भिंत! (प्रवीण टोकेकर)

प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com
Sunday, 9 September 2018

गेल्या वर्षी "अमेझॉन'वर एक छोटासा चित्रपट येऊन गेला होता. नाव होतं ः द वॉल. अवघा 89 मिनिटांचा चित्रपट. एक पडकी भिंत या चित्रपटाची चक्‍क नायिका आहे.दोन राष्ट्रांच्या निरर्थक युद्धखुमखुमीची साक्षीदार बनलेली इराकच्या मरुभूमीतली निराधार भिंत!.
अमेरिकेत या चित्रपटाला समीक्षकांनी जाम हाणलं. तरीही असा चित्रपट निर्माण करण्यासाठी अपरंपार धाडस लागतं हे मात्र खरं. "राजा, तू चुकलास' हे निर्भीडपणे सांगण्यासाठी अंगात वेगळं पाणी असावं लागतं. दिग्दर्शक डग लिमन यांनी ते दाखवलं. केवळ या बेजोड सत्यदर्शनासाठी चित्रपटाला दाद द्यावी. अर्थात चित्रपटही कधीही चुकवू नये असाच आहे.

गेल्या वर्षी "अमेझॉन'वर एक छोटासा चित्रपट येऊन गेला होता. नाव होतं ः द वॉल. अवघा 89 मिनिटांचा चित्रपट. एक पडकी भिंत या चित्रपटाची चक्‍क नायिका आहे.दोन राष्ट्रांच्या निरर्थक युद्धखुमखुमीची साक्षीदार बनलेली इराकच्या मरुभूमीतली निराधार भिंत!.
अमेरिकेत या चित्रपटाला समीक्षकांनी जाम हाणलं. तरीही असा चित्रपट निर्माण करण्यासाठी अपरंपार धाडस लागतं हे मात्र खरं. "राजा, तू चुकलास' हे निर्भीडपणे सांगण्यासाठी अंगात वेगळं पाणी असावं लागतं. दिग्दर्शक डग लिमन यांनी ते दाखवलं. केवळ या बेजोड सत्यदर्शनासाठी चित्रपटाला दाद द्यावी. अर्थात चित्रपटही कधीही चुकवू नये असाच आहे.

अफाट वाळवंटात ही जीर्णशीर्ण भिंत एकटी उभी आहे. जुनी असावी. तिला इतर भिंतींचा शेजार नाही. चौघी जमल्या की कशा पदर खोचून अवघं घर सांभाळतात; पण ही एकटीच उरली. छताचा आधार नाही. दार-उंबऱ्याची गरज नाही. खांब-तुळयांना केव्हाच पाय फुटले. खिडक्‍यांचे डोळे गळून पडले आहेत. भिंतीसारखी भिंत; पण तिला कान नाहीत. ठार बहिरी भिंत. मृगजळाच्या भासमान थरथरीकडं निश्‍चलपणे पाहत जराजर्जर म्हातारीसारखी भिंत आपली उभी आहे.

या भिंतीनं काय काय पाहिलं असेल? या भिंतीच्या आड काय घडलं असेल? कुणास ठाऊक. शेवटचा धक्‍का कुठून येईल, याची वाट पाहत असलेली ही भिंत आत्ता या क्षणी दोन राष्ट्रांच्या निरर्थक युद्धखुमखुमीची साक्षीदार मात्र बनलेली आहे. इराकच्या मरुभूमीतली ही एक निराधार भिंत आहे.
गेल्या वर्षी "अमेझॉन'वर एक छोटासा चित्रपट येऊन गेला होता. नाव होतं ः द वॉल. "अमेझॉन'वर अजूनही पाहता येईल. अवघा 89 मिनिटांचा चित्रपट. यात मानवी व्यक्‍तिरेखा अडीच. म्हणजे दोन पडद्यावर आणि तिसरी निव्वळ आवाजाच्या रूपातली. तिला चेहराच नाही; पण एक पडकी भिंत या चित्रपटाची चक्‍क नायिका आहे.
अमेरिकेत या चित्रपटाला समीक्षकांनी जाम हाणलं. तरीही असा चित्रपट निर्माण करण्यासाठी अपरंपार धाडस लागतं हे मात्र खरं. "राजा, तू चुकलास' हे निर्भीडपणे सांगण्यासाठी अंगात वेगळं पाणी असावं लागतं. नुसता बोलाचा भात नव्हे! दिग्दर्शक डग लिमन यांनी ते दाखवलं. केवळ या बेजोड सत्यदर्शनासाठी चित्रपटाला दाद द्यावी. अर्थात चित्रपटही कधीही चुकवू नये असाच आहे.
