ओस्लोः संग्रहालयांचं शहर (प्रा. शैलजा सांगळे)

प्रा. शैलजा सांगळे
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

नॉर्वेची राजधानी ओस्लो या शहरात तब्बल ५० हून अधिक संग्रहालयं आहेत. जहाजांचं संग्रहालय, छोट्या-मोठ्या बाटल्यांचं संग्रहालय, भूगर्भशास्त्राविषयीचं, प्राणिशास्त्राविषयीचं संग्रहालय अशी कितीतरी...याशिवाय नॉर्वेचा विख्यात शिल्पकार व्हिगेलॅंड यानं साकारलेल्या ६५० शिल्पांचं-पुतळ्यांचं उद्यानवजा संग्रहालय. ओस्लोला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हे पुतळे म्हणजे सगळ्यात मोठं आकर्षण. ग्रॅनाईट, ब्राँझ, विशिष्ट प्रकारचं लोखंड अशा विविध प्रकारांमधली ही शिल्पं पर्यटकांना खिळवून ठेवतात...

नॉर्वेची राजधानी ओस्लो या शहरात तब्बल ५० हून अधिक संग्रहालयं आहेत. जहाजांचं संग्रहालय, छोट्या-मोठ्या बाटल्यांचं संग्रहालय, भूगर्भशास्त्राविषयीचं, प्राणिशास्त्राविषयीचं संग्रहालय अशी कितीतरी...याशिवाय नॉर्वेचा विख्यात शिल्पकार व्हिगेलॅंड यानं साकारलेल्या ६५० शिल्पांचं-पुतळ्यांचं उद्यानवजा संग्रहालय. ओस्लोला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हे पुतळे म्हणजे सगळ्यात मोठं आकर्षण. ग्रॅनाईट, ब्राँझ, विशिष्ट प्रकारचं लोखंड अशा विविध प्रकारांमधली ही शिल्पं पर्यटकांना खिळवून ठेवतात...

निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण असणाऱ्या नॉर्वेची राजधानी ओस्लो ही हजारो मैल पसरलेल्या घनदाट अरण्यांच्या टेकड्या व ओस्लो फियॉर्ड (दोन उंच-सरळसोट खडकांमधला समुद्राचा निमुळता-निरुंद भाग) यांच्यामध्ये वसलेली आहे. खूप मोठं क्षेत्रफळ असलेल्या अनेक राजधान्यांच्या शहरांपैकी ओस्लो हे एक राजधानीचं शहर. या शहराचं क्षेत्रफळ जरी मोठं असलं, तरीसुद्धा केवळ २० टक्के क्षेत्रफळ शहराच्या विकासासाठी वापरलं आहे, उर्वरित ८० टक्के क्षेत्रफळावर उद्यानं, बागा, जंगल, हिरव्यागार टेकड्या, निसर्गरम्य तळी व मोकळी जागा आहे. विशेष म्हणजे शहरातल्या बागा, तळी, उद्यानं आदी ठिकाणी जाण्यासाठी भरपूर पायवाटा, फुटपाथ आहेत, त्यामुळं ट्रॅफिकमधून कसरत करून जीव मुठीत धरून फिरावं लागत नाही, हे या शहराचं वेगळेपण आहे. समुद्रकिनारी स्थान असल्यानं या शहराच्या सौंदर्यात आगळी भर पडली आहे.

ओस्लो शहराची रचना आकर्षक असून, निळ्याशार समुद्राची झालर व भरपूर हिरवाई यामुळं या शहरात पायी फिरण्याची मजा काही औरच. इथला किल्ला, राजवाडा, नाट्यगृहं, ऑपेरा हाउस, नोबेल इन्स्टिट्यूट, कॅथेड्रल, व्हिगेलॅंड, शिल्पकलेचं उद्यान, व्हायकिंग शिप म्युझिकल, इतर अनेक संग्रहालयं आणि उद्यानं आदी बघण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं इथं येतात. कुठंच गर्दी नाही, गडबड नाही, भरपूर झाडी असल्यानं स्वच्छ व प्रसन्न हवा व नॉर्वेच्या लोकांनी जपलेला निसर्ग हा पर्यटकांना ताजंतवानं करतो.

