...पंखांना ओढ आभाळाची! (प्रवीण टोकेकर)

प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

"बर्डमॅन' हा चित्रपट एखाद्या अमूर्त चित्रासारखा वाटतो. रंगांचे गहन फटकारे आणि त्या रंगसंगतीनं साधलेला त्याहूनही गहन उजेड काहीतरी वेगळं सांगू पाहतो. त्यातलं काही कळतं, काही नाहीच कळत; पण नाही कळलं, तरी अडत नाही. अर्थ न लागताही त्यांचं म्हणणं मनात उतरलेलं असतं.

"बर्डमॅन' हा चित्रपट एखाद्या अमूर्त चित्रासारखा वाटतो. रंगांचे गहन फटकारे आणि त्या रंगसंगतीनं साधलेला त्याहूनही गहन उजेड काहीतरी वेगळं सांगू पाहतो. त्यातलं काही कळतं, काही नाहीच कळत; पण नाही कळलं, तरी अडत नाही. अर्थ न लागताही त्यांचं म्हणणं मनात उतरलेलं असतं.

रामायणातली ही एक लोककथा आहे.
सूर्यदेवाचा सारथी जो अरुण, त्याला दोन मुलगे. थोरला संपाती, धाकटा जटायू. नीलमाथ्यावरून गगनात उंच उंच भराऱ्या माराव्यात आणि गगनाच्या निळाईत मुक्‍त संचार करत खालील दंडकारण्याच्या हिरवाईचा अभिमान करावा, हा दोघा भावांचा नित्यक्रम. एक दिवस कोण उंच उडतं, याची दोघा भावांमध्ये स्पर्धा लागली. उडता उडता दोघंही सूर्याच्या निकट गेले. सूर्यदाहानं जटायूचे पंख जळू लागल्याचं पाहून थोरल्या संपातीनं बळ एकवटून त्याच्याही वर घेतली झेप, आणि स्वत:च्या पंखांचं सावट धरून आपल्या धाकट्या बंधूस वाचवलं. तथापि, या साहसात संपातीचे पंख मात्र पुरते जळाले आणि तो भूमीवर कोसळला. चंद्रमानामक ऋषींनी त्याच्यावर उपचार करून सांगितलं, की "त्रेतायुगात एका स्त्रीच्या शोधात फिरणारे काही वानरवीर तुजला भेटतील. त्यात एक हनुमंत असेल. त्याच्या दर्शनहेळामात्रे नव्या पंखांचे अंकुर तुझ्या देहावर फुटतील...तेव्हा नव्या पंखांची प्रतीक्षा करत पडून राहा, गृद्धराज!''
ऐसी अनेक युगे लोटिली.

जळालेल्या पंखांचा अर्धामुर्धा पसारा सांभाळत युगानुयुगे खुरडणाऱ्या संपातीनं डोळे भरून आभाळाकडं बघितलं. दु:खार्त स्वरात तो आपल्या पुत्राला म्हणाला : सुपार्श्‍वा, अपंग बापाला सांभाळण्याचे कर्तव्य तुला करावे लागते...माझ्या मनाला क्‍लेश होतात. माझ्यासाठी अन्नाची व्यवस्था तुलाच करावी लागते, हा किती दैवदुर्विलास! पण बऱ्याच दिवसांत मी मांसखंड भक्षिला नाही असे सांगूनही तू कोरभर तुकडादेखील आणला नाहीस...असे का?
सुपार्श्‍वाने अपराधी सुरात सांगितले, पिताश्री, मृगयेला निघालो असता म्यां पाहिले की एक कृतांत राक्षस एका कोमलांगीस घेऊन आपल्या पुष्पक विमानातून वायुवेगाने चालला होता. एका स्त्रीचे अपहरण निषिद्ध आहे, हे ठाऊक असल्याने मी त्या राक्षसास थांबविण्याचा यत्न केला. "हा राम, हा लक्ष्मण' असा विलाप करीत असलेल्या त्या स्त्रीस संरक्षिणे मला जमले नाही, पिताश्री! त्या गोंधळात मांसखंड आणणे राहून गेले. तथापि, त्या स्त्रीचा शोध घेत काही वानरवीर या दिशेने येताना मी पाहिले आहेत.''
...हे वृत्त ऐकून संपातीच्या अर्धजळक्‍या पंखांत काहीतरी सळसळले, मोहरले, अंकुरले. मान वळवून त्याने खुरट पंखपसाऱ्याकडे पाहिले, तेव्हा नवपंखांचे सहस्र कोंब त्याच्या जीर्ण देहावर उमलत होते...
* * *