* * *

"द वॉल' बघण्यापूर्वी थोडा इतिहास तपासून घेणं ठीक राहील. इतिहास म्हटलं खरं; पण हा काही इतिहास नाही. ते अजूनही वर्तमानच आहे. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश (ज्युनिअर) यांनी सन 2003 मध्ये इराकविरुद्ध सर्वंकष युद्ध पुकारलं. सद्दाम हुसेनला असेल त्या बिळातून हुडकून काढून फासावर चढवण्याची बुशसाहेबांची प्रतिज्ञा पूर्ण झाली. "नायजरनामक देशानं इराकला गुपचूप युरेनियम देऊ केल्यानं सद्दामसारखा हुकूमशहा शिरजोर झाला, रासायनिक अस्त्रांचा साठा करून जगाला तिसऱ्या महायुद्धात ढकलण्यासाठी सज्ज झाला,' अशी जोरदार हाकाटी जगभर झाली होती. प्रत्यक्षात असं काही निष्पन्न झालंच नाही. अमेरिकेच्या अफाट ताकदीनिशी तुटून पडलेल्या दोस्तांच्या फौजांसमोर इराक टिकला नाही. सारं काही थंड झालं. उरल्या त्या फक्‍त बॉम्बवर्षावात उद्‌ध्वस्त झालेल्या इमारती. किडुकमिडुक संसार पुन्हा उभा करू पाहणारी इराकी जनता. आणि अधूनमधून दोस्तांच्या फौजफाट्याच्या नाकात दम आणणारे इराकी बंडखोर...बस्स.
ही गोष्ट साधारणत: 2004-5 ची. जुबा हे नाव त्या काळात बरंच फेमस झालं होतं. इंटरनेटवर या जुबाचा बोलबाला होता. जुबा हा इराकी नेमबाज होता म्हणे. त्याला कधीही कुणीही पाहिलं नाही. त्याचा एकही फोटो नाही. लांबवरचा अमेरिकी सैनिक हातातल्या बंदुकीनं लीलया उडवणाऱ्या या जुबाचे कितीतरी व्हिडिओ इंटरनेटवर येत होते. त्याचा एक व्हिडिओ तर आत्तासुद्धा बघायला मिळतो. त्यात तो म्हणतो : "मि. जॉर्ज बुशला मी एक गिफ्ट पाठवतो आहे. माझ्याकडं नऊ गोळ्या आहेत. मी नऊ अमेरिकी सैनिक उडवणार...अल्लाहू अकबर!' असं म्हणून तो कुणी एक अज्ञात नेमबाज अचूक सावज टिपत जातो...अंगावर काटा आणणारं हे दृश्‍य खुद्द जुबानंच कॅमेऱ्यात टिपलेलं.
कुणी म्हणायचं, जुबा ही व्यक्‍ती नाही, निव्वळ अफवा आहे. कुणी म्हणायचं, जुबा एक नाही, अनेक आहेत. कुणाच्या मते, जुबा हा अमेरिकी मरीन्स दलातून शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन परागंदा झालेला आणि "अल्‌ कायदा'ला मिळालेला पट्टीचा नेमबाज आहे. काही जणांच्या मते तर तो एक माजी ऑलिंपिकपदक विजेता नेमबाज होता.
...तर अशा या जुबानं किमान 37 अमेरिकी सैनिक टिपले. अमेरिकी सैनिकांनी तर जुबाची दहशतच घेतली होती; पण तेवढ्यात बुशसाहेबांनी जाहीर करून टाकलं की, इराकचा प्रतिकार संपुष्टात आला आहे. वॉर इज ओव्हर!
प्रत्यक्षात चित्र वेगळं होतं. इराकची पडझड सावरण्यासाठी अमेरिका पैसे ओतू लागली होती. बांधकामं, जलवाहिन्यांची निर्मिती, बंधारे पुन्हा बांधून देणं वगैरे कामं सुरू होती. अमेरिकी कंपन्यांकडेच कंत्राटं होती, आणि इस्लामी बंडखोर डोकं वर काढू लागले होते.