ओस्लोमधल्या पर्यटकांचे सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे शिल्पकलेचा अप्रतिम संग्रह असलेलं जगातलं एकमेव व आकारानं सगळ्यात मोठं असं ‘व्हिगेलॅंड शिल्पकलेचं उद्यान’. व्हिगेलॅंड हा नॉर्वेतला सुप्रसिद्ध शिल्पकार होता. तो केवळ शिल्पकलेसाठीच प्रसिद्ध नव्हता, तर स्केचेस, लाकडावरचं कोरीव काम, फोटोग्राफी, लेखन व त्याचं खासगी ग्रंथालय आदी बाबींसाठीही सगळ्या युरोपभर प्रसिद्ध होता. हे उद्यान म्हणजे व्हिगेलॅंडला वाहिलेली कायमस्वरूपी श्रद्धांजलीच होय. ८० एकर परिसरात विस्तारलेल्या या आगळ्यावेगळ्या उद्यानात व्हिगेलॅंडनं आयुष्यभरात बनवलेली ६५० शिल्पं पर्यटकांना खिळवून ठेवतात. ग्रॅनाईट, ब्राँझ व विशिष्ट प्रकारे तयार केलेल्या लोखंडातली ही शिल्पं आहेत. एखादा शिल्पकार एका आयुष्यात एवढी शिल्पं बनवू शकतो, यावर विश्‍वास बसू नये, असं हे भव्य काम आहे. ही शिल्पं ओझरती बघण्यासाठी नाहीतच. ती बघायची तर बारकाईनंच; त्यातले बारकावे टिपत. मात्र, तशी बारकाईनं बघायची तर आठ दिवससुद्धा पुरणार नाहीत. या शिल्पांचं वर्णन करायला शब्द अपुरे पडावेत, इतके बारकावे त्यांत आहेत.
***

दरवर्षी दहा लाखांपेक्षा जास्त पर्यटक या उद्यानाला भेट देतात. उद्यान कसलं? ते तर शिल्पकलेचं संग्रहालयच. प्रत्येक शिल्पापाशी पर्यटकांची पावलं थबकतात आणि किती फोटो घेऊ असं होऊन जातं. या उद्यानाची कल्पना, डिझाईन व रचना हे सगळं काही संपूर्णतः व्हिगेलॅंड या शिल्पकाराचं आहे. सन १९२४ ते १९४३ अशी सतत २० वर्षं या उद्यानाचं काम चाललं होतं. या अखंड मेहनतीची फलश्रुती म्हणजे पर्यटकांच्या डोळ्याचं फिटणारं पारणं! या उद्यानाच्या मध्यभागी एक भलंमोठं कारंजं आहे. उद्यानाचं प्रवेशद्वारही खूप लक्षवेधी आहे. प्रवेशद्वार व कारंजं यांना जोडणारा पूल १०० मीटर लांब व १५ मीटर रुंद असून, त्यावर ५८ शिल्पं आहेत.

या उद्यानातलं कारंजं, तसंच मोनोलिथ, अँग्री बॉय आदींभोवती पर्यटकांची सतत गर्दी असते व असंख्य कॅमेऱ्यांचे फ्लॅश सतत चमकत असतात. उद्यानाच्या मध्यभागी असलेल्या कारंज्याचा आकार एक हजार ८०० चौरस मीटर आहे. काळ्या व पांढऱ्या मोझॅक टाईलनं वर्तुळाचा परीघ व्यापलेला आहे. उद्यानाच्या मध्यभागी असलेलं फाउंटन पार्क हे अत्यंत देखणं व उत्तम दर्जाचं आहे. त्याच्या चारी बाजूंना मानवाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व अवस्था दाखवणारे पुतळे आहेत. प्रत्येक दिशेला पाच झाडं आहेत व त्यांवर मानवाचे पुतळे आहेत. एका दिशेच्या झाडावर लहान मुलं, दुसऱ्या दिशेच्या झाडावर तरुण, तिसऱ्या दिशेच्या झाडावर प्रौढ, कुटुंबवत्सल, संसारी माणसं, तर चौथ्या दिशेच्या झाडावर वृद्ध मंडळींचे पुतळे आहेत. त्यांची शरीररचना, चेहऱ्यांवरचे हावभाव, देहबोली आदींवरूनच ते कोणत्या वयोगटात मोडतात हे समजतं. इतके हे पुतळे सुंदर अन्‌ बोलके आहेत.  

