हे असलं भयंकर काही करण्याची गरज नाही. कलेवरं कोण खातं, माहितीये ना?' असं त्यानं सुनावलं. सहदेवाला पित्याच्या मृतदेहाशी राखण करायला बसवून सगळे उठून बाहेर गेले. हळव्या सहदेवाचं मन संभ्रमानं भिरभिरलं होतं. कुणाचं ऐकावं? भगवंताचं? की पित्याचं? इकडं श्रीकृष्णानं गुपचूप सूक्ष्मदेह धारण करून पंडूच्या कलेवरात प्रवेश केला आणि तो आतून ते शरीर खाऊ लागला. सहदेवानं न राहवून पित्याच्या मृतदेहाचा अंगठा तोडून पटकन प्रसाद म्हणून खाऊन टाकला. अंगठा खाताच त्याला अंतर्ज्ञान प्राप्त झालं. श्रीकृष्णाचा कुटिल डाव सहदेवानं ओळखला. कृष्णाला अंगठा खायला मिळाला नाही, कारण तो सहदेवानं खाल्ला होता. अखेर युगंधरानं प्रकट होऊन सहदेवाला शाप दिला : "माझं हे गुपित कुणाकडं उघड केलंस, तर तुझ्या डोक्‍याची शंभर शकलं होऊन तुझ्या पायाशी लोळू लागतील...लोळू लागतील...लोळू लागतील...' '

सहदेवानं आयुष्यभर हा त्रिकालज्ञानाचा शाप बाळगला. कुठंही तोंड उघडलं नाही. पुढं वाढून ठेवलेलं युद्धही त्यानं आधीच पाहिलं होतं. त्याचे परिणामही त्याला ज्ञात होते. तो मनातल्या मनात भळभळत राहिला. अफाट ज्ञानानं बोजड झालेल्या मेंदू-मस्तिष्काच्या आतल्या आत उडणाऱ्या ठिकऱ्या गोळा करत राहिला. बृहस्पतीच्या तोडीचं ज्ञान प्राप्त असलेल्या सहदेवाच्या वाट्याला आली ती अटळ दुभंगलेपणाची निर्मम जाणीव.
असाच एक सहदेवाचा शाप भोगणाऱ्या शास्त्रज्ञाची ही कहाणी आहे.
* * *

डॉ. जॉन नॅश हे थोर अर्थशास्त्रज्ञ. गणितज्ञ. त्यांच्या सिद्धान्तांवर काही शास्त्रं कैक योजनं पुढं गेली. नॅश इक्‍विलिब्रियम, नियामक गतिशीलतेचा सिद्धान्त, गेम थिअरी...अशा पथदर्शी सिद्धान्तांचे जनक ठरलेले नॅश हे प्रिन्स्टन विद्यापीठाचे भूषण होते. नोबेल पुरस्कार आणि गणितज्ञांना मिळणारा "आबेल' सन्मान हे दोन्ही सर्वोच्च मानाचे किताब त्यांच्याकडं होते. जगातल्या बुद्धिमंतांच्या मांदियाळीतलं हे पहिल्या फळीतलं नाव. त्यांची गेम थिअरी आजही कित्येक ज्ञानशाखांमध्ये उपयोगी पडते. अर्थशास्त्र म्हटलं की शेअर बाजारातले चढ-उतार, अर्थसंकल्प, आर्थिक पाहणी अहवाल, व्याजदर, नेमेचि भडकणारे तेलाचे भाव, बॅंकांचं कोसळणं, दारिद्य्ररेषा असलं काही जांभईयुक्‍त जडजंबाल डोळ्यांसमोर येतं. त्या आकडेवारीत माणूस प्रथम गहाळ होतो, मग घायाळ! पण अर्थशास्त्र एवढं मर्यादित नाही. समाजाची कितीतरी रहस्यं उलगडायला अर्थशास्त्र कामी येतं. गेम थिअरी ही अर्थशास्त्रातली एक महत्त्वाची संकल्पना आहे. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, संगणकशास्त्र अशा कितीतरी शास्त्रांमध्ये हा सिद्धान्त वापरला जातो; अगदी जनुकशास्त्रातसुद्धा! समोरच्याच्या अपेक्षित कृतीचा विचार करून कसे निर्णय घेतले जातात, याचे काही गणितीय आडाखे गेम थिअरी मांडते. या आडाख्यांनुसार होणाऱ्या वर्तनाचा परिणाम प्रामुख्यानं दोन प्रकारे दिसून येतो. एक ः संघर्ष किंवा दोन ः सहकार्य. उदाहरणार्थ ः नोटाबंदी जाहीर झाल्यामुळं तुम्ही बॅंकेपुढल्या भल्यामोठ्या रांगेत उभे आहात. जोवर रांगेचा नियम सगळे पाळताहेत, तोवर रांग उभी आहे. रांग शिस्त पाळतेय म्हणून आपोआप तुम्ही हाताची घडी घालून रांगेत उभे राहाताय; पण पुढल्या बाजूला कुणीतरी रांगेत घुसण्याचा आगाऊपणा करतो. मग शिव्या, बोंबाबोंब, राडा! रांगेतला प्रत्येक माणूस रांग मोडण्याच्या उद्योगाला लागतो. तुम्हीही हाताची घडी सोडून ढकलाढकली करत, खिशातल्या जुन्या नोटा सांभाळत पुढं घुसू बघता... बघा, काय झालं? सहकार्याचं रूपांतर संघर्षात झालं. हा प्रकार गणितीय आडाखे बांधून टाळण्याजोगा असतो. हीच ती गेम थिअरी! ती संगणकशास्त्राला लागू आहे आणि विश्वाच्या अफाट पसाऱ्यात भिरभिरणाऱ्या हजारो लघुग्रहांच्या आणि अवकाशधुळीच्या कणांनाही लागू आहे.
...बुद्धिमंतांच्या वर्तुळातलं आदराचं स्थान लाभलेले डॉ. नॅश एक शापित आयुष्य जगले. त्यांना पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया या मनोविकारानं हयातभर पछाडलं होतं. तीन वर्षांपूर्वी, नेमकं सांगायचं तर 23 मे 2015 रोजी वयाच्या 86 व्या वर्षी डॉ. नॅश यांचा एका मोटार-अपघातात मृत्यू झाला. तोवर त्यांनी मनोव्याधीपायी चिक्‍कार भोगलं होतं. त्यांचा "बिघडलेला' मनोव्यापार हाच मुळात अनेक मानसतज्ञांच्या अभ्यासाचा आणि कुतूहलाचा विषय आहे. स्किझोफ्रेनियासारखा दुर्धर विकार सांभाळत या माणसानं किती आभाळाएवढं काम करून ठेवलं? कसं शक्‍य झालं असेल त्यांना हे? किती किती भोगलं असेल त्यांनी आतल्या आत?

दशकभरापूर्वी त्यांच्या जीवनावर आधारित एक अभूतपूर्व चित्रपट येऊन गेला. नाव होतं ः "ब्यूटिफुल माइंड'. चित्रपट न विसरता येण्याजोगाच आहे. रसेल क्रो याच्या अभिनयामुळं मन-मस्तिष्कात खोल रुतणारा हा चित्रपट खूपच गाजला. त्या वर्षीचे चार ऑस्कर पुरस्कार या चित्रपटानं पटकावले. अर्थात हार होते तसेच प्रहारही आलेच! क्रो आणि कंपनीचा अभिनय लाजबाब असला तरी मुळात चित्रपटातले संदर्भच साफ चुकले असल्याची टीका बुद्धिमंतांच्या वर्तुळात झाली. सिनेमाची गोष्ट करण्याच्या नादात वस्तुस्थितीचा विपर्यास झाला असून हे गणित साफ चुकलेलं आहे, असा दावा अनेकांनी केला. त्यात तथ्यही असावं; पण हे खरं असलं तरी चित्रपट वाईट होता, असं मात्र कुणी म्हटलं नाही. कारण खरोखर मेंदूवर जबरदस्त पगडा बसवणारं हे प्रकरण आहे.
