शब्दांचं नवं 'महाजाल' (प्रा. योगेश बोराटे)

prof yogesh borate write article in saptarang
prof yogesh borate write article in saptarang

"गूगल'च्या नव्या "चॅट' सेवेचे नगारे इंटरनेटच्या दुनियेत वाजायला सुरवात झाली आहे. इतर मेसेजिंग सेवांना ती तगडी स्पर्धा करू शकेल, अशी एकीकडं चर्चा असताना दुसरीकडं हा "शब्दव्यापार' कोणत्या दिशेनं चालला आहे, याचाही विचार अभ्यासकांसाठी उत्सुकतेचा आहे. एसएमएसद्वारे सुरू झालेला लिखित संवादाचा प्रवास "व्हॉट्‌सऍप'च्या वळणापाशी येऊन ठेपला आणि आता तो पुन्हा एका वेगळ्याच दिशेनं जाण्याचे संकेत आहेत. एसएमएसचा, सोशल नेटवर्किंग साइट्‌सचा वापर कमी होत असताना "गूगल चॅट' संवादाची दिशा नक्की कशी असेल, लिखित संवादात सातत्यानं नावीन्यपूर्ण प्रयोग होण्याचं नक्की कारण काय, लोकांची संवादाची आस कमी होत आहे की वाढत आहे आदी गोष्टींचा वेध.

"नाम' चित्रपटातलं "चिठ्ठी आयी है...' गाणं ऐकलंय का नुकतं कधी? तेच ते, पंकज उधास यांच्यावर चित्रीत झालं आहे ते. घरापासून दुरावलेल्या नायकाला घराची ओढ लावणारं ते गाणं. इथं त्याचा संदर्भ विचारात घ्यायचं कारण म्हणजे या गाण्यात तत्कालीन संवादाविषयी, त्याच्या पद्धतीविषयी केलेलं भाष्य. "पहले जब तू खत लिखता था, कागज में चेहरा दिखता था...' असं सांगू पाहणारे गीतकार आजच्या जमान्यातल्या तंत्रज्ञानाधारित संवादाविषयी, तंत्रज्ञानाधारित संवादाच्या पद्धतीविषयी नेमकं काय सांगतील, असा प्रश्न या गाण्यातले शब्द कदाचित तुमच्यासमोर उपस्थित करतील. विशेषतः जिथं तुम्हा-आम्हाला व्हॉट्‌सऍपला डीपी ठेवता येतात किंवा फेसबुक मेसेंजरवरून समोरच्याचं प्रोफाइल पिक्‍चरही जाणून घेता येतं, अशा काळात! त्या गाण्यात उल्लेख केलेली लिखित "चिठ्ठी' येणं आपल्याकडं कधीच बंद झालंय. एखाद- दुसरं सरकारी वा कार्यालयीन गरजेचं म्हणून आलेलं पत्र सोडलं, तर तुम्ही-आम्ही हल्ली ई-मेल आणि मोबाईल मेसेजिंगवरच अवलंबून आहोत. तसं असतानाही त्या गाण्यातून गीतकारानं लिखित संदेशाचं मानवी भावनांशी जोडलेलं नातं तुम्हा-आम्हाला असा विचार करायला उद्युक्त करू शकतं. काहींसाठी हा प्रश्न त्रासदायक ठरू शकतो, तर काहींसाठी तो कोरडेपणाचा- अर्थात आजकालच्या तंत्रज्ञानाधारित कोरड्या लिखित संवादाच्या एका वैशिष्ट्याचाही- भाग ठरू शकतो. मानवी संदेशवहनासाठी म्हणून नवनवीन तंत्रज्ञानं समोर येत असताना हे प्रश्न जटिल होत जाणार आहेत. अगदी "गूगल'चं नवं "चॅट' तुमच्यासमोर आल्यानंतरही!
संवादशास्त्र आणि माध्यम व्यवहाराचे विद्यार्थी म्हणून आम्ही शिकलेली एक महत्त्वाची बाब म्हणजे, संवाद हे मानवी जीवनाचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे. अर्थातच व्यक्ती जिवंत असेपर्यंत श्वासोच्छ्वास आणि त्याची संवादाची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. दोन वा अधिक व्यक्तींमधलं नातं विकसित करणारी प्रक्रिया म्हणून संवादाचा विचार केला जातो. एका वेगळ्या अर्थानं एकटेपणाची भावना संपवण्यासाठीही संवादाला खूप जास्त महत्त्व आहे. व्यक्तिगत पातळीवरचं मानवी जीवन; तसंच मानवी समाजजीवनाच्या विकासासाठी म्हणून अशा संवादाची खूप मोठी गरज असते. भौतिक, जैविक आणि सामाजिक घटकांवर आधारलेल्या वातावरणामध्ये सक्रिय देवाण-घेवाणीमधून संवादाची प्रक्रिया व्यापक होत जाते. त्यापैकी कोणत्याही एका घटकाकडे जरी दुर्लक्ष झालं, तरी त्याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवायला सुरवात होते. संवादाची भूक असलेले तुम्ही-आम्ही अशी परिस्थिती समोर आल्याबरोबर ती सुधारण्यासाठी तातडीनं प्रयत्न करत असतो. त्यासाठी आपण आधार घेत असतो, तो भाषेचा आणि शब्दांचा. खरं तर संत तुकारामांनी शब्दांचं सामर्थ्य स्पष्ट करताना तितक्‍याच ताकदीच्या शब्दांमध्ये भाष्य केलं आहे. "आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करू।। शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन। शब्द वाटू धन जनलोका।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्देचि गौरव पूजा करू।।' हे संत तुकारामांचे शब्द आजच्या तंत्रज्ञानाधारित संदेशवहनाच्या काळामध्ये अधिकच "अपिलिंग' होत चालले आहेत.