तुम्हा-आम्हासारख्या साध्या माणसांनाही पंख असतात. त्या अदृश्‍य पंखांची उघडझाप फक्‍त एकटं असतानाच ऐकू येते. हे अदृश्‍य पंख तेवढे एकांतातल्या माणसाचे खरे सोबती. ऐहिकातल्या आयुष्याची वाळू बोटांमधून झरझरा गळून जाते; पण हे पंख नाही गळून पडत. एकांतात तर या पंखांमध्ये संपातीचं बळ येतं. पेचप्रसंगांमध्ये, संभ्रमाच्या जंजाळात अडकून जायला होतं, तेव्हा नेमके हेच पंख साथीला पुढं सरसावतात. मग मन घेतं भराऱ्या. उंच उंच...उंचच उंच. जटायू किंवा संपातीसारखे सूर्यदाहानं ते करपले, तरी पुन्हा पुन्हा उगवतात. राखेतून पुन्हा एकवार झेप घेणाऱ्या फिनिक्‍स पक्ष्याकडं असेच संजीवक पंख होते असावेत.

असाच एक होता बर्डमॅन...."होता' असं तरी का म्हणायचं? आहेच. स्पायडरमॅन, सुपरमॅन, आयर्नमॅनसारखा आणखी एक सुपरहीरो-बर्डमॅन. त्याला उडता येतं. आसपासची भौतिक वस्तू बोटांच्या इशाऱ्यानं इकडून तिकडं फेकता येते. दुष्टांचा नायनाट करणं हे तर त्याचं कामच होतं...सॉरी, आहेच; पण बर्डमॅनची थोडी गोची झाली. त्यालाही कसला तरी अभिशाप होता.
...अशाच एका गगनभरारीत त्याचेही पंख जळाले आणि मग बसला खुरडत; पण काहीही झालं तरी तो सुपरमॅन. व्यक्‍तिमत्त्वात ठासून भरलेली सगळी जादू एका संकटानं थोडीच नाहीशी होते? तिचे अवशेष उरतातच. त्या अवशेषांच्या ढिगाऱ्यावरच बर्डमॅन उ:शापाची वाट पाहत बसला होता...पार कलियुगापर्यंत.

"बर्डमॅन"ची ही आत्मकहाणी काही वर्षांपूर्वी हॉलिवूडच्या पडद्यावर अवतरली होती. आत्मकहाणी म्हणजे आत्म्याची कहाणी या अर्थानं. तसं बघायला गेलं तर या कहाणीत जे काही भौतिकात घडतं, ते फार थोडं. बरंचसं घडतं ते मनोभूमीत. तरीही ती एक चित्तवेधी कहाणी ठरते. कारण मेंदूची खिट्टी उडवणारं रसायन या चित्रकहाणीत आहे. दृश्‍यात्म काव्य आणि व्यवहारातला धटिंगणपणा यांचा असा काही मेळ या चित्रकथेत आहे की रसिक माणूस भांबावून जातो. चित्रपटाचा परिणाम बराच काळ राहतो. मेंदूतली विचारांची केंद्र उद्दिपीत करण्याची असामान्य क्षमता या चित्रकथेत आहे. अलेयांद्रो इनारितु या मेक्‍सिकन प्रतिभावान दिग्दर्शकानं "बर्डमॅन' साकार केला. तोही त्याच्या खास शैलीत. तीन तास टाइमपास म्हणून हा चित्रपट बघायला बसाल तर फसगत होईल. आपल्याकडच्या भाऊ पाध्ये यांच्या किंवा श्री. दा. पानवलकर यांच्या कथा वाचून झाल्यावर एक प्रकारची अस्वस्थता देह-मनात थरथरते, तसं काहीसं "बर्डमॅन' बघून झाल्यावर जाणवतं. नामदेव ढसाळ यांच्या कवितेनं होणारा अंतर्मनाचा दाह आणि इनारितुच्या कलेसंदर्भातल्या अधोरेखनाचं काहीतरी जवळचं नातं आहे असं वाटू लागतं. एकंदरीत प्रकरण भलतंच अवघड होऊन बसतं.

"बर्डमॅन आवडला' आणि "बर्डमॅन कळला नाही' एवढीच वर्गवारी ढोबळमानानं करता येईल. आवडला म्हणणाऱ्यांना त्यातलं "अतरंगी सत्य' कुठंतरी जाणवलेलं असतं. मनाच्या वैचित्र्यपूर्ण व्यवहाराचे पातळ पदर हाताला नाही लागले, तरी जाणवलेले असतात. एका जुन्या नटाच्या पुन्हा रिलेव्हंट ठरण्याची ही केविलवाणी धडपड आहे, हा झाला या कथावस्तूचा लौकिकार्थ...पण यापलीकडंही "बर्डमॅन' खूप काही सांगून जातो.

अलेयांद्रो इनारितु हा एक आचरट दिग्दर्शक आहे. सर्वसाधारणपणे ज्यासाठी चित्रपट निर्माण केले जातात, त्या कारणांसाठी तो या व्यवसायात उतरलेलाच नाही. हॉलिवूडच्या टेकड्यांवरली ती अगडबंब अक्षरं तिथल्या मनोरंजनाच्या दुनियेचा डंका वाजवत असतात; पण तिथंच राहून इनारितु मात्र त्याच मनोरंजनाची लक्‍तरं काढून अभिमानानं दाखवत असतो. याचा अर्थ इनारितुला "गल्ल्या'ची पडलेली नाही, असा घेण्याचं कारण नाही. नवकथेतले कुठले घटक धंदा करू शकतात, याचं नवगणित त्याला अवगत आहे. म्हणूनच त्याच्या "बर्डमॅन'नं ऑस्करपासून अनेक मान-सन्मान पटकावले. त्यानं दिग्दर्शित केलेला "रेव्हनंट'देखील रूढार्थानं एक सूडकथा म्हणून पेश झाला नव्हता. रेव्हनंट ही एक धडाकेबाज सूडकथाच होती; पण आडमुठ्या पद्धतीनं सांगितलेली. तिलाही रसिकांनी नावाजलं होतं; पण या सटकेल दिग्दर्शकाच्या भन्नाट "बर्डमॅन'नं चित्रपटकलेतून जगण्याचा अन्वयार्थ शोधू पाहणाऱ्या अनेक "इंटुक' लोकांच्या झोपा उडवल्या. चित्रपटाचा पडदा असाही वापरता येतो, हे जणू नव्यानं कळलं होतं त्यांना. आधी सांगितलं त्याप्रमाणे, लौकिकार्थानं, "बर्डमॅन' ही एका "अनुभवी' अभिनेत्याची कहाणी होती. अनुभवी अभिनेता याचा दुसरा अर्थ जुनाट नट! दिलखेचक अदा, अभिनिवेशयुक्‍त आवाजी आणि चाहत्यांच्या गराड्यालाच प्रेम समजून ऊर फुलवून घेणाऱ्या "त्या' काळच्या "कडऽऽक' नटांच्या काळातलाच कुणी एक! कालौघात प्रसिद्धीच्या आणि लोकप्रियतेच्या झोताबाहेर फेकल्या गेलेल्या नटाची ही वर्तमानातली धडपड, इनारितुनं फार फार वेगळ्या पद्धतीनं मांडली आहे.
* * *

दहा...नऊ...आठ...सात...सहा...पाच...चार...तीन...दोन...एक...धुडुम. एका विक्राळ स्फोटानिशी आगीचे मस्तवाल लोळ सोडत सुसाटत निघालेल्या रॉकेटनं आभाळ गाठलं. ढगांच्या पडद्याच्या चिंधोट्या करत मौन अवकाशाकडं निघालेल्या त्या एकुटवाण्या रॉकेटचं सारं सारं इंधन वातावरण भेदता भेदता संपेल. मग उरेल ते विशाल, अनंत अवकाश. जिथं ना जीवित. ना प्राणवायू. ना काळ. ना वेळ.
...न्यूयॉर्कच्या सेंट जेम्स थिएटरच्या ग्रीनरूमसदृश खोलीत रिग्गन थॉम्सन पद्मासनात अधांतरी बसला आहे. जवळपास विवस्त्र. अधांतरावस्थेत त्याची समाधी लागली आहे. उजवीकडच्या भिंतीवर जुनं पोस्टर लावलेलं दिसतं. रिग्गनच्या चाहत्यांनी त्याला मध्यंतरी ते भेट दिलं होतं. त्या पोस्टरवर एक बर्डमॅन दिसतोय. तो बर्डमॅन रिग्गनशी बोलतोय काहीतरी.