* * *

तो सुमार साधारणत: 1947 चा. दुसरं महायुद्ध नुकतंच संपलं होतं. शीतयुद्धाला प्रारंभ झाला होता. अमेरिकेनं अणुबॉम्बचा वापर करून जगतात आपणच "बिग ब्रदर' असल्याच्या दाव्यावर शिक्‍कामोर्तब केलं होतं. पोलादी पडद्याआड दृष्टिआड होत जाणाऱ्या सोविएत रशियाची हायड्रोजन बॉम्बच्या निर्मितीसाठी उभय देशांची अकटोविकट धडपड सुरू होती. गुप्तहेरगिरीचा सुळसुळाट सुरू होण्याचा तो काळ. सांकेतिक लिप्या, छुपे कोड, गुप्त माहिती यांच्या गदारोळात महासत्तांचं रक्‍त आटू लागलं. हायड्रोजन बॉम्बची निर्मिती जो आधी करील त्याचा वरचष्मा राहणार, हे उघड होतं...अशा परिस्थितीत प्रिन्स्टन विद्यापीठात असामान्य बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या एका जथ्याचं स्वागत होत होतं. बहुतेक सगळे उत्तम गुणवत्ता सिद्ध करून पदव्युत्तर शिक्षणासाठी आलेले. स्कॉलर्स म्हणतात तसे. जॉन फोर्ब्स नॅश (ज्युनिअर) हा 19 वर्षांचा एक तुटक बोलणारा विद्यार्थी त्यापैकी एक. गणितातला जीनिअस म्हणून त्यानं आधीच थोडाफार लौकिक गाठीला बांधला होता. कार्नेजी स्कॉलरशिपचा मानकरी. मार्टिन हॅन्सन या सहाध्यायाबरोबर त्याला संयुक्‍तपणे ती शिष्यवृत्ती मिळाली होती. रिचर्ड सॉल, बेंडर, आइन्सली ही हुशार दोस्तमंडळीही होतीच. त्यात भर पडली ती रूममेट चार्ल्स हर्मनची. चार्ल्स साहित्याचा विद्यार्थी होता. होता अर्थात स्कॉलरच. धम्माल व्यक्‍तिमत्त्वाचा.

व्हीलर स्कॉलरशिप मिळवायची असेल तर एखादा चांगला शोधनिबंध लिहिणं क्रमप्राप्त होतं. प्राध्यापक हॉनर यांनी एकदा नॅशला खडसावलंच.
""इतरांचे शोधनिबंध पूर्ण होत आले, तुझं चाचपडणं सुरूच आहे. अशानं कुठंही निमंत्रण येणार नाही तुला! काय करणार आहेस?'' हॉनर म्हणाले.
""मला ओरिजिनल आयडिया लिहायची आहे...म्हणून थांबलोय!''
""नाहीच काही सुचलं तर काय करशील? समोर काय दिसतंय ते बघ जरा!'' बोलता बोलता ते दोघं विद्यापीठाच्या, फक्‍त प्राध्यापकवृंदासाठी असलेल्या कॅंटिनसमोर आले. इथं फक्‍त बुद्धिमंतांनाच चहा मिळतो. तिथं एक नयनरम्य सोहळा सुरू होता. त्यात जिव्हाळा, आदर, अभिमान अशा सगळ्या भावना साकळल्या होत्या...
...प्राध्यापक डॉ. ऍलन यांना दालनाच्या मधोमध ठेवलेल्या मेजाशी सन्मानानं बसवलं गेलं होतं. बाकीचे प्राध्यापक अदबीनं येऊन तिथं आपल्या खिशाचं पेन काढून ठेवत होते. एखाद्या प्राध्यापकानं नेत्रदीपक कामगिरी बजावलेली असली की प्रिन्स्टनमध्ये असा सन्मान करण्याचा रिवाज होता...योद्धे आपल्यापेक्षा सरस योद्‌ध्यासमोर शस्त्र ठेवतात तसंच काहीसं. बुद्धिमंतांनी त्यांची लेखणी वाहावी!