सुरवातीच्या काळात लिखित शब्दांना महत्त्व दिलं गेलं, ते त्या आधारे होणारी संदेशवहन प्रक्रिया जतन करून ठेवण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळं. तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून छापखाने पुढं आल्यावर ही प्रक्रिया केवळ मोजक्‍या व्यक्तींपुरती मर्यादित न राहता, ती अधिक व्यापक होत गेली. आजकालच्या इंटरनेटच्या जमान्यात अशी व्यापकता ही जनसंज्ञापन प्रक्रियेची एक महत्त्वाची ओळख बनली आहे. मोबाईल तंत्रज्ञानामध्ये प्रगती होत असताना लिखित संवादाला चालना मिळाली, ती टेक्‍स्ट मेसेजिंगमुळं. 1992 च्या सुमाराला पुढं आलेल्या शॉर्ट मेसेज सर्व्हिसनं (एसएमएस) जगभरातल्या संदेशवहन प्रक्रियेचा चेहरामोहराच बदलून टाकला. 160 कॅरेक्‍टर्सच्या मर्यादेतला पहिला एसएमएस पाठवला गेला तो कॉम्प्युटरवरून मोबाईलवर- कारण त्यावेळी मोबाईल्सना अक्षरांचे कळफलक नव्हते. त्यानंतरच्या काळात एकाच अंकाच्या बटणावर तीन वा चार अक्षरांचा एक गट अशा प्रकारानं कळफलक विकसित झाले. "टी 9' अर्थात "टेक्‍स्ट ऑन नाइन कीज'च्या तंत्रज्ञानाचाही पुढं वापर होत गेला. 1997 मध्ये "नोकिया'चा कम्युनिकेटर आणि नंतर "क्वेर्टी की-बोर्ड' अर्थात कॉम्प्युटरच्या की-बोर्डसारख्या मोबाईल की-बोर्डनी तर ही एसएमएसची दुनिया अधिकच समृद्ध होत गेली.

