निरंगाचं अंतरंग! (प्रवीण टोकेकर)

pravin tokekar
pravin tokekar

तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही एक पांढरंशुभ्र पीस एका झुळकीसरशी तरंगत तरंगत येऊन तुमच्या खांद्यावर येऊन बसतं. तुम्ही ते हळुवारपणे उचलता. हलेकच ते आंजारता-गोंजारता. आपल्याजवळच ठेवून देता. "फॉरेस्ट गम्प' हा चित्रपट म्हणजे असंच एक शुभ्र, निरंगी पीस आहे...हे पीस तरल संवेदनांनिशीच पाहिलं पाहिजे.

कहाण्या हा माणसाच्या सांस्कृतिकतेचा एक अभिन्न हिस्सा आहे. ज्या माणसाला भरपूर गोष्टी ठाऊक असतात, तो आपोआप थोडा शहाणाच असतो. शेकडो गोष्टी तोंडपाठ असलेलं माणूस म्हणजे भलाईचं फूलच. त्याच्याकडला खजिना आपण ओंजळीओंजळीनं उचलायचा...मग आपणसुद्धा शहाणे होऊ. गोष्टी जमा होत गेल्या म्हणून तर मानव उत्क्रांत होत गेला. माणसाच्या प्रगल्भतेचा इतिहास हा त्याच्या गोष्टी जमा करण्याचा इतिहास आहे. या गोष्टींच्याही कितीतरी परी! एखादी चौकस शोधकथा असते. दुसरी निरागस परिकथा, तिसरी वाऱ्यावरच्या म्हातारीसारखी इतस्तत: उडणारी लोककथा. चष्मिष्ट अंगकाठीची विज्ञानकथा असो, काळ्या पोशाखातली सावलीसारखी बिनचाहुलीची गूढकथा असो किंवा अध्यात्म वा भक्‍तिमार्गाचं गंध लावून आलेली पौराणिक कथा असो...साऱ्यांचा हेतू तोच. माणसाला आणखी थोडं शहाणं करणं.

काही काही कहाण्या मनावर फार खोल परिणाम करून जातात. काहींचा स्वभाव थोडा उग्र असतो, त्या थेट घायाळ करतात. काही गोष्टींची मधुर चव जिभेवर रेंगाळते. काहींचं मार्दव दीर्घ काळ दरवळत राहतं मनात. काही कथांची कथाच वेगळी. त्या कहाण्या नसतातच. त्या असतात एक सुंदर संस्कार.
- "फॉरेस्ट गम्प' या चित्रपटाची कहाणी ही अशीच. ज्यानं ऐकली त्याचं सोनं झालं.
विनोद, योगायोग, निरागस हास्य अशा हलक्‍याफुलक्‍या घटकांनी बनलेली ही कहाणी एक रोकडा संस्कार करून जाते. फॉरेस्ट गम्प आवडला नाही, असा रसिक बहुधा माणसांच्या जगात नसणार. अगदी खात्रीनं!
कोण आहे हा फॉरेस्ट गम्प? हे कुठलं नाव? कुठलं गाव?
अमेरिकेतल्या अलाबामामध्ये राहणारा हा फॉरेस्ट गम्प आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर आपल्याला भेटलेला असतो. उभ्या उभ्या असेल; पण भेटलेला असतोच. जगण्याच्या धांदलीत आपण त्याला पारखे होत जातो, हे खरं सत्य आहे. खांद्यावर हलकेच उतरलेल्या पांढऱ्याशुभ्र पिसासारखी त्याची कहाणी येते. तिचा आवाज नाही होत. ज्यांचं लक्ष त्या पिसाकडं गेलं, त्यांनी ते चिमटीत उचलावं आणि अलगद आपल्या खास वहीच्या पानात आयुष्यभर दडवून ठेवावं. प्राणापलीकडं जपावं. ज्याचं लक्ष नाही, त्याच्या खांद्यावरून ते पीस उडालंच म्हणून समजा.
