बाप से बेटा सवाई...! काबिल वारसदार: मायकल डग्लस!

आज हॉलिवुडमध्ये डग्लस घराण्याचा दबदबा आहे. या घराण्याच्या तीन पिढ्या चंदेरी दुनियेत ठामपणे आपला खानदानी झेंडा रोवून उभ्या आहेत.
michael douglas
michael douglassakal

मायकेल डग्लस आणि त्याची बायको कॅथरिन झिटा जोन्स हे दाम्पत्य नव्हेंबरात गोव्यात येईल. भारतानं देऊ केलेला सन्मानाचा सत्यजित राय पुरस्कार स्वीकारेल. केवळ ही घटना घडणार, म्हणून आतुर झालेल्या हिंदी चित्रसृष्टीतल्या अनेक ताऱ्यासिताऱ्यांनी आपापले फॅशन डिझायनर एव्हाना गाठले असतील.

डग्लस आणि कॅथीच्या समोर जाणं हा काही जोक नाही. प्रत्यक्ष जितंजागतं हॉलिवुड गोव्याच्या भूमीवर अवतरणार आहे. डग्लस खानदानाची एक फांदी भारतीय भूमीवर वाकली, हेच मोठं कौतुक. डग्लस घराण्याचा कुलदीपक येतोय. गुढ्यातोरणं उभारायला हवीत.

माणसांचे तीन टाइप असतात, असं सोयीसाठी म्हणूया. एक प्रकार शून्यातून विश्व उभं करणाऱ्यांचा. विपरित परिस्थितीत यांचं जीवन मुशीतल्या सोन्यासारखं तावून सुलाखून येतं आणि आपल्या अंगभूत तेजानं सोनसळेसारखं झळकतं. त्यांना आपला प्रणाम असो.

दुसरा प्रकार, ‘दैव देतं आणि कर्म नेतं’, असं म्हणायला लावणाऱ्यांचा. अशा अनेक छोट्या-मोठ्या कहाण्या आपल्याला आसपास दिसत असतात. बापानं गडगंज ठेवलेलं असताना, शेतीवाडी फुंकून मोटारसायकली उडवत गावभर उंडारणाऱ्या एखाद्या बाप्याला पुढे नाक्यावरला पानवालाही उभा करीनासा होतो. हा काहीसा कर्मदारिद्र्याचा प्रकार आहे. यांनाही आपलं वंदन असो.

काही लोक मात्र अगदी याच्या उलट गोष्ट रचतात. वडलार्जित संपत्ती सांभाळतात. बापजाद्यांच्या स्वयंप्रकाशी कर्तृत्वाला आपल्या कर्तबगारीचं कोंदण देतात. वडलार्जित संपत्तीतही आणखी भर घालून ठेवतात. घराण्याचं नाव राखतात. हे पाणीच वेगळं आहे, याची पदोपदी जाणीव करून देतात. ही गुणसूत्रांची कमाल सगळ्यांनाच नाही दाखवता येत. बरेचसे दुसऱ्या प्रकारातले- ‘दैव देतं, कर्म नेतं’वाले. मायकेल कर्क डग्लस मात्र तिसऱ्या प्रकारचा गृहस्थ निघाला.

आज हॉलिवुडमध्ये डग्लस घराण्याचा दबदबा आहे. या घराण्याच्या तीन पिढ्या चंदेरी दुनियेत ठामपणे आपला खानदानी झेंडा रोवून उभ्या आहेत. मायकेलचे पिता कर्क डग्लस हा या घराण्याचा मूळ पुरुष. मायकेल त्याचा सुपुत्र. आता कॅमेरॉन आणि डिलॅन डग्लस ही पुढली पिढी आली आहे. हे थोडंफार आपल्याकडल्या कपूर खानदानासारखंच.

कर्क डग्लस हे हॉलिवुडमधलं एक मिथक आहे. चित्रपट जेमतेम बोलू लागला होता, तेव्हापासून तहत आत्ता आत्तापर्यंत कर्क डग्लस कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी २०२० च्या फेब्रुवारीत कर्क डग्लस गेले, तेव्हा ते १०३ वर्षांचे होते. इझुर डॅनियलोविच हे त्यांचं खरं नाव. मूळ बेलारुसचे यहुदी. भंगारवाल्याचं हे पोर दरदर की ठोकरें खात हॉलिवुडला पोचलं आणि महानायक झालं. त्यांचं ‘रॅगमॅन्स सन’ नावाचं सुंदर आत्मचरित्र आहे. या ऐश्वर्यवान माणसानं भूतकाळात काय भोगलं आहे, हे वाचताना हृदय फाटतं.