""लेका, ही काय माती खातोयस...? हे खरं नाही रे! आपण वीस वर्षांपूर्वी जे गारुड केलं ना, त्याच्यासमोर हे काहीच नाही. ऊठ, बंद कर ही माती खाणं. अरे, जिथं फुलं वेचली तिथं हे भिकेचे डोहाळे कशापायी लागले तुला!'' बर्डमॅन सांगतोय. रिग्गननं त्याचं अज्जिबात ऐकायचं नाही असं ठरवलं आहे. लेकाचा दरिद्री दर वेळेला असे पाय ओढतो. हे खरंय की वीसेक वर्षांपूर्वी रिग्गन थॉम्सन ही चाहत्यांमधली एक क्रेझ होती. त्यानं साकारलेला बर्डमॅन अजूनही काही लोक विसरलेले नाहीत. बर्डमॅनचे तीन सिक्‍वेल आले. काय भन्नाट स्टोऱ्या होत्या. गगनभराऱ्या घेत सुष्टांना वाचवण्यासाठी अवतरणारा दुष्टनिर्दालक बर्डमॅन. त्याच्या बोटांच्या इशाऱ्यासरशी आग लागायची. वस्तू हलायच्या.
...लोकांचं अलोट प्रेम होतं. रिग्गन थॉम्सन ऊर्फ बर्डमॅन मुद्दाम प्रेक्षागृहाच्या लॉबीत उभा राहायचा. पोरी चित्कार करत स्वाक्षऱ्या घेत. गळ्यात पडत. लोकांशी हसतमुखानं हस्तांदोलन करता करता रिग्गनचा हात सुजून येई.
""इथं काय करतोयस तू? बर्डमॅनचं चित्रपट करणं तू सोडलंस तिथंच चुकलं लेका...ही नाटकंबिटकं म्हंजे फालतू धंदा आहे. घाण वास येतो इथं सगळा...बंद कर ही भंकस!'' बर्डमॅन बोलतच राहिला; पण रिग्गननं त्याच्याकडं दुर्लक्ष केलं. हा बर्डमॅन म्हणजे कुणीही हाडा-मांसाची व्यक्‍ती नाही. आपल्याच देहात राहतो हा नतद्रष्ट. हे आपल्या भूतकाळाचं पाप आहे, पाप. यापासून मुक्‍ती हवी...

एक काळ पडदा गाजवणारा रिग्गन आता नाटकात आपलं पुनरागमन सिद्ध करायला बघतो आहे. प्रख्यात लघुकथाकार रेमंड कार्वर यांच्या "व्हॉट वी टॉक अबाऊट व्हेन वी टॉक अबाऊट लव्ह' या मस्त लघुकथेचं नाट्यरूपांतर करण्याचं त्यानं मनावर घेतलं. संहिता स्वत:च लिहिली. त्यात तो मोठी भूमिकाही करतोय आणि अर्थात दिग्दर्शनही. च्यायला, आपल्याला असा अभिनयसुद्धा येतो, हे एकदा प्रेक्षकांना सणकून दाखवायलाच हवं. हा रिग्गन वीस वर्षांपूर्वी मेला नाही म्हणावं...
रेमंड कार्व्हर हे एक इंग्लिश साहित्यातलं मोठं नाव. गेल्या शतकातलं. मद्याच्या आकंठ आहारी गेलेल्या या कलंदर साहित्यिकानं कथाविश्‍वाला नवा पैलू दिला. उमरावी साहित्याला धुडकावत वास्तवातली जीवितं आपल्या कथेतून पुढं आणली.
...पद्मासन सोडून हवेतून खाली उतरत रिग्गननं फोन उचलला. त्याची मुलगी सॅम कुठल्यातरी फ्लोरिस्टाकडं फुलं घेतेय. बापासाठीच. व्हिडिओकॉलवर ती बापाला फुलं दाखवून वैतागून म्हणतेय : ""हे चालेल का? सांग ना लवकर!''
सॅम जेमतेम अठरा-वीस वर्षांची आहे. सध्या ड्रग्जपासून मुक्‍ती मिळवते आहे. एका रिहॅब सेंटरमधून नुकतीच बापाकडं आली आहे. त्याला मदत करण्याचा अभिनय तेवढा करते. अर्थात तिला जमेल तितकाच. तिला कश्‍शातच धड इंटरेस्ट नाही. आपला बाप हा एक कालबाह्य आक्रस्ताळी कलाकार आहे, ज्याचं साधं ट्‌विटर अकाउंट नाही, तो कसला डोंबलाचा सेलिब्रिटी? असा साधासोप्पा निष्कर्ष तिनं काढलाय.