...अनिमिष नेत्रांनी नॅश त्या सोहळ्याकडं पाहत राहिला.
* * *

एका पार्टीत चार-पाच जणींच्या "हिरव्यागार' घोळक्‍यानं प्रवेश केला. पोरं सावरून बसली. स्कॉलर लोकांनाही हृदय असतंच की. त्या घोळक्‍यात एक केवडा उभा होता. सामुदायिक रीतीनं पोरांनी केवड्याला पसंती दिली.
""ओह माय गॉड, ती ब्लॉंड म्हणजे भलतीच फटाका आहे रे...'' एकजण कुजबुजला. नॅशला पुढं ढकलून कानफटात खायला लावायची उबळ आणखी दोघा-चौघांना आली. मागल्या वेळेलाही त्यांनी नॅशला उचकवून एका पोरीला प्रपोज करायला पाठवलं होतं. तेव्हा या वीरांनी थेट "विषयाला' हात घालून एक करकरीत कानफटात खाऊन आपलं नाव विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलं होतं; पण ते जाऊ दे.
""जॉन, आधुनिक अर्थशास्त्रज्ञ ऍडम स्मिथ म्हणतात की, समूहातल्या एकानं आपल्या हिताचं कार्य पार पाडलं तर ते समूहाच्याही हिताचंच असतं! तेव्हा मि. नॅश, आपण आपल्या हिताचं कार्य पार पाडणार काय?'' सॉल नावाचा मित्र म्हणाला.
""स्मिथचा सिद्धान्त थोडा सुधारायला हवा आहे! आपण सगळ्यांनी एकाच गोष्टीची अभिलाषा धरली तर आपल्यामध्येच संघर्ष होऊन अंतिमत: ती गोष्ट कुणालाच प्राप्त होणार नाही. तथापि, त्या एकमेव गोष्टीकडं दुर्लक्ष केलं तर अन्य चार प्राप्य गोष्टींचा लाभ अनुक्रमे प्रत्येकाला होईल...थॅंक यू! मला "नियामक गतिशीलते'चा सिद्धान्त दिसू लागला आहे...मित्र हो, पोरी गेल्या उडत, माझा शोधनिबंध ठरला!'' एवढं बोलून जॉन नॅश झपाट्यानं तिथून निघाला.
नियामक गतिशीलतेच्या सिद्धान्तामुळं जॉन नॅश अल्पकाळातच डॉ. जॉन नॅश झाले. त्यांना व्हीलर संशोधनवृत्ती मिळाली. प्रिन्स्टन विद्यापीठानं त्यांना सन्मानपूर्वक प्राध्यापकपद देऊ केलं. डॉ. नॅश हे आयुष्यभरासाठी प्रा. नॅश झाले.
* * *

ऍलिशिया लार्द भेटली नसती तर नॅश यांची कारकीर्द कदाचित उभीदेखील राहिली नसती. या विक्षिप्त प्राध्यापकाला त्यांच्या विद्यार्थिनीनं हयातभर तळहाताच्या फोडासारखं जपलं. त्यांच्या गुंतागुंतीच्या मेंदूव्यापाराची भलीभक्‍कम किंमत वेळोवेळी धीरानं मोजली. विद्यार्थिनी ऍलिशियाशी विवाहबद्ध होऊन डॉ. नॅश आपल्या पुढल्या संशोधनाला लागले, तेव्हाच एका भयंकर संकटाचे काळे ढग त्यांच्या भोवताली जमू लागले होते.
