लैंगिक अज्ञानामुळे पती नाराज

स्मिता जोशी
Sunday, 21 July 2019

समस्यांवर बोलू काही - स्मिता जोशी 
- माझ्या लैंगिक अज्ञानामुळे पती नाराज 

लैंगिक अज्ञानामुळे पती नाराज 
प्रश्‍न : माझे लग्न होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. पण, अजूनही आम्ही पती-पत्नी म्हणून एकत्र येऊ शकलेलो नाही. मी ग्रामीण भागातून शहरात आलेली आहे. साध्या कुटुंबात वाढल्यामुळे पती-पत्नीमधील शारीरिक संबंधाबाबत बोलणे, आमच्याकडे पाप समजले जात होते. त्यामुळे या विषयावर घरात कधीच चर्चा झाली नव्हती. लग्न झाल्यानंतर माझ्या पतीच्या माझ्याकडून खूप वेगळ्या अपेक्षा होत्या. तो मोबाईलवर अनेक व्हिडिओ मला दाखवायचा आणि त्या पद्धतीने मी त्याच्याशी वागावे अशी त्याची अपेक्षा होती. परंतु, ते सर्व पाहून माझ्या मनामध्ये अत्यंत किळस निर्माण झाली आणि या गोष्टी अजिबातच करू नये, असे वाटू लागले. आमच्या दोघांमध्ये त्यामुळे अत्यंत दुरावा निर्माण झाला आहे. आता तर आमचे एकमेकांशी बोलणेही बंद झाले आहे. या सर्व गोष्टी मी माझ्या माहेरी किंवा सासरी अद्यापही सांगितलेल्या नाहीत. माझा संसार व्यवस्थित व्हावा, माझ्या पतीने माझ्याशी चांगले वागावे, असे मला वाटते. परंतु, आता यातून मार्ग काढण्यासाठी काय करावे? 

उत्तर : लग्न कशासाठी करतात?, हा विचार केला तर सामाजिक स्थैर्य, शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी एक समाजमान्य मार्ग म्हणून लग्नाकडे बघितले जाते. आपल्या शारीरिक आणि मानसिक गरजांची पूर्तता ही लग्नसंबंधांमध्ये होत असते. परंतु, याबाबत पती-पत्नी यांनी एकमेकांशी मोकळेपणाने बोलणे, एकमेकांच्या आवडी-निवडी समजून घेणे, हे लग्नानंतर पहिल्या वर्षामध्ये घडणे गरजेचे आहे. आपल्या आवडीनिवडी आणि जोडीदाराच्या आवडीनिवडी विचारात न घेता केवळ आपल्या अपेक्षा लादत गेल्यास एकमेकांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्‍यता जास्त असते. तुमच्या दोघांबाबत नेमके हेच घडले आहे. परंतु, अजूनही वेळ गेलेली नाही. पुन्हा एकदा नव्याने सुरवात करा. अहंकार बाजूला ठेवून एकमेकांशी बोलायला सुरवात करा. काही अडचणी असतील, मनामध्ये भीती असेल तर याबाबत लैंगिक समुपदेशकांची मदत घ्या. लग्नानंतर अशा चुका होत असतात. परंतु, त्या वेळीच सुधारणेही गरजेचे आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: problem in relation of husband wife