एकल संस्कृती नव्हे; विविधताच आधार

एकल संस्कृती नव्हे; विविधताच आधार

बहुसंख्याकवादाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेचे हिंदुत्ववादी आणि हिंदुकरणाचे प्रयत्न होत आहेत. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हिंदुत्ववादीकरण म्हणजे ब्राह्मणीकरण आणि हिंदूकरण म्हणजे क्षत्रियीकरण. यासाठी राज्यघटनेचाच आधार घेतला जातोय. त्या माध्यमातून एकल संस्कृती (मोनो-कल्चर) लादण्याचा हा प्रयत्न आहे. हिंदूकरणात वेगवेगळ्या वर्ग-जातींचा संघर्ष घडवून त्यातून एकल संस्कृती लादण्याचा हा प्रयत्न आहे. खरे तर आपली विविधता हीच ताकद आहे. आचार, विचार, भाषा, धर्म अशा विविध रूपाने तीचे अस्तित्व आहे. तीच देशाच्या केंद्रस्थानी आली पाहिजे. तोच राज्यघटनेचा गाभा आणि आधार आहे.

एकल संस्कृतीला विरोधाचे जे प्रयत्न होत आहेत तेही वरवरचे आहेत. खरे तर त्या संघर्षासाठी मॉडेल तयार केली पाहिजेत. आजवर भारतीय राज्यघटना समजून न सांगता आपण बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभे करणे म्हणजे घटनेचे जतन करणे असा अर्थ घेतला. खरे तर राज्यघटना बचाव म्हणतो तेव्हा तो संघर्ष धर्मसत्तेविरोधातील आहे हेच आपण विसरतो. त्यामुळे होणारा विरोध वरवरचा ठरतो. प्रस्थापित व्यवस्थेला तात्पुरता आणि कायम विरोध करणारी अशी दुफळी तयार झाली आहे. तात्पुरता विरोध करणारे एकप्रकारे पुन्हा प्रस्थापित व्यवस्थेलाच घट्ट करीत असतात. या दोन्ही परंपरा जुन्या आणि समांतरपणे चालत आल्या आहेत. सम्यक साहित्य संमेलनाचे व्यासपीठ कायम विरोधकांचे आहे. 

आजच्या राजकीय अवकाशात पुरोगामी विचारवंत-साहित्यकांनाच आरोपी ठरवले जातेय. शहरी नक्षलवादी म्हणून हिणवले जाते. मुळात नक्षलवादी चळवळीकडे बघण्याचा आजचा दृिष्टकोन जुनाच आहे. मागे एकदा काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नक्षलवाद्यांविरोधात लढण्यासाठी लाँचरची मागणी केली होती. त्यावेळचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. मात्र, ही चळवळ वाढतेय का, याकडे लक्ष दिले जात नाही. हेच आजही सुरू आहे. काँग्रेस असो वा भाजप वैचारिकदृष्ट्या एकच आहेत. त्यामुळे काँग्रेसविरोधाची मांडणी करणारे जयप्रकाश नारायण किंवा राम मनोहर लोहिया यांनी अंतिमतः यांच्या राजकीय संघर्षाची परिणती भाजपच्या विस्तारात झालेली दिसते. 

नचिकेत कुलकर्णी नावाच्या एका लेखकाने यावर लिहिलेल्या लेखाचा मथळाच मुळी ‘समाजवादी साथी; खाती फॅसिष्ट माती’ असा आहे. त्यामुळे यापुढेची मांडणी ॲन्टी बीजेपी किंवा ॲन्टी काँग्रेस एवढीच पुरेशी ठरणार नाही. पुरोगामी लेखक-साहित्यकांना त्यासाठी मॉडेल्स मांडावी लागतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com