पण आपल्याला कर्क डग्लसशी नाही, तर त्यांच्या पोराशी कर्तव्य आहे- मायकेलशी. त्याला यंदाच्या गोव्यात होणाऱ्या इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मानाचा सत्यजित राय पुरस्कार देण्यात येणार आहे. मायकेल डग्लस स्वत:च अवघा ७९ वर्षांचा आहे. ऐंशीच्या उंबरठ्यावरचा हा तरुण कितीही कर्तबगार असला तरी त्याला ‘अहो-जाहो’ असं संबोधणं जड जातं. कारण आपण पडलो, सारे चित्रपटांचे वेडे. आपल्या हिरो लोकांना आदरार्थी संबोधण्याचे संस्कारच आपल्यावर नाहीत.

मायकेल डग्लस आणि त्याची (एकेकाळची) रुपसुंदरी बायको कॅथरिन झिटा जोन्स हे दाम्पत्य नव्हेंबरात गोव्यात येईल. भारतानं देऊ केलेला सन्मानाचा सत्यजित राय पुरस्कार स्वीकारेल. केवळ ही घटना घडणार, म्हणून आतुर झालेल्या हिंदी चित्रसृष्टीतल्या अनेक ताऱ्यासिताऱ्यांनी आपापले फॅशन डिझायनर एव्हाना गाठले असतील. डग्लस आणि कॅथीच्या समोर जाणं हा काही जोक नाही. प्रत्यक्ष जितंजागतं हॉलिवुड गोव्याच्या भूमीवर अवतरणार आहे. डग्लस खानदानाची एक फांदी भारतीय भूमीवर वाकली, हेच मोठं कौतुक.

हॉलिवुडमध्ये राहूनही ही दोघं गेली तेवीस वर्षें एकत्र आहेत, हेच अनेकांना मोठं कर्तृत्व वाटेल, पण त्यासाठी त्याला हा पुरस्कार दिला जाणार नाही! मायकेल डग्लस हा एक गुणी नट आहे, त्याहूनही चांगला दिग्दर्शक आहे आणि त्यापेक्षाही सरस निर्माता आहे, हे एव्हाना साऱ्यांना पटलंय, म्हणून सत्यजित राय यांच्या नावाचा पुरस्कार त्याला मिळतोय.

खरं सांगायचं तर ‘कर्क डग्लसचा मुलगा’ येवढ्या ओळखीवर त्याला उभं आयुष्य रेटून नेता आलं असतं. लॉस एंजलिसच्या पार्ट्यांना हजर राहता आलं असतं. आलिशान गाड्यांमधून भन्नाट पळता आलं असतं. कोकेनादी मादक पदार्थांच्या नशेत मजेत डुंबता आलं असतं. घर-दार सगळं काही होतं, पण यातलं मायकेलनं काहीच केलं नाही. म्हणजे तारुण्यातली जी काही मजा तरुण करतात, ती केली.

पण तेवढ्यापुरतीच. किमान एक घटस्फोट, एक जीवघेणा अपघात, एकतरी बारका गुन्हा, एकदा तरी व्यसनमुक्ती केंद्राची वारी... हे अमेरिकेतल्या तारापुत्रांच्या करिअरसाठी अनिवार्य घटक आहेत! मायकेल डग्लसने हे सगळं व्यवस्थित केलं. पण सोबत उत्तम अभिनय केला, उत्कृष्ट निर्मितीचे पुरस्कारही कमावले आणि चांगलं वागूनही दाखवलं.

खूप वर्षांपूर्वी, १९७५ मध्ये एक नितांतसुंदर चित्रपट येऊन गेला होता. त्याचं नाव होतं- ‘वन फ्ल्यू ओव्हर ककुज नेस्ट’ ‘कोकिळेच्या घरट्यावरून उडणारा’ हा संप्रती अवतार अवघ्या चित्ररसिकांचंही डोकं फिरवून गेला. जॅक निकोल्सननं त्यातल्या रँडल मॅकमर्फी या मध्यवर्ती भूमिकेत जान ओतली होती.

उत्कृष्ट अभिनेत्याची ऑस्करची बाहुली त्यावर्षी त्याच्या कुशीत होती. हा चित्रपट मायकेल डग्लसनं निर्माण केला होता. त्यासाठी वडील कर्क डग्लस यांच्याकडून चित्रकथेचे हक्क हट्टानं मिळवले होते, तेही ‘मला रोल दे’ असा धोशा लावणाऱ्या वडलांना नकार देऊन! कर्क डग्लस ही तेव्हाही एक दंतकथा होती.

