या डोळ्यांची दोन पाखरे... (प्रवीण टोकेकर)

pravin tokekar write article in saptarang
pravin tokekar write article in saptarang

"सायको' हा चित्रपट हिचकॉक यांच्या कारकीर्दीचा मेरुमणी मानला जातो. सन 1960 मध्ये आलेल्या या चित्रपटानं प्रेक्षक थरारून गेले होते. आता हा चित्रपट पाहताना तितकं काही वाटत नाही; पण 1960 च्या दशकात थिएटराबाहेर रुग्णवाहिका लागत म्हणे. एका सत्यकथेवर आधारित कादंबरीवरून हिचकॉक यांनी "सायको' निर्माण केला होता...

सस्पेन्स आणि सरप्राइज यांत कधी गल्लत करू नका...दोन्हींत बराच फरक असतो.
उदाहरणार्थ ः आपण असे या मेजाशी गप्पा मारत बसलोय. अशाच इकडच्या तिकडच्या बकवास गप्पा. मेजाखाली कुणीतरी बॉम्ब ठेवून गेलंय; पण आपल्याला काही माहीत नाही. कुणालाच माहीत नाही. आणि काही क्षणातच...धुडुम्‌! खेळ खल्लास. पंधरा सेकंदांत सगळं संपलं. हे झालं सरप्राइज...धक्‍कातंत्र. किंवा-
आपण असे या मेजाशी गप्पा मारत बसलोय. अशाच इकडच्या तिकडच्या बकवास गप्पा. मेजाखाली कुणीतरी बॉम्ब ठेवून गेलंय, हे फक्‍त आपल्या दोघांना माहीत नाही. समोर खुर्चीत बसलेल्या पब्लिकला सगळं माहीत आहे. भिंतीवर घड्याळ दिसतंय. त्यात पाऊण वाजलाय. बरोब्बर एक वाजता बॉम्ब फुटणार आहे. टिक टिक टिक टिक...खुर्चीतलं पब्लिक अनावर होतंय. "अरे, हे काय तिथं फालतू बडबडत बसलेत. उठा. बॉम्ब फुटेल आता...' असं त्यांना सांगायचं असतं; पण काही उपयोग होत नाही. आणखी काही मिनिटांतच...धुडुम! खेळ खल्लास. पंधरा मिनिटात सगळं संपलं. हे झालं पंधरा मिनिटांचं रहस्य...सस्पेन्स.
म्हणून माझ्या मित्रांनो, कायम लक्षात ठेवा, रहस्यकथेतला सर्वात महत्त्वाचा साक्षीदार नेहमी वाचक किंवा प्रेक्षकच असतो.
-सर आल्फ्रेड जोसेफ हिचकॉक (1899-1980)
* * *

समजा, रात्री घरी यायला तुम्हाला उशीर झालाय. गल्लीच्या तोंडाशी एरवी कुत्र्यांचं कोंडाळं बसलेलं असतं. रात्रभर भुंकून भुंकून हैराण करणारी ही कुत्री आज गेली कुठं? सर्वत्र सामसूम आहे. गल्लीतले दिवेही गेले आहेत. बोंबला. तुम्ही मोबाइल फोन काढून त्याच्या बॅटरीचा दिवा ऑन करता. त्या अपुऱ्या प्रकाशात पावलं टाकत सावधपणे जाताना अचानक पाठीमागून कुणीतरी "शुक शुक' करतं....
...मध्यरात्री पुढल्या खोलीत कसली तरी खुडबूड ऐकून बायको जागी झाली. तिनं तुम्हाला उठवलं, ""बघा ना...'' मग तुम्ही जीव गोळा करून ओरडता, "कोणेय?' एक खसफस ऐकू येते. कुणीही बोलत नाही. "उंदीर असेल!' तुम्ही सोप्पं उत्तर काढता.; पण मनातून तुम्हीसुद्धा भेदरलेले असता...आणि त्या तशा भेदरलेल्या मनानंच तुम्हाला हे उत्तर सुचवलंय...जाऊ दे. अशी शेकडो उदाहरणं देता येतील. भय ही माणसाची आदिम भावना आहे. अगदी मूळ पिंडात सामावलेली. भय ही भावना नसती तर ही दुनिया किती अमानुष असती! जरा विचार करा... प्राणिमात्रांच्या बचावयंत्रणेचाच तो भाग आहे.

