अंगठी (प्रा. शैलजा यादव पाटील)

प्रा. शैलजा यादव पाटील, इस्लामपूर
रविवार, 24 जून 2018

उन्हाळ्याच्या सुटीत नातवंडांनी घर भरून जायचं. दिवाळीत दोन्ही मुलं-सुना आवर्जून घरी यायची. तेव्हा सुमनताईंना वाटायचं, सुखाच्या झळझळीत सुवर्णमुद्रांचं मापच आपल्या पदरात पडलं आहे!

आज सुमनताईंचा वाढदिवस होता; पण घरी कुणीच नव्हतं. मुलगा नील (इंद्रनील) आणि सून नीना एका कॉन्फरन्ससाठी गेले होते. नातवंडं शिक्षणासाठी बाहेरगावीच होती. "आज सुमनताईंच्या आवडीचा स्वयंपाक कर,' असं जाताना नीना घरकाम करणाऱ्या बाईला - कमलला - सांगून गेली होती.

उन्हाळ्याच्या सुटीत नातवंडांनी घर भरून जायचं. दिवाळीत दोन्ही मुलं-सुना आवर्जून घरी यायची. तेव्हा सुमनताईंना वाटायचं, सुखाच्या झळझळीत सुवर्णमुद्रांचं मापच आपल्या पदरात पडलं आहे!

आज सुमनताईंचा वाढदिवस होता; पण घरी कुणीच नव्हतं. मुलगा नील (इंद्रनील) आणि सून नीना एका कॉन्फरन्ससाठी गेले होते. नातवंडं शिक्षणासाठी बाहेरगावीच होती. "आज सुमनताईंच्या आवडीचा स्वयंपाक कर,' असं जाताना नीना घरकाम करणाऱ्या बाईला - कमलला - सांगून गेली होती.

मात्र, सुमनताईंना कशातच उत्साह वाटत नव्हता. डॉक्‍टर असलेली त्यांची मुलगी राधिका हिनं घेतलेली गर्भरेशमी साडी सुमनताईंना कपाटात समोरच दिसली. तिनं ती आज आवर्जून नेसायला सांगितली होती. त्यांनी ती साडी काढून हातात घेतली. तीवरून हात फिरवला; पण नेसायची इच्छाच होईना. देवळात जायचीही इच्छा नव्हती. मऊ मोरपिसासारख्या साडीवरून हात फिरवताना अचानक साडीचा धागा सुमनताईंच्या अंगठीत अडकला. त्यांनी तो अलगद सोडवला; पण सोडवताना त्यांच्या समोर भूतकाळाचे भरजरी पदर उलगडत गेले.

ही हिऱ्याची अंगठी सुमनताईंच्या पन्नासाव्या वाढदिवशी माधवरावांनी त्यांना दिली होती. खरं तर माधवअण्णांना हे सुचलेलं नव्हतं; सुमनताईंची मैत्रीण देशपांडेबाई यांनी अण्णांना हे सुचवलं होतं दोन वर्षांपूर्वी आणि दोन वर्षं अण्णांनी काटकसर करून, पैसे साठवून हे "सरप्राइज' सुमनताईंना दिलं होतं. सुमनताई आणि माधवअण्णा हे एक आदर्श जोडपं होतं. सुमनताई कोल्हापूरच्या एका नामांकित विद्यालयातून मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्या, तर अण्णा एका खासगी बॅंकेतून निवृत्त झाले होते. लग्न झालं तेव्हा तशी बरी परिस्थिती नव्हतीच; पण दोघांनी मिळून काटकसरीनं संसार करून घराचं आनंदभुवन केलं होतं. त्यांना दोन मुली आणि दोन मुलगे. मोठा अर्णव, नंतर राधिका आणि मालविका आणि छोटा इंद्रनील. त्यांनी कोल्हापुरातच एक छोटासा बंगला बांधला होता. कोल्हापूरपासून जवळच एका खेड्यात त्यांची शेतीही होती. तिचीही देखभाल सुमनताई व अण्णा करायचे. दर रविवारी गावी जाऊन यायचे. आर्थिक चणचण पाचवीला पूजलेली असूनही त्यांनी शेती थोडीशी वाढवली होती.