कारंज्यातले चारी दिशांचे पुतळे हे मानवाचं जन्मापासूनचं ते मृत्यूपर्यंतचं जीवनचक्र दाखवतात आणि मृत्यूनंतर नवीन जीवन सुरू होतं हे सुचवतात. कारंज्याच्या मध्यभागी एखाद्या मोठ्या बेसिनसारखा भाग आहे. तो भाग सहा लोकांनी उचलून धरला आहे, असं ते शिल्प आहे. हे सगळे पुतळे ब्राँझचे आहेत. त्यांची भव्यता मूळच्या सौंदर्यात भरच टाकते.
***

मोनोलिथ हे व्हिगेलॅंडचं शिल्प म्हणजे त्याच्या सगळ्या शिल्पांमधलं अतिमहत्त्वाचं शिल्प ठरावं. शिल्पकलेचा अप्रतिम नमुना. उद्यानाच्या मध्यभागी एका उंच चौथऱ्यावर ते उभारलेलं आहे. मोनोलिथ म्हणजे अखंड दगडाचा खांब; पण हा खांब इतर खांबांसारखा सरळसोट खांब नाही. ४६ फूट उंचीच्या या ग्रॅनाईटच्या अखंड खांबावर १२१ मानवी आकृत्या कोरलेल्या आहेत. या सगळ्या मानवी आकृत्या म्हणजे त्या खांबावर ते सगळेजण चढत असून, प्रत्येकजण खांबाच्या शिखरावर पोचण्यासाठी झगडत आहे, असं प्रतीत होतं. त्यात नवजात बालकं, पौंगडावस्थेतली मुलं, तरुण, वृद्ध मंडळी अशा सगळ्या वयोगटातल्या मानवी शिल्पाकृती आहेत. त्यांच्या पोजेस पण वेगळ्या वेगळ्या म्हणजे प्रेमीयुगुलापासून ते गप्पा मारणाऱ्या स्त्री-पुरुषांपर्यंतच्या आहेत. १२१ मानवी आकृत्या कोरून मोनोलिथ तयार होण्यास १४ वर्षं लागली. व्हिगेलॅंडच्या या भव्यदिव्य शिल्पकृतीपुढं पाहणारा नतमस्तक व निःशब्द होऊन जातो.

***
पर्यटकांचं या उद्यानातलं तिसरं आकर्षण म्हणजे ‘अँग्री बॉय’ हे शिल्प. हे शिल्प तसं छोटेसं आहे. रागावल्यानंतर चिडून ओरडणाऱ्या मुलाचं हे हुबेहूब शिल्प आहे. ते पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडते. याव्यतिरिक्त चेहऱ्यावर अप्रतिम प्रेमभाव असलेले गप्पा मारणारे दोन प्रेमिक, चिंतेचे भाव असणारा दाढीवाला म्हातारा, मुलाला वरच्या दिशेला फेकून झेलणारी आई, दहीहंडीसारखा पिरॅमिड केलेली छोटी मुलं, एकमेकींजवळ घोळक्‍यानं उभ्या राहून गप्पा मारणाऱ्या पाच मैत्रिणी, मुलाबरोबर खेळणारी आई इत्यादी अनेक शिल्प लक्ष वेधून घेतात. या उद्यानात काही विचित्र, अनाकलनीय शिल्पंसुद्धा आहेत. ही शिल्पं करण्यामागं शिल्पकाराची मानसिकता नेमकी काय असावी, याचा उलगडा होत नाही. अशा शिल्पांची उदाहरणंच द्यायची झाली तर, मोठ्या सरड्याला मिठी मारणारी बाई, आदिमानवसदृश वस्त्रविरहित पुरुष, राक्षसाशी लढणारा माणूस, लहान मुलाकडून मार खाणारा माणूस इत्यादी.

***
ओस्लो बंदराजवळच निळ्याशार पाण्याच्या पार्श्‍वभूमीवर इटालियन मार्बलमध्ये बांधलेलं पांढरंशुभ्र ऑपेरा हाउस म्हणजे वास्तुकलेचा ओस्लोमधला सर्वोत्कृष्ट नमुना. ओस्लोत आलेला एकही पर्यटक व्हिगेलॅंड शिल्पकलेचं उद्यान व ऑपेरा हाउस पाहिल्याशिवाय परतत नाही. ऑपेरा हाउसमध्ये संगीताचे व नृत्याचे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम चालतात. ऑपेरा हाउसची वास्तुरचना अशी आहे, की त्याचं उतरते छत थेट रस्त्यालाच येऊन भिडतं. पर्यटक त्या छतावरून चालत जाऊन छताच्या वरच्या भागात पोचतात व तिथूनच ओस्लो शहराच्या सौंदर्याचा देखावा अनुभवतात. मोठमोठ्या कॉलमचा आधार देऊन छत उभारण्यात आलेलं आहे.

थेट रस्त्यालाच येऊन भिडणारं हे जगातलं एकमेव छत असावं. छताच्या वरच्या भागातून चारी दिशांना वेगवेगळा देखावा बघायला मिळतो. उजवीकडच्या फियॉर्डमध्ये बेटांचा समूह असून, त्या बेटांवर छोटे छोटे, गडद रंगात रंगवलेले टुमदार बंगले आहेत, तर डावीकडं संपूर्ण ओस्लो शहराचं दर्शन घडतं. मागच्या बाजूला अगदी परिकथेत असाव्यात अशा हिरव्यागार टेकड्या व डोंगरांचा देखावा दिसतो. पांढराशुभ्र इटालियन मार्बल व पांढरा ग्रॅनाईट यांच्यात बनवलेली ऑपेरा हाउसची वास्तू म्हणूनच खूप प्रेक्षणीय झाली आहे.

ऑपेरा हाउसमधलं आतील सभागृहही अतिसुंदर आहे. ते नॉर्वे देशाचं अतिशय सुंदर व सगळ्यात मोठं सांस्कृतिक केंद्र आहे. नेत्रदीपक झुंबरांच्या प्रकाशात झगमगणाऱ्या सभागृहाचा आकार घोड्याच्या नालेसारखा आहे. सभागृहातली स्फटिकाची झुंबरं डोळ्याचं पारणं फेडतात. हातानं पैलू पाडलेल्या ५८०० हजार स्फटिकांचा वापर या झुंबरात करण्यात आलेला आहे. सभागृहाच्या खांबांवर खालून वर पसरणारे दिवे सोडलेले असल्यानं ते वितळणाऱ्या बर्फाचा आभास निर्माण करतात. स्टेजही भव्यदिव्य असून, स्टेजचा पडदा असा तयार करण्यात आलेला आहे, की तो चुण्या पाडलेल्या ॲल्युमिनियमच्या अतिपातळ पत्र्यासारखा दिसतो.
मात्र, तो ॲल्युमिनियमचा बनवलेला नसून लोकर, सुती कापड व पॉलिस्टर यांच्या मिश्रणानं बनवलेला आहे! तो त्रिमितीचा परिणाम साधत असल्यानं आकर्षक वाटतो. खूप चमक असलेल्या या पडद्याचं वजन ५०० किलो आहे.

या सभागृहाभोवती जी लॉबी आहे, त्या लॉबीभोवतीही १५ मीटर उंचीची काचेची भिंत असून, तीत काचांचा वापर जास्तीत जास्त आणि फ्रेमचा कमीत कमी वापर करण्यात आलेला आहे. काचेचा वापर केल्यानं बाहेरचा निळा समुद्र आतून सुंदर दिसतो. ही लॉबी अनेक सुंदर शिल्पांनी व फ्रेमनी सजवण्यात आलेली आहे. ऑपेरा
हाउसच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे समुद्राजवळ एक प्लॅटफॉर्म बांधलेला असून, त्यावर एका स्त्रीचं स्टेनलेस स्टीलचं शिल्प आहे. ते शिल्प भरती-ओहोटीच्या किंवा वाऱ्यानं हलणाऱ्या पाण्यानं गोल गोल फिरतं. त्यामुळं त्या स्त्रीचा चेहरा सतत सर्व दिशांना दिसत राहतो.

***
ओस्लो शहराला ‘सिटी ऑफ म्युझियम्स’ म्हणण्याचे कारण म्हणजे या शहरात ५० पेक्षा जास्त संग्रहालयं आहेत. एवढ्या संख्येनं संग्रहालयं असणारा हा एकमेव देश असावा. येथील संग्रहालयात पुरातन व्हायकिंग जहाजापासून ते आजच्या कलेपर्यंत सगळं काही बघायला मिळतं. मिनी बॉटल म्युझियम, व्हायकिंग शिप म्युझियम, मंच म्युझियम, नॅचरल हिस्ट्री म्युझियम, नॉर्वेजियन मारिटाईम म्युझियम, फ्राम म्युझियम, नॅशनल गॅलरी म्युझियम, इंटरनॅशनल म्युझियम ऑफ चिल्ड्रेन आर्ट,