‘महानायकालाच आता तू नको आहेस’ असं सांगायला काळीज लागतं. मायकेलनं ते दाखवलं. संपूर्ण नवी टीम उभी करून चित्रपट बनवला. केवळ या चित्रपटाच्या निर्मितीसाठीही त्याला बोलावून डझनभर पुरस्कार द्यायला हरकत नाही. जिज्ञासूंनी हा चित्रपट आवर्जून मिळवून पाहावा.

‘चित्रपटांची निर्मिती प्रक्रिया मला आवडते. तिथं मोठ्या माणसासारखं वागावं लागतं इतकंच, पण मी पहिले नट आहे, मग निर्माता!’ असं मायकेल म्हणतो. ते खरंही आहे. निळसर घारे डोळे, सोनेरी बाल, डोळ्यांमध्ये कसला तरी अपार मोह साकळलेला. बघितल्याक्षणी वाटावं की, गडी हृदयानं विचार करणारा आहे, डोक्यानं नाही... मायकेलचं हे ‘विकारी’ रूप १९६९ च्या सुमारास पब्लिकला जाम आवडलं.

सुरवातीला त्यानं ‘द एक्सपेरिमेंट’ नावाच्या एका टीव्ही मालिकेत चांगला रोल केला होता. तेव्हा तो ‘एम. के. डग्लस’ असं नाव लावत असे. मोठ्या बापाची सावली नको म्हणून! मग यथावकाश तो सिनेमाच्या जगात दाखल झाला. नाव झालं. १९८४ च्या उन्हाळ्यात एक काहीच्या काहीच चित्रपट आला. त्याचं नाव होतं - रोमॅन्सिंग द स्टोन. या चित्रपटानं अनेक अर्थांनी इतिहास घडवला. मायकेल डग्लसच्या गुणसूत्रांची ओळख मिळाली ती इथं.

‘रोमॅन्सिंग द स्टोन’चा तो निर्माता होता आणि नायकही. पुढे व्हिज्युअल इफेक्टसचा जनक मानला गेलेला आणि लोकप्रिय ठरलेला दिग्दर्शक रॉबर्ट झेमेकिस याचं हे पहिलं वहिलं भरघोस यश होतं. बॅक टु द फ्यूचर, हू फ्रेम्ड रॉजर रॅबिट हे चित्रपट त्याचेच होते. ‘रोमॅन्सिंग द स्टोन’ ही मॅड कॉमेडी होती. त्यावर्षीचा गोल्डन ग्लोब पुरस्कार घ्यायला डग्लस उत्साहानं गेला.

‘बेसिक इन्स्टिंक्ट’मधला अस्वस्थ, उतावीळ निक क्यूरन नावाचा तपास अधिकारी साकारताना मायकेल डग्लसची दमछाक झाली होती. समोर शॅरन स्टोन असूनही तो तरला. त्याचा तो ॲटिट्यूड, चिडचिड आजही आठवते.

१९८७ मध्ये विख्यात दिग्दर्शक ऑलिवर स्टोन यांनी ‘वॉल स्ट्रीट’ हा चित्रपट रसिकांना पेश केला.

यामध्ये गॉर्डन गेक्कोची भूमिका मायकेल डग्लसला देण्याचा त्यांचा निर्णय अचूक ठरला. डग्लसचा चेहरा इतका खलनायकी स्वरूपाचा दिसू शकतो, हे तेव्हा कळलं. इनसायडर ट्रेडिंगच्या घोटाळ्यावर हा चित्रपट आधारलेला आहे. या भूमिकेसाठी डग्लसला ऑस्कर पुरस्कार मिळाला.

मायकेलनं २००० मध्ये कॅथरिन झिटा जोन्स या सुंदरीशी लग्न केलं. भानगडीशिवाय हॉलिवुडचं लग्न कसं लागेल? ती होतीच. झिटाबेबीचे दिवानेही जगात कमी नव्हते. लौकरच हॉलिवुडमधलं हॉटेस्ट कपल म्हणून त्यांची चर्चा होऊ लागली. त्यांना दोन मुलं झाली. अजूनही लग्न टिकलंय.

गोव्यात नव्हेंबरात दोघंही येताहेत. सत्यजित राय यांच्या नावाचा पुरस्कार हॉलिवुडमध्येही मानाचाच समजला जातो. ‘आयम ऑनर्ड’ असं डग्लस म्हणाला ते काही तोंडदेखलं नव्हे.

डग्लस घराण्याचा कुलदीपक येतोय. गुढ्यातोरणं उभारायला हवीत.

pravintokekar@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com