पण माणूस नावाचा प्रगल्भ मेंदूवाला प्राणी भय ही भावना मनोरंजनासाठीही वापरतो. त्यातलं अग्रणी नाव सर आल्फ्रेड हिचकॉक. हे ब्रिटिश गृहस्थ आजही "भयसम्राट' याच उपाधीनं स्मरले जातात. कारण, हिचकॉक ही एक व्यक्‍ती उरली नसून तो एक "रूपबंध' ठरला आहे. रुपेरी पडद्यावरल्या रहस्यपटांची ही गंगोत्रीच म्हणावी लागेल. ""दु:स्वप्नातून जागं झाल्यावर सुटकेची सुखद भावना घर करते. ती सुखद भावना प्रेक्षकांना दिली पाहिजे,' असं हिचकॉकसाहेब म्हणत. तसं तर ते बरंच काही म्हणत. "घसादुखीवरचा सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे गळा कापणं!' असंही ते एका ठिकाणी म्हणून गेले आहेत. हा माणूस स्वत:च एक गूढ होता का?
इंग्लिश चित्रपटांच्या विश्‍वात आजवर अनेक भयपट निर्माण झाले. रहस्यपटांची तर डोंगराएवढी चळत लागेल. संगीत आणि ग्राफिक तंत्रज्ञानाच्या जोरावर हल्ली तर भयपटांनी बराच पुढचा पल्ला मारला आहे. हिचकॉक यांच्या काळात संगीत होतं; पण ग्राफिक्‍सची मदत त्यांना नव्हती. त्यांचं बलस्थान होतं दमदार, तपशिलात लिहिलेली संहिता आणि गूढ व्यक्‍तिरेखांचं विलक्षण रसायन. हिचकॉकसाहेब भुताखेतांचे चित्रपट विशेष करत नव्हते कधी. त्यांना मानवी भीतीबद्दल काही सांगायचं असे. खून, लैंगिक विकृतांची विलसितं, माणसाच्या मनात साचणारं गलिच्छ भावनांचं दुर्गंधयुक्‍त डबकं, अपराधाचं शरीरशास्त्र या असल्या काळ्या-करड्या भावविश्वात त्यांना अधिक गम्य होतं. भावविश्व कसलं, हे तर अभावविश्व...पण तरीही ते एक वास्तव आहेच. साल्वादोर दालीच्या चित्रांसारख्या हिचकॉकच्या चित्रचौकटीही मनात घर करून राहत. अजूनही हा अनुभव येतोच.

"सायको' हा चित्रपट हिचकॉक यांच्या कारकीर्दीचा मेरुमणी मानला जातो. सन 1960 मध्ये आलेल्या या चित्रपटानं प्रेक्षक थरारून गेले होते. आता हा चित्रपट पाहताना तितकं काही वाटत नाही; पण 1960 च्या दशकात थिएटराबाहेर रुग्णवाहिका लागत म्हणे. एका सत्यकथेवर आधारित कादंबरीवरून हिचकॉक यांनी "सायको' निर्माण केला. रॉबर्ट ब्लॉक नावाचे एक रहस्यलेखक होते. त्यांनीच ही कहाणी लिहिली होती. या कहाणीवर चित्रपट करायचं ठरवल्यावर हिचकॉक यांनी आधी बाजारात असलेल्या या पुस्तकाच्या सर्वच्या सर्व प्रती खरेदी करून टाकल्या. पब्लिकला सस्पेन्स कळला तर काय उपयोग? म्हणून! "सायको'ची निर्मिती करताना हिचकॉकसाहेब साठीला पोचले होते. तब्येतही बरी नसायची. त्यांची पत्नी, सखी, सहकारिणी एल्मा हिच्या साथीनं त्यांनी जिद्दीनं "हिचकॉकयुग' निर्माण केलं होतं. "सुप्रसिद्ध "हिचकॉक टच' हा नेहमी चार हातांचा असे...त्यातले दोन हात कायम एल्माचे असत,' असं त्यांच्या एका चरित्रकारानं म्हटलं आहे. "सायको'ची निर्मिती याच विषयाला वाहिलेला "हिचकॉक' हा चित्रपटही काही वर्षांपूर्वी येऊन गेला होता. सर अँथनी हॉपकिन्स आणि हेलन मिरेन या अद्वितीय जोडगोळीनं यात साकारलेले सर हिचकॉक आणि एल्माच्या व्यक्‍तिरेखा ग्रेटच आहेत; पण बायोपिकच्या वळणानं जाणारा तो चित्रपट आपला आजचा विषय नाही. आज आपण "सायको"मध्ये गुंतू या.