रिग्गननं फोन बंद केला आणि खालच्या मजल्यावर रंगभूमीवर आला. तिथं तालमी चालल्या आहेत. जेवणाच्या मेजावरचं दृश्‍य चालू आहे. लेस्ली, राल्फ आणि लॉरा या कलावंतांना मोजक्‍या सूचना देऊन रिग्गन थोडा वेळ थांबला. उद्यावर रंगीत तालीम येऊन ठेपली. अजून बऱ्याच मोकळ्या जागा भरायच्या आहेत. त्याच्या डोक्‍याला मुंग्या आल्या. हा राल्फ लेकाचा बथ्थड आहे, बथ्थड. चांगल्या रोलची माती करणार हा...तालमीला येतानाच त्यानं जेकला तसं सांगून टाकलं होतं ः ""जेक, या मूर्खाला बदल...नाहीतर नाटकाचा बोऱ्या वाजणार!'' जेक वैतागला होता. तो रिग्गनचा जुना मित्र, वकील, सल्लागार सगळं काही होताच. शिवाय, या नाटकाचा निर्माताही.
...नाटकाची तालीम सुरू असतानाच स्टेजच्या वरचा एक दिवा कोसळून राल्फच्या डोसक्‍यात पडला. राल्फची शुद्धच हरपली. "ऍम्ब्युलन्स बोलवा' असं ओरडून रिग्गननं जाता जाता जेकला सांगितलं की ""जेक, दिवा पडला नाही, मी पाडला! आता तो उचल आणि कुणीतरी चांगला नट बघ!''
""अरे, आता अखेरच्या क्षणी कोण धरून आणू?'' जेक अजीजीनं म्हणाला.
"" वूडी हॅरलसनसारखा बघ एखादा गुणी!'' रिग्गन.
""तो "हंगर गेम्स'चा पुढला भाग करतोय ना!!'' जेक.
""मग मायकेल फासबिंडर?'' रिग्गन.
""तो "एक्‍समेन'च्या प्रिक्‍वेलचा प्रिक्‍वेल करतोय!!'' जेक.
""मग तो जेरेमी रेनर?''रिग्गन.
""कोण?''
""तो रे...रेनरचा बच्चा..."हर्ट लॉकर'मध्ये होता बघ!'' रिग्गन.
""हां हां..तो...तो "ऍव्हेंजर'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे...'' जेक.
""च्यायचे, सगळे लेकाचे त्या भिकार** हॉलिवुडी सुपरसिनेमांमध्ये मरतायत!'' रिग्गनचं मन भडकून गेलं होतं. वेळ आणि पैसा दोन्ही कमी होतं. लेस्लीनं माइक शायनरचं नाव सुचवलं. रंगभूमीवरचा एकदम दादा माणूस. मेथड ऍक्‍टर! त्याचा वास्तववादी अभिनय बघण्यासाठी लोक नाटकांसाठी जीव टाकतात. आधुनिक रंगभूमीला बळ देणारा वगैरे अभिनेता आहे तो. त्याला घेतलं तर समीक्षक आपला बॅंड वाजवणार नाहीत, ते वेगळंच.
* * *

आश्‍चर्य म्हणजे माइक शायनरला नाटकातल्या संवादांची ओळन्‌ओळ पाठ होती. कसबी नट होता. डोळ्यांनी बोलणारा. कुठंही आवाज चढत नाही की कुठं आक्रस्ताळा अभिनय नाही...तरीही प्रभाव टाकतो चांगलाच. तालमीच्या वेळेलाच शायनरनं काही मौलिक सूचना केल्या. त्या रिग्गनला आवडल्या. रिग्गननं त्याला नाटकात घेतलं. अर्थात शायनरचे स्वत:चे असे काही लाड होतेच. त्याला सगळंच वास्तववादी हवं असायचं. या वास्तववादाच्या बैलाला...हासुद्धा वास्तववादाची पतली गली शोधून शेवटी त्या गर्दीशीच येतो ना... यालाही तो लाइमलाइट हवाच आहे. म्हणे मेथड ऍक्‍टर...माय फूट! बॅकस्टेजला लॉरानं रिग्गनला गाठलं आणि बातमी दिली : "मी प्रेग्नंट आहे.' रिग्गन कसनुसं हसला. कसनुसंच.
""तुला आनंद नाही झाला?''
""जाम...जाम आनंद झालाय!'' साला आपल्याला धड अभिनयही करता येत नाही, या विचारानं रिग्गन खचलाच. पडेल चेहऱ्यानं तो खोलीकडं निघाला. डोक्‍यात दिवा पडल्यामुळे इस्पितळात दाखल झालेला राल्फ भक्‍कम दावा ठोकणार, अशी भीती जेकनं व्यक्‍त केली. "तुझे पैसे मी भरून देईन,' असं आश्‍वासन त्याला देऊन रिग्गन सटकला.
...पहिल्या रंगीत तालमीला त्याच जेवणाच्या दृश्‍यात माइक शायनर स्टेजवर खरी जीन पिताना बघून रिग्गन खवळला. च्यायला, हा कसला यांचा वास्तववादी अभिनय? नॉन्सेन्स. त्यानं दृश्‍यातच घुसून बाटली बदलून ठेवली.
""ए, तू माझी जीन का उचललीस? मी या रोलमध्ये दारू पिणाऱ्या बेवड्याचा रोल करतोय. मला खराखुरा बेवडा हवाच. नाहीतर मी भूमिकेत कसा शिरणार? लेको, तुम्हाला अभिनय कशाशी खातात हे तरी कळतं का? कॅरेक्‍टरशी इमान राखता आलं पाहिजे साल्यांनो!
"" माइक, मी या प्रयोगात माझी जान ओततोय, तू त्याच्यावर ** नकोस!''रिग्गन भडकून म्हणाला.
""यू नो व्हॉट रिग्गन...वस्तुस्थिती ही आहे की तुला अभिनयातलं ओ की ठो समजत नाही. नुसते मुखवटे घालून भंकस पिक्‍चरांमध्ये उड्या मारून अभिनय करता येत नाही, मूर्खा! त्यात आता तुला कुत्रासुद्धा विचारत नाही गल्लीतला! तुला पुन्हा रिलेव्हंट व्हायचंय म्हणून तू हा उंटाच्या शेपटीच्या बुडख्याचा मुका घ्यायला निघालायस. रिग्गन, तू एक तिय्यम दर्जाचा नट आहेस आणि ब्रॉडवेवर नाटकं करण्याचा तुझा खटाटोप हास्यास्पद आहे...'' माइकनं ताडताड बोलत रिग्गनची इज्जत काढली. संतापलेल्या रिग्गननं जेकला ताबडतोब "माइक शायनरच्या पार्श्‍वभागावर बुटाची लाथ हाणून त्याला बाहेर घालव' असं फर्मान सोडलं. जेकनं कपाळाला हात लावला. माइक शायनरमुळे बुकिंग होतंय, ही वस्तुस्थिती त्याला कळत होती. रिग्गनची घटस्फोटित बायको सिल्विया हा तमाशा प्रेक्षागृहातून बघत होती. तिनं रिग्गनला ग्रीनरूममध्ये गाठलं. त्याच्याशी बोलून त्याचं टाळकं थोडं ठिकाणावर आणलं.
थोड्या वेळानं रिग्गननं शांत होऊन माइक शायनरला थेटराबाहेर काढलं. जवळच्या गुत्त्यात नेलं.