सोयीनं संदेशाची देवाणघेवाण
संदेशवहनाच्या प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञानाइतकाच महत्त्वाचा मानला जाणारा मुद्दा म्हणजे प्रतिसादाचा. या मुद्द्याच्या बाबतीतही तंत्रज्ञानाधारित लिखित संवादामध्ये तशा वेगवेगळ्या सुविधा निर्माण होत गेल्या आणि होत आहेत. टेक्‍स्ट मेसेजच्या मदतीनं प्रत्येक जण आपापल्या सोयीनं संदेशाची देवाणघेवाण करू शकतो, हे या प्रकारच्या संवादाचं एक वेगळं वैशिष्ट्य नंतरच्या काळात अधिकच महत्त्वाचं ठरू लागलं. या सेवेच्या वापरादरम्यान एकमेकांना प्रतिसाद देण्यासाठीचा काळ हा म्हटलं तर तसा अनिश्‍चित असू शकतो. दोन व्यक्तींमधल्या संवादासाठी ही तशी नवी बाब ठरली. दोन व्यक्तींमधल्या समोरा-समोरच्या संवादादरम्यान एकमेकांचा प्रतिसाद महत्त्वाचा आणि तितकाच अपेक्षित ठरत असतो. मात्र, दोन व्यक्तींमध्येच असलेल्या तंत्रज्ञानाधारित टेक्‍स्ट मेसेज सेवेनं मात्र प्रतिसादासाठीच्या अपेक्षित त्या वेळेची गणितं बदलली. मोबाईलवर किंवा फोनवर बोलण्यासाठीही दोन्ही व्यक्ती त्या वेळी बोलण्यासाठी उपलब्ध असण्याची गरज असे. टेक्‍स्ट मेसेजमध्ये प्रतिसादासाठी म्हणून मिळणाऱ्या वेळेच्या सुविधेनं तशी गरजही संपवून टाकली. मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांनी तुम्ही पाठवलेला संदेश समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचला की नाही, हे जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यातून किमान आपला संदेश समोरच्याला पोचला, या मानसिक समाधानाच्या पातळीवर आपण पोचलो. त्यानंतर पुढं आली ती "एमएमएस' अर्थात "मल्टिमीडिया मेसेजिंग सर्व्हिस.' या सेवेनं संदेशवहनाच्या प्रक्रियेला खऱ्या अर्थानं बहुमाध्यमाचे रंग देण्याला सुरवात केली. या टप्प्यापर्यंत मोबाईलवर आधारलेल्या लिखित संदेशवहन सेवेमध्ये इंटरनेटचा तसा थेट हस्तक्षेप नव्हता. मोबाईलसाठीचं नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्यांच्या दुनियेनं केलेल्या नियमांच्या आधारानं ही लिखित संदेशवहन प्रक्रिया सुरू होती आणि अद्यापही आहे. फक्त सध्या फरक पडला आहे तो इंटरनेटच्या मदतीनं होत असलेल्या लिखित संदेशवहन प्रक्रियेचा.

इंटरनेटमुळं दिशा आणि गतीही!
इंटरनेटच्या मदतीनं मोबाईलवरून चालणाऱ्या लिखित संदेशवहन प्रक्रियेनं जगभरातल्या संदेशवहन प्रक्रियेशी निगडित व्यवहारांची दिशा आणि गतीही बदलली. व्हॉट्‌सअप किंवा फेसबुक मेसेंजरसारख्या "ऑव्हर द टॉप मेसेजिंग प्लॅटफॉर्म्स'च्या (ओटीटी) वापरासाठी मोबाईलच्या नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडरची तशी गरजच उरली नाही. वाय-फाय किंवा डेटा पॅकच्या आधारे इंटरनेट वापरून या प्लॅटफॉर्म्सवरून लिखित संदेशवहन करणं शक्‍य झालं आहे. तंत्रज्ञानामधली ही प्रगती निव्वळ टेक्‍स्ट मेसेजिंग करणाऱ्यांना व्हॉट्‌सअप- फेसबुक मेसेंजरकडे घेऊन आली. या प्लॅटफॉर्म्सवरून मिळणाऱ्या ग्रुप चॅट, इमेज शेअरिंग, इमोटिकॉन्स किंवा व्हिडिओचा वापर अशा सुविधा वापरकर्त्यांसाठी आश्वासक चित्र निर्माण करणाऱ्या ठरल्या. प्रतिसादाच्या बाबतीत टेक्‍स्ट मेसेजमध्ये सर्व्हिस प्रोव्हायडरकडून मिळणाऱ्या मेसेज डिलिव्हरी रिपोर्टच्या पुढचा टप्पाही या इंटरनेट आधारित मेसेजिंग सुविधांमधून गाठता आला. मेसेज डिलिव्हर होणं, समोरच्या व्यक्तीनं मेसेज वाचणं आणि समोरच्या व्यक्तीनं त्याविषयी आपल्याला प्रतिसाद देण्यासाठी म्हणून काही तरी लिहायला सुरवात करणं अशा वेगवेगळ्या टप्प्यांमधून आपण आपल्या लिखित संदेशांना मिळणारा प्रतिसाद हळूहळू अनुभवू लागलो.

