सत्ताधीश क्रूर माणसं जन्माला घालतात...

विजय तेंडुलककरांचं ‘घाशीराम कोतवाल’ मराठी आणि भारतीय रंगभूमीवरचं अत्यंत महत्त्वाचं नाटक. हे सिद्ध झालं काळाच्या प्रवाहाबरोबर.
Ghashiram Kotwal
Ghashiram KotwalSakal
Summary

विजय तेंडुलककरांचं ‘घाशीराम कोतवाल’ मराठी आणि भारतीय रंगभूमीवरचं अत्यंत महत्त्वाचं नाटक. हे सिद्ध झालं काळाच्या प्रवाहाबरोबर.

विजय तेंडुलककरांचं ‘घाशीराम कोतवाल’ मराठी आणि भारतीय रंगभूमीवरचं अत्यंत महत्त्वाचं नाटक. हे सिद्ध झालं काळाच्या प्रवाहाबरोबर. एखाद्या कलाकृतीचं श्रेष्ठत्त्व सिद्ध होण्यासाठी काही एक काळ जाऊ द्यावा लागतो. तसा तो काळ काही प्रमाणात का होईना पुढे सरकलेला आहे. विजय तेंडुलकरांना कल्पनाही नसेल, तशी ती कोणत्याच कलावंताला नसते, की आपण जे काम करतो ते काळाला पुरून उरेल वा नाही. पण आता काळ पुढे सरकलेला आहे. ‘घाशीराम कोतवाल’चा पहिला प्रयोग होऊन (१६ डिसेंबर १९७२) ४९ वर्ष पूर्ण झाली आणि या नाटकाने पन्नासाव्या वर्षात प्रवेश केला. हा सुवर्णक्षण पाहायला विजय तेंडुलकर आज आपल्यात नाहीत. त्यामुळे तशी काही अडचण येत नाही, कारण लेखक त्याच्या कलाकृतीबरोबर वर्तमानातही जगत असतो. तेंडुलकरांना आणि या वर्तमानाला आमचा सलाम!

‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत पहिल्यांदा सादर झालं ते भालबा केळकर यांच्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) या संस्थेतर्फे. त्या स्पर्धेतलं एक वेगळं नाटक होतं. नाटकाचा फॉर्म हा गद्य-पद्य संगीतमय असा होता. त्याला लोककलेच्या फॉर्ममधील लवचिकतेची जोड होती. खरं तर हे नाटक त्या स्पर्धेमध्ये त्याच्या सर्व गुणवैशिष्ट्यांमुळे पहिलं यायला हवं होतं; पण ते आलं दुसरं. स्पर्धेची गणितं बहुदा वेगळ्या कलाकृतींना मान्य नसावीत. ती स्पर्धेची गणितं मोडून (परीक्षकांच्या नाकावर टिचून) ताठ कण्यानं उभी राहातात. तरीही महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेने मराठी मातीला काय दिलं तर, ‘घाशीराम कोतवाल’ हे आगळंवेगळं नाटक. या आगळेवेगळेपणाबरोबरच पुण्यात काही प्रयोग होऊ लागताच, यात ब्राह्मणांची आणि नाना फडणविसांची बदनामी होत आहे, त्यामुळे हे नाटक ताबडतोब बंद करावं, अशी भूमिका पुणेकर ब्राह्मणांनी घेतली. याचा परिणाम असा झाला, भालबा केळकरांनी या नाटकाचे प्रयोग करणं बंद केलं.

अत्यंत मेहनतीनं लिहिलेलं आणि तितक्याच तीव्रतर मेहनतीनं सिद्ध केलेलं हे नाटक असंच दुर्लक्षित होऊ नये म्हणून दिग्दर्शक जब्बार पटेल, या नाटकाची सगळी टीम, नृत्य दिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद, संगीतकार भास्कर चंदावरकर, अभिनेते मोहन आगाशे आणि सतीश आळेकर या सगळ्यांनी एकत्रित येऊन ‘थिएटर अकादमी ’ या संस्थेची स्थापना केली आणि ‘घाशीराम कोतवाल’चे प्रयोग पुन्हा सुरू झाले.