"सायको'पेक्षा दमदार चित्रपट आपण पाहिलेले असू शकतात; पण "सायको'मधली कलात्मकता आणि साल्वादोर दालीच्या चित्रांमध्येच सापडाव्यात अशा गूढ चौकटी बघितल्या की हिचकॉक ही चीज काय होती, हे कळतं...कॅमेऱ्याची हालचालही प्रेक्षकांचा डोळा गृहीत धरून ठरवण्याची "हिचकॉकी आयडिया' इथं आपल्याला चाट पाडते. चित्रपटाची मांडणी किती गुंग करणारी असू शकते, याचं प्रत्यंतर "सायको' हा चित्रपट बघताना येतं. सन 1960 मध्ये आलेल्या या चित्रपटानं चिक्‍कार रेकॉर्ड मोडले. अफाट धंदा केला. "हिचकॉकरी'चं तंत्र हे अभ्यासाचा विषय मानलं जाऊ लागलं. "डरना जरूरी है' हा वैधानिक इशारा देणारा "सायको' चुकवणं "नॉर्मल' मानू नये!
* * *

ऍरिझोनातल्या फिनिक्‍स शहरातली गोष्ट आहे. मॅरियन क्रेन ही युवती एका रिअल इस्टेट एजंटाच्या झक्‍क कचेरीत कारकुनी करायची. उरलेल्या वेळेत सॅम लुमीस नावाच्या आपल्या प्रियकरासोबत रमून गेलेली असायची. भराभरा पैसे कमवावेत, सॅमशी लग्न करून संसारात बुडावं अशी तिची माफक अपेक्षा होती आयुष्याकडून; पण सॅमला तरी धड नोकरी कुठं होती? दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत सॅमबरोबर कुठल्या तरी हॉटेलच्या खोलीत तासाभराचा प्रणय आटोपून पुन्हा ऑफिस गाठण्याचा दिनक्रम तिला नकोसा झाला होता; पण सॅमकडं लग्नासाठीही पैसे नव्हते. "अशा कफल्लक अवस्थेत तुझ्याशी लग्न कसं करू?' असं तो म्हणायचा. त्या दिवशीही तो तसंच म्हणाला.

काहीशा अनिच्छेनंच तिनं त्याला "बाय' म्हणून पुन्हा ऑफिस गाठलं. तिचं डोकं जाम दुखत होतं. ऑफिसमध्ये कुणी तालेवार गिऱ्हाइक आलं होतं बहुधा. रिअल इस्टेट एजन्सीच्या मालकानं मॅरियनसमोर एक पुडकं टाकलं.
""चाळीस हजार डॉलर्स आहेत. कॅश. या गिऱ्हाइकाला रोखीतच व्यवहार करायचा आहे. आज शुक्रवार...ताबडतोब बॅंकेत जा, हे पैसे आपल्या खात्यात जमा कर. सोमवारी मी समोरच्या पार्टीला चेक देऊन टाकीन!'' मालक म्हणाला.
""माझं डोकं दुखतंय, सर'' मॅरियन कपाळ चेपत म्हणाली.
""ओह...मग बॅंकेतलं काम आटोपून सरळ घरीच जा. आराम कर...'' मालक प्रेमळ म्हातारा होता. मॅरियननं पर्समध्ये पुडकं टाकलं आणि पडत्या फळाची आज्ञा स्वीकारून ती निघाली. मध्येच तिला काय वाटलं कोण जाणे. ती घरी गेली. कपडे बदलले आणि पुन्हा गाडीत बसली.
ड्रायव्हिंग करताना डोकं भणभणत होतं. लक्ष सारखं शेजारच्या सीटवर ठेवलेल्या फुगलेल्या पर्सकडं जात होतं. चाळीस हजार डॉलर्स! साधी रक्‍कम नाही...एवढ्या रकमेत सॅमसोबत कुठंही जाऊन सेटल होऊ शकू. कटकटच जाईल कायमची. तिनं गाडी फेअरवेलकडं (कॅलिफोर्निया) जाणाऱ्या महामार्गाकडं वळवली.
विचारांच्या या भोवऱ्यात तिची गाडी जुन्या हायवेला कधी लागली तिला कळलंच नाही. तुफान पावसाच्या झडीत काळोख मिसळत होता. तिनं गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि तिला झोपच लागली...
* * *

