तेरे लिए, हम है जिए...!

शाहरुख खान यांनी रोमँटिक इमेज बदलून वयानुरूप भूमिका साकारण्यास सुरुवात केली आहे. ‘पठान’ आणि ‘जवान’मधून त्यांनी वयाचा टप्पा ओलांडला आणि नव्याने पुनरागमन केले, त्यानिमित्त...
Shahrukh Khan
Shahrukh Khansakal

शाहरुख खान यांनी रोमँटिक इमेज बदलून वयानुरूप भूमिका साकारण्यास सुरुवात केली आहे. ‘पठान’ आणि ‘जवान’मधून त्यांनी वयाचा टप्पा ओलांडला आणि नव्याने पुनरागमन केले, त्यानिमित्त...

अत्यंत महत्त्वाच्या संशोधनाला हात घालतो आहो. वाचकांचा आशीर्वाद हीच आमची पुंजी. तुमचा हात पाठीवर असेल, मुंगीदेखील पर्वत ओलांडील आणि ओलांडल्यावर कोल्ड ड्रिंक पीत ‘डर के आगे जीत है’ असे तुम्हालाच सांगेल! किंबहुना ड्रिंक (‘कोल्ड’ हा शब्द राहिला. वाचकांनी ओतून घ्यावा.) घेत घेतच आम्ही सदरहू संशोधन वाचकांपुढे ठेवत आहो.

‘पुरुषवर्गाच्या परिप्रेक्ष्यातून गेल्या तीन दशकांतील तीन पिढ्यांच्या स्वच्छंदतावादी मानसिक आंदोलनांच्या संदर्भातील ढोबळ निरीक्षणे आणि रा. शाहरुख खान यांच्या कारकिर्दीच्या सूक्ष्म परिनिरीक्षणातील अमूर्तता’ असा दणकट विषय आम्ही अभ्यासासाठी निवडला, त्याची ढोबळ मानाने तीन कारणे सांगता येतील.

एक, वर सांगितलेच! आम्ही सध्या ‘कोल्ड ड्रिंक’ पीत आहो! दोन, गेल्या तीन दशकांत आम्ही आयुष्यात जे काही करायचे असते, ते करून घेतले. उदाहरणार्थ, दोन टाइम जेवण, श्वासोच्छ्वास आणि अन्य निकडीची देहकर्मे. या काळात आम्ही हे मौलिक निरीक्षण केले आहे. आणि तिसरे महत्त्वाचे कारण, म्हणजे आमच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे रा. शाहरुख खान यांचे पुनरागमन!

सदरील संशोधनरूपी लिखाणानंतर रा. शाहरुख खान यांजवर आम्ही जळ जळ जळतो, असा आरोप आमच्यावर होईल, याची विनम्र जाणीव आहे. शाहरुख खान यांचा चाहतावर्ग आम्हास कुठेतरी गाठून ‘डर’मधील सनी देओलप्रमाणे कुदवेल, याचेही भय आहे; परंतु साक्षेपी संशोधकाला अशा हलक्या भावनांना थारा देणे शोभणारे नाही, म्हणूनच परखडपणे आम्ही आमची संशोधनरूपी वखार पेटवली आहे.

रा. खान यांचा परिचय देण्याची गरज आहे, असे वाटत नाही. ‘गुगल’वर सारेच उपलब्ध असल्याचे मा. संपादकांनीच लक्षात आणून दिल्याने अल्पपरिचयाचा मजकूर संपूर्ण गाळावा लागला. तरीही एवढे सांगावेच लागेल की शाहरुख खान हे मूळचे दिल्लीचे गृहस्थ मुंबईत येऊन सेटल झाले, त्यालाही आता पस्तीसेक वर्षे होतील.

वालिद मीर ताज महम्मद खान यांचे दिल्लीत हॉटेल होते, अशी माहिती मिळते. पुढे रोजीरोटीच्या शोधात ते (पक्षी : शाहरुख खान) मुंबईत आले, आणि स्थायिक झाले असे म्हणतात. त्यांना रोजीरोटी मिळाली नाही; परंतु पिझ्झा, केक, चायनीज असे बरेच काहीबाही मिळाले. घरदेखील समुद्राकाठी मिळाले.