नाना फडणवीसांची किंवा ब्राह्मणांची बदनामी व्हावी, असं काय आहे या नाटकात ? तर घाशीराम सावळादास नावाचा ब्राह्मण पुण्यामध्ये येतो, तो पोटासाठी काम शोधत. काहीच काम मिळत नसल्यामुळे तो एका गुलाबी असं नाव असलेल्या, नाचगाणं करणाऱ्या बाईकडे गडी म्हणून काम करू लागतो. या नाचघरातच नाना फडणवीस आणि घाशीराम सावळादास यांची भेट होते. या भेटीत नाना फडणवीस आपल्या गळ्यातीला कंठा काढून घाशीरामला देतो. ती नाचगाणं करणारी बाई तो कंठा घाशीरामकडून हिसकावून घेते आणि इतर गड्यांकडून मारहाण करून घाशीरामला नाचघरातून बाहेर काढते. घाशीराम उघड्यावर पडतो. पुण्यात पेशवाई काळात रमणा (पेशव्यांकडून ब्राह्मणांना दान करणे) नावाची प्रथा होती. हा घाशीरामही त्या रमण्यासाठी जातो आणि त्याच्यावर ब्राह्मणाचे पैसे चोरल्याचा आळ येतो. या चोरीच्या आळामुळे घाशीरामला गुन्हेगार म्हणून कोठडीत बंद केले जाते. या घटनेमुळे घाशीराम उद्विग्न होतो आणि पुण्यातील ब्राह्मणांना धडा शिकवीन अशी शपथ घेतो. घाशीरामला हे निश्‍चित माहीत असतं की नाना फडणवीसांना स्त्री देहाची प्रचंड ओढ आहे, (हे त्याने नाचघरात अनुभवलं असतं.) हे लक्षात घेऊन तो आपली स्वत:ची मुलगी ललितागौरी हिला नाना फडणवीसांच्या हवाली करतो आणि पुण्याची कोतवाली मिळवतो.

ब्राह्मणांना धडा शिकवण्यासाठी तो आपली मनमानी सुरू करतो. रात्री-मध्यरात्री घाशीरामची पुण्यात गस्त सुरू होते. कुठेही काही खट्ट असं वाटलं तर तो त्या व्यक्तीची झाडाझडती घेतो. मध्यरात्री झोपलेल्या एका पती-पत्नीस जागं करून, ते जोडपं अधिकृत आहे की अनधिकृत याची शहानिशा करतो. पुरावे मागतो. हे होत असताना घाशीरामच्या असं लक्षात येतं की, हाच तो माणूस आहे, ज्याने रमण्यात त्याच्यावर चोरीचा आळ घेतला होता. मग घाशीरामच्या मनातलं क्रौर्य जागं होतं. घाशीराम त्या ब्राह्मणाचा अनन्वित छळ करतो. त्याच्या बोटाची नखं काढतो. त्याचे हात तोडतो आणि त्या वस्तीतून हाकलून देतो, असं हे घाशीरामचं क्रोर्य. या सगळ्या मनमानीला ब्राह्मण वैतागलेले असतात. ते नाना फडणवीसांकडे जाऊन घाशीरामची तक्रार करतात. घाशीरामचा बंदोबस्त कसा करायचा, असा पेच नाना फडणवीसांसमोर उभा राहतो. नाना फडणवीस त्याची कानउघडणी करतात. दरम्यान, घाशीरामच्या असं लक्षात येतं की, नाना फडणवीसांनी त्याच्या मुलीचा ललिता गौरीचा, ती गर्भवती राहिल्याने तीचा खून घडवून आणला.