- मॅम, ही झोपायची जागा नाही. एखादं मोटेल का नाही बघत?'' मोटारीच्या काचेवर टकटक करून तिला उठवणारा पोलिस विचारत होता. मॅरियन खडबडून जागी झाली. थातुरमातुर उत्तरं देऊन तिनं पोलिसाला फुटवलं; पण त्याचाही संशय नाही म्हटलं तरी बळावलाच. त्यानं तिचा पाठलाग सुरू केला.
बेकर्सफील्ड गावात महामार्गालाच एक मोटारींचा डीलर आहे हे तिला आठवलं. तिनं कार तिथं वळवली.
ऍरिझोनाची नंबरप्लेट असलेली जुनी फोर्ड गाडी बदलून तिला कॅलिफोर्नियाची नंबरप्लेट असलेली जरा बरी गाडी मिळेल का असं विचारायचं होतं. तशी तिला मिळालीही. वर सातशे डॉलर्स फक्‍त द्यावे लागले.
...अंधार पडून बराच वेळ झाला होता. उजवीकडं "बेट्‌स मोटेल'ची पाटी दिसली. मोटेलमध्ये रात्र काढून सकाळी फेअरवेलमध्ये सॅमला गाठावं, असा तिचा विचार होता.
""मी नॉर्मन बेट्‌स...हे आमचंच मोटेल आहे. राहणार आहात ना?'' उत्सुक चेहऱ्याचा एक हसरा तरुण नम्रपणे समोर येऊन उभा राहिला. तिनं मान डोलावली. त्यानं लगबगीनं तिची बॅग काढून घेतली. नॉर्मन बेट्‌स खूपच सुसंस्कृत तरुण होता. शिष्टाचार पाळत होता.
""इथून पुढं जवळच एक उपाहारगृह आहे. तिथं जेवून या पाहिजे तर...आमच्याकडं मुदपाकखाना नाही!'' तो ओशाळून म्हणाला ः "" त्याचं काय आहे. इथं मी आणि माझी म्हातारी आई असे दोघंच राहतो. शिवाय गिऱ्हाईकही कमी असतं या जुन्या हायवेला. पलीकडंच माझं घर आहे...''
...मोटेलच्या मागच्या बाजूला एक दोनमजली जुनं घर होतं. छोट्या खोल्या असाव्यात. जुन्या धाटणीच्या. खिडक्‍याही छोट्या छोट्या. पडद्यामागं एक बाई उभी दिसली...
""माझ्या घरी जेवाल का? सॅंडविच आणि दूध...एवढंच मिळेल पण...चालेल का?'' तो म्हणाला. धावत घराकडं गेला.
""मूर्ख कुठला! अपरात्री असं परक्‍या पोरीशी बोलताना लाज नाही वाटत का? कोण आहे ती? हे कसले धंदे सुचताहेत तुला?...काय? घरात जेवायला? कठीण आहे तुझं...अजिबात चालणार नाही मला. तिला जायचं तिथं जाऊ दे...नको नको...'' त्याची म्हातारी आई त्याला सुनावत होती, हे मॅरियननं स्पष्ट ऐकलं. नॉर्मन आईला समजावण्याचा प्रयत्न करत होता; पण...
थोड्या वेळानं सॅंडविच आणि दूध घेऊन नॉर्मन खालीच मोटेलमध्ये आला.
""माझ्यामुळे आईची बोलणी खावी लागली ना?'' तिनं हळुवारपणे विचारलं.
""ती...ती...तिला बरं नाहीए. मी कुठल्याही मुलीशी बोलायला लागलो की ती भडकते. अगदी वैताग येतो कधी कधी...माझ्याजवळ दुसरी कुणी स्त्री आलेली तिला चालतच नाही. तिचं...तिचं डोकं नाहीए ठिकाणावर. तुम्ही मनावर घेऊ नका, प्लीज!'' तो क्षमायाचनेच्या सुरात म्हणाला.
""जाऊ दे हो...चालायचंच. म्हातारी माणसं अशीच असतात. तुम्ही तिला कुठंतरी ठेवत का नाही?'' तिनं सहज विचारलं.
""कुठंतरी म्हणजे? व्हॉट डू यू मीन? वेड्यांच्या इस्पितळात? वृद्धाश्रमात? लोक वेड्यांच्या इस्पितळालाच हल्ली "कुठंतरी' म्हणतात...ना? ती आई आहे माझी! तिला सोडून देण्याइतका कृतघ्न नाही मी...जमेल तशी तिची सेवा करीन...कृपा करून असलं काही बोलू नका!'' नॉर्मन बेट्‌स अचानक उसळलाच. बहुधा आईचा भलताच लाडका असणार.

