रथचक्र उद्धरू दे... (प्रवीण टोकेकर)

प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

"बेन-हर' ही क्रिस्तकाळातली गाथा. आहे काल्पनिकच; पण तिचं क्रिस्ती इतिहासाशी असं काही घट्ट नातं आहे की खरीच वाटावी. विल्यम वायलरनं दिग्दर्शित केलेला "बेन-हर' हा चित्रपट बरोब्बर साठ वर्षांपूर्वी, 18 नोव्हेंबर 1959, रोजी प्रदर्शित झाला होता. त्या महाचित्रगाथेची ही षष्ट्यब्दी, त्यानिमित्त...

कुरुक्षेत्रावरच्या कोलाहलानं अस्वस्थ झालेल्या धृतराष्ट्रानं कळवळून संजयाला विचारलं : 'अरे, या कोलाहलात मला भविष्यातल्या किंकाळ्या का ऐकू येत आहेत? कोण कोण लोटले आहे त्या युद्धभूमीवर...सांग, सांग ना!''

"बेन-हर' ही क्रिस्तकाळातली गाथा. आहे काल्पनिकच; पण तिचं क्रिस्ती इतिहासाशी असं काही घट्ट नातं आहे की खरीच वाटावी. विल्यम वायलरनं दिग्दर्शित केलेला "बेन-हर' हा चित्रपट बरोब्बर साठ वर्षांपूर्वी, 18 नोव्हेंबर 1959, रोजी प्रदर्शित झाला होता. त्या महाचित्रगाथेची ही षष्ट्यब्दी, त्यानिमित्त...

कुरुक्षेत्रावरच्या कोलाहलानं अस्वस्थ झालेल्या धृतराष्ट्रानं कळवळून संजयाला विचारलं : 'अरे, या कोलाहलात मला भविष्यातल्या किंकाळ्या का ऐकू येत आहेत? कोण कोण लोटले आहे त्या युद्धभूमीवर...सांग, सांग ना!''

संजय म्हणाला : 'देवन्‌, कुरुक्षेत्रावरच्या कोलाहलानं आसमंतातले अनेक पक्षी-प्राणी केवळ ध्वनिकंपनानं मरून पडले आहेत. अमोघ शस्त्रागारे जणू त्या रणांगणावर उलथली असून उभय बाजूंस शस्त्रास्त्रसिद्ध रथांचा जणू महासागर लोटला आहे. लोह, मिश्रधातू आदी अभेद्य पदार्थांपासून बनलेले विविध आकारांचे, विधांचे, क्षमतांचे रथ एकमेकांचा नाश करण्यासाठी सिद्ध झाले आहेत. उजवीकडं अग्रभागी अष्टरथी भीमाच्या आरोळ्यांनी भूमंडळ जणू थरारतं आहे. महारथी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य साक्षात युगंधर कृष्ण करत आहे. अतिरथी युधिष्ठिरानं आपल्या दिव्य रथातच युद्धापूर्वीची प्रार्थना म्हणणं सुरू केलं आहे. डावीकडं महारथी दुर्योधनानं आक्रमणाचे आदेश दिले आहेत. भूरिश्रवस, शाल्य, कृतवर्मा, विंद-अनुविंद, त्रिगर्ताचे पाचही राजपुत्र, सुदक्षिणा, अलांबुश, भगदत्त अशा अतिरथी-महारथींनी आपापले अश्व कसेबसे रोखून धरले आहेत. कुठल्याही क्षणी युद्धास तोंड फुटेल आणि अमोघ शस्त्रास्त्रांचे साठे ही पृथ्वी भस्म होईपर्यंत रिते होणार नाहीत...चक्रवर्तिन्‌, इथं प्रत्येक रथ हाच एक अमोघ अस्त्र झाला आहे...''
(महाभारत, युद्धपर्व)
..................