तेंडुलकरांनी या नाटकात दोन्ही बाजूंनी, नाना फडणवीस किंवा घाशीराम यांच्यातलं क्रौर्य आणि हिंसा या दोन्ही मानवी वृत्ती ठळकपणे अधोरेखित केल्या आहेत. तेंडुलकरांच्या नाटकांचं हे वैशिष्ट्य आहे, की मानवी मनातील हिंसा आणि क्रौर्य विविध पद्धतीनं अधोरेखित करणं. सखाराम बाईंड, गिधाडे, शांतता! कोर्ट चालू आहे ही याची ठळक उदाहरणं. इतिहास असंही सांगतो की, माणसातील हिंसक वृत्ती काळाच्या प्रत्येक टप्प्यावर कलाकृतीच्या माध्यमातून अधोरेखित होत असतात आणि तेंडुलकर तर या नाटकाला ऐतिहासिक नाटक मानत नाहीत, ते अनैतेहासिक असं मानतात. ते म्हणतात, ‘‘नाटक फक्त नाटक असतं. इतिहास आहे किंवा नाही याचा शोध इतिहासकारांनी घ्यावा. नाटककाराचं ते काम नाही.’’ घाशीराम कोतवाल हे दंतकथेवर आधारित आहे, असंही ते म्हणतात. इतिहास आणि दंतकथा यांचं काही एक नातं असू शकतं किंवा इतिहासाचा भार न पेलवणाऱ्यांसाठी इतिहासालाच दंतकथा म्हणणं म्हणजे इतिहासावर शुगर कोटिंग करणं होय. इतिहास आणि दंतकथेवर ठाम भूमिका न घेतल्यामुळे तेंडुलकर संभ्रमाच्या भोवऱ्यात सापडलेले दिसतात.

सत्ताधीश आपल्या सोयीसाठी घाशीरामसारखं क्रूर माणसं जन्माला घालतात आणि तेच त्यांना नष्टही करतात.

तेंडुलकरांना या नाटकामुळे खुपच त्रास सहन करावा लागला. काही काळ पोलीस बंदोबस्तात राहावं लागलं. एका अर्थानं हे नाटक मराठी अथवा भारतीय रंगभूमीवरचं क्रांतीकारी नाटक होय. या नाटकाचं दिग्दर्शन म्हणजे लोककलेतील तमाशा, गण गवळण, लावणी नृत्य, बतावणी, दशावतार, नृत्य याचा सुरेख संगम होय. नाटकाच्या या लवचिक फॉर्ममुळे नाटक एखाद्या चलचित्राप्रमाणे त्या त्या प्रसंगाचा ठसा उमटवत पुढे सरकत राहातं. नाटकाचा दिग्दर्शकीय फॉर्म मराठी रंगभूमीला नवा आयाम देऊन गेला.

रंगमंचावरील काळ्या पडद्यासमोरील चौकट आणि त्यावरचा गणपती (ब्राह्मणी देवतेचं प्रतीक) आणि त्या समोरील ब्राह्मणांची रांग एखाद्या चलतचित्राप्रमाणे काम करते. रांग मोडते आणि विविध दृश्‍य उभी राहातात. माणसांचंच घर होते, माणसांचीच कोठडी बनते, हे सगळं मराठी रंगभूमीला नवं होतं. या दिग्दर्शकीय दृश्‍यात्मकतेचा परिणाम मराठी रंगभूमीवर आजही दिसून येतो. त्या अर्थानं हे नाटक गेल्या ५० वर्षांतलं वेगळं घटित आहे.

या नाटकाकडे सूक्ष्मपणे पाहिले असल्यास कथानक साधं आहे. नायक आहे नाना फडणवीस आणि खलनायक आहे घाशीराम सावळादास. नायक आणि खलनायक हा तर मराठी-भारतीय कलासृष्टीचा प्राण राहिला आहे. प्रेक्षकांना नायक आवडतो तसा खलनायकही. खलनायक मारला गेला तर प्रेक्षकही भारी सुखावतात आणि नायकाचा जयजयकार करतात. रामायण, महाभारत हे त्याचं उत्तम उदाहरण. आणि तरीही हे नाटक या व्यतिरिक्तही वेगळं काही देत राहातं. म्हणून गेली ५० वर्ष भारताच्या विविध भाषिक कलावंतांना सतत आकर्षित करत राहातं, हे या नाटकाचं गुणवैशिष्ट्यं होय. एका अर्थानं हे गद्य नाटक, पद्य नाटक की संगीत नाटक असाही एक पेच रसिकांसमोर उभा करण्यात यशस्वी झालेलं आहे.

(लेखक ज्येष्ठ नाटककार असून ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com