खासगीपणा अबाधित ठेवणाऱ्यांसाठी वेगळ्या सुविधा या प्लॅटफॉर्म्सनी उपलब्ध करून दिल्या. समोरच्या व्यक्तीनं पाठवलेला मेसेज आपण वाचला की नाही, हे समोरच्याला कळू न देण्याची सुविधा पुढं आली. अशा सुविधा वापरणाऱ्यांना पाठवलेले संदेश पुढं गेलेत की नाही, हे न समजल्यानं एखाद्या व्यक्तीला बेचैन झाल्यासारखं वा अस्वस्थ वाटत असेल, तर त्यात काहीच नवल वाटू नये. एखाद्याशी बोलत असताना, समोरचा आपल्याला काहीच प्रतिसाद कसा देत नाही, हे वाटल्यानं अस्वस्थ झाल्यासारखाच हा भाग आहे. इंटरनेटच्या आधारानं या लिखित संदेशवहन प्रक्रियेनं भौगोलिक सीमाही ओलांडल्या, विशेष म्हणजे त्यासाठी कोणताही वेगळा पैसा न घेता. तुमचा मोबाईल नंबर ही तुमची ओळख राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरही याच माध्यमातून स्पष्ट होत गेली. त्यासाठी तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरची कोणतीही गरज तशी उरली नाही. व्हॉट्‌सऍपवरील संदेशांनी ज्यावेळी निव्वळ टेक्‍स्ट मेसेजच्या आधारानं चालणाऱ्या संदेशवहनाचे आकडे मागे टाकले, त्यावेळी जगभरात एसएमएस तंत्रज्ञानाचा अंत जवळ आल्याच्या चर्चा झाल्या. प्रत्यक्षात उद्योगविश्वाच्या मनात काही तरी वेगळंच असल्यानं, तसं काही झालं नाही. किंबहुना तेच कारण असावं की काय, "गूगल'सारख्या व्यावसायिक कंपनीलाही मेसेजिंग सर्व्हिसच्या क्षेत्रामध्ये सातत्यानं नवनवीन प्रयोग करावे लागत असावेत.

"गूगल चॅट'चं तंत्रज्ञान
गूगलच्या नव्या "चॅट' प्रणालीचं वैशिष्ट्य म्हणजे ती "अँड्रॉइड' या ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारलेली आहे. इंटरनेटच्या मदतीनं कोणत्याही अँड्रॉइड मोबाईल्समध्ये टेक्‍स्ट मेसेजिंग शक्‍य होणार आहे. कोणत्याही मोबाईल नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडरची त्यासाठी गरज उरणार नाही. "रिच कम्युनिकेशन सर्व्हिस' (आरसीएस) या तंत्राच्या आधारे व्हॉट्‌सऍप वा आय-मेसेजसारख्या सेवांचा अनुभव अँड्रॉइडचे वापरकर्ते आता घेऊ शकतील. मेसेज कधी वाचला गेला, त्यावर प्रत्युत्तर देण्यासाठी कोणी काही टाइप करत आहे का, हे जाणून घेणं शक्‍य असेल. गटांमध्ये संवाद शक्‍य करण्याची सुविधाही त्यामध्ये मिळणार आहे. या सेवेमध्ये सध्या सुरक्षिततेची कोणतीही हमी ग्राहकांना मिळणार नाही. केवळ पाठवणारा आणि ज्याला तो मेसेज पाठवला आहे तोच हा मेसेज पाहू वा वाचू शकेल, अशी सुविधा त्यामध्ये नाही.
हे सर्व गूगलनं करण्याचं कारण कदाचित, सोशल मीडिया साइट्‌सपेक्षा मेसेजिंग अप्सचा जगभरात वाढत चाललेला वापर, हे असावं. उद्योग जगतानं ही बाब वेळीच ओळखून ब्रॅंडिंगच्या उद्देशानं केवळ सोशल मीडिया साइट्‌सवर असलेला भर मेसेजिंग ऍप्सकडे वळवला आहे. थेट संपर्क आणि थेट संवादातून ग्राहकांच्या नेमक्‍या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यावर व्यावसायिक कंपन्या भर देत आहेत. कंपन्या आपल्या विविध सेवा या मेसेजिंग ऍप्ससोबत जोडून घेत आहेत. ग्राहकांनाही आपल्या आवडीच्या ब्रॅंडसोबत थेट संवाद साधण्याची मिळणारी संधी अतिशय महत्त्वाची वाटत असल्याचंही समोर आलं आहे. तुम्हा-आम्हाला सध्या येत असलेले वेगवेगळ्या कंपन्यांचे एसएमएस, त्यामधून पाठवल्या जाणाऱ्या लिंक्‍स हा याच प्रकाराचा भाग आहे.