कल्चरल हिस्ट्री
म्युझियम, लेबर म्युझियम, ओस्लो सिटी म्युझियम, इंटरकल्चरल म्युझियम, म्युझियम ऑफ कॉन्टेम्पररी आर्ट अशी कितीतरी संग्रहालयं पर्यटकांना भुरळ घालतात. आत काय बघायला मिळणार, हे संग्रहालयाच्या नावावरूनच कळतं.
जगातलं एकमेव व आगळेवेगळे संग्रहालय म्हणजे मिनी बॉटल म्युझियम. नावाप्रमाणेच या संग्रहालयात जगभरातल्या अनेक देशांमधल्या छोट्या छोट्या बाटल्यांचा संग्रह आहे. हे संग्रहालय तीन मजली असून, त्यात ५५ हजारांहून अधिक विविध आकारांच्या, विविध रंगांच्या बाटल्या मोठमोठ्या स्टॅंडवर मांडलेल्या आहेत. या सर्व बाटल्या रिकाम्या नसून त्यांत फळं, बिया, किडे, मद्य, अळ्या असं काही ना काहीतरी भरून ठेवलेलं आहे!

‘व्हायकिंग शिप म्युझियम’ला तर प्रत्येक पर्यटकानं आवर्जून भेट द्यावी असंच ते आहे. नॉर्वेला मोठा समुद्रकिनारा लाभल्यानं व किनाऱ्याजवळ फियॉर्ड असल्यानं तिथले लोक दर्यावर्दी होते. व्हायकिंग ही नॉर्वेची मूळ दर्यावर्दी जमात. तिला समुद्रातून सतत प्रवास करावा लागत असे. त्यामुळं जहाजबांधणीत ती पारंगत होती. या संग्रहालयात वेगवेगळ्या आकारांची-रंगांची असंख्य जहाजं आहेत. मात्र, ओसेबर्ग, गोकस्टॅंड आणि ड्यून ही तीन जहाजं पर्यटकांच्या विशेष पसंतीची आहेत.
समुद्राच्या तळाशी ११०० वर्षांपूर्वी गाडलं गेलेलं जहाज ओसेबर्ग फियॉर्डजवळ पुरातत्वशास्त्रज्ञांना सापडलं, म्हणून या जहाजाला ओसेबर्ग असं नाव देण्यात आलं. एवढी वर्षं समुद्राच्या तळाशी गाडलं गेलेलं हे जहाज सापडलं तेव्हा जसंच्या तसंच होतं, कारण ते अत्यंत टिकाऊ अशा ओक वृक्षाच्या लाकडापासून बनवण्यात आलेलं होतं. हे जहाज गाळातून बाहेर काढून त्याचं इतक्‍या उत्तमरीत्या जतन केलं गेलं आहे, की या संग्रहालयात तेच पर्यटकांचं प्रमुख आकर्षण आहे. त्या जहाजात ६० ते ७० वयोगटातली एक महिला व २५ ते ३० वयोगटातली एक तरुणी असे दोघींचे सांगाडे सापडले होते. या सांगाड्यांच्या अभ्यासकांच्या मते, वयस्कर महिला ही व्हायकिंग राणी होती व ती तरुणी तिची दासी होती. गोकस्टॅंड हे जहाज खूप मोठं असून, त्याला १६ वल्ह्यांच्या जोड्या आहेत. ७० लोक त्यातून प्रवास करू शकतात. त्या जहाजात अनेक शस्त्रं, दागिने, सोन्या-चांदीची नाणी व पुरातन फर्निचरही बघायला मिळतं. त्यातली अत्यंत सुशोभित बग्गीसुद्धा पूर्वीच्या राणीची असावी, असं सांगितलं जातं.