- फॉरेस्ट गम्प हा नितांतसुंदर चित्रपट सन 1994 मध्ये येऊन गेला होता. म्हणजे आता त्यालाही पंचवीसेक वर्ष झाली. नव्वदीच्या दशकात नव्या उमेदीनं, नव्या दृष्टीनं जगाकडं बघू लागलेल्या तरुण पिढीपैकी ज्यांनी फॉरेस्ट गम्प पाहिला असेल, ती पिढी आता पन्नाशीला आली. तरीही फॉरेस्ट गम्पच्या कहाणीनं त्यांची साथ सोडली नसेल. पैज! माणसाला "चांगलं' बनवणाऱ्या काही अद्भुत गोष्टी असतात ना, त्यापैकी ही एक आहे.
वास्तविक ही सन 1986 मध्ये विन्स्टन ग्रूम यांनी लिहिलेली कहाणी. "फॉरेस्ट गम्प' याच नावाची. टॉम हॅंक्‍सनं साकारलेला फॉरेस्ट गम्प बघितल्यावर आंतर्बाह्य ढवळून गेलेला रसिक या पृथ्वीतलावर नसेल. कधीही, कुठंही चुकवू नये असा हा चित्रपट मनाच्या कुठल्याही अवस्थेत बघावा. कितीही वेळा बघावा. दरवेळी तो एक नवं, शुभ्र पीस अलगद तुमच्या सदऱ्यावर उतरवतो.
* * *

ते वर्ष होतं बहुधा सन 1981. किंवा सत्तरीच्या दशकातलंही असेल. काय फरक पडतो? जॉर्जियातल्या सॅव्हानातली एक छान सकाळ होती. चकचकीत, निर्मनुष्य रस्त्याच्या कडेला एका विशाल वृक्षाखालच्या बाकावर फॉरेस्ट गम्प बसला आहे. आहे तसा तरुणच. छान कपडे घालून आलाय. दोन्ही बाजूंनी सफाचट चप्पी. बारीक केस. किंचित अवघडलेली नजर. ओठांवर विनाकारण रुळणारं खुळचट स्मित; पण कमालीचा निरागस चेहरा. अगदी छोट्या मुलासारखा निवळशंख. निष्पाप.
डाव्या हाताला त्यानं आपली चिटुकली; पण छानशी सूटकेस ठेवली आहे. तो बसची वाट पाहतोय अर्थात. आज त्याला जेनी भेटणार आहे...जेनी. म्हणून तर फॉरेस्ट गम्प मधूनच गोड हसतोय.
...तेवढ्यात वाऱ्यावरती उडत उडत आलेलं एक शुभ्र पीस हलकेच त्याच्या बुटाशी उतरलं. फॉरेस्टनं ते हलकेच उचललं. बॅग उघडून "क्‍युरिअस जॉर्ज'चं कॉमिक बुक काढून त्यात ते नीट ठेवलं.
एक बस आली, निघून गेली. एक बाई आल्या, बसल्या.
"" माय नेम इज फॉरेस्ट गम्प...लोकही मला फॉरेस्ट गम्प म्हणतात. चॉकलेट खाणार? माझी आई म्हणायची की आयुष्य चॉकलेटच्या खोक्‍यासारखं असतं. कुठल्या फ्लेवरचं चॉकलेट तुमच्या हातात येईल, काही सांगता नाही येत...'' फॉरेस्ट गम्प त्याची गोष्ट सांगू लागला. बाकड्यावरचे सोबती बदलत गेले; पण फॉरेस्ट गम्पला त्याची कुठं काय पडली होती? तो उत्साहानं सांगत राहिला आपली कहाणी...ऐका, नाहीतर...नका ऐकू.
* * *

-फॉरेस्ट गम्पचं बालपण तसं फारसं बरं नव्हतं. अलाबामातल्या ग्रीन्सबो नावाच्या एका गावात तो राहायचा. साधंच पण प्रशस्त घर होतं. त्याच्यावर जीव पाखडणारी आई होती. मम्मा त्याला खूप काय काय समजावून सांगायची. फॉरेस्ट डोक्‍यानं थोडा अधू होता. पायानंही अधू होता. त्याच्या मणक्‍यात काही प्रॉब्लेम होता म्हणे. बदकासारखा फेंगडा चालायचा. त्याचा बुध्यंक 75 पेक्षा जास्त नाही, असं शाळेतल्या मास्तरांनी सांगितलं होतं. बुध्यंक 75 म्हणजे अगदीच काठावरची बात. इतर चंट पोरांना जे पटकन कळायचं ते फॉरेस्टला कळायला जाम वेळ लागायचा. अशा अर्धुकल्या पोरावर मम्माचा जीव असणारच ना! ती सदोदित त्याच्या काळजीत खंगणारी.