अशाच इराकी वाळवंटात पाइपलाइनचं काम सुरू असताना, त्या साइटवरची आठ माणसं (यात अर्थात अमेरिकी सैनिकही होते...) कुण्या अज्ञात नेमबाजानं टिपून टिपून मारून टाकली होती. तिथं जाऊन परिस्थिती बघून येण्याची जबाबदारी स्टाफ सार्जंट शेन मॅथ्यूज आणि सार्जंट ऍलन आयझॅक या दोघांवर सोपवण्यात आली होती. सार्जंट शेन हा नेमबाज होता आणि आयझॅक त्याचा स्पॉटर. म्हणजे दुर्बिणीतून बघून सावज किती जवळ आहे, नेम कुठं धरावा हे सांगणारा. रेडिओवरून आपल्या पलटणीशी संपर्कात राहण्याचं कामही त्याचंच असतं.
""किती वेळ झाला रे? अठराएक तास झाले?'' बंदुकीच्या दुर्बिणीला नजर खिळवून कंटाळलेल्या शेननं आपल्या जोडीदाराला विचारलं.
""वीस झाले वीस!'' तो म्हणाला.
""काहीही हालचाल नाही. मेलेला उंदीर नाही तिथं च्यायला. आपण इथं उगाच ** तापवत बसलोय. चल, तिकडं जाऊन बघून येऊ,'' शेन उठत म्हणाला. दूरवरचं दृश्‍य त्यांनी हजारदा बघितलं होतं. वाळवंटात पडलेली आठ कलेवरं. तीन-चार निकामी वाहनं. काही अवजारं. भंगाराचे ढिगारे आणि अजस्र पाइपलाइनलगत उभी असलेली एकुलती एक पडकी भिंत...
""कुणी आहेसं दिसत नाही; पण एखादा पट्टीचा नेमबाज असूही शकेल तिथं दडलेला,'' आयझॅक दुर्बिणीला डोळा लावत म्हणाला.
""एखादा हाजी? हॅ:!'' असं म्हणून सार्जंट शेन पाइपलाइनच्या दिशेनं चालू लागला. ऊन्ह मी म्हणत होतं. धुळीच्या छोट्या छोट्या वावटळी त्या वाळवंटाचं रूप आणखी उग्र करत होत्या. पाइपलाइनच्या दिशेनं थोडं पुढं सार्जंट शेन गेला आणि कुठून तरी सणाणत आलेली गोळी त्याच्या छाताडात घुसली. दुसरी पायात. जिवाच्या आकांतानं ओरडत तो खाली कोसळला. त्याच्या मदतीसाठी धावलेल्या सार्जंट आयझॅकनं बंदूक ताणली; पण गोळी येतेय कुठून? इतक्‍यात आणखी एका गोळीनं त्याचाच उजवा गुडघा नारळासारखा फोडला. शिव्याशाप घालत तो खुरडत खुरडत पलीकडच्या पडक्‍या भिंतीच्या पलीकडं पोचला. पन्नासेक फुटांवर सार्जंट शेन निश्‍चेष्ट पडला होता.
प्रचंड हादरलेल्या आयझॅकनं त्याला हाका घालून पाहिल्या. प्रतिसाद शून्य. थोड्या वेळानं मॅथ्यूजनं हालचाल केली; पण तो खूपच घायाळ होता. किंचित जरी हालचाल केली तरी आणखी एक गोळी येणार हे नक्‍की. भिंतीच्या आडोशाला आयझॅक. पन्नास फुटांवर उघड्यावर शेन मॅथ्यूजची शुद्ध हरपलेली. दूर कुठं तरी शत्रू दडून बसला आहे. कोण लेकाचा म्हणतोय युद्ध संपलं म्हणून?
* * *

सार्जंट आयझॅकचा गुडघा साफ गेला होता. रक्‍त भळभळून आलं होतं. आतल्या मांसपेशी, स्नायूतंतू तुटून फाटून बाहेर डोकावत होते. वेदनेनं आयझॅकला वेड लागायची पाळी आली. बॅकपॅकमधल्या मेडिकल बॉक्‍समधलं मॉर्फिन काढून त्यानं जखमेवर ओतलं. बॅंडेजचे बोळे खोल जखमेत खोचले. रडत-भेकत तो त्या भिंतीपलीकडच्या नालायकाला शिव्या घालत होता ः "साल्या समोर तर ये. नाही तुझा भेजा अस्मानात उडवला तर नावाचा नाही, ***!' त्याचा आरडाओरडा ऐकायला आसमंतात बहुधा कोणीही नव्हतं.