- मॅरियन झोपायला गेली. नॉर्मननं आवराआवर केली. नॉर्मनच्या स्वागतकक्षामागच्या खोलीत पेंढा भरलेले कावळे बघून तिला थोडं मळमळलं होतं; पण एकंदर तो तरुण तिला चांगला वाटला होता.
...आंघोळीसाठी बाथरूममध्ये शिरलेल्या मॅरियननं शॉवर सुरू केला. त्या धुवॉंधारेत छान न्हाताना जवळ आलेली मानवी आकृती तिला दिसलीच नाही. एका वृद्ध बाईचा गाऊन तिला दिसला तो शेवटचाच.
...पुढच्याच क्षणी मॅरियनवर सुऱ्याचे वार झाले. शॉवरच्या धारांमध्ये तिचं रक्‍त मिसळून गेलं.
* * *

धावत आलेल्या नॉर्मननं पाहिलं आणि त्याची बोबडीच वळली. "माय गॉड! हे काय होऊन बसलं? आईचं वेड कुठल्या थराला चाललंय? ओह नो...' त्यानं घाईघाईनं न्हाणीघरातला प्लास्टिकचा पडदा घेतला. त्यावर मॅरियनचं रक्‍तबंबाळ विवस्त्र कलेवर ठेवलं. गुंडाळून टाकलं. न्हाणीघर स्वच्छ फडक्‍यानं धुऊन काढलं. रक्‍ताचा थेंबही दिसणार नाही याची काळजी घेतली. मॅरियनचे खोलीतले कपडे, बॅग, वर्तमानपत्र (यातच चाळीस हजार डॉलर्सची पुडकी गुंडाळलेली होती) सगळं उचललं. मॅरियनच्याच नव्या गाडीच्या डिकीत तिचं कलेवर ठेवलं. वर बॅग टाकली. मोटेलच्या जवळच एक चिखलाचं डबकं होतं. बऱ्यापैकी खोल आणि मोठं. त्या डबक्‍यात त्यानं ती गाडी लोटून दिली. गाडी दिसेनाशी झाल्यावर त्यानं सुटकेचा निःश्वास सोडला...मगच आईकडं गेला.
* * *