गेल्या जून महिन्यात वर्तमानपत्रांमध्ये फुटकळ बातमी आली होती. कुठल्या तरी आतल्या पानावर असेल. उत्तर भारतात बागपत जिल्ह्यात सनौली नावाच्या गावात एक शेतकरी पावसाळ्यापूर्वीची नांगरट करत असताना त्याच्या नांगराचा फाळ कशाला तरी अडखळला. चार शिव्या हासडत त्यानं थोडं खणून पाहिलं. गावच्या सरपंचाकडे तक्रार केली. दिल्लीपासून अवघ्या 60 किलोमीटरवरचं गाव. सरकारी जीप आली, थोडी पाहणी करून गेली. नांगरट राहिली बाजूलाच, काही दिवसांतच आणखी काही जिपा भरून माणसं आली. शेतकऱ्याच्या शिवारात खणती सुरू झाली...तिथं आता चार हजार वर्षांपूर्वीचे रथांचे अवशेष सापडले आहेत. हे अवशेष महाभारतकालीन युद्धरथांचा सॉलिड पुरावा असल्याचा दावा भारतीय पुरातत्त्व विभाग करतोय...सनौलीत सापडलेली रथांची चाकं भरीव होती. आरेदार नव्हती. वजनानं तुलनेनं हलकं, आणि युद्धवीराला पुरेसा वेग आणि संरक्षण देणारं हे युद्धवाहन इसवीसनाच्या आधीच कालबाह्य ठरलं होतं; पण कुठल्याही प्राचीन देशाचा इतिहास धुंडाळायला जावं तर रथ नावाचं वाहन पानोपानी "ये-जा' करताना दिसतं. रोमनांचा इतिहास तर रथचक्रांनी भरलेला आहे.

"बेन-हर' ही क्रिस्तकाळातली गाथा. आहे काल्पनिकच; पण तिचं क्रिस्ती इतिहासाशी असं काही घट्ट नातं आहे की खरीच वाटावी. विल्यम वायलरनं दिग्दर्शित केलेला "बेन-हर' हा चित्रपट बरोब्बर साठ वर्षांपूर्वी, 18 नोव्हेंबर 1959, रोजी प्रदर्शित झाला होता. त्या महाचित्रगाथेची ही षष्ट्यब्दी.

अफाट, अचाट खर्चानिशी (त्याकाळी सोळा दशलक्ष डॉलर्स!) आणि हजारो कलावंतांसह साकारलेल्या या चित्रपटाला निव्वळ चित्रपट म्हणणं अन्यायकारक आहे. गाथाच ती! "एमजीएम स्टुडिओ'नं मोठ्या हिमतीनं "बेन-हर'चा घाट घातला होता. सॅम झिम्बालिस्टला त्यासाठी निर्माता म्हणून नियुक्‍त करण्यात आलं होतं. "बेन-हर'चं एपिक पडद्यावर साकारण्यासाठी एमजीएमनं आपली इभ्रत पणाला लावली. ही असली स्वप्नं पाहून ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी माणूस वेडाच असावा लागतो. सॅम झिम्बालिस्ट तर ठार वेडाच म्हणायला हवा. मिळेल तिथून पैसा उभा करत त्यानं "बेन-हर'ची चित्रगाथा पेश केली. या चित्रपटानं अर्थातच सर्व विक्रम कचाकचा मोडले. दामदुपटीनं पैसा परत मिळवून दिला. इंग्लिश चित्रपटांच्या इतिहासात "बेन-हर'नं ध्रुवताऱ्यासारखं अढळस्थान मिळवलं. कालजयी असा हा सिनेमा आहे. चित्रपटांचं तंत्र आताशा इतकं पुढारलं आहे की आख्खा एक ग्रह फुटताना पडद्यावर सहजी दाखवता येतो. लाखो सैनिकांची फौज ग्राफिक स्टुडिओत तयार करता येते. साठ वर्षांपूर्वी असलं तंत्रज्ञान नव्हतं. त्या काळी दिग्दर्शक विल्यम वायलरनं हे कसं साकार केलं असेल, या विचारानं आजही मोठमोठे ग्राफिक-कलावंत तोंडात बोटं घालतात. प्राचीन काळी इजिप्तमध्ये प्रचंड पिरॅमिड्‌स कशी उभारली असतील, त्याची गणितं मांडताना आत्ताच्या तंत्रज्ञांना घाम फुटतो, त्यातलाच हा प्रकार.

