प्रेसरूम ; नकोनकोशा, दोन बातम्या...

जवळपास तीन महिन्यांपासून संप सुरू होता आणि कंपनीनं टाळेबंदीही जाहीर केलेली होती.
saptrang
saptrangsakal

दिवस तर अगदी आरामात उजाडला होता. शिवाय टाइम्स वृत्तसमूहात जवळपास तीन महिन्यांपासून संप सुरू होता आणि कंपनीनं टाळेबंदीही जाहीर केलेली होती. त्यामुळे घरातून उठून कामावर जाण्याचाही प्रश्न नव्हता. घरात टीव्हीही नव्हता आणि बुक करून वर्ष झालं तरी फोन आलेला नव्हता. पण बँकेतून पैसे मात्र काढायलाच हवे होते. तेव्हा सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास बोरिवली पूर्वेच्या महाराष्ट्र बँकेत प्रवेश केला, तेव्हा एकदम काचेपलीकडून थेट मॅनेजरच खुणा करून बोलवताना दिसला. आता काय आफत आली, असं म्हणत जरा दबकतच त्याच्या केबिनमध्ये शिरलो...

तारीख होती ३१ ऑक्टोबर १९८४.

या घटनेला आता चांगली ३६-३७ वर्षं उलटून गेली असली, तरी मग त्या केबिनमध्ये काय घडलं, ते जस्सच्या तस्सं आठवतं. केबिनमध्ये शिरताच त्या मॅनेजरनं बॉम्ब टाकला... ‘इंदिरा गांधींवर गोळ्या झाडल्यात म्हणे...’ आणि पत्रकार असल्याचं ठाऊक असल्यानंच त्यानं बातमी ‘कन्फर्म’ करून घेण्यासाठी मला आत बोलावलं होतं.

टाइम्सची वास्तू तर कुलुपबंद होती... मग? अचानक युनायटेड न्यूज ऑफ इंडिया -‘युएनआय’ या वृत्तसंस्थेचा फोन नंबर आठवला आणि त्या मॅनेजरच्याच टेबलवरून फोन लावला. चंदू मेढेकर या अत्यंत कार्यक्षम प्रमुखानंच सुदैवानं फोन उचलला आणि ती दुर्दैवी घटना खरी असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर ‘टाइम्स’नं टाळेबंदी उठवली असून, तुम्ही आजच हजर व्हायचं आहे, असा निरोपही दिला.... मग तातडीनं घरी परतून वरच्याच मजल्यावर राहत असलेल्या हेमंत देसाईला घेऊन ऑफिसच्या दिशेनं कूच केलं. सोबत होत्या इंदिरा गांधी यांच्या आठवणी.

पण त्या साऱ्या आठवणीही ‘दूरवरून दृष्टिक्षेप’ स्वरूपाच्याच होत्या. ना कधी त्यांच्याबरोबर दौऱ्यात सहभागी होता आलेलं; ना कधी त्यांची पत्रकार परिषद कव्हर करता आलेली... पण एक प्रसंग मात्र सांगायलाच हवा. एकदा भल्या सकाळी नौदलाच्या एका अत्याधुनिक युद्धनौकेच्या जलावतरण सोहळ्यासाठी माझगाव डॉकमध्ये जाणं झालं. प्रमुख पाहुण्या अर्थातच इंदिराबाईच होत्या. नौदलाच्या शिस्तीतला तो सोहळा थाटानं पार पडला आणि नंतर त्याच शिस्तीत तो ‘हाय टी’चा कार्यक्रम सुरू झाला. पांढरी शुभ्र कापडं घातलेल्या टेबलांची रांग. त्यावर शाही खाद्यपदार्थ. तुम्ही स्वत: जाऊन हवं ते घ्यायचं. खाली मान घालून दोन पदार्थ बशीत टाकले आणि मान वर केली तो समोरच्या बाजूस हातात डिश घेऊन थेट इंदिरा गांधी!

खरं तर तिथल्या तिथं त्यांना एखादा प्रश्न विचारून ‘एक्सक्लुजीव्ह बातमी’चा आव सहज मिरवता आला असता. पण प्रत्यक्षात त्यांना असं अचानक समोर बघितल्यावर एकदम गांगरायलाच झालं... आणि काय करावं तेच सुचेनासं झालं. त्या मात्र दोन पदार्थ घेऊन सहज पाय काढत्या झाल्या... आयतीच चालून आलेली संधी तितक्याच सहजपणे हातातून निसटलीही होती.

दुसरी घटना तीस वर्षांपूर्वीची. तीही तितकीच दुर्दैवी. कोणती अधिक अमानुष ते सांगता येणं कठीण. ते दिवस आजच्या इतके कडक बंदोबस्ताचे आणि जागोजागी होणाऱ्या चेकिंगचे बिलकूलच नव्हते. त्यामुळे अगदी विमानतळावरच्या विशिष्ट एनक्लोजरपर्यंत केवळ पत्रकार आहे, असं म्हटल्यावर प्रवेश सहज मिळायचा. अशाच एका निवडणुकीच्या धामधुमीत एका बड्या नेत्याची वाट बघत पत्रकारांचा जथ्था संध्याकाळच्या कातरवेळी तिथं थांबलेला होता. अखेर ते खाजगी विमान उतरलं आणि वैमानिकानं ते अगदी त्या एनक्लोजरपर्यंत आणलं. वैमानिक कोण ते तिथूनही स्पष्ट दिसत होतं. त्या पायलटचं नाव होतं राजीव गांधी.

विमानातून उतरून हा ‘पायलट’ अगदी थेट पत्रकारांपर्यंत आला. थकल्याची कोणतीही निशाणी चेहऱ्यावर नव्हती आणि पत्रकारांनीही त्यांना गराडाच घातला. अगदीच जवळून झालेली ती भेट होती. लक्षात राहिलं ते एवढंच की त्यांचे दात बऱ्यापैकी किडलेले आहेत आणि त्यांच्या तलम झब्ब्याच्या वरच्या खिशात भलं मोठ्ठं चॉकलेट आहे. चॉकलेट कसलं एनर्जी बारच असणार तो. पण ते नंतर लक्षात आलं. लगोलग बाहेर पडून ते एका ओपन गाडीत बसले आणि त्यांची मुंबईची रात्रीची सफर सुरू झाली. विमानतळाजवळच सांताक्रूजला त्यांनी पहिली चौकसभा घेतली आणि मग त्यांनी दक्षिण मुंबईच्या दिशेनं कूच केलं. वाटेवरती हा चौकसभांचा सिलसिला मध्यरात्र उलटून गेली आणि पहाटेची चाहूल लागली, तेव्हाच संपला. सांगितलं तर आज विश्वास बसणारही नाही; पण मध्यरात्रीच्या त्या भलत्या वेळी मुंबईकरांनी राजीवना चांगलाच प्रतिसाद दिला होता...

या प्रवासात ते बोलायला थांबले की कोणीही थेट त्यांच्या जवळ जाऊ शकत होता. सुरक्षेचं काही म्हणता काही अवडंबर नव्हतं. प्रताप आसबे असाच गर्दीत त्यांच्या जवळ गेला. प्रतापचा तेव्हाचा ‘लूक’ हा एखाद्या पोलिस अधिकाऱ्यासारखं असायचा. तेव्हा त्यांनी स्वत:च प्रतापला ‘कहाँ है ना... मुझे सिक्युरिटी नही चाहिये...’ असं म्हणत दूर केलं होतं...

त्यानंतर आठ-पंधरा दिवसांतच मुंबईतला प्रचार संपला. नेमकी तारीख सांगायची तर ती होती २१ मे १९९१. रात्री घरी पोहोचलो, तो फोन घणघणतच होता. तोपावेतो घरात लॅण्डलाइन आलेली होती! फोन अर्थातच कार्यालयातून होता. राजीव गांधी गेल्याची बातमी होती. कन्फर्म होत नाही... असं कार्यालयातून सांगण्यात येत होतं. तेव्हा अस्तित्वात असलेलं दूरदर्शनचं एकमेव चॅनेल काहीच सांगायला तयार नव्हतं. कसं सुचलं, कोण जाणे... पण तत्काळ ‘वर्षा’वर फोन लावला. राजीव गांधी तेव्हा पंतप्रधान नव्हते, तरी ही ‘खबर’ मुख्यमंत्र्यापर्यंत आलेलीच असणार असं वाटून गेलं होतं. मुख्यमंत्री ‘वर्षा’वर नव्हते; पण फोन उचलणाऱ्या अधिकाऱ्यानं बातमी ‘कन्फर्म’ आहे, असं सांगितलं आणि पायाखालची जमीनच घसरली... ‘सिक्युरिटी’ टाळल्यामुळेच हा घात झाला होता... मनात अवघ्या पंधराच दिवसांपूर्वीच्या त्यांच्या मुंबई भेटीच्या आठवणी फेर धरू लागल्या.. पण काम करायला हवं होतं. घरातूनच काम सुरू केलं. दिवसाचे २४ तास जागं असणाऱ्या या शहरातील भल्याभल्यांनाही या दुर्घटनेचा पत्ता नव्हतां... त्यांना ते सांगणं भाग होतं... तिथूनच फोनवर उपलब्ध असलेल्या दोन सहकाऱ्यांसह काम सुरू केलं..

अवघ्या मुंबापुरीला या बातमीनं बसलेला जब्बर धक्का सर्वांच्याच बोलण्यातून जाणवत होता... काय करावं, काय बोलावं, तेच कळत नाही, असाच सर्वांचा सूर होता. फोनवरनंच मग सगळ्यांनी मिळून तयार केलेली बातमी ऑफिसला कळवली. तेव्हा मध्यरात्र उलटून गेलेली होती...

-प्रकाश अकोलकर

akolkar.prakash@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com