पेंटागॉनकडून शास्त्रज्ञांना बोलावणं येणं हे काही नवीन नाही. एक दिवस डॉ. नॅशना फोन आला. रशियन सांकेतिक कोडलिपीची उकल करण्याची खटपट पेंटागॉनमध्ये चालली होती. लाखो आकड्यांच्या त्या रानातून डॉ. नॅश यांच्या गणिती मेंदूनं ते कोड शोधून काढले. मग तो एक सिलसिलाच सुरू झाला.
तिथंच डॉ. नॅश यांच्या समोर एक इसम येऊन उभा राहिला. उंचापुरा. डोक्‍यावर फेल्ट हॅट. काळा कोट. गूढ चेहरा. म्हणाला ः ""मी विल्यम पार्चर.''
तो अमेरिकेच्या संरक्षण खात्याचा माणूस होता. ""रशियनांनी हायड्रोजन बॉम्बच्या निर्मितीत आघाडी घेतली असून देशावर कुठल्याही क्षणी न भूतो न भविष्यति असं संकट कोसळू शकतं, डॉ. नॅश, तुमच्या मदतीची देशाला नितांत गरज आहे...'' पार्चर म्हणाला.
""देशातल्या वर्तमानपत्रांत, मासिकांत, जाहिरातफलकांवर कुठंही हे कोड असू शकतात. त्यांची उकल होणं गरजेचं आहे. तुम्ही कराल, डॉ. नॅश?'' पार्चरनं गळ घातली.
नॅश ""हो'' म्हणाले.
पेंटागॉनहून परत येताना त्यांना प्रिन्स्टन विद्यापीठातला रूममेट चार्ल्स आणि त्याची भाची मार्शी भेटली. गप्पा झाल्या; पण नॅश यांनी आपल्या आयुष्याचा हेतू बदललाय, हे त्यांना जाणवू दिलं नाही.
कोडलिपीचा अंदाज-अडाखा बांधून त्याचा अर्थ लावायचा, तो विशिष्ट ठिकाणच्या विशिष्ट टपालपेटीत नेऊन टाकायचा...कुणालाही कळता कामा नये, अगदी ऍलिशियालाही! डॉ. नॅश इरेला पडून कामाला लागले.
* * *

व्हायचं होतं ते घडत गेलं...
रशियन हस्तकांचा वावर त्यांना जाणवू लागला. कुणीतरी आपल्यावर अहोरात्र पाळत ठेवतंय, हे त्यांना जाणवत होतं. पार्चर त्यांच्या सुरक्षेसाठी काळजी घेत होता. त्याचा आधार वाटे. एकदा तर त्या दोघांवर भररस्त्यात गोळीबारही झाला. दोघंही वाचले इतकंच. "घरातून किंवा कचेरीतून फोनवर बोलू नका, रशियन गुप्तचरांनी मायक्रोफोन दडवलेले असू शकतात,' असं पार्चरनं सांगून ठेवलं होतं. अखेर न राहवून त्यांनी एकदा हे सगळं त्यांचा जिगरी दोस्त आणि माजी रूममेट चार्ल्सला सांगितलं होतं. तोही काळजीत पडला. चार्ल्स आणि मार्शी हे नॅश यांच्या विरंगुळ्याचं ठिकाण होतं.
ऍलिशियाला दरम्यान दिवस गेले. जॉनचं वागणं बदलतंय, तो काहीतरी लपवतोय, हे ऍलिशियाला कळलं होतं. तो घाबरल्यासारखा दिसे. कशाला घाबरत होता तो? तिनं त्याला दोन-चारदा छेडलंही.
तिला दिवस गेले असल्यानं आता ही कामगिरी थांबवू या, असंही डॉ. नॅशनं अखेर पार्चरला सुचवलं; पण त्यानं नकार दिला.
""तुम्हाला सांगितलं होतं मी डॉ. नॅश...भावनिक गुंतवणूक टाळा. तिच्याशी लग्न केलंत हेच चुकलं. मी तुम्हाला तेव्हा थांबवलं नाही; पण आता सांगतो...'' पार्चरला देशाच्या सुरक्षिततेपुढं सारंच फिजूल वाटत होतं. एक दिवस हार्वर्ड विद्यापीठात अतिथी व्याख्याता म्हणून गेलेले असताना डॉ. नॅश यांना तिघा हस्तकांनी घेरलं.
""डॉ. नॅश, मला तुमच्याशी थोडं बोलायला हवं. मी डॉ. रोझेन!'' ते म्हणाले. त्यांच्यासोबत दोन सहकारी होते. काही कळायच्या आत डॉ. नॅश यांनी त्याच्या थोबाडावर गुद्दा मारला आणि उडी मारून ते पळाले; पण डॉ. रोझेनच्या हस्तकांनी त्यांना पकडलं. एका रुग्णालयात आणलं. इंजेक्‍शन दिलं.
...जाग आली, तेव्हा त्याच्यासमोर चार्ल्स उदास चेहऱ्यानं बसला होता.
* * *

""चार्ल्स, मार्शी आणि विल्यम पार्चर हे तिघंही फक्‍त डॉ. नॅश यांच्या मनात अस्तित्वात आहेत. ती माणसं नाहीत...,'' डॉ. रोझेन अलिशियाला सांगत होते. याला पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया म्हणतात. वास्तव वाटावेत, असे भास या विकारात होतात. हा विकार वयानुसार वाढतसुद्धा जातो. हे ऐकून ऍलिशिया उन्मळून पडली. डॉ. नॅश यांची कपाटं, ड्रॉवर धुंडाळून तिनं ती विशिष्ट टपालपेटी शोधून काढली. डॉ. नॅश यांनी त्या पेटीत टाकलेले गुप्त संदेश सीलबंद अवस्थेत तिला सापडले. कुणीही ते नेले नव्हते की वाचलेही नव्हते.
पुढला काही काळ डॉ. नॅश यांनी एका मनोरुग्णालयात काढला.

- मध्ये दोनेक दशकं गेली. चार्ल्स, मार्शी, पार्चर या व्यक्‍तिरेखा खऱ्या नाहीत, यावर डॉ. नॅश यांचा विश्‍वास बसत गेला; तरीही त्या त्यांना दिसत होत्याच. इतकी वर्षं भेटत राहूनही त्यांचं वय कसं वाढत नाही, असा तर्कशुद्ध प्रश्‍न त्यांनाही पडला होता. अखेर या "मानसव्यक्‍तिरेखां'कडं दुर्लक्ष कसं करायचं, हे त्यांनी हळूहळू शिकून घेतलं. नोकरी सुटली होती. संशोधन तर संपलंच होतं. एक दिवस हिय्या करून त्यांनी आपलं प्रिय प्रिन्स्टन विद्यापीठ गाठलं. त्यांचाच सहाध्यायी मार्टिन हेन्सन आता गणित विभागाचा प्रमुख होता. "विद्यापीठाच्या ग्रंथालयात येऊन बसत जाऊ का?' असं डॉ. नॅश यांनी विचारलं.
""नुसतं कशाला बसतोस? जमलं तर शिकव की!'' मार्टिन मित्रत्वानं म्हणाला. हळूहळू डॉ. नॅश पुन्हा शिकवू लागले. मुलांचे लाडके होऊ लागले. त्यांच्या "नॅश इक्‍विलिब्रियम'चा बोलबाला होऊ लागला होता. गेम थिअरीची संकल्पना जोरात चर्चेत होती. प्रिन्स्टनच्या आवारातलं ते एक वलयांकित व्यक्‍तिमत्त्व ठरले.
साधारण 1994 च्या वसंतात एक दिवस त्यांच्या वर्गाबाहेर सद्‌गृहस्थ उभा होता. त्याला म्हणे, प्राध्यापक डॉ. नॅश यांच्याशी बोलायचं होतं. एका विद्यार्थिनीला जवळ बोलावून डॉ. नॅश यांनी विचारलं, ""हा माणूस तुलाही दिसतोय का? नाही...म्हणजे..अनोळखी माणसाशी बोलताना मी सुरवातीला साशंक असतो म्हणून विचारलं!''