"बेन-हर' ही गोष्टच मुळात कुठल्याही भाविक मनाला भुरळ घालणारी. क्रिस्ताच्या जन्मापासून सुरू झालेली "बेन-हर'ची काल्पनिक कहाणी क्रिस्तजीवनाशी समांतर फुलत जाते. विशेष म्हणजे, यहुदी आणि क्रिस्ती धर्माशी निगडित कथानक असून कुठंही कुठल्याही धर्माचा अधिक्षेप होताना दिसत नाही. म्हणूनच "बेन-हर'ची कहाणी सर्वधर्मीयांनी उचलून शिरावर घेतली.

सन 1880 मध्ये ल्यू वॉलेस नामक लेखकानं "ज्यूडा बेन-हर : अ टेल ऑफ द क्राइस्ट' नावाची महाकादंबरी लिहिली होती. तब्बल आठ भागांची कादंबरी. तीत पहिल्या भागात कथानायक "ज्यूडा बेन-हर' प्रविष्टच होत नाही. ती क्रिस्ताची कहाणी वाटू लागते. दुसऱ्या-तिसऱ्या भागापासून मात्र ज्यूडाची गोष्ट पकड घेते. ही कादंबरी त्या काळी बायबलच्या खालोखाल खपली. सन 1925 मध्ये तीवर एक चित्रपटदेखील आला. अर्थात विल्यम वायलरच्या चित्रगाथेची भव्यता त्यात नव्हती.
ऐतिहासिक ढाच्यातले - जिला पीरिअड-फिल्म असं म्हणतात- चित्रपट निर्माण करणं भयंकर खर्चिक असतं. तो काळ उभा करण्यासाठी नेपथ्यावर भरमसाठ खर्च होतो. युद्धबिद्ध, हत्ती-घोडे, ते वजनदार पोशाख, ती जुनी तालेवार भाषा...सगळाच मामला किचकट असतो. "बेन-हर'नंतर कितीतरी असे चित्रपट येऊन गेले. अगदी भारतातही "मोगले आझम'पासून थेट आत्ताच्या "बाहुबली'पर्यंत! यांतले काही चित्रपट खरोखर दर्जेदार आहेत; पण "बेन-हर' ही चित्रगाथा नसून एक महाअनुभव आहे. तो या जिंदगीत एकदा तरी घ्यावाच.
* * *

क्रिस्ताचा जन्मकाळ झाला तेव्हाची गोष्ट.
जेरुसलेमनजीकच्या ज्युडिआ नावाच्या गावात ज्यूडा बेन-हर नावाचा तरुण राहत असे. खात्या-पित्या घरचा होता. घरदार, जमीनजुमला चांगला होता. थोडा काही व्यापारही त्याला साधत असे. या गावातच त्याचं बालपण गेलं होतं. तो आणि त्याचा जिवलग दोस्त मेस्साला. पण पुढं शिकण्यासाठी मेस्सालानं गाव सोडलं. ज्यूडा बेन हर आपल्या गोतावळ्यात जगत होता.

ते दिवस चांगले नव्हते. रोमनांनी त्यांच्या साम्राज्यविस्तारासाठी दहा दिशांना आपलं सैन्य नामजद केलेलं होतं. ज्युडिआ गावातही रोमनांचा कब्जा होता. निर्दय, पाताळयंत्री रोमनांना धडा शिकवण्यासाठी काही सळसळत्या रक्‍ताचे तरुण रोमन छावण्यांवर छोटे छोटे हल्ले करत. पळून जात. या बंडखोरांचा नि:पात करण्यासाठी रोमन सम्राट सीझरनं आणखी कुमक पाठवली, त्यात मेस्साला एक रोमन योद्धा म्हणून आला.