त्यानं रेडिओशी खटपट करून पाहिली. नुसतीच अथांग खरखर...एका ठिकाणी तुटक संपर्क लागला.
नेमबाजानं त्याची पाण्याची बाटलीही उडवलेली होती. चला, खेळ खल्लास. असा कितीतरी वेळ गेला. कडक ऊन्ह, गुडघ्यातल्या वेदना यांनी आयझॅकला ग्लानी आली.
""लिमा चार्ली, कम इन...लिमा चार्ली कम इन...टेल युअर पोझिशन...'' कानातल्या मायक्रोफोनमध्ये खरखरयुक्‍त चौकशी ऐकू येत असतानाच आयझॅकला जाग आली.
""ब्रेकर ब्रेकर स्पार्टन 33...आम्ही संकटात आहोत, ओव्हर. एक सोल्जर गमावला आहे ओव्हर. तत्काळ वैद्यकीय पथक पाठवा. ओव्हर.'' तो रेडिओत बडबडला.
""लिमा चार्ली...नेमकं लोकेशन सांगा...ओव्हर.'' रेडिओतून आवाज आला. हुश्‍श! झाला संपर्क. आता पंधरा मिनिटांत हेलिकॉप्टर्स येतील. घरी जायचं!
""ओह, ग्रिड व्हिस्की हॉटेल 7203...पण तुम्ही माझ्या लोकल रेडिओवर कसे? जवळ आहात का कुठं?'' शेननं चौकशी केली.
""लिमा चार्ली...तुमची ओळख पटवा. ओव्हर,'' आवाज आला.
""ओके, मी सार्जंट ऍलन आयझॅक! 51 ओडीए...सार्जंट शेन मॅथ्यूज इज परहॅप्स केआयए (किल्ड्‌ इन ऍक्‍शन) ओव्हर. वैद्यकीय मदत ताबडतोब पाठवा. ओव्हर!
""तुमचा चॅलेंज कोड कळवा. ओव्हर!'' रेडिओतून झालेली विचारणा ऐकून अचानक आयझॅक चमकला. त्याचा हेल अमेरिकी नव्हता.
""तुम्ही कोण?'' आयझॅक सावध झाला.
""धिस इज कॅप्टन ओटिस सिमन्स!'' पलीकडून ओळख आली.
...क्षणार्धात त्याच्या ध्यानात आलं की आपला रेडिओ संपर्क "उचलला' गेला आहे. खुद्द शत्रूच आपल्याशी बोलतो आहे...ओह गॉड!
* * *

""तू कोण आहेस रे, साल्या!'' आयझॅकनं तुफानी शिव्या घातल्या.
""तुझा जोडीदार मेला काय रे? की घालू दुसरी गोळी? मी शब्दांच्या मागं लपलोय, तू भिंतीमागं...वी आर सेम...ओके?'' पलीकडल्या आवाजानं इरादा उघड केला.
""तू मर रे...दळिद्य्रा...काय हवंय तुला?''
""मला फक्‍त तुझ्याशी बोलायचंय...तुला बायको आहे? मुलं?''
""चूप रे ***!''
""तुझ्यासारखाच मीही एक सैनिक आहे!''
""फरक आहे...मी सैनिक आहे, तू टेररिस्ट!''
""अच्छा? दुसऱ्याच्या देशात घुसलायस तू! दडून बसलायस तू! आणि मी टेररिस्ट? भले, हा काय न्याय झाला? माझ्या जागेवरून तर तू मला डिट्टो टेररिस्ट दिसतोस, आइज...तुला आइज म्हटलं तर चालेल ना?''
""नाही..!''
...जो कुणी पलीकडून बोलतोय तो महापाताळयंत्री असावा. त्याच्या सापळ्यात आपण स्वत:हून चालत आलो. त्यानं आता रेडिओ हायजॅक केलाय. त्याच्या जोरावर तो या सापळ्यात आपल्या अन्य सैनिकांनाही बोलावतोय. त्याचा नेम कमालीचा चांगला आहे. गाठ जोरदार दुश्‍मनाशी आहे...आयझॅकनं अर्धवट ग्लानीत विचार केला.