""हे बघ, मी सर्वस्व ओतलंय या नाटकात माइक. पुन्हा सांगतोय. तुला जितका मी गयागुजरा वाटतो, तसा नाही. बघशील तू. मी तुझ्यापेक्षा पॉप्युलर आहे, म्हणून तू जळतोस माझ्यावर. जळू नकोस असा...'' रिग्गन बोलत राहिला.
""पॉप्युलर, च्यायचे! लोकप्रियता ही प्रतिष्ठेची चवचाल चुलतबहीण असते, रिग्गन!'" सुट्ट्याचा धूर सोडत माइक शायनर बरळला.
""ऐक, मी हे नाटक का करतोय हे तू विचारत होतास ना? मग ऐक, मी लहानपणी एका नाटकात काम केलं होतं. प्रेक्षकात खुद्द रे कार्व्हर बसला होता. त्यानं नंतर चिठ्‌ठी पाठवली. "" चांगला न्याय दिलास,'' असं तीत लिहिलं होतं...ही ती चिठ्‌ठी!'' चुरगळलेला एक कागद काढून रिग्गननं भावुकपणे तो माइकसमोर धरला.
""हा हा! हा बारमधला टिश्‍यू पेपर आहे, रिग्गन! कार्व्हर मजबूत टाकून आला असणार तुझ्या प्रयोगाला! बेवडाच होता ना तो...'' माइक खदाखदा हसत दात विचकत म्हणाला. रिग्गन हताश झाला. त्याच गुत्त्यात टाबिथा नावाची नावाजलेली नाट्यसमीक्षक होती. तिच्याकडं बोट दाखवून माइक म्हणाला ः ""तुला बरे रिव्ह्यूज्‌ मिळाले तर माझ्यामुळेच मिळतील, रिग्गन...लक्षात ठेव!''
टाबिथानं जाता जाता रिग्गनला तोंडावर सांगितलं : ""तुझ्यासारख्यानं ब्रॉडवेवर लुडबुडणं म्हणजे प्रदूषण आहे रिग्गन. तुमच्या पिढीतलं कुणीच मला आवडत नाही. लोकानुनयाला सवकलेले, प्रसिद्धीचे भुकेलेले, बिघडलेल्या औलादीसारखे बहकलेले तुझ्यासारखे नट म्हणजे कलेचा मूर्तिमंत अपमान आहात. मी तुझ्या नाटकाचा बॅंड वाजवणार आहे, बघ!''
* * *