डोकं दुखतंय म्हणून गायब झालेली मॅरियन वीकेंड गेल्यानंतरही परतली नाही, हे बघून तिच्या रिअल इस्टेट एजंट मालकाची गाळण उडाली. म्हणजे आपले चाळीस हजार डॉलर्सही गेले? त्यानं मॅरिअनच्या बहिणीला - लैलाला - फोन केला. सगळं सांगितलं. "मला माझी रोकड मिळाली तर मी पोलिसात जाणार नाही', असंही म्हणाला. लैलानं सॅम लुमीसला भेटून "मॅरियन आलीये का?' असं विचारलं. तोही हादरला. मग लैलानं एक आर्बोगास्ट नावाचा खासगी गुप्तहेर गाठला. आर्बोगास्टनं रस्त्यावरचं हरेक मोटेल धुंडाळून काढलं. अखेर तो "बेट्‌स मोटेल'पर्यंत पोचला.
""मित्रा, ही बाई आली होती का तुझ्या मोटेलमध्ये?'' आर्बोगास्टनं फोटो दाखवत नॉर्मनला विचारलं.
""छे, गेल्या दोन आठवड्यांत इथं कुणी फिरकलेलंसुद्धा नाही...'' नॉर्मन सावधपणाने म्हणाला.
""आठव, आठव जरा...एक काम कर, तुझं रजिस्टर दाखव बरं!'' आर्बोगास्टनं आणखी चौकशी आरंभली. नॉर्मननं अनिच्छेनंच रजिस्टर काढून दाखवलं.
"" आमच्याकडं कोण खरं नाव सांगतं, साहेब? आम्ही विचारत नाही, ते सांगत नाहीत...'' नॉर्मन म्हणाला.
""ते खरंय...पण हे अक्षर जुळतंय बघ आणि खोटं का बोललास माझ्याशी? दोन दिवसांपूर्वी एक बाई रात्रीपुरती आली होती की इकडं! हे काय रजिस्टरातच दिसतंय!'' आर्बोगास्टचा संशय बळावला.
""हां, ते मी विसरलोच होतो. एक बाई आल्या होत्या. रात्री उशिरा आल्या आणि पहाटेच निघून गेल्या...'' नॉर्मननं भाषा बदलली.
""तुझ्या आईला विचारू का? ती बोलली असेल ना त्या बाईंशी!'' आर्बोगास्ट म्हणाला.
""म...म...माझी आई? न...न...नको. तिला बरं नाहीए...'' नॉर्मन एकदम चाचरला.
आर्बोगास्टनं गुपचूप तिथून बाहेर जाऊन लैलाला फोन करून माहिती दिली. तो परत मोटेलवर गेला. मोटेलवर कुणीही नव्हतं. तो मागच्या बाजूच्या घरात शिरला. जिन्यावरून वर जातानाच अचानक गाऊनमधल्या एका बाईनं सुरा परजत त्याच्यावर हल्ला केला. बारा-पंधरा वार करून तिनं आर्बोगास्टचा कोथळा काढला.
...आठवडा उलटून गेला तरी आर्बोगास्टचाही पत्ता नाही, हे बघून लैला काळजीतच पडली. तिनं आणि सॅम लुमीसनं त्या भागाचे शेरिफ चेंबर्स यांना गाठलं. सगळी माहिती दिली. "एवढं होऊनही पोलिस कम्प्लेन्ट का केली नाहीत?' असं त्यांनी आधी खडसावलं. मग थोडी फोनाफोनी केली.
"" "त्या नॉर्मन बेट्‌सच्या आईला काही माहिती असू शकेल. मी तिथं जातोय' असं आर्बोगास्ट फोनवर म्हणाला होता. त्याच्या आईला गाठायला हवं आपण!'' लैलानं सुचवलं.
""जुन्या हायवेवरच्या मिसेस बेट्‌सबद्दल बोलताय का आपण? त्या दहा वर्षांपूर्वीच वारल्या आहेत...'' शेरिफ चेंबर्स यांनी दिलेल्या माहितीनं सॅम आणि लैला पार गारठले.
* * *
...अखेर धीर एकवटून सॅम आणि लैलानं स्वत:च "बेट्‌स मोटेल'च्या पत्त्यावर जायचं ठरवलं. नॉर्मननं त्यांचंही मन:पूर्वक स्वागत केलं. खोलीची किल्ली दिली; पण त्यालाही त्यांचा हेतू बहुधा कळला होता. पुढं काय घडलं? नॉर्मनची आईच खुनी होती? की तिचं पिशाच्च? की आणखी कुणाचं हे कृत्य होतं? यात "सायको'ड्रामा नेमका कुठं आणि कसा घडतो? ते सगळं पडद्यावर बघून हिचकॉकसाहेबांना दाद द्यावी.
* * *