सौंदर्यदृष्टी असलेली सुविद्य पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असे पंचकोनी कुटुंब. प्रत्येकास राहण्यास स्वतंत्र खोली आणि पलंग... पुढल्या (एकमेव) खोलीत सलग तीन गाद्या पसरून झोपायची गरज नाही की स्वच्छतागृहासाठी नंबरात उभे राहण्याची निकड नाही. माणसाला आणखी काय हवे? सारांश, गृहस्थ सध्या सुखी आहे.

कोलकाता नाइट रायडर या क्रिकेट संघाच्या आयपीएलच्या लढतींच्या वेळी बऱ्याच जणांनी त्यांस चुम्मे फेकत पॅवलियनमध्ये उभे असलेले पाहिले असेल. काही रंगारंग फिल्मी रजन्यांचे सूत्रसंचालनही त्यांनी केले आहे. बऱ्याचदा ते परदेशी जाऊन येतात. ते तेथे का जातात (आणि का येतात) हे गूढ आहे. उर्वरित काळात त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली असून, त्यांचा चाहतावर्गही मोठा असावा, असे मानण्यास जागा आहे.

कारण त्यांना ‘किंग खान’ असे बिरुद लाभले असून गडी पैकाही बऱ्यापैकी राखून आहे, हे वर आले आहेच. तथापि, अभिनयाचे अंग यथातथा असूनही त्यांनी मिळवलेले यश उल्लेखनीय म्हणावे लागेल. बांदऱ्याला आलिशान बंगला उगाचच होत नसतो. तेथील कुंपणावर उभ्या केलेल्या आधुनिक मचाणावर उभे राहून ते दरसाल स्वत:च्या जन्मदिनी चाहत्यांना मुखदर्शन देतात.

प्रसादादाखल चुम्मे फेकतात. ते चुम्मे गोळा करून चाहते घरी घेऊन उशीखाली ठेवतात, अशी एक लोककथा आहे. (प्रस्तुत लेखकाने गेल्या दहीहंडीला खापरी घरी नेली! दूधदुभते वाढते म्हणे.) प्रस्तुत लेखकही त्या जन्मदिन सोहळ्यात एक-दोन वेळा धक्के खाऊन आला आहे. (चुम्मा मिळाला नाही. अलिकडील आगाऊ चाहत्याने आधी झेलला!) जाऊ द्या. संशोधनासाठी अभ्यासकाला काहीही करावे लागते.

रा. शाहरुख खान हे सुमारे ५८ वर्षांचे गृहस्थ असून ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात ते मुंबईत आले. ‘फौजी’ या टीव्ही मालिकेतून कारकीर्दीचा श्रीगणेशा करणाऱ्या रा. खान यांनी नुकताच ‘जवान’ नावाचा चित्रपट रसिकांस पेश केला. त्यायोगे हजारेक कोट रुपयांचा गल्ला घरी नेला, अशी वदंता ऐकूनच आम्ही या मौलिक संशोधनाकडे वळलो.

यापूर्वी त्यांनी ‘पठान’ नावाचा चित्रपट आणला होता. त्यालाही रसिकांनी पाचेकशे कोटींचा गल्लारुपी नजराणा दिला, असे कळते. भले! पैशाकडे पैसा जातो, म्हणतात ते हेच! चित्ररसिकही कधी आणि कोणाला डोक्यावर घेतील, सांगता येत नाही. प्रस्तुत लेखकाचे वयदेखील रा. खान यांच्याएवढेच आहे; परंतु मंथेंण्डमुळे कुठल्याही विषयावर लेख लिहिण्याचे दैव त्याच्या कपाळी कोरले आहे आणि शाहरुख खानांस मात्र हजार कोटी!!

रा. खान हेदेखील दिसण्यास यथातथाच आहेत, हे आमचे स्पष्ट मत आहे, पण ‘माकडतोंड्या’ हे विशेषण आम्हालाच प्राप्त व्हावे? या इसमाची हाइटबॉडी काही भय वाटावी, अशी नाही. तरीही तो हँडसम आणि आम्ही मेषपात्र? शाहरुख खानाचे सिगारेट धरणे आणि सोडणे दोन्हीही कौतुकाचे विषय झाले. आम्ही आजही चोरूनच विड्या ओढाव्या?