बहुपैलू संवाद
तंत्रज्ञानाधारित संवादाच्या बहुतांश उदाहरणांमध्ये दोन व्यक्तींमधला संवाद, गटांमधला संवाद आणि जनसंवाद अशा तीन महत्त्वाच्या टप्प्यांवर आपल्याला एकाच वेळी काम करता येतं. त्यामध्ये प्रतिसादाचाही विचार केला जातो. कदाचित अशा सर्वच टप्प्यांचा एकत्रित अनुभव हाच अशा सेवांच्या लोकप्रियतेचं एक प्रमुख कारणही असावं. तंत्रज्ञानाधारित लिखित संवादाविषयीच्या, खासकरून एसएमएस आणि इंटरनेटवर आधारित मेसेजिंग सेवांच्या जगभरातील आकडेवारीवर नजर टाकली, तर या बाबींना तशी बळकटीच मिळत जाते. भारतापुरतं बोलायचं झालं, तर "स्टॅटिस्टा'च्या आकडेवारीनुसार, भारतात 2015 मध्ये मोबाईलवर इंटरनेट वापरू शकणाऱ्यांपैकी एकूण 45 टक्के लोक हे संदेशवहनासाठी मेसेजिंग ऍपचा वापर करत होते. 2020 मध्ये हा आकडा पन्नास टक्‍क्‍यांच्या घरात जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. तसंच, 2015 मध्ये भारतातले दहा कोटींहून अधिक लोक मेसेजिंग ऍप्स वापरत होते. 2020 मध्ये ही संख्या 23 कोटींचा आकडा ओलांडून पुढं जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. "स्टॅटिस्टा'च्याच आकडेवारीनुसार, जगभरामध्ये जून 2000 मध्ये एक कोटी वीस लाख टेक्‍स्ट मेसेज पाठवले गेले होते. जून 2017 मध्ये टेक्‍स्ट मेसेजच्या संख्येनं 781 अब्जांचा आकडा गाठला होता. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढणार यात कोणतीही शंका नाही. त्याच वेळी अशा सेवांच्या वापराचा प्रत्यक्ष संवादावर होणारा परिणाम विचारात घेणंही रास्त ठरणार आहे.