""आय ऍम रिअल...मी थॉमस किंग!'' त्या मृदू गृहस्थानं ओळख दिली. किंचित अवघडून ते म्हणाले ः ""त्याचं असं आहे की यंदा नोबेल पुरस्कारासाठी तुमची निवड झाली आहे. तत्पूर्वी, तुम्हाला भेटून तुमची तब्येत जाणून घ्यावी म्हणून आलो होतो...''
""मी वेडा आहे म्हणून...ना?''
..बोलता बोलता दोघंही विद्यापीठाच्या कॅंटिनमध्ये गेले. देशोदेशीचे कितीतरी नामवंत प्राध्यापक, विचारवंत, संशोधक तिथं चहा पीत होते. विद्यार्थिदशेत डॉ. नॅश यांनी दरवाजाच्या बाहेरूनच हे कॅंटिन पाहिलं होतं...
थॉमस किंग आणि डॉ. नॅश दोघंच चहाचा आस्वाद घेत असताना एका प्राध्यापकानं येऊन आपलं पेन डॉ. नॅश यांच्यासमोर ठेवलं. मग दुसऱ्यानं...तिसऱ्यानं...चौथ्यानं...पाचवा...डॉ. नॅश यांचं चहाचं टेबल बघता बघता पेनांनी भरून गेलं.
* * *

सिल्विया नासर नावाच्या एका उझ्बेक-जर्मन वंशाच्या अमेरिकी पत्रकार-लेखिकेनं जॉन नॅश यांचं जीवनचरित्र लिहिलं होतं. "ब्यूटिफुल माइंड' याच शीर्षकाचं. त्यावर आधारित आहे हा चित्रपट. रसेल क्रो याचा अप्रतिम अभिनय ही तर या चित्रपटाची जमेची बाजू आहेच; पण रॉन हॉवर्डसारख्यानं कसबी दिग्दर्शकानं चित्रपटाच्या कथेत गणिताचा केलेला उपयोग केवळ थक्‍क करणारा आहे. गणितासारखा एखाद्याला भयचकित करणारा विषय इतका रोमॅंटिक करता येतो? गणिताची परिभाषा कानाला इतकी गोड वाटू शकते? नवलच वाटावं. जेम्स हॉर्नरचं म्युझिक तर इतकं संवादी आहे की तेही चक्‍क गोष्ट सांगतं. "हॉर्नरचं संगीत "टायटॅनिक'ला वेगळीच उंची देऊन गेलं होतं. जेनिफर कोनोलीनं
साकारलेली ऍलिशिया खूपच समंजस आहे. जेनिफरला तर या भूमिकेसाठी ऑस्करही मिळालं होतं. एड हॅरिसनं साकारलेला विल्यम पार्चर, पॉल बेटनीनं उभा केलेला चार्ल्स, डॉ. रोझेनच्या भूमिकेतले ख्रिस्तोफर प्लमर...सगळं काही दीर्घकाळासाठी स्मरणात राहणारं.
"ब्यूटिफुल माइंड" हा चित्रपट म्हणजे रसेल क्रो याच्या कारकीर्दीतला लखलखता मेरुमणी आहे. त्याहूनही अधिक तो पटकथालेखक अकिवा गोल्डमन यांच्या प्रतिभेचा आविष्कार आहे. मूळ जीवनकहाणीतल्या वास्तव घटनांना त्यांनी बगल दिली आहे हे खरंच; पण गणित ही भाषाही होऊ शकते, हे त्यांनीच दाखवून दिलं.
...हा चित्रपट संपल्यावर तुमचाही हात नकळत शर्टाच्या खिशाकडं किंवा पर्समध्ये जाईल. एखादं पेन पडद्यासमोर शिस्तीत ठेवून जावं असं वाटेल. तसं घडेल असं वाटणं हेसुद्धा डॉ. नॅश यांच्या गेम थिअरीला धरून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com