आपल्या जिवलग बालमित्राला धावत येऊन मेस्साला भेटला, तेव्हा "बेन-हर'समोर जुना मित्र नव्हताच. एक तरणाबांड, काहीसा मग्रूर रोमन सैनिक तेवढा उभा होता. बेन-हरची बहीण तिरझा त्याला खूप आवडायची, हे भेटायचं एक कारण होतंच.
'ज्यूडा, बंडखोरांना हुडकण्यासाठी मला मदत कर..,'' मेस्सालानं प्रस्ताव ठेवला. त्याला रोमन शिलेदार होण्याची घाई होती. इथलं बंड चेचता आलं तर त्याला मदत झाली असती.
'आपल्याच भावंडांची नावं सांगू म्हणतोस? मेस्साला, किती बदललास रे तू!'' ज्यूडा दु:खानं म्हणाला. त्यावर मेस्सालानं महत्त्वाकांक्षा नावाची काही गोष्ट असते, असं व्याख्यान झोडत आपल्यात झालेला बदल सिद्ध केला. ज्यूडानं दिलेला नकार त्यानं मनात ठेवला.

...काही वर्षांनंतर रोमन अंमलदाराची लष्करी मिरवणूक ज्युडिआ गावातून जात असताना ज्यूडाची बहीण तिरझा सज्जातून वाकून बघत होती. तेव्हाच दोन फरश्‍या सुटून खाली पडल्या आणि नेमका अंमलदाराचा कपाळमोक्ष झाला! तालेवार रोमन अधिकाऱ्याचा पाईक असलेल्या मेस्सालानं चमकून बघितलं आणि त्यानं त्वेषानं तलवार उगारून ज्यूडाच्या घरावर चाल केली. भराभरा धरपकड करून ज्यूडाची आई मिरिअम आणि तिरझा यांना अटक केली. याच घरात एकेकाळी आपल्याला चांगलंचुंगलं खाऊ घालणाऱ्या मिरिअममावशीला तुरुंगात टाकताना त्याचं काळीज हललंसुद्धा नाही. ज्यूडाची रवानगी तर कैदखान्यात झाली. त्याचा दोष काय होता? तर अपघातानं फरश्‍या सुटून अंमलदाराला झालेला छोटासा अपघात.
* * *

-मेस्सालाच्या नीच कारवायांनी संतापलेला ज्यूडा सूडभावनेनं बेभान झाला होता. आपला बालमित्रच अस्तनीतला निखारा ठरावा? कैदखान्याच्या साखळ्या तोडून त्यानं थेट मेस्सालाच्या महालसदृश हवेलीत शिरकाव केला. 'का असं वागलास?'' त्यानं मेस्सालाला जाब विचारला.
'मी तुला मदत मागितली होती...तुला आयुष्यातून उठवून ती मी मिळवली आहे...ज्यूडा, तू आता रोमन जहाजांवर वल्ही मारत मारत एक दिवस छाती फुटून मरणार आहेस...गुलामाची मौत देणार आहे मी तुला...रोमन साम्राज्य अजिंक्‍य आहे हे मरताना लक्षात ठेव!'' मेस्साला दर्पोक्‍तीनं म्हणाला. ताबडतोब ज्यूडा जेरबंद झाला, त्याची रवानगी गुलामांच्या कुप्रसिद्ध मृत्युखान्यात झाली. त्याच्या आईला आणि बहिणीलाही मेस्सालानं कुठल्या तरी अज्ञात नरकात टाकून दिलं.
विक्राळ वाळवंट तुडवत गुलामांचे तांडे जहाजांकडं निघाले. अन्न-पाण्याविना बरेचसे कैदी या वाळवंटातच मरत. नाझरथ गावाच्या नजीक ज्यूडाची सहनशक्‍ती संपुष्टात आली आणि तो वाळूत कोसळला...शुद्ध आली तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर एक करुणामयी चेहरा होता.