""तू बोलला नाहीस तर तुझ्या जोडीदाराचं डोकं उडवणार मी!''
...दुश्‍मनाच्या बोलजाळ्यात आपण हळूहळू गुंतत चाललोय, हे आयझॅकला कळत होतं; पण इलाज नव्हता. मॅथ्यूजला वाचवायचं तर याच्याशी बोलावं लागणारच. शिवाय, त्याच्या हातात परिस्थितीच्या नाड्या आहेत. आपण हे असे पडक्‍या भिंतीमागं दडलो असलो तरी त्याला बहुधा सगळं दिसतंय...
""तू काय माझ्या भिंतीभोवती फेऱ्या घालतोयस का?...समोर ये ना!'' आयझॅक भडकला.
""कमाल आहे...तुझी भिंत? अरे, याच आमच्या भिंती उडवायला तुम्ही लाखोंच्या संख्येनं आलात ना? आता ती तुमची भिंत झाली?'' दुश्‍मनानं रेडिओतून टोमणा हाणला.
""तुला काय हवंय माझ्याकडून?''
""काय देणार तू मला? फक्‍त बोल माझ्याशी...तुझी भिंत म्हणालास, पण ती कसली भिंती आहे माहीत आहे तुला? तुम्ही अमेरिकन्स इथं येण्यापूर्वी शाळा होती इथं. त्या शाळेची ही भिंत आहे....तू आत्ता इस्लामच्या सावलीत जगू पाहातोयस, आयझॅक!''
...हाच तो जुबा असणार. नक्‍कीच. ज्याला कुणीही पाहिलेलं नाही, तो जुबा! अमेरिकन सैन्याचा कर्दनकाळ. त्याला बोलत ठेवत आयझॅकनं भिंतीचा चिरा काढून भोक पाडलं. त्यातून मोडकी दुर्बिणी घुसवून "पलीकडं' पाहून घेतलं. दूरच्या एका भंगार ढिगाऱ्यात तो दडून बसल्याची त्याची खात्री पटली.
""यू ब्लडी सायकॉटिक किलर...'' आयझॅकनं शिवी हासडली.
दोन शत्रू पक्षातल्या दोघा सोल्जर्सचं हे संभाषण एकमेकांना शिव्या घालत आणखीच गहन होत गेलं. अमेरिकन हेच खरे टेररिस्ट कसे आहेत, हे तो अज्ञात सैनिक सतत पटवून देत होता. अमेरिकन कवी एडगर ऍलन पो याच्या कवितेच्या ओळीही ऐकवत होता. शिकलेला असावा! कविता, शेक्‍सपीअर, कुराणातलं तत्त्वज्ञान, इस्लामची उदात्त परंपरा...तो बोलत होता, त्यातलं सगळं फौजी आयझॅकच्या डोक्‍यावरून जात होतं. अर्धग्लानी, भय, निराधार भावना यांच्याशी लढत आयझॅक बोलत राहिला...
त्याला आधार होता फक्‍त एका पडक्‍या भिंतीचा.
* * *

- मॅथ्यूजला शुद्ध आली. त्यानं धुळीच्या वादळाचा फायदा घेत हळूच आपली जवळच पडलेली रायफल उचलली. नेम धरला; पण तेवढ्यात सणसणत आलेल्या बुलेटनं त्याचा उरलासुरला जीवही संपवला. आयझॅकनं मग निकरानं शेवटचा हल्ला करायचं ठरवलं. लोकल रेडिओची फ्रिक्‍वेन्सी जुळवून शत्रू आयझॅकशी गप्पा मारत होता आणि अमेरिकन तळावरच्या लोकांनाही यायला सांगत होता. रेडिओ संभाषणातून आयझॅकला हे सगळं कळत होतं. दूरवर हेलिकॉप्टर्सची घरघर ऐकू आली, तेव्हा आयझॅकनं सारी शक्‍ती पणाला लावून ती अशक्‍त भिंत धक्‍का देऊन पाडली. रायफलीत उरलेली एकुलती एक गोळी अचूक त्या भंगाराच्या ढिगाऱ्याच्या दिशेनं सोडली. प्रचंड धूळ उडाली. हेलिकॉप्टर तिथं पोचलं. आयझॅक घरी निघाला होता...
पण आयझॅक खरंच घरी पोचला? नाही. आयझॅक घरी नाहीच पोचला. इथंच तर मेख आहे. या चित्रपटाचं खरं प्रयोजन शेवटच्या अडीच मिनिटांमध्ये दडलं आहे. ते पडद्यावर बघूनच सुन्न व्हायचं.