नाथन बेडफोर्ड फॉरेस्ट म्हणून यादवी युद्धातले एक महानायक होते. त्यांची आठवण म्हणून म्हणे त्याचं नाव फॉरेस्ट ठेवलं...म्हणजे असं मम्मा सांगायची. फॉरेस्ट तर फॉरेस्ट. आपल्याला काय?
शेजारी जेनी राहायची. जेनी...खूप गोड मैत्रीण. एकदा स्कूल बसमध्ये भेटली. दोस्ती झाली ती झालीच. फॉरेस्टच्या फेंगड्या पायांना ब्रेसेस लावलेले होते. पार जाडजूड बुटातून स्टीलच्या पट्ट्या कमरेपर्यंत यायच्या. पाय आवळून सरळ धरायच्या. तश्‍शातही फॉरेस्ट गम्प न कुरकुरता चालायचा. जेनी त्याला सोबत करायची. घराभोवतीची शेतं, लांब लांब घरं, लांबच लांब शाळा, दूरवरचे पक्षी...फॉरेस्ट गम्प विनातक्रार मम्माच्या सावलीत सरळ रेषेत जगत होता.
...पण आयुष्य इतकं सरळ रेषेत कुठं असतं कुणाचं? फॉरेस्ट गम्पची आयुष्यरेषा तर काहीच्या काहीच वाकडीतिकडी. त्याच्या त्या पायांसारखी.
शाळेतली पोरं त्याची टेर खेचत. "ए लंगड्या', "ए बदक्‍या,' "धावून दाखव रे, ए रेम्याडोक्‍या...' फॉरेस्ट तेही हसतमुखानं सहन करायचा. माणसानं चांगलंच वागलं पाहिजे. हो...ना?
स्कूल बससाठी एकटा उभ्या असलेल्या फॉरेस्टला डोरोथी हॅरिसनं विचारलं ः ""येतोस ना बाळा वरती?''
""मम्मानं सांगितलंय की अनोळखी माणसाबरोबर बसमधून जायचं नाही!'' फॉरेस्टनं खरं काय ते सांगून टाकलं.
""अरेच्चा...पण ही तर स्कूल बस आहे ना बाळा?'' डोरोथीनं समजून-उमजून विचारलं.
""मी फॉरेस्ट गम्प...तुमचं काय नाव?''
""मी डोरोथी हॅरिस!''
""चला, आता कुठं आपण अनोळखी आहोत? येतो!'' असं म्हणत फॉरेस्ट बिनधास्त बसमध्ये चढला. हात्तीच्या! एवढं सोप्पं उत्तर होतं की या समस्येवर...
...पण आयुष्य इतकी सोप्पी उत्तरं काढत जगता येत नाही.
* * *

शाळेतून परत येत असताना टारगट पोरांनी फॉरेस्टला गाठलं. दगड मारले. सोबतीला चालत येणारी जेनी ओरडली ः ""रन फॉरेस्ट रन...रन फॉरेस्ट रन...रन फॉरेस्ट रन...' फॉरेस्ट फेंगडी पावलं टाकत पळत सुटला. हृदयात आग भडकली. पायात वादळ गरगरलं. पायातले ब्रेसेस खळाखळा तुटून पडले आणि वाऱ्याच्या वेगानं फॉरेस्ट दौडत निघाला. दौडतच राहिला...दौडतच राहिला.
तसाच काळही दौडत होता. फॉरेस्ट मोठा होत होता. एकदा त्याला एक ट्रकवाला माणूस भेटला. मस्तमौला होता. गिटारबिटार वाजवणारा. झोकदार गाणी म्हणणारा. फॉरेस्ट गम्पचं निरागस नाचणं त्याला बेहद्द आवडलं. पायात दोष असणारा फॉरेस्ट उगाच पार्श्वभाग हलवत जागच्या जागी ढिंच्यॅक नाचायचा. ट्रकवाला हसून हसून बेजार झाला. त्यानं त्याची नाचाची स्टाइल उचललीच.