दोन्ही हात दो बाजूंस पसरून एकशेवीस मावा ‘लागल्या’गत ओठांची ठेवण करणे याला जर अभिनय म्हणायचे असेल तर काही बोलायची सोयच उरली नाही. चाचरत, तोतरत बोलणे हा आमच्या बालपणी दोष मानला जात असे; परंतु शाहरुख खानाचे तेही आवडावे? नुकत्याच खुराड्यातून बाहेर आलेल्या टर्रेबाज मुर्ग्यागत तिरतिरत पळण्यास एनर्जी म्हणत असतील, तर म्हणा बापडे! शाहरुख खानाइतके केस वाढविले म्हणून तीर्थरुपांनी आम्हास झिंज्या धरून केशकर्तनकाराच्या खुर्चीत नेऊन बसवल्याची अवहेलनामूलक आठवण आजही सतावते.

शाहरुख खान यांनी जुही चावला, काजोल, शिल्पा शेट्टी आदी कन्यकांप्रती चित्रपटांमध्ये जो बर्ताव सुरुवातीला केला, तो आम्हांस तत्त्वत: पटला नव्हताच. ‘आय लव यु... कक क... क... किरन’ या संवादात इतके गाजण्यासारखे काय आहे, हे वाचकांनीच सांगावे! आम्हीही शाहरुख खानाप्रमाणे ‘ऊं ऊं ऊं’ केले तर ‘कान फुटले का बे, बहिऱ्या’ असे ऐकू का येते? ही सरासर नाइन्साफी आहे.

सारांश इतकाच की प्रस्तुत लेखक आणि लेखवस्तु जे की रा. शाहरुख खान हे समवयस्क असून दोहोंचीही जडणघडण समांतर झाली. उदाहरणार्थ, १९८८ च्या सुमारास शाहरुख यांनी मुंबईत रोजीरोटी शोधावयास सुरुवात केली. आम्हीही तेव्हाच नोकरीसाठी अर्ज घेऊन फिरत होतो. शाहरुख खानास टीव्ही मालिकेत पहिले काम मिळाले, तेव्हा आम्हीही कुठेतरी टेंपरवारी चिकटू पाहात होतो.

शाहरुख खानास मुंबईत गौरी नामक मैत्रिणीचा शोध घ्यायचा होता, तर आम्ही याच कामगिरीत दोनचारदा जायबंदी झालो होतो. मरो! त्या दुखऱ्या आठवणी नकोत! सारांश, शाहरुख खानाची कारकीर्द आणि आमचे (नुसतेच) जगणे समांतर गेले, जाते व जात राहील.

‘दीवाना’ (१९९२) या चित्रपटात दिव्या भारती नामक सुंदरीसह नृत्य करताना आम्ही शाहरुख खानांस पहिल्यांदा पाहिले. मग ‘बाजीगर’मध्ये त्यांनी साकारलेला खुनी, हत्यारा हिरो आणि ‘डर’मधला डोके बिघडलेला नायक बघितला. हिरोने असे व्हिलनसारखे वागणे शोभादायक नव्हते, पण रसिकांना तेही आवडून गेले. पुढे ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ने तर इतिहास घडवला. शाहरुख म्हटले की प्रेम, मुहब्बत, प्यार, इश्क असलेच काहीबाही आठवते हे खरेच.

खानदानी परंपरा-रुढींना कोलणारा, उत्कट प्रेम बेधडक व्यक्त करणारा, त्यासाठी कुठल्याही थराला जाणारा, वेळवखत पाहून गिटार वगैरे वाजवणारा, मोहरीच्या शेतात प्रियसखीसमवेत हुंदडणारा, बर्फावरून बिनधास्त घसरणारा, ओठांची तारुण्यसुलभ थर्थर करणारा, सखीला मिठीत घेण्यासाठी आसुससलेले बाहू पसरणारा, मनीचे गूज त्यालाच सांगावे, त्याच्या छाती-खांद्यावर डोके ठेवून मुग्ध पडून राहावे, असे वाटायला लावणारा, धडपडणाऱ्या तमाम तरुणांचे गुणदोष दाखवणारा त्याचा नायक जनामनात रुजला, फुलला. कारण त्याचा जन्मच मुळी तिथे झाला होता. आम्हा रसिकांची मनोवस्था हीच त्याची जन्मभूमी होती.