"सायको' हा कृष्णधवल चित्रपट असूनही रंगांची उणीव कुठंही जाणवत नाही, हे त्या चित्रपटाचं एक वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. शॉवरस्नानातले रक्‍ताचे ओघळ तर अक्षरश: लाल रंगापेक्षाही अधिक प्रभावी ठरताना बघून चकित व्हायला होतं. संपूर्ण सिनेमात प्रेक्षक हा एक "प्रत्यक्षदर्शी' म्हणून भूमिकाच बजावत असतो. संवाददेखील आवश्‍यक तेवढेच असल्यानं उत्कंठा हीच एक भाषा बनून जाते.
हा चित्रपट आल्फ्रेडनं बनवू नये, असं सगळ्यांचं म्हणणं होतं. त्यांची पत्नी एल्मा हीदेखील काहीशी विरोधातच होती. पॅरामाउंट स्टुडिओज्‌नं तर प्रारंभी एक डॉलरसुद्धा गुंतवणूक करण्याचं नाकारलं; पण हिचकॉकसाहेब हटले नाहीत. आपलं राहतं घर गहाण ठेवून त्यांनी उतारवयात हा चित्रपट निर्माण केला.
वास्तविक "सायको'च्या निर्मितीपूर्वीच हिचकॉक एक सेलेब्रिटी बनले होते. "व्हर्टिगो', "नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट' यांसारखे त्यांचे चित्रपट चांगलेच गाजलेले होते. सन 1956 मध्ये त्यांनी केलेल्या "द मॅन हू न्यू टू मच' मधलं डोरिस डे यानं गायलेलं "के सेरा सेरा' हे गाणं अफाट गाजलं होतं. "आल्फ्रेड हिचकॉक प्रेझेंट्‌स' ही त्यांची टीव्हीमालिकाही अमेरिकाभर बघितली जायची. भीतीचं मानसशास्त्र, उत्कंठेचं गणित असल्या गूढ विषयांवर प्रेक्षकांशी गप्पा मारणारे हिचकॉकसाहेब "बाप' माणूस वाटत. तसे ते होतेच; पण असं असलं तरी "सायको'तला न्हाणीघरातला सीन, टॉयलेटमधला रक्‍तपात, नायिकेचं कपडे बदलणं हे अमेरिकी सेन्सॉर बोर्डानं कात्रीच्या टोकावर धरलं होतं. बरीच भवति न भवति झाल्यावर तो तिढा सुटला होता.
अँथनी पर्किन्स या तरण्याबांड नायकानं या चित्रपटात साकारलेला नॉर्मन बेट्‌स कमालीचा प्रभावी आहे. हिचकॉकसाहेबांची आवडती नटी जॅनेट ले इथं मॅरियनच्या व्यक्‍तिरेखेत दिसते. तेव्हाची प्रसिद्ध पावलेली अभिनेत्री व्हेरा माइल्सनं लैलाची भूमिका केली आहे. "सायको'ला त्या वर्षी ऑस्कर पुरस्काराची चार नामांकनं मिळाली होती. मिळालं एकही नाही.

जगभरातल्या जाणकारांनी "सायको'डोक्‍यावर घेतल्यानंतर फ्रेंच दिग्दर्शक फ्रान्स्वा त्रुफा यांनी हिचकॉक यांना मुलाखतीसाठी गळ घातली. मुलाखत कसली? महासंवादच होता तो. त्रुफा यांनी विचारलेल्या पाचशे प्रश्‍नांना हिचकॉकसाहेबांनी सविस्तर उत्तरं दिली आहेत. ही उत्तरं म्हणजे गूढकथा, भयकथा लिहिणाऱ्यांसाठीचं एक प्रकारे गाईडच आहे. पन्नास तासांचं रेकॉर्डिंग झालं. त्याचं शब्दांकन करण्यासाठी पुढची चार वर्षं खर्ची पडली. त्याचं पुढं अर्थात पुस्तकही आलं. खुद्द त्रुफा त्या पुस्तकाला गमतीनं "हिचबुक' म्हणत असत.

"हिचकॉकचं विश्व' आणि "मेकिंग ऑफ सायको' यांवरही अनेक पुस्तकं आहेत; किंबहुना हिचकॉक यांच्यावर आजवर लाखो पृष्ठं लिहून झाली असतील. आणखीही नि:संशय लिहिली जातील. कारण, हिचकॉक हे एक व्यक्‍ती उरलेच नाहीत. भयगंडांची उकल करणारा एक गूढ रूपबंध म्हणूनच हिचकॉक यांचं नाव अजरामर झालं आहे. "या डोळ्यांची दोन पाखरे फिरतिल तुमच्या भवती, पाठलागही सदैव करतील, असा कुठेही जगती...' या गदिमांच्या ओळी बहुधा हिचकॉकसाठीच असाव्यात.
...जोवर माणसाच्या जगात भय आहे, तोवर हिचकॉकसाहेबांना मृत्यूचं भय नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com