पुढं हाच ट्रकवाला एल्विस प्रिस्ली म्हणून महासितारा झाला म्हणे.
वय वाढलं. जग बदललं; पण फॉरेस्ट गम्प दौडतच राहिला. दौडता दौडता सरळ अमेरिकन फुटबॉलच्या सामन्याच्या मैदानातून दौडत गेला. मागचे राहिले मागे! त्याच्या धावण्याच्या कसबामुळेच त्याला स्कॉलरशिप मिळाली. वाहवा मिळाली. काही थोडेफार चाहतेही मिळाले.
विद्यालयातलं शिक्षण पुरं करता करता त्यानं सैन्यभरतीत नाव नोंदवलं. तिथंही तो सिलेक्‍ट झाला आणि गेला थेट व्हिएतनामच्या अक्राळविक्राळ युद्धभूमीत. युद्धप्रशिक्षणातही त्यानं कसब दाखवलं.
ड्रिल सार्जंट : ""गम्प! लष्करात येण्याचा तुझा उद्देश काय?''
गम्प : ""तुमचं ऐकणं, ड्रिल सार्जंट!''
ड्रिल सार्जंट : ""डॅम इट, गम्प! यू आर जीनिअस...एवढं बेस्ट उत्तर कुणीच दिलं नव्हतं!''
...वरिष्ठांचे बिछाने घालून देणं, ताठ उभं राहणं आणि वरिष्ठांच्या प्रत्येक वाक्‍यानंतर "येस, ड्रिल सार्जंट' असं म्हणणं यात काय अवघड होतं?...असा फॉरेस्ट गम्पचा सवाल होता.
व्हिएतनाममध्ये फॉरेस्ट गम्पला जिवाभावाचा दोस्त मिळाला. त्याचं नाव बुब्बा ब्लू. कृष्णवर्णीय होता; पण आपल्या दोस्तासाठी जीव टाकणारा. "व्हिएतनाम युद्धानंतर आपण कोळंबी पकडायचा धंदा करू या,' असं तो फॉरेस्टला म्हणे; पण युद्धात गोळीबाराच्या वर्षावात, नापाम बॉम्बच्या स्फोटात फॉरेस्टचा हा एकुलता एक मित्र मारला गेला. त्या युद्धात फॉरेस्ट गम्पनं कित्येक साथीदारांना वाचवलं. मृत्यूच्या दाढेतून ओढून आणलं. अगदी आपला कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट डॅनियल टेलरलाही. डॅनचे दोन्ही पाय युद्धात निकामी झाले आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात फॉरेस्ट गम्पच्या पार्श्वभागात गोळी लागली.
युद्ध संपलं. फॉरेस्ट गम्पला शौर्यपदक मिळालं. तो दौडतच राहिला...दौडतच राहिला.
* * *

पार्श्वभागात गंभीर जखम झाल्यावर फॉरेस्ट गम्पला पिंगपॉंग खेळायची संधी मिळाली. पिंगपॉंग म्हणजे आलं ना लक्षात? आपलं टेबल टेनिस. तर एकाच जागी उभं राहून, चित्त एकाग्र करून, नजर रोखून फॉरेस्ट गम्पनं त्या खेळात भलतंच प्रावीण्य दाखवलं. तेव्हा नेमकी अमेरिका आणि चिनी सरकारांची "पिंगपॉंग डिप्लोमसी' सुरू होती. म्हणजे दोन्ही देशांचे खेळाडू मैत्रीपूर्ण लढती खेळत. त्या लढतींमध्ये फॉरेस्ट गम्प खेळला. त्याला वलय प्राप्त झालं. इतकं की टेबल टेनिसच्या बॅटी बनवणाऱ्या एका कंपनीनं त्याला पंचवीस हजार डॉलर्सचं मानधन देऊन आपला ब्रॅंड ऍम्बॅसिडर नेमलं. फॉरेस्ट गम्पनं आपल्या दिवंगत मित्राला, बुब्बाला दिलेल्या शब्दाखातर एक मासेमारी बोट विकत घेऊन टाकली. दोन्ही पाय गमावलेला लेफ्टनंट डॅन मासेमारीच्या या कामात सहभागी झाला.
