जाहिरातींचा "देसी'वाद मांडणाऱ्याची गोष्ट (योगेश बोराटे)

प्रा. योगेश बोराटे borateys@gmail.com
रविवार, 19 ऑगस्ट 2018

अलीकडच्या काळामध्ये एखाद्या सिनेमा वा मालिकेशी संबंधित "द मेकिंग ऑफ'चे माहितीपट तसे नवे राहिले नाहीत. हे माहितीपट त्या सिनेमा वा मालिकेच्या निर्मितीदरम्यानच्या पडद्यामागच्या गमतीजमती रसिकांसमोर मांडतात. अगदी मोजक्‍या सेकंदांच्या; फार तर मिनिटभराच्या जाहिरातींसाठीच्या तशाच "द मेकिंग ऑफ' चा आपण तसा कधी विचार करत नाही. मात्र, अशा शेकडो जाहिरातींच्या "द मेकिंग ऑफ'च्या कथा तितक्‍याच रंजकपणे मांडण्यात "पांडेपुराण' हे पुस्तक यशस्वी ठरतं.

अलीकडच्या काळामध्ये एखाद्या सिनेमा वा मालिकेशी संबंधित "द मेकिंग ऑफ'चे माहितीपट तसे नवे राहिले नाहीत. हे माहितीपट त्या सिनेमा वा मालिकेच्या निर्मितीदरम्यानच्या पडद्यामागच्या गमतीजमती रसिकांसमोर मांडतात. अगदी मोजक्‍या सेकंदांच्या; फार तर मिनिटभराच्या जाहिरातींसाठीच्या तशाच "द मेकिंग ऑफ' चा आपण तसा कधी विचार करत नाही. मात्र, अशा शेकडो जाहिरातींच्या "द मेकिंग ऑफ'च्या कथा तितक्‍याच रंजकपणे मांडण्यात "पांडेपुराण' हे पुस्तक यशस्वी ठरतं. हे पुस्तक केवळ त्या जाहिरातींचंच नाही, तर त्या जाहिरातींच्या निर्मितीमागं असणाऱ्या व्यक्तीचे, संस्थेचे, त्यांच्या कल्पनाशक्तीचे प्रत्यक्ष दाखलेच आपल्यासमोर मांडतं. केवळ तसे दाखले मांडूनही हे पुस्तक थांबत नाही. या पुस्तकामध्ये जाहिरातींच्या क्षणचित्रांची केलेली मांडणी तुम्हा-आम्हाला स्मरणरंजनाचा अनुभव देत, त्या जाहिराती पुन्हा आठवायलाही भाग पाडतं. आठवतात ती जाहिरातींमधली माणसं, पर्यायानं जाहिरातीला अपेक्षित असणारे ब्रॅंड्‌स आणि त्या जाहिरातींमधून जपलेला मूळ भारतीयपणा; सोप्या भाषेत जाहिरातींचा "देसी'वाद!

"पांडेपुराण' हे "पांडेमोनियम' या मूळ इंग्लिश पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. या इंग्लिश पुस्तकाचे लेखक पीयूष पांडे यांची भारतीय जाहिरात क्षेत्रामध्ये एक कल्पक व्यक्ती म्हणून ओळख आहे. त्यांचं मूळ इंग्लिश पुस्तक जाहिरात या एका तितक्‍याच कल्पक आणि रंजक क्षेत्राविषयी भाष्य करतं. जाहिरात या क्षेत्राविषयीची रंजकता आणि पांडे यांच्या व्यक्तिमत्त्वामधले अगदी अफलातून म्हणावेत असे कल्पक पदर "पांडेमोनियम'नं सर्वसामान्य भारतीय नागरिकांसमोर इंग्लिशमधून उलगडून दाखवले होते. "पांडेमोनियम'मधल्या सर्व भावना आणि एक कल्पक व्यक्ती म्हणून पीयूष पांडे यांचं वेगळेपण इंग्लिशइतक्‍याच प्रभावीपणे मराठीमध्ये अनुवादित करण्याची जबाबदारी प्रसाद नामजोशी यांनी तितक्‍याच समर्थपणे पेलल्याचं "पांडेपुराण'च्या वाचनादरम्यान अनुभवता येतं. मुखपृष्ठावरच्या पुस्तकाच्या नावानं चेहऱ्याचा काही भाग झाकला जाईल, अशा स्वरूपामध्ये वापरलेलं पांडे यांचं छायाचित्र पुस्तकाविषयीची उत्सुकता वाढवतं. "पांडेपुराण' हे नाव पांडे यांच्या चेहऱ्यावरच्या हास्याच्या छबीकडून सुपीक डोक्‍याकडं, त्यामधल्या कल्पनाविश्वाकडं घेऊन जात असल्याचंही एखाद्याला भासू शकतं. या टप्प्यापासूनच सुरू होणारा "पांडेपुराण'चा प्रवास आपल्याला भारतीय जाहिरात विश्वाची एक रंजक सफर घडवून आणतो.
पुस्तकामध्ये एकूण पाच भागांमधून हे पुराण मांडण्यात आलं आहे. पहिल्या भागामध्ये लेखकाची जडणघडण, दुसऱ्या भागामध्ये जाहिरातीचे मूलभूत तंत्र, तर तिसऱ्या भागामध्ये जाहिरातींसाठीचं साधेपणाचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. "ऑगिल्वी आणि मी' या चौथ्या भागामध्ये लेखकानं आपलं व्यावसायिक भावविश्व मांडलं आहे. पाचव्या भागामधून लेखकानं जाहिरातीच्या भवितव्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकामध्ये सुरवातीच्याच टप्प्यात लेखकाच्या दोन शब्दांमध्ये "पांडेमोनियम' या पुस्तकाच्या निर्मितीमागची कथा स्वत: पीयूष पांडे यांनी सांगितली आहे. ती प्रक्रिया उलगडवून दाखवतानाही, त्यांनी हे पुस्तक समोर येण्याचं श्रेय आपल्या एका मित्राला दिलं आहे. ही प्रांजळ नी प्रामाणिकपणाची भावना आपल्याला या पुस्तकाच्या जवळ नेणारी ