पियूची वही, मी आणि माझी आई!

डॉ. संगीता बर्वे यांच्या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ‘पियूची वही’ तील ‘पियू’ म्हणजे आजची आघाडीची पार्श्वगायिका प्रियांका बर्वे-कुलकर्णी.
Dr sangita barve and dr priyanka barve
Dr sangita barve and dr priyanka barvesakal
Summary

डॉ. संगीता बर्वे यांच्या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ‘पियूची वही’ तील ‘पियू’ म्हणजे आजची आघाडीची पार्श्वगायिका प्रियांका बर्वे-कुलकर्णी.

- प्रियांका बर्वे sakal.avtaran@esakal.com

डॉ. संगीता बर्वे यांच्या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ‘पियूची वही’ तील ‘पियू’ म्हणजे आजची आघाडीची पार्श्वगायिका प्रियांका बर्वे-कुलकर्णी. छोट्या-छोट्या गोष्टींतून आईने कसा आनंद दिला, त्याविषयी सांगताहेत पियू अर्थात प्रियांका बर्वे...

पियूतल्या वहीतील पियू म्हणजे मीच. आईने माझ्या बालपणावर पुस्तक लिहिले, असे म्हणायला हरकत नाही. अर्थातच त्यातल्या काही गोष्टी आणखीच छान रंगवून लिहिल्या आहेत. माझ्या मित्र-मैत्रिणींचे त्यात संदर्भ आहेत. आम्ही रंगवलेली खिडकी असो, सिंहगडावर गेलेली ट्रिप असो, अशा बालपणीच्या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात, अशी ही ‘पियूची वही’ आहे.

माझी आई प्रचंड साधी आहे. मूळची नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर या छोट्याशा गावात जन्मलेली. बेलापूरनंतर ती बारामतीला गेली. मग पुण्याला आली असा हा तिचा स्थलांतराचा प्रवास आहे. तो खूप पॉझिटिव्ह आहे. आई इतकी साधी आहे की, माझे मित्र-मैत्रिणी, माझे सहकारी जे कुणी आईला कधी भेटतात तेव्हा म्हणतात, तुमच्या आईच्या साधेपणात प्रचंड श्रीमंती आहे. त्यांना तिच्या निर्मळपणाचा अनुभव येतो आणि तेच संस्कार कुठेतरी आमच्यावर झाले. आपण कितीही उंचउंच हॉटेलमध्ये राहिलो, महागडी वस्त्रं परिधान केली तरी आपले जे संस्कार आहेत, घरातला जो साधेपणा आहे तो आम्ही विसरलेलो नाही. त्याचे मूळ कारण म्हणजे माझी आई.

उन्हाळ्याच्या सुटीमध्ये आम्ही बेलापूरला जायचो. ते खेडेगाव. तिकडच्या माझ्या मित्र-मैत्रिणींची नावं आठवणीत आहेत. अजूनही ते माझ्या इन्स्टाग्रामवर मेसेजेस करतात. बब्बू, रूकय्या, बिलाल अशी सगळी मित्रमंडळी होती. त्यांच्याबरोबर मी लपाछपी खेळायचे, बनात जायचे. बेलापूर हे दुष्काळी गाव आहे. त्यामुळे ते रखरखीतच होतं, पण तरीही त्यात आनंद शोधायचे. सुट्या सगळ्या माझ्या बेलापुरात गेल्या. तिथल्या मित्र-मैत्रिणींसोबत मी झाडावरून चिंचा काढून खाल्ल्या आहेत. सागरगोट्या खेळल्या. गावाकडचे सगळे खेळ एन्जॉय केले. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहायचे. लोकांच्या घरी जाऊन गाणी म्हणून दाखवायचे. डान्स करून दाखवायचे. इतके की आईने मला एक दिवस बेलापूरच्या शाळेतही घातलं होतं. तिकडची इंग्लीश शाळा होती. गावाकडचं जीवन आपण जेव्हा बघतो ना, तेव्हा आपले मातीतले संस्कार आपल्यावर होत असतात. गावाकडचं जगणं एकदा अनुभवायला हवं. शेतात जाऊन भाकरी आणि ठेचा खाण्याची मजा काही औरच असते, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असतो. आपण शहरात राहून कधी कधी हा साधेपणा, निवांतपणा हे विसरायला होतं. मी खूप लकी आहे की, माझी आई बेलापूरची असल्याने ते सगळं बघायला मिळालं आणि आपोआप ते मनामध्ये कुठंतरी रुजलं.