""लेफ्टनंट डॅन, तुम्ही इथं कसे?'' गम्प म्हणाला.
""मलाही समुद्रात पाय मारायचेत!'' लेफ्टनंट डॅन म्हणाला.
""पण तुम्हाला कुठं पाय आहेत?'' गम्प.
""माहितीये मला लेका; पण तूच मला पत्र पाठवून बोलावलंस ना?'' वैतागून लेफ्टनंट डॅन म्हणाला.
...फॉरेस्ट गम्पच्या बोटीचं नाव "जेनी' होतं. समुद्रात घोंघावणाऱ्या "कारमेन' चक्रीवादळात "जेनी' तग धरून तरंगत राहिली. बाकीच्या बोटी बुडाल्या. फॉरेस्ट गम्प आणि लेफ्टनंट डॅनला अफाट अफाट कोळंबीचा साठा मिळाला. किंमतही चांगली आली. एका रात्रीत दोघंही कोट्यधीश झाले.
निम्मा पैसा फॉरेस्ट गम्पनं दिवंगत बुब्बाच्या आईला देऊन टाकला. आता तिला चार घरी धुणी-भांडी करावी लागणार नाहीत, याचा त्याला झालेला आनंद अब्जावधी मोलाचा होता. फॉरेस्ट गम्पनं चालवलेल्या पैशाच्या वाटावाटीत संपत्तीची वाट लागू नये म्हणून उर्वरित पैसा लेफ्टनंट डॅननं त्याच्या नावे शेअर्समध्ये गुंतवला. तेव्हा "ऍपल कॉम्प्युटर्स' नावाची कंपनी जोर धरू लागली होती. त्यात डॅननं पैसे गुंतवले. फॉरेस्टला त्यातलं काही कळत नव्हतं. ऍपल कंपनीला तो फळभाज्या विकणारी कंपनी समजायचा. देवदूतासारखं वागणाऱ्याला देवही सांभाळत असतो...आणि दैवही! फॉरेस्ट गम्पची आर्थिक चिंता कायमची मिटली.
...आता त्याला जेनीची आठवण येऊ लागली. तशी ती भेटलीही. तिच्या आयुष्याची रेषा मात्र पार उलट्या दिशेनं गेलेली. ती हिप्पी झाली होती. आयुष्याचं गणित बिघडून गेलेलं. तिचंही लहानपण डागाळलेलं. मारकुटा, भयानक बाप आणि लहान वयात नको त्या अनुभवांना निमूट सामोरं जाण्याची नियती. जेनी विस्कटून गेली होती. तिनं फॉरेस्टला व्हिएतनामचे अनुभव विचारले.
""व्हिएतनाममध्ये घाबरला होतास ना?''तिनं विचारलं.
""खरं म्हणजे नाही...खूप काळ पडून झाल्यावर पाऊस थांबायचा. आभाळ निरभ्र व्हायचं. ताऱ्यांचा खच दिसायचा. समोरच्या तळ्यात त्याचं प्रतिबिंब पडायचं. वाटायचं, इथं तर दोन दोन आभाळं आहेत. रेताड जागी असलो तर सूर्योदयाच्या वेळी स्वर्ग आणि पृथ्वी यातलं अंतरच कळायचं नाही...'' फॉरेस्ट गम्पचा दुर्दम्य आशावादी, आपुलकीचा सूर वर्णन करत होता.
""वॉव...किती सुंदर! मी असायला हवी होते रे'' जेनी स्वप्नाळू सुरात म्हणाली.
""तू होतीस ना...तू होतीस!''
जेनीचा बालमित्र आहे तसाच होता. निरागस. निष्कपट. आनंदी. दु:खालाही सुखाचा किनारा देणारा. याला कोण खुळा म्हणेल? याच्यात तर जगातलं सगळं शहाणपण भरलं आहे.
-फॉरेस्टनं तिला विचारलं ः ""माझ्याशी करशील लग्न? मी चांगला नवरा होईन!''