'बंधो, अजून हवंय का पाणी?'' त्या आवाजानं ज्यूडाच्या अंतर्यामी अशा काही लहरी उठल्या की जन्मजन्मांतरीचं एक अनामिक नातं तिथं अंकुरताना त्याला स्पष्ट जाणवलं. ते नातं मानवतेचं होतं. साध्या पाण्याच्या घोटानिशी या भल्या माणसानं आपल्याला जीवनदान दिलं? कोण हा देवदूत?
'ए, ऊठ रे...त्याला पाणी पाजू नकोस..तू पाय उचल रे भराभरा...,'' ज्यूडाच्या अंगावर एक रोमन सैनिक ओरडला. त्या शांतचित्त तरुणानं त्याच्याकडं अशा काही नजरेनं पाहिलं की त्या सैनिकाचा पायच थांबला. सैनिकांनी ज्यूडाला खेचत नेलं. तो तरुण तिथंच उभा होता.
ाच देवदूताला पुढं साऱ्या जगानं येशू क्रिस्त म्हणून ओळखलं.
* * *

यहुदी गुलामांना घेऊन जहाज निघालं होतं. जहाजाचा कप्तान अरिअस भयंकर कर्दनकाळ होता. गुलामांना झुंजवून मारणं हा त्याचा छंद; पण पुढं गनिमाच्या हल्ल्यात त्यानं गुलामांनाही झुंजायला लावलं. त्या चकमकीत कप्तान अरिअस मेलाच असता; पण ज्यूडा बेन-हर नावाच्या गुलामानं त्याला वाचवलं.
'तू का वाचवलंस मला?'' कप्तान आश्‍चर्यानं म्हणाला.
'युद्धापूर्वी तू माझे साखळदंड का तोडलेस? हात मोकळे होते, वाचवला जीव..,"' गुलाम ज्यूडानं उत्तर दिलं. कप्तानाला ज्यूडा आवडला. त्यानं त्याला पुढं दत्तक घेतलं. ज्यूडा बेन-हरच्या आयुष्यानं इथं निर्णायक कलाटणी घेतली.
संपन्न आयुष्य पुन्हा वाट्याला आल्यानंतर ज्यूडाच्या मनातली सूडभावना पुन्हा एकवार नागासारखी फणा काढून उठली. त्याला पुन्हा ज्युडिआ गावाची आठवण येऊ लागली. आपल्या मानसपित्याला वंदन करून तो जन्मगावी निघाला. या प्रवासात त्याला भेटला बाल्थाझार नावाचा एक भला, वृद्ध माणूस. काही वर्षांपूर्वी बेथलेमच्या ताऱ्याचा वेध घेत गेलेल्या काही भाविकांमध्ये बाल्थाझार होता. ज्यूडामधली भलाईची भावना त्यानं ओळखली. त्याला रथांच्या शर्यतींचं तारुण्यसुलभ वेड आहे हेही ओळखलं.
'मुला, तू भला आहेस; पण तुझ्या डोळ्यांतली सूडाची धग मला जाणवते आहे, खटकते आहे...''
पण ज्यूडाला त्याचं बोलणं समजलं नाही. बाल्थाझारच्या गोतावळ्यातल्याच इल्देरिम नावाच्या एका अरबानं ज्यूडाला सारथ्याचे शास्त्रोक्‍त धडे दिले.
"रोममध्ये होणाऱ्या रथांच्या शर्यतीत मेस्सालाचा काळ्या अश्वांचा रथ अजिंक्‍य ठरतोय. त्याला तू नमवलंस तरी तुझा सूड सत्कारणी लागेल,' असं ज्यूडाच्या गुरूनं त्याला सांगितलं. ज्यूडा तयारीला लागला. शुभ्र अश्वांचा दमदार ताफा त्याच्या समोर हजर करण्यात आला.
...एका न भूतो न भविष्यति अशा रथयुद्धाला तोंड फुटलं होतं.
* * *