खरी मेख इथेच आहे!

आमच्या पिढीतील पुरुषांना शाहरुख खानाचे विशेष कौतुक नाही, तरीही तो आवडून घ्यावा लागतो. हे भागधेय आहे. त्याला इलाज नाही. आमच्या पिढीतील स्त्रीवर्ग त्याच्यावर बेहद्द खुश होता, हे त्याचे खरे कारण आहे. आज ज्यांचे रुपांतर आंट्यांमध्ये झाले आहे, त्या सर्व भगिनींना मनोमनी शाहरुखप्रति जिव्हाळा असे.-अजुनी असेल! रणवीर, रणबीर आणि कार्तिक आर्यनवादी नव्या पिढीला कदाचित ‘त्या’ शाहरुखबद्दल तितके वाटत नसेल, पण पन्नाशी उलटलेल्या बव्हंशी सुविद्य भगिनींस शाहरुखप्रती नाजूक भावना होत्या व आहेत.

शाहरुख हे जनसामान्यांच्या प्रेमसुलभ भावनांचे प्रतिमारुप होते. पूर्वी ज्या स्त्रिया माजघरात ‘जिवलगा, कधी रे येशील तू?’ असे गुणगुणत असत, त्यांच्याच मुली पुढे तेरे लिए, हम है जिए, होठों को सिए...’ असे मनातल्या मनात म्हणत वाढल्या. शाहरुख आणि अनुष्का शर्माचा एक ‘रबने बना दी जोडी’ नावाचा एक नितांतसुंदर चित्रपट आहे. त्यातील दुहेरी भूमिकेत शाहरुखनं मानमोड्या, संसारी, चट्ट्यापट्ट्यांचा पायजमा घालून वावरणारा नवरोबाही रंगवलाय, आणि गुलछबु, गुलजार, गुलमिजाज मित्रदेखील! हा चित्रपट आमच्या पिढीच्या अंतरंगातले रंग हलकेच उधळतो...

ते जाऊ द्या, आपण ज्या सहचारिणीसोबत संसारगाडा ओढतो, तीस शाहरुख नावाचा परका पुरुष आवडतो, हे कुठल्या युवकास पचेल किंवा पटेल? परंतु, केवळ लोकापवादापोटी आमच्या पिढीतील तरुणांना शाहरुख खानाचे चित्रपट पाहावे लागले आणि ते आवडूनही घ्यावे लागले. कारण आमच्या प्रेमपात्रांना हेच शाहरुख गृहस्थ आवडत. आम्ही जळायचे नाहीतर काय करायचे?

‘याच्यात असे काय आहे, जे आमच्यात नाही?’ असा सवाल आमच्या आख्ख्या पिढीला समस्त स्त्रीरसिकांस विचारायचा होता, पण धाडस झाले नाही. आता साठीच्या उंबरठ्यापाशी हा सवाल करण्याची वेळ निघून गेली. अशा वेळेस खुद्द शाहरुख खान यांनीच आपली रोमँटिंक इमेज बदलून वयानुरुप भूमिका साकारण्यास सुरवात केली आहे. ‘पठान’ आणि ‘जवान’मधून त्यांनी वयाचा टप्पा ओलांडला आणि नव्याने पुनरागमन केले.

…तर एणेप्रमाणे रा. शाहरुख खान यांचे पुनरागमन तर झाले. रसिकांनी ते डोक्यावरही घेतले. आता समांतर आयुष्यात आमचेही पुनरागमन होईल, या प्रतीक्षेत आम्ही आहो. कारण पडद्यावरचा शाहरुख खान आणि आमच्या मनोपडद्यावरचे आम्ही यांच्यात फार फरक नाही.

माशाल्ला, आयुष्यात आमचेही एक दिवस पुनरागमन होईल. कारण रा. शाहरुख खान यांनीच सांगून ठेवले आहे की ‘अगर किसी चीज को दिल से चाहो, तो सारी काएनात उसे तुमसे मिलाने के लिए लग जाती है. आम्ही वाट पाहू... ऊं?

pravintokekar@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com