""नको करूस माझ्याशी लग्न!'' ती दुखावून म्हणाली.
""का? तू माझ्यावर प्रेम का करत नाहीस?'' फॉरेस्टच्या निर्मळ वाक्‍यानं जेनीला भडभडून आलं. ती काहीच बोलली नाही.
""मी काही स्मार्ट माणूस नाही, कबूल, जेनी...पण प्रेम म्हणजे काय हे मला कळतं..!''
...आयुष्यभर मी तुझीच राहीन असं सांगून जेनी त्याच्या कुशीत शिरली. रात्रीचे रंग गडद होत गेले. निर्मळ स्वभावाच्या फॉरेस्टवर प्रेमाचा धुवॉंधार वर्षाव करत एखाद्या पहाटेसारखी जेनी निघून गेली.
जेनीच्या पुन्हा दुरावण्यामुळे हादरून गेलेल्या फॉरेस्ट गम्पला काय करावं हे कळेना. त्याला काय येत होतं? धावता येत होतं फक्‍त. मग तो धावला. छाती फुटेपर्यंत धावला. आख्खा अलाबामा धावला.
...तीन वर्षं, दोन महिने, 14 दिवस आणि 16 तास तो धावत होता. शेवटी थांबला आणि एवढंच म्हणाला ः ""मला आता कंटाळा आला... मी घरी जातो!''
* * *

खूप दिवस गेले. महिने. वर्षं. मग जॉर्जियातल्या बाकड्यावर फॉरेस्ट गम्प उत्साहानं येऊन बसला. आज जेनी भेटणार होती...तशी ती भेटली. सोबत एक चिमुरडं पोरगं होतं. जेनी हटली होती. आजारी दिसत होती. तिला कसला तरी भयंकर रोग झालाय असं ती म्हणाली. ती बहुधा एचआयव्ही बाधित होती.
""हा माझा मुलगा...त्याचंही नाव फॉरेस्ट आहे!'' ती हसून म्हणाली.
""अरेच्चा, कसं काय?''
""कारण, त्याच्या वडिलांचं नावही फॉरेस्टच आहे!'' ती खट्याळपणाने म्हणाली.
""कमालच झाली!'' खरं तर फॉरेस्ट गम्पच्या निरागसपणाचीच ती कमाल होती.
""गाढवा, तूच त्याचा बाप आहेस...'' ती म्हणाली.
...जेनी काही दिवसांतच मरणार आहे, हे माहीत असूनही फॉरेस्ट गम्पनं तिच्याशी लग्न केलं. पोराचा सांभाळ केला. पुढं घडलं त्याला कहाणी म्हणायचं की कविता? अनुभूती की संवेदना? तुम्हीच ठरवा. एका वेगळ्याच उंचीवर आपल्याला नेऊन ठेवणारी ही गोष्ट संपते तेव्हा ओठांवर हसू असतं. डोळ्यात आसवं असतात आणि मन खूप खूप तृप्त असतं. अस्वस्थ करणाऱ्या कहाण्या चिक्‍कार असतात; पण तृप्तीचा क्षण देणाऱ्या अशा गोष्टी दुर्मिळच.
* * *

-फॉरेस्ट गम्प ही व्यक्‍ती नाही. ती एक सुंदरशी, हवीहवीशी ऊर्मी आहे. वय आणि अनुभवाच्या रानात हातातून निसटून जाणारं निरागस असं काहीतरी आहे. फॉरेस्ट गम्पच्या हातात आपलं बोट द्यायचं नसतं. त्याचं बोट आपल्या मुठीत घेऊनच त्याची कहाणी ऐकायची किंवा पाहायची. त्यात खरं शहाणपण आहे. आधी म्हटलं तसं हे वाऱ्यावर हिंडणारं शुभ्ररंगी पीस आहे. हल्लकफूल. खळखळून हसणारं. स्वागतशील आणि विशुद्ध.