रथयुद्धाच्या विशाल रिंगणात अनेक रथ उभे होते. ज्यूडा बेन-हरचा शुभ्र रथ पाहून मेस्साला चमकला; पण तोही गुर्मीत होता. बेन-हर या रिंगणातून जिवंत परत जाणार नाही, अशी त्यानं प्रतिज्ञाच घेतली. भोवतालच्या दगडी प्रेक्षागारात चित्कार, आरोळ्यांचा कोलाहल माजला होता. या रिंगणातून फक्‍त अजिंक्‍यवीरच जिवंत राहतो, बाकी स्पर्धकांना ओढून न्यावं लागतं. हा रक्‍तपात पाहणं हा रोमनांसाठी एक मनोरंजनाचाच प्रकार होता. रोमन उमराव पॉंटियस पिलेटनं हातातला पांढरा रुमाल फडकवला आणि वाद्यांच्या दणदणाटात शर्यतीला सुरवात झाली...
तोंडाला फेसाटी येईस्तोवर धावणारे तगडे घोडे आणि त्यापाठोपाठ घरघराट करत दौडणारे रथ...त्यावर हातात चाबूक किंवा पराणी घेऊन ओणवलेले स्पर्धक...काळे-कबरे, धब्बेदार, तपकिरी, तांबडे, शुभ्र अशा वेगानं आणि आवेगानं मुसमुसलेल्या सणसणीत घोड्यांनी बघता बघता वेग घेतला. पहिलं रिंगण पुरं होता होता एक-दोन रथ कोलमडले. चाकं निखळली. खाली पडलेल्या स्पर्धकांवरून दडदडत अन्य घोडे दौडले. रक्‍ताचे सडे पडले. मस्तकं फोडत, शरीरं तुडवत रथ बेहाय दौडत होते...
-मेस्साला आणि ज्यूडाच्या रथांची टक्‍कर केवळ थरारक होती. सारं प्रेक्षागार मंत्रमुग्ध होऊन तो थरार नसानसात भिनवून घेत होतं. एकमेकांवर थाडथाड आदळणाऱ्या रथांच्या आऱ्या, चाकं आणि लोखंडी सांगाडे रोमन दुर्दम्यतेनं झुंजत होते. ज्यूडाचा रथ यंदा मेस्सालाची सद्दी संपवणार, हे लक्षात येताच प्रेक्षागार त्याचा जयजयकार करू लागलं. दात-ओठ खात मेस्सालानं एका खटक्‍यानं आपल्या रथचक्रातून दातेदार पाती बाहेर काढली आणि तो बेन-हरच्या रथाला झोंबू लागला. "जणू जिंकाया गगनाचे स्वामित्व, आषाढघनांशी झुंजे वादळवात' अशी ती भयानक रथझुंज संपता संपत नव्हती. प्रत्येक क्षण मोलाचा होता. मेस्सालाच्या पातळयंत्री चालींनी ज्यूडा बेन-हर चांगलाच घायाळ झाला होता; पण त्यानं धीर सोडला नाही. जिवाच्या करारानं तो रथ हाकत राहिला.
....मेस्सालानं अखेरची टक्‍कर ज्यूडाच्या रथाला दिली आणि तो स्वत:च रथातून फेकला जाऊन घोड्यांबरोबर फरफटत जाऊ लागला. तुफान जयघोषात ज्यूडा बेन-हरनं शर्यत जिंकली होती.
* * *