सुमनताई-अण्णा यांची चारही मुलं अत्यंत हुशार होती आणि त्यांना या बाबीचा साहजिकच खूप अभिमान होता. सुमनताईंच्या विद्यालयात आणि अण्णांच्या बॅंकेत नेहमी त्यांच्या मुलांचा विषय निघायचा. वक्तृत्व, खेळ आणि अभ्यास या सगळ्यांतच मुलं हुशार होती. राज्यस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धेत अर्णवनं "माझी आई' या विषयावर भाषण केलं होतं. त्यात त्याला प्रथम क्रमांक मिळाला होता. त्याच्या भाषणानं उपस्थितांच्या भावना हेलावून गेल्या होत्या.

आमची आई म्हणजे जगात "द बेस्ट' यावर अर्णवसह सगळ्या भावंडांचं एकमत होतं. अण्णांवरही मुलांचं तेवढंच प्रेम; पण थोडंसं अंतर राखून. आदरयुक्त प्रेम. आपलं घर म्हणजे गोकुळ, असं सुमनताई आणि अण्णा यांना वाटायचं. नंदनवन म्हणजे याहून काय वेगळं असतं?
सुमनताईंना वाटायचं, हे सुखाचं चांदणं नियती असंच दोन्ही हातांनी माझ्या घरावर सतत उधळत राहू दे. दोन्ही मुलं एमटेक्‌ झाली. मालविका बीई होऊन सॉफ्टवेअर कंपनीत चांगल्या पॅकेजवर पुण्यात नोकरी करत होती. राधिका डॉक्‍टर होती. अर्णवला बंगळूरला, तर नीलला हैदराबादमध्ये भल्या मोठ्या पॅकेजवर चांगल्या नोकऱ्या मिळाल्या होत्या. मात्र, हे करता करता सुमनताई-अण्णा दोघंही थकून गेले होते. चारही मुलांना अत्युत्तम शिक्षण देणं ही काही खायची गोष्ट नव्हती. सगळी सोंगं आणता येतात; पण पैशाचं सोंग कसं आणता येईल? खूप ओढाताण होत होती. सुमनताई सतत "शिक्षक बॅंके'चं कर्ज काढायच्या आणि अण्णा त्यांच्या बॅंकेचं. काटकसरीनं राहूनही दमछाक काही चुकत नव्हती. मात्र, दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंदाचा वसंतऋतू कधी ओसरला नव्हता. "मुलं हीच आमची संपत्ती आणि ती तर आमच्याकडं अमाप आहे,' असा त्यांचा दृष्टिकोन. मुलांनाही याची जाणीव होती. त्यांनी कधीच कसली उधळपट्टी केली नाही. कॉलेजच्या ट्रिपसारख्या गोष्टींनाही मुलं स्वतःहून फाटा द्यायची. सिनेमा, पार्ट्या, हॉटेलिंग हे सगळं कटाक्षानं टाळायची.
***