रंगीत तालमींना अर्ध्या तिकिटात येण्याची पद्धत होती. तशी गर्दी जमायची. माइक शायनरमुळे त्यात वाढ झाली. बुकिंगही फुल होत आलं होतं; पण रिग्गन अस्वस्थ होता. सगळाच प्रसिद्धीचा झोत या नालायकानं स्वत:कडं ओढला तर आपल्या पुनरागमनाचं काय, हा विचार त्याला छळत असे. त्यात प्रयोगपूर्व पब्लिसिटीवाल्यांनी मुलाखती ठरवल्या. माइक शायनरची मुलाखत पहिल्या पानावर होती आणि रिग्गन आतल्या पानात. भयंकर आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे लेखक रे कार्व्हर भेटल्याची आठवण माइक शायनरनं स्वत:चीच म्हणून दडपून सांगितली होती, त्याच्या मुलाखतीत. रिग्गनचं माथं भडकलं. त्यात भरीस भर म्हणून की काय, "बर्डमॅन'चा आवाज त्याचा पिच्छा सोडत नव्हता. "इथून नीघ. बर्डमॅनच खरा, नाटकात काही दम नाही,' असा धोशा त्या आवाजानं लावला होता; पण रिग्गन आता पुरता हट्टाला पेटला.
""रिग्गन, या शेवटच्या दृश्‍यात तू पिस्तूल झाडून घेऊन आत्महत्या करतोस असं आहे. निदान खरं पिस्तूल तरी वापर लेका! हे खेळणं वैताग आणतं मला!'' माइकनं त्याला रंगीत तालमीतच ताणलं.
...शुभारंभाची वेळ येऊन ठेपली होती. प्रयोग संपला की बर्डमॅनचा बोऱ्या वाजून अभिनेता, दिग्दर्शक, लेखक रिग्गन थॉम्सनचं नवं करिअर भरारी घेणार की यातलं काहीही न घडता "बर्डमॅन'चं भूत अधिक शिरजोर होणार? त्याची लोकप्रिय इमेज आणि माइक शायनरचा अतिवास्तववादी अभिनय यातलं कोण जिंकणार होतं?
* * *

प्रयोगाची वेळ जवळ येता येता खूप काही घडलं. रिग्गन थॉम्सननं क्‍लायमॅक्‍सच्या दृश्‍यात खरंखुरं पिस्तूल वापरलं. खरीखुरी गोळी झाडून घेतली. रंगमंचावर तो रक्‍तबंबाळ होऊन कोसळला; पण खरंच तो मेला का? बर्डमॅनचं काय झालं? रिग्गन थॉम्सनचं पुनरागमन यशस्वी झालं का? या साऱ्या विक्षिप्त खेळाचा अन्वयार्थ काय? हे सारं जाणून घेण्यासाठी "बर्डमॅन' बघावाच. या चित्रकथेचं नावच मुळी "बर्डमॅन ऑर द अन्‌एक्‍स्पेक्‍टेड व्हर्च्यू ऑफ इग्नरंस' असं लांबलचक आहे.
* * *

बर्डमॅनची गोष्ट सांगणं हे मुळात चूक. कारण ती गोष्ट नाही. जाणिवांच्या निरनिराळ्या पोतांमधलं हे नाट्य आहे. मोबाईल, सोशल मीडिया, सतत चर्चेत राहणं ह्या नव्या युगातल्या गोष्टींनी आपल्या संवेदना बदलल्या, अभिरुची बदलल्या; पण त्या तशा बदलल्या म्हणून जुन्या गोष्टी टाकाऊ होत नसतात. त्यांना कमी लेखणं चूक असतं. त्या त्या कालखंडात त्या गोष्टींचा एक रिलेव्हन्स असतो. सोशल मीडियावर अस्तित्व नसलेल्या माणसाला किंवा कलावंताला एकंदर अस्तित्वच नसतं का? त्यानं मग स्वत:चा शोध कुठल्या मार्गानं घ्यावा? की त्याच्या मुक्‍तीचे सर्व मार्ग भूतकाळात कायमचे गाडले गेले आहेत? अशा कित्येक गुंतागुंतींच्या प्रश्‍नांचा गडबडगुंडा सोडवण्याचा प्रयत्न "बर्डमॅन' करतो. अलेयांद्रो इनारितुनं ही कथा पडद्यावर साकार केली, तीही अगदी विक्षिप्त ढंगात. संहितेवर काम करताना त्याला वाटलं की, ही एक सलग कहाणी हवी. त्याला संकलनाची कात्री लागली की ती कृत्रिम होईल. सलग कॅमेऱ्यानं अडीच तास कॅरेक्‍टरांचा पाठलाग करत ही कहाणी टिपली पाहिजे. कुठंही जोडकाम दिसता कामा नये. हे प्रकरण भलतंच अवघड होतं. इनारितुचा विचार बहुतेकांना पटला नाही. ""तुझ्या पिक्‍चरचे तीनतेरा वाजणार...लिहून ठेव!' असं त्याला खात्रीनं सांगितलं गेलं; पण इनारितुचा मेंदू हा वेगळ्या धातूनं बनलेला असावा. त्यानं त्याला वाटलं तेच केलं! अवघ्या चित्रपटात फक्‍त सोळा दृश्‍यं आहेत. तीही एकसंध...""आपलं आयुष्य कुठं संकलित असतं? एकसंधच असतं ना...'' हे त्यावर इनारितुचं भाष्य होतं.
किटन या जाणत्या अभिनेत्यानं यात मध्यवर्ती रिग्गनची भूमिका साकारली. मायकेल कीटन हा पडद्यावरचा पहिला बॅटमॅन म्हणून लोक त्याला ओळखत असतील! माइक शायनरची भूमिका एडवर्ड नॉर्टन या तरण्याबांड गुणी अभिनेत्यानं केली. लेस्लीच्या रोलमध्ये नओमी वाट्‌स दिसते, तर रिग्गनच्या मुलीच्या - सॅमच्या- भूमिकेत एम्मा स्टोन आहे. जेकचा अफलातून रोल झॅक गॅलिफियानाकिसनं केला आहे. अर्थात या चित्रपटात महत्त्वाचा रोल आहे तो कॅमेऱ्याचा. एकसंध, समतान कॅमेऱ्याची कमाल दाखवली आहे सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर इमॅन्युएल ल्युबेझ्कीनं. त्यासाठी त्यांना सन 2015 चं ऑस्करचं बाहुलं मिळालं. त्या वर्षी "बर्डमॅन'नं एकंदर नऊ ऑस्कर नामांकनं मिळवली होती. चार मिळाली. एक सिनेमॅटोग्राफीला, बाकी तीन उत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन आणि पटकथेची खुद्द इनारितुच्या घरी शोकेसमध्ये ठेवली आहेत.