प्राणांतिक जखमा झालेल्या स्पर्धक सैनिकाला संपवणं ही रोमन माणुसकीच होती; पण मेस्सालानं त्याही अवस्थेत बेन-हरला बोलावून घेतलं. एक कुचकट हास्य करत तो म्हणाला.
'शर्यत जिंकलीस...शत्रू मेला...जिंकलास...असं वाटतंय ना तुला?''
'शर्यत जिंकलो; पण शत्रू कोण मेस्साला?..तू? नाही रे...'' बेन-हर शांतपणे म्हणाला.
'तुझी आई आणि बहीण मेली असं वाटतंय तुला....पण नाही...त्या कुष्ठरोग्यांच्या वस्तीत जगतायत...जा...शोधून आण त्यांना...अर्थात त्यांना ओळखू शकलास तर..!'' विकृत सुरात मेस्साला मरता मरता बोलत होता. बेन-हरचं काळीज हललं
'शर्यत कधीही संपत नसते, मित्रा...कधीही...कधीही...'' एवढं बोलून मेस्सालानं अखेरचा श्‍वास घेतला.
...ज्यूडा बेन-हरनं पुढं आईला आणि बहिणीला सोडवून आणलं? तो ज्युडिआ गावाला गेला? क्रिस्ताला सुळावर चढवलं तेव्हा तो काय करत होता? त्याच्या कुठल्या शिकवणीचा बेन-हरवर परिणाम झाला? हे सगळं बघायचं ते पडद्यावर...आणि हात जोडायचे.
* * *

"बेन-हर'ची कहाणी हाच मुळात एक चमत्कार आहे. त्याचे लेखक ल्यू वॉलेस यांनी मोठ्या चलाखीनं ही कहाणी सांगितली आहे. यहुदी, क्रिस्ती आणि अरबी धर्मसंकल्पनांची गुंफण कथानकात असूनही कुठंही धार्मिक तेढ निर्माण होईल, असा एक शब्दही त्यांनी लिहिला नाही. प्रत्येक धर्माची शिकवण अबाधित ठेवत त्यांनी "बेन-हर' नावाच्या हाडा-मांसाच्या माणसाची हकीकत सांगितली. म्हणूनच बहुधा ही कादंबरी आणि त्यावर पुढं बेतलेले चित्रपट, नृत्यनाटिका, नाटकं यांचे सहस्रावधी प्रयोग झाले. ल्यू वॉलेस हे गेल्या शतकातले लेखक. अमेरिकी यादवीच्या काळात लष्करात जनरल असलेले वॉलेससाहेब मनानं साहित्यिकच होते. सन 1905 मध्ये त्यांचं निधन झालं. बेन-हरची अजरामर कहाणी किमान पाच वेळा पडद्यावर आली आहे. सन 1907 मध्ये एक छोटा मूकपट आला होता, नंतर 1925 मध्ये पूर्ण लांबीचा; पण मूकपटच आला. विल्यम वायलरनं आणलेला बेन-हर हे तिसरं रूप होतं. मग 2003 मध्ये "बेन-हर' ऍनिमेशनपट म्हणून रसिकांसमोर पेश केला गेला. तीनेक वर्षांपूर्वी "बेन-हर'ची थ्रीडी आवृत्ती बघायला मिळाली. इतकं होऊनही विल्यम वायलरची चित्रगाथा दशांगुळे वरच राहिली आहे. अर्थात तेव्हाही निर्माता सॅम झिम्बालिस्ट आणि दिग्दर्शक विल्यम वायलर यांनी अर्थात कुठलीही कसर ठेवली नाही. दिग्दर्शनासाठीही सात-आठ टीम होत्या. संहितेवर काम करण्यासाठी डझनभर लेखक नेमलेले होते. चित्रीकरणासाठी शेकडो कर्मचाऱ्यांचे अर्धा डझन ताफे होते. अँड्य्रू मार्टोन आणि याकिमा कानुट या सहदिग्दर्शकद्वयीनं फक्‍त रथांची शर्यत शूट केली. त्यासाठी चक्‍क अडतीसपानी संहिता लिहून काढण्यात आली होती आणि वर्षभर फक्‍त रथशर्यतीच्या चित्रीकरणाचीच तयारी सुरू होती. त्यासाठी रिंगण बांधणं हे एक सेट डिझायनिंगचं आव्हान होतं. त्यासाठी अरबस्तानातून हजारो टन वाळू आणली गेली. चारशे टन लोखंड वापरावं लागलं. युगोस्लाविया आणि सिसिलीतून 78 जातिवंत घोडे चक्‍क विकत घेण्यात आले. घोड्यांची शर्यत चित्रित करणं धोकादायक होतं. ते ओळखून निर्मात्यांनी चित्रीकरणाच्या ठिकाणी एक वीस खाटांचं तात्पुरतं इस्पितळ उभारलं होतं आणि दोन डॉक्‍टर आणि दोन नर्सेस असं वैद्यकीय पथक आणून ठेवलं होतं. पुढं "स्पाघेट्‌टी वेस्टर्न'पटांची लाट हॉलिवूडमध्ये आणणारे विख्यात दिग्दर्शक सर्गिओ लिओनी हे "बेन-हर'चे सहायक दिग्दर्शक होते. त्यांनी हे सारं त्यांच्या दीर्घ मुलाखतीत नमूद केलं आहे.