***
ओस्लोमध्ये उत्तमोत्तम शिल्पकार, चित्रकार, दर्यावर्दी, वादक, गायक होऊन गेले. त्यातला एडवर्ड मंच हा एक सुप्रसिद्ध चित्रकार होता. ‘मंच म्युझियम’ हे त्याच्याचं नावानं आहे. मंच यानं काढलेली चित्रं, पेटिंग्ज, स्केचेस, जलचित्रं, शिल्पं  या संग्रहालयात आहेत. मंचनं काढलेली १२०० पेंटिंग्ज इथं पाहायला मिळतात. हे म्युझियम म्हणजे मंचच्या कलेला केलेला मानाचा मुजराच. ‘नॅचरल हिस्ट्री म्युझियम’मध्ये अनेक विभाग आहेत. त्यातली भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र या विभागांची संग्रहालयं प्रसिद्ध आहेत. भूगर्भशास्त्र संग्रहालयात अनेक आगळीवेगळी खनिजं, मौल्यवान रत्नं, धातू, डायनोसॉरचा सांगाडा आहे, तर प्राणिशास्त्र संग्रहालयात नॉर्वेतल्या सगळ्या प्राण्यांविषयीची सखोल माहिती मिळते. १८१४ मध्ये स्थापन झालेल्या बोटॅनिकल गार्डनमध्ये जगातल्या ७५०० जातींच्या वनस्पती असून, मध्यभागी असलेल्या रॉक गार्डनमध्ये १५०० जातींच्या वनस्पती पाहायला मिळतात.
नॉर्वेजेरिअन मारिटाईम म्युझियमची इमारत हा वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. त्यात किनाऱ्यांची संस्कृती, समुद्रकिनाऱ्यांचा इतिहास, बोटींची मॉडेल, सागरी पुरातत्वशास्त्र, जहाजबांधणी आदींविषयीची सखोल माहिती मिळते.
नॉर्वेमधले लोक उत्तर ध्रुवावर शोधमोहिमेला गेले होते, त्याची माहिती फ्राम म्युझियममध्ये मिळते. त्या शोधमोहिमेवर जाताना जे जहाज वापरण्यात आलं होतं, त्या फ्राम जहाजावरच हे संग्रहालय उभारण्यात आलेलं आहे.

ओस्लो शहरातलं आणखी एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे भव्य असा सिटी हॉल. इथं दरवर्षी १० डिसेंबरला म्हणजेच ऑल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीला जागतिक स्तरावरच्या व्यक्तीला नोबेल शांतता पुरस्कार दिला जातो. चौकोनी आकाराच्या लाल विटांनी बांधलेल्या व प्लॅस्टर न केलेल्या त्या लाल इमारतीत दोन टॉवर आहेत. एका टॉवरवर मोठं घड्याळ आहे व दुसऱ्या टॉवरवर ४९ छोट्या छोट्या घंटा आहेत. त्यांचा मंजुळ व लयबद्ध आवाज बंदरापर्यंत ऐकू जातो. ज्या हॉलमध्ये नोबेल पुरस्कार दिला जातो, तिथं त्या घंटांचा आवाज घुमतो. सिटी हॉलची अंतर्गत सजावट प्रेक्षणीय आहे. फ्रेस्को कलेचा वापर करून हा हॉल सजवण्यात आला आहे. त्याला ‘स्ट्रक्‍चर ऑफ सेंच्युरी’ म्हणतात.

ओस्लो शहरात जगातल्या अनेक मोठ्या शॉपिंग सेंटरपैकी एक शॉपिंग सेंटर आहे. शहराच्या मध्यभागी १६ हजार चौरस मीटर जागेत बांधलेल्या या शॉपिंग सेंटरमध्ये पाच मजल्यांवर ९३ दुकानं आहेत. १९८८ मध्ये बांधलेल्या या शॉपिंग सेंटरला दररोज ५० हजार पर्यटक भेट देतात आणि तिथल्या विक्रीची उलाढाल १४ हजार ४४० दशलक्ष नॉर्वेजियन क्रोन एवढी आहे.

सन १०५० च्या सुमारास ओस्लो शहराची स्थापना तिसऱ्या हेरॉल्डनं केली. तेराव्या शतकाच्या अखेरीस तिथं राजधानी आली.
१६२४ मधील अग्निप्रलयामुळं संपूर्ण शहर भस्मसात झालं. त्यानंतर पूर्वीच्या जागेजवळच तिथल्या राजानं नवं शहर बांधून त्याला क्रिस्तियाना हे नाव दिलं. काही काळ ते स्वीडनच्या आधिपत्याखाली होतं. स्वातंत्र्यानंतर म्हणजे १९२५ मध्ये त्याला ओस्लो हे जुनं नाव पुन्हा देण्यात आलं. १९ व्या शतकातल्या आर्थिक मंदीच्या काळात युरोपातल्या स्वीडन, फिनलंड, पोलंड, डेन्मार्क आदी देशांतल्या नागरिकांनी ओस्लो इथं स्थलांतर केले. या स्थलांतरित लोकांनी व स्थानिक लोकांनी ओस्लोचा विकास तर केलाच केला; पण ओस्लोला नॉर्वेचं प्रमुख औद्योगिक, व्यापारी, सांस्कृतिक व दळणवळणाचे केंद्र बनवून जगाच्या पर्यटन-नकाशावर या राजधानीला मानाचं स्थान मिळवून दिलं.

Web Title: prof. shailaja sangle's article in saptarang