* * *

"द वॉल' हा चित्रपट युद्धखोर प्रवृत्तींवर कोरडे ओढतो. त्यात अमेरिकाही आलीच. मानवी जीवितांना कस्पटासमान मानून अमानुष नरसंहार करणाऱ्या कुठल्याही शक्‍तीला "द वॉल' कडकडीत शिव्या घालतो. ड्‌वेन वोरेल नामक चित्रपटलेखक चीनमध्ये चित्रपटकला शिकवायला काही काळ राहिले होते. तिथं त्यांना ही कहाणी सुचली. त्यांनी ती थेट पटकथेच्या रूपबंधातच लिहून ठेवली. ही पटकथा चित्रनिर्मात्यांच्या वर्तुळात दोनेक वर्षं गाजत होती; पण कुणी उचलली मात्र नाही. अखेर "अमेझॉन स्टुडिओज्‌'नं ते धाडस दाखवलं. जेमतेम दोन पात्रं आणि एक आवाजाच्या रूपातली व्यक्‍तिरेखा यांच्या पलीकडं या चित्रपटात मानवी असं काहीही नाही. डग लिमन हे नाणावलेले दिग्दर्शक या पटकथेच्या प्रेमातच पडले होते. "बोर्न आयडेंटिटी', "मि. अँड मिसेस स्मिथ', "फेअर गेम', "एज ऑफ टुमॉरो' सारखे गल्लेबाज चित्रपट देणाऱ्या लिमनसारख्या तरुण दिग्दर्शकाला "द वॉल'मधला परखड विचार भावला. जॉन सेना आणि ऍरन टेलर-जॉन्सन या दोन अभिनेत्यांना घेऊन लिमन यांनी "द वॉल' अवघ्या पाचेक आठवड्यांत पुरा केला. अर्थात युद्धभूमीवरच्या हालचाली, नेमबाजी, त्यातली परिभाषा यात नेमकेपणा यावा म्हणून अमेरिकेचे एकेकाळी गाजलेले स्नायपर निकलस आयर्विंग यांना सल्लागार म्हणून हाताशी घेतलं.
चित्रपटात अमेरिकेच्या युद्धखोरीवर मर्मभेदी टीका आहे, हे आधी सांगितलंच. निष्फळ युद्धात सारं जग भरडणाऱ्या अमेरिकी धोरणाची इथं अक्षरश: वासलात लावण्यात आली आहे. चित्रपटाचा शेवट तर आपल्या "सैराट'च्या अखेरच्या दृश्‍यासारखा अंगावरच येतो. तरीही अमेरिकेतल्या राष्ट्रप्रेमींनी लिमन आणि कंपनीवर सडकून टीका केली. "हा चित्रपट काहीच्या काहीच बहकलेला आहे. दोन सोल्जर्स एडगर ऍलन पो आणि शेक्‍सपीअरबद्‌दल बोलतात, हाच एक मोठा विनोद आहे', अशी शेरेबाजी झाली. चित्रपटाच्या हेतूबद्दलही शंका घेतल्या गेल्या. चित्रपट तांत्रिकदृष्ट्या अप्रतिमच आहे. जॉन सेनानं मॅथ्यूजची भूमिका केली असल्यानं चित्रपटातला बव्हंशी वेळ त्याला प्रेतासारखं पडून राहावं लागलंय; पण ऍरन टेलर-जॉन्सनचा आयझॅक कमालीचा प्रभावी आहे. लइथ नकली नावाच्या अभिनेत्यानं अज्ञात मारेकरी जुबा याचा आवाज म्हणून चित्रपट अक्षरश: "खाऊन' टाकला आहे.
...चित्रपट संपताना उजळलेला पडदा विझतो. समोर उभी राहते एक मौन भिंत. तिच्या पलीकडला बिनचेहऱ्याचा "माणुसकीचा खरा शत्रू' दिसल्यासारखं वाटलं, तर खुशाल समजा, चित्रपटानं आपलं काम केलं आहे. जाता जाता सहज एक शेर आठवला. काबिल-ए-गौर आहे. ऐकाच...
शोर बरपा है खाना-ए-दिल में कोई दीवारसी गिरी है अभी...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pravin tokekar write article in saptarang