विन्स्टन फ्रान्सिस ग्रूम नावाचे अमेरिकी लेखक आहेत. अलाबामातच राहतात. आता पाऊणशे वय झालेल्या ग्रूमसाहेबांनी 1986 मध्ये फॉरेस्ट गम्पची गोष्ट लिहिली. तेव्हा ती विशेष गाजली नव्हती; पण रॉबर्ट झेमेकिस या प्रतिभावान दिग्दर्शकानं कॉम्प्युटर ग्राफिक्‍सचा अप्रतिम वापर करत ती कहाणी पडद्यावर आणली. या चित्रपटाला सहा ऑस्कर पुरस्कार मिळाले आणि ग्रूमसाहेबांच्या दुर्लक्षित कहाणीच्या कोट्यवधी प्रती खपल्या. झेमेकिसनं या चित्रकथेत एल्विस प्रिस्लीला जिवंत केलं. जॉन एफ. केनेडी, फॉरेस्ट गम्पसोबत जिवंत दाखवले. रिचर्ड निक्‍सन, लिंडन जॉन्सन हे राष्ट्राध्यक्ष चक्‍क चित्रपटाच्या कथेत सुसंगतपणे दिसले. त्यांनी कहाणीतले संवादही म्हटले. सन 1994 मध्ये हे एक आश्‍चर्यच मानलं गेलं. झेमेकिसनं चित्रपटासाठी कादंबरीत खूप बदल केले. पहिली अकराच प्रकरणं तेवढी घेतली. शिवाय, इतरही व्यक्‍तिरेखा बदलल्या. अधिक धारदार केल्या. वास्तविक सॅमी एल. डेव्हिस नामक एका माजी सैनिकाच्या जीवनावर ढोबळमानानं बेतलेली ही कहाणी होती. विशेषत: व्हिएतनाम युद्धाची पार्श्‍वभूमी...ते या कहाणीचे प्रेरणास्थान होते, असं म्हणता येईल. टॉम हॅंक्‍सनं या चित्रपटात साकारलेली फॉरेस्ट गम्पची भूमिका जगभरातील रसिकांची मानवंदना घेऊन गेली. हॅंक्‍सच्या अभिनयाची उंची काय आहे, हे दाखवणारा हा चित्रपट आजही हॅंक्‍सच्या चाहत्यांचा अभिमानबिंदू मानला जातो. सॅली फील्डनं फॉरेस्ट गम्पची आई साकारली होती. तिला बघूनच आईची आठवण यावी अशी...

कॉनर्स हम्फ्रीज या कोवळ्या अभिनेत्यानं लहानपणीचा फॉरेस्ट गम्प साकारला आहे. तो टॉम हॅंक्‍सच्या तोडीचा आहे. रॉबिन राइट या नवख्या अभिनेत्रीनं पेश केलेली जेनी क्‍युरान प्रभावी आहे. मायकेल्टी विल्यमसनचा "बुब्बा ब्लू' किंवा लेफ्टनंट डॅन टेलर साकारणारा गॅरी सायनेसी यांच्या सहायक भूमिका कहाणीत गडद रंग भरतात.
ऍलन सिल्वेस्त्रीचं संगीत हे फॉरेस्ट गम्पचा एक अविभाज्य अंग आहे. या चित्रपटासाठी सिल्वेस्त्रीनं दिलेलं संगीत प्रेक्षकावर अक्षरश: गारुड करतं. त्यांनी रचलेल्या सिंफनीज्‌ आणि अन्य रचना आजही अनेक नावाजलेल्या वाद्यवृदांमध्ये वाजवल्या जातात. पियानोची ती तरंगफुलं चित्रपट संपला तरीही तासन्‌तास मनात फुलत आणि मिटत राहतात. ही सिंफनी खरं तर आपापल्या जवळ ठेवावी. संधी मिळेल तेव्हा डोळे मिटून ऐकत पडावं. मन कसं भरून जातं. त्या सुरावटींचं एक शुभ्र पीस हलकेच तुमच्या खांद्यावर उतरतं. वाऱ्याची दुसरी झुळूक येण्यापूर्वी डोळे उघडा आणि उचला ते पीस.
-मनाच्या कुपीत निगुतीनं जपून ठेवाव्यात अशा गोष्टी खूप दुर्मिळ असतात. त्या बव्हंशी फुकट असतात, हे एक बरं आहे. उदाहरणार्थ, हे एक निरंगी पीस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com