संवाद वरचा की सखोल?
एसएमएस किंवा इंटरनेटवर आधारलेल्या ऍप्सच्या माध्यमातून होणारं संदेशवहन हे तसं सहज आणि सोपं मानलं जातं. मात्र, त्यामुळं होणारा संवाद हा अगदी वरवरचा ठरत असल्याचं सातत्यानं समोर येत गेलं आहे. भाषाशास्त्राच्या अंगानं तर एसएमएसमधील लिखित भाषेचा जगभरात अभ्यास सुरू असून, त्याचे दुष्परिणामही त्याच निमित्तानं विचारात घेतले जात आहेत. प्रमाणभाषेच्या तुलनेत एसएमएसच्या भाषेमध्ये व्याकरणाच्या दृष्टीनं खूप चुका असल्याची ओरड केली जाते, ती काही चुकीची नाही. शालेय विद्यार्थ्यांच्या वाढत्या मोबाईल वापराचा त्यांच्या भाषेवर थेट परिणाम होत असल्याचंही संशोधनांमधून समोर आलं आहे. "प्रेडिक्‍टिव्ह टेक्‍स्ट' अर्थात शब्द वा स्पेलिंग सुचवण्याची उपलब्ध असणारी सुविधा ही दुसरीकडे तुमचं शब्दभांडार रितं करणारी ठरू लागली आहे. डेव्हिड क्रिस्टल यांच्या "टेक्‍स्टिंग- द ग्रेट डिबेट' या पुस्तकामधल्या संदर्भानुसार, टेक्‍स्ट मेसेजिंगच्या वापरामुळं जगभरातल्या काही भाषांचं आंग्लभाषिकीकरण होत चालले आहे. जगभरातल्या अकरा भाषांमध्ये इंग्लिश वर्णाक्षरांच्या मदतीनं LOL (लाफिंग आउट लाउड), U (तुम्ही वा तू), BRB (बी राइट बॅक), GR8 (ग्रेट), B4 (बीफोर) अशा लघुरूपांचा वापर होत आहे. शब्दांमध्ये अक्षरांऐवजी अंकांचा वापर (लोगोग्राम्स) आणि शब्दांऐवजी चिन्हांचा (इमोटिकॉन्स) वापरही वाढला आहे. याच पुस्तकामधल्या संदर्भानुसार, टेक्‍स्ट मेसेजच्या वापरामुळं लेखन आणि वाचन सवयींमध्ये आणि पर्यायानं साक्षरतेमध्येही वाढ होत असल्याचं निरीक्षण मांडण्यात आलं आहे. टेक्‍स्ट मेसेज करण्यासाठी वापरली जाणारी भाषा ही औपचारिक संवादामध्ये तशी अपेक्षित नसते. मात्र, त्याच भाषेच्या आधारावर संवादासाठी आग्रही राहणाऱ्यांच्या अनौपचारिक संवादकौशल्यांमध्ये वाढ होत असल्याचंही याविषयी झालेल्या संशोधनांमधूनच समोर आलं आहे.

मानवी संवादावर तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव ही आता एक अटळ बाब बनली आहे. सुरवातीच्या टप्प्यात संवादाच्या पद्धती बदलण्याचा असलेला तंत्रज्ञानाचा रोख आता संवादाची भाषा बदलण्याच्या दिशेनं झपाट्यानं काम करू लागला आहे. संवादाच्या पद्धती बदलत चालल्या आहेत. लांब अंतरावरच्या व्यक्ती एकमेकांच्या जवळ आल्याचं आभासी वास्तव निर्माण होत असतानाच, तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळं म्हणा वा चुकीच्या पद्धतीनं होणाऱ्या वापरामुळं म्हणा, अगदी जवळ अंतरावरच्या व्यक्तींमधला प्रत्यक्ष संवाद दुरापास्त होत चालला आहे. हाताच्या अंतरावर बसलेल्या दोन व्यक्तींनाही तंत्रज्ञानावर आधारलेल्या संवादाची मदत घ्यावी लागत आहे. "इंटरनेट ऑफ थिंग्स'ची संकल्पना तर तुमच्या-आमच्या बोलण्याच्या बहुतांश गरजाच संपवून टाकू शकेल अशी आहे. ऑटोमेशनच्या आधारे आपोआप सुरू वा बंद होऊ शकणाऱ्या आपल्या घरातल्या वस्तू, "अरे तो पंखा सुरू कर रे', "लाइट बंद केले आहेत का, बघा जरा' असे संवादही काळाच्या ओघात संपत जातील. त्यामुळं ही परिस्थिती अशीच बदलत गेली, तर कदाचित भविष्यात "आम्ही तुम्हाला एकमेकांशी बोलतं करू शकतो,' अशा आशयाची जाहिरात तुमच्यासमोर याच तंत्रज्ञानाधारित माध्यमांमधून आली, तर नवल वाटू देऊ नका!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com