राधिका, मालविका दोघींनाही छान स्थळं मिळाली. राधिकाचे यजमान डॉ. राजन मुंबईत एक यशस्वी स्त्रीरोगतज्ज्ञ होते, तर मालविकाचे पती पुण्यातच एका नामवंत कंपनीत होते. दोघंही जावयासारखं कधी वागत नसत. स्वतःच्या आई-वडिलांइतकाच मान ते सुमनताईंना आणि अण्णांना देत. अर्णव, नील यांचाही विवाह पार पडला. सुमनताई-अण्णांनी सुचवलेल्या स्थळांना त्यांनी होकार दिला. रेवती आणि नीना दोन्ही सुना छानच होत्या. लवकरच नातवंडांच्या आगमनानं घरात अपार आनंद आला.
सुमनताई आणि अण्णा आता सगळ्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाले होते. दोघंही सेवानिवृत्त होते.
सगळी मुलं रास्त कारणांमुळं जिकडं-तिकडं पांगलेली होती. दोघांच्याही जवळ आता कुणीच नव्हतं; तरीही दोघं अत्यंत आनंदी होते. तब्येतीच्या तक्रारी अधूनमधून असायच्या; पण त्या तर वयाबरोबर येणारच. सकाळी लवकर उठून दोघंही फिरायला जायचे. आल्यानंतर चहा. मग अण्णा बागेत आणि सुमनताई न्याहारीची तयारी करायला किचनमध्ये. अधूनमधून कधी हैदराबाद, कधी बंगळूर, पुणे, मुंबई अशा दोघांच्याही फेऱ्या व्हायच्या. उन्हाळ्याच्या सुटीत नातवंडांनी घर भरून जायचं. दिवाळीत दोन्ही मुलं-सुना आवर्जून घरी यायची. तेव्हा सुमनताईंना वाटायचं, सुखाच्या झळझळीत सुवर्णमुद्रांचं मापच आपल्या पदरात पडलं आहे!
***

त्या दिवशीही नेहमीप्रमाणे सुमनताई आणि अण्णा फिरून आले. "सुमन, चहा टाकतेस ना?' असं म्हणून अण्णा बेडरूमकडं गेले. सुमनताईंनी चहा केला आणि अण्णांना हाक मारली; पण अण्णा आलेच नाहीत. "कशात रमलेले असतात देव जाणे' असं बडबडतच त्या चहाचा कप घेऊन बेडरूममध्ये गेल्या, तर फॅन सुरू होता आणि अण्णा बेडवर पडले होते. त्यांनी कप टेबलवर ठेवला. परत अण्णांना हाक मारली... हलवलं...पण अण्णा उठलेच नाहीत. ते हे जग सोडून गेले होते. अण्णांच्या आकस्मिक निधनानं सुमनताईंचं सर्वस्वच गेल्यासारख झालं. मुलांनाही हा फार मोठा धक्का होता.

आठवणींचे पाझर डोळ्यातून आणि अंतःकरणातून वाहत होते. अण्णांचं सुमनताईंवर खूप प्रेम होतं. प्रत्येक ठिकाणी दोघं एकत्र असायचे. शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणचा फेरफटका, शहरातली व्याख्यानं, नाटक, सिनेमा...सगळ्या गोष्टी दोघांनी एकत्र केल्या. केतकीसारखा वर्ण, सरळ नाक आणि सात्त्विक चेहऱ्याच्या सुमनताईंचा अण्णांना खूप अभिमान होता, कौतुक होतं. बाहेर कडक आणि करारी व्यक्तिमत्त्व असलेले अण्णा सुमनताईंसमोर अतीव प्रेमानं वागायचे. एकदा त्यांना बरं नसतानाही अण्णांनी कमलच्या मदतीनं खास कोल्हापुरी कोंबडी-वड्याचा झकास बेत केला होता.
...आणि "ती' हिऱ्याची अंगठी! सुमनताईंच्या आयुष्यातली ती तर सगळ्यात प्रिय वस्तू होती. तेव्हापासून सुमनताईंनी ती कधीच बोटातून काढली नव्हती. अण्णा गेल्यामुळं आता मुलं सुमनताईंना एकटं ठेवायला तयार नव्हती. मोठा अर्णव तर आईचा खूपच लाडका. त्याला आईला सोडून जायची कल्पनाच करवत नव्हती; पण सुमनताईंनी निग्रहानं नकार दिला. शेजारच्या वृंदाताई सोबतीला होत्या. विधवा वृंदाताई भावाकडं राहायच्या. आता सोबत म्हणून रात्री झोपायला यायचं त्यांनी सुमनताईंना कबूल केलं होतं. अशीच पाच वर्षं भरकन्‌ गेली. सत्तराव्या वर्षी झालेला अण्णांचा मृत्यू अकाली जरी नव्हता; तरी तो अनपेक्षित असल्यानं हा धक्का सुमनताईंना पेलला नव्हता. मानसिकदृष्ट्या खूप खचल्या होत्या त्या. मात्र, काळ हा सगळ्याच दुःखांवरचं औषध असतं.
***

पुढं वृंदाताईंना त्यांचा भाचा त्याच्या लहान मुलाला सांभाळण्यासाठी म्हणून अमेरिकेला घेऊन गेला. वृंदाताईंची खरंतर जायची इच्छा नव्हती; पण त्या निराधार असल्यानं त्यांच्यापुढं तसा दुसरा पर्यायही नव्हता. मनातलं सांगायचं धाडस त्यांना झालं नाही.