आमच्या घरी गाणं होतंच. आजी-आजोबा मालती पांडे-बर्वे, पद्माकर बर्वे; पण आईकडून जे साहित्यिक ज्ञान आम्हाला मिळालं, त्यातून साहित्य-कविता वाचनाची गोडी लागली. असं कधीच आई-बाबांनी म्हटलं नाही की, तू फक्त गाणंच करायचं, बाकी काही नाही. मला जे आवडेल ते त्यांनी करू दिलं. त्यांचं इतकं स्वातंत्र्य होतं मला की, मी नाट्यवाचनात भाग घ्यायचे. नाटकात भाग घ्यायचे. डान्स शिकत होते तीन वर्षे. मला खूप नृत्याची-कथ्थक शिकायची आवड होती. आईने तिकडे घातलं. फक्त गाणं-गाणंच करायचं असं नाही तर तिने मला सगळ्या कलांची आवड लावली. मला आज त्याचा इतका उपयोग होतो की, ‘मुगले आज़म’साठी लागणारं अभिनयाचं अंग मला माझ्या आईमुळेच सापडलं. सगळ्या कलांची आवड मला लावली, आवड जोपासण्‍याचं स्वातंत्र्य दिलं.

माझ्या आईकडे प्रचंड जिद्द आणि चिकाटी आहे. कितीही कठीण प्रसंग येवो, तिने काम करणं कधी सोडलं नाही. घरात राहून, संसार सांभाळून, दोन मुलींचं बघून, ती काम करत राहिली. अजूनही करतेच आहे. तिच्याकडून हीच जिद्द आणि चिकाटी मी शिकले आहे. कधीच रडत बसलेली मी तिला बघितलेली नाही. जे काही तिच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले, त्यात ती रमून गेली आहे.

माझ्या बाबांची कायम फिरतीची नोकरी होती. त्यामुळे त्यांना फार फिरता आलं नाही. आईला खूप फिरायची आवड आहे; पण संसारामुळे, काही ना काही व्याधी आल्यामुळे त्यांना फार जमलं नाही. पण तिचा आनंद इतक्या छोट्या गोष्टींमध्ये की, ती मी घरी आले की गच्चीवर घेऊन जाते. चंद्र बघायला चल म्हणते. तो चंद्र बघितल्यानंतर तिला आनंद मिळतो. तिने लावलेली तिच्या गॅलरीतली झाडं. त्यांना मिरची लागली आहे. लिलीची फुलं आली आहेत. या छोट्या-छोट्या गोष्टींचा तिला आनंद आहे. निखळ आनंद ती त्यातून मिळवते. तिला भौतिकतेचा आनंद नाहीच. शॉपिंगची आवड नाही, तिच्या काही गरजा नाहीयेत. तिचा आनंद निसर्गातील छोट्या-छोट्या गोष्टींमधूनच शोधते. त्यामुळे भौतिक सुखापासून ती अलिप्त राहिली आहे. दूर राहिली आणि निसर्गानंद मिळवत श्रीमंत झाली आहे. माझ्या आईचा हा साधेपणा आणि निर्मळपणा तिचा गर्भश्रीमंतपणा आहे. तो मलाही अवलंबवावासा वाटतो.

आई पेशाने आयुर्वेदिक डॉक्टर आहे, पण कविमनाची. अक्षरश: पोळ्या लाटतालाटता कविता केलेल्या मी पाहिल्या आहेत. त्यामुळे ‘पियूची वही’ला मिळालेला हा साहित्य अकादमीचा पुरस्कार तिने केलेल्या कामाला मिळालेली ही पावती आहे, असं मला वाटतं. याच्याही पुढे जाऊन तिचं हे काव्य, बालसाहित्य आणखी बहरेल, तिच्या कादंबऱ्या, कवितांची पुस्तकं सर्वांपर्यंत पोचावी, असं या निमित्तानं सांगावंस वाटतं.

कलाकृतीतील पियू म्हणजेच मीच; पण ही पियू आमच्या त्या पिढीतल्या सगळ्या मित्र-मैत्रिणींचे प्रतिनिधित्व करणारी आहे. हे असे बालपण घालवणारी कदाचित आमची शेवटची पिढी आहे, असे मला वाटते. आता इंटरनेट आणि मोबाईलने जग जवळ आले आहे; पण ‘पियू’च्या वाट्याला आलेल्या बालपणाचा उपक्रमशील अनुभव कुणीही घेताना आज दिसत नाही. त्यामुळे पियूची रोजनिशी तिच्या बालपणाचे महत्त्व आजच्या पिढीला पटवून देण्याचे काम करणारी आहे.

(लेखिका प्रसिद्ध पार्श्वगायिका आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com