"बर्डमॅन' हा चित्रपट एखाद्या अमूर्त चित्रासारखा वाटतो. रंगांचे गहन फटकारे आणि त्या रंगसंगतीनं साधलेला त्याहूनही गहन उजेड काहीतरी वेगळं सांगू पाहतो. त्यातलं काही कळतं, काही नाहीच कळत; पण नाही कळलं, तरी अडत नाही. अर्थ न लागताही त्यांचं म्हणणं मनात उतरलेलं असतं. एखाद्या अमूर्त चित्रांचं प्रदर्शन बघून कलादालनाच्या बाहेर पडल्यावरची मनस्थिती वेगळीच असते. आपल्या विचारांच्या गोंधळात त्या चित्रातले रंग अलगद मिसळलेले असतात. मग खुरटलेल्या पंखांवरची नूतन वाढीव लव दिसू लागते. न जाणो, कालांतरानं या रोमांचातूनच पिसं उगवतील आणि पंख पसरून गगनात भरारी घेताही येईल.
"बर्डमॅन' बघताना उगीचच आपलं मराठी मन रंगभूमीकडं वळतं.
साठीच्या दशकात असाच एक "बर्डमॅन' आपल्याकडं होऊन गेला होता का? फूटलाइटच्या प्रकाशात त्यानं उभी केली होती की एक इंद्राची धनुकली...तिच्या सप्तरंगात सचैल ओले झाले होते मराठी प्रेक्षक. त्यानंही असंच मनातल्या "बर्डमॅन'शी पंगा घेत प्रयत्न केले होते पंख पसरण्याचे. पुन्हा पुन्हा. खोल मनाच्या तळाशी असलेलं काही वास्तववादी काळंबेरं दाखवण्याच्या भानगडीत न पडता त्या प्रसिद्धीच्या झोताचा मन:पूत आस्वाद घेत त्यानं तो लोकमान्यतेचा क्षण पुरेपूर भोगण्यात धन्यता मानली. रसिकांची दाद आणि कौतुक हा त्यालाही प्रेमाचाच आविष्कार वाटायचा; पण तिकिट काढून आलेले हेच प्रेक्षक वेळप्रसंगी ओळखही दाखवत नाहीत, हे तोही विसरला होता; किंबहुना त्या झोतामधल्या वर्तुळाबाहेर जाण्याची त्याची तयारीच नव्हती.

तोही एक बर्डमॅनच असावा. कधी तो लाल्या म्हणून झुलपं उडवत पुढं आला, ""उस में क्‍या है? कडऽऽक...!'' असं म्हणत. कधी संपातीसारखा धाकट्या भावाला पाठंगुळी घेऊन ताडताड चालत आला स्पॉटच्या प्रकाशात आणि गर्जला, ""कोण म्हणतो, शंभूराजे स्वतंत्र नाहीऽऽत...?'' कधी तो गारंबीचा बापू होता, कधी डॉ. आनंदीबाईंचा गोपाळराव...
बर्डमॅनचे पंख जळाले तरी तो पुनःपुन्हा भरारी घेतो. अभिशापाच्या मुक्‍तीसाठी युगानुयुगे वाट पाहतो. आपणही पाहावी...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pravin tokekar write article in saptarang