सुमनताईंही आता सत्तरीच्या झाल्या होत्या. अशा वेळी मुलांनी मात्र त्यांचं ऐकलं नाही. बंगळूर, हैदराबाद, मुंबई, पुणे असा त्यांचा प्रवास सगळ्या मुलांकडं सुरू झाला. सगळे जण काळजी घ्यायचे; पण प्रत्येक जण स्वतःच्या व्यापात गुंतलेला. आपल्यासाठी कुणाकडंच वेळ नाही, अशी खंत सुमनताईंना मनातून वाटत राहायची. अशीच आणखी काही वर्षं गेली. सगळीकडं आर्थिक सुबत्ता असूनही - मघाशी गर्भरेशमी साडीत अडकलेल्या अंगठीसारखं - त्यांना काहीतरी खटकत होतं. मोठ्या मुलाकडं बंगळूरला असताना एकदा त्या अशाच उदास बसलेल्या होत्या. तब्येतही बरी नव्हती. तेव्हा थोरली सून म्हणाली होती ः ""का हो आई, तुम्हाला इथं करमत नाही का? नसेल करमत तर मग ताईंकडं जा, नाहीतर भाऊजींकडं जा चार दिवस.'' ती हे सहजच बोलली असेल; पण सुमनताईंना वाटलं, "या मंडळींना आपली अडचण तर होत नसावी ना? ती हाकलतेय का आपल्याला? तसं नसेल...आपण उगाचच उलटासुलटा विचार करत आहोत...' त्याच वेळी शेजारी राहणाऱ्या एका मराठी कुटुंबातल्या आजींना त्यांची मुलगी "सीनिअर सिटिझन्स'च्या टूरला पाठवणार होती म्हणून ती सुमनताईंनाही विचारायला आली. सोबत चांगली आहे, तेव्हा जायला हरकत नाही, असा विचार करून सुमनताईंनी सून रेवतीला व अर्णवला विचारलं, तेव्हा रेवती पटकन म्हणाली ः ""काही नको या वयात रिस्क घ्यायला. त्या आजी खूप काटक आहेत. तुम्हाला नाही जमणार. कुठंतरी पडलाबिडलात तर या वयात काय होईल?'' अर्णव - त्यांचा लाडका मुलगा - यावर काहीच बोलला नाही. त्यांना याचा खूप त्रास झाला; पण अत्यंत सोशिक असलेल्या सुमनताईंनी शेजाऱ्यांना सांगून टाकलं ः ""मलाच आता एवढ्या लांब येणं झेपणार नाही.'' अर्णव आणि रेवती दोघंही दिवसभर ऑफिसला. नातवंडंही शिक्षणासाठी बाहेर, त्यामुळं सुमनताई कंटाळून जायच्या. दुसरा प्रसंग राधिकाच्या घरचा. राधिका एक प्रथितयश स्त्रीरोगतज्ज्ञ होती; त्यामुळं सतत कामात...पण एक दिवस तिनं आईला मुंबईतल्या एका मोठ्या मंदिरात घेऊन जायचं ठरवलं. सुमनताईही सुखावल्या; पण अचानक इमर्जन्सी आली आणि सुमनताईंना ड्रायव्हरबरोबर जावं लागलं. तसं मंदिरात जाणं हे आवश्‍यकच होतं असं नाही; पण त्यानिमित्तानं मनातल्या चार गोष्टी लेकीबरोबर त्यांना बोलायच्या होत्या. ते होऊ शकलं नाही. ताई खिन्न झाल्या; पण राधिकाला वाटलं की आपण आईसाठी कितीही केलं तरी तिचं समाधान काही होत नाही. राधिका याबद्दल मालविकाला फोनवर सांगत असताना सुमनताईंनी ते ऐकलं. नंतर राधिकानं सांगितल्यानुसार, मालविका तिला म्हणत होती ः ""अगं, तुझ्याकडं आई राहायला तरी येते; पण आम्ही दोघं दिवसभर ऑफिसमध्ये म्हणून आमच्याकडं ती येतच नाही. आता मी काय नोकरी सोडू शकते का तिच्यासाठी? ती समजून का घेत नाही?''

हे असं काही ऐकलं की सुमनताईंना खूप वाईट वाटायचं; पण त्या चेहरा नेहमी शांत आणि हसतमुख ठेवायच्या. मंदिरात जायला मिळालं असतं, तर त्यांना राधिकाला सांगायचं होतं ः "त्यांच्या हिऱ्याच्या अंगठीतला खडा पडला आहे, कोंदण तुटलंय, ते इथं दुरुस्त करून घेऊ या का?' आणि शक्‍य असतं तर लगेच दुरुस्तही करून घ्यायचं होतं.
मात्र, मनातली गोष्ट मनातच राहिली होती. कोंदण तुटलेली अंगठी सुमनताईंनी तशीच बोटात ठेवली. कारण, अण्णांची अतीव प्रेमाची आठवण होती ती. सध्या त्या धाकट्या मुलाकडं राहत होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांनी धाडस करून नीलला विचारलं ः ""अरे, माझी अंगठी दुरुस्त करायची आहे. तुला वेळ मिळेल का रे?''
का कुणास ठाऊक, हल्ली सुमनताईंना आत्मविश्वासच वाटत नसे. नील पटकन म्हणाला ः ""ठीक आहे. या रविवारी जाऊ या.'' रविवारी सूनबाई नीलशी बोलत होत्या ः ""आईंना आता कुठं हिऱ्याची अंगठी घालून जायचं आहे? काही नाही. आज आपल्याला मुलांच्या "पॅरंट्‌स मीट'ला जायचं आहे.''

सुमनताईंच्या कानावर हे शब्द आले. त्यांना अतिशय दुःख झालं; पण त्या शांतच राहिल्या. त्यानंतर किती तरी रविवार गेले; पण कुणीच कधी विषय काढला नाही. वृंदाताई अमेरिकेला चालल्या असताना सुमनताईंनी त्यांना पंचवीस हजार रुपये दिले होते, तेव्हाही तोंडावर कुणीच काही बोललं नव्हतं; पण ती गोष्ट कुणालाच आवडली नव्हती, हे नाही म्हटलं तरी सुमनताईंना जाणवलं होतंच.
"अरे, माझे पैसे! मी दिले...अण्णा गेल्यानंतर ज्या बाईनं पाच वर्षं माझी सोबत केली, मला प्रेम दिलं, मायेनं खाऊ घातलं, तिला काही द्यायचं की द्यायचं नाही, हे ठरवण्याचा अधिकार माझा नाही? अरे बाळांनो, मी कधी तुमच्याकडं पैसे मागितले का रे?' दुखावलेल्या सुमनताईंचे असे विचार सुरू होते.
***

सुमनताईंना आज उदासच वाटत होतं. अंगात कसकसही जाणवत होती. "स्वयंपाकाला काय करू,' असं कमल विचारत होती; पण त्यांचं लक्षच नव्हतं. त्या विचारातच हरवल्या होत्या..."माझं गोकुळ कुठं आहे? सुखाच्या मोहरा भरलेला माझा डबा कुठं हरवला?' त्यांनी परत एकदा अंगठीवरून हात फिरवला. समोरच अण्णांचा हसरा फोटो बघून त्यांना हुंदका आल्यासारखं झालं; पण तो हुंदका बाहेर पडलाच नाही. सुमनताई अखेरच्या प्रवासाला निघून गेल्या होत्या.

Web Title: prof shailaja yadav patil write article in saptarang