चार्ल्स हेस्टन या अभिनेत्यानं ज्यूडा बेन-हरची मध्यवर्ती भूमिका साकारली, तर स्टीफन बॉइडनं खलनायक मेस्साला पेश केला.
वास्तविक मेस्सालाच्या भूमिकेसाठी दिग्दर्शक वायलर यांना कर्क डग्लससारखा सितारा हवा होता; पण डग्लसनं नकार दिला. कथानायक "बेन-हर'वर अलोट प्रेम करणाऱ्या, त्याच्यातली सूडभावना नष्ट करू पाहणाऱ्या इस्थरची शालीन भूमिका हाया हारारीत नावाच्या नवख्या ज्यू अभिनेत्रीनं साकारली. बेन-हरचं संगीत हा एक स्वतंत्र विषय आहे. मिक्‍लोस रोझा नामक प्रतिभावान संगीतकारानं हे अवघड काम तडीला नेलं. "बेन-हर'चं शीर्षक संगीत म्हणजे ग्रीक-रोम सुरावटींनिशी नटलेली अशी सिंफनी होती, की त्यासाठी तीन तबकड्या काढाव्या लागल्या. संपूर्ण रंगीतसंगीत, सिनेमास्कोप चित्रपटाचा गाजावाजाही तितकाच करण्यात आला होता. अखेर 1954 मध्ये सुरू झालेला "बेन-हर" चित्रगाथेचा महाप्रकल्प पाच वर्षांनी पूर्ण झाला. मधल्या काळात एक बळी गेला होता...

"बेन-हर'चे जनक आणि निर्माते सॅम झिम्बालिस्ट यांचं इटलीत चार नोव्हेंबर 1958 रोजी हृदयविकाराच्या झटक्‍यानं निधन झालं होतं. पुढं "बेन-हर'ला अकरा ऑस्कर पुरस्कार मिळाले. त्यातला एक मरणोत्तर झिम्बालिस्ट यांना देण्यात आला.
"बेन-हर'ची कहाणी सूडकथेचे रंग घेऊन येते. बघता बघता त्यात क्रिस्ताच्या करुणेचा रंग मिसळतो आणि कहाणीचा सूर बदलून मानवतेकडं कधी वळतो कळतच नाही. चित्रपटाच्या शेवटी बेन-हरच्या तोंडचं एक वाक्‍य आपल्याला हलवून जातं. येशू क्रिस्ताबद्दल बेन-हर भावगर्भ आवाजात म्हणतो ः ' क्रूसावर खिळलेल्या अवस्थेतही तो अडखळत म्हणाला होता की, "हे आकाशातल्या बापा, त्यांना क्षमा कर...कां की ते काय करीत आहेत, ते त्यांना माहीत नाही...' ''
'तेव्हाही...त्या क्षणीही हे उद्‌गार?'' अश्रूभरल्या डोळ्यांनी इस्थर विचारते.
'होय, तेव्हाही...आणि त्या क्षणी मला वाटलं की त्या दैवी वाणीनं माझ्या हातातली तलवार अलगद काढून घेतली आहे...''

Web Title: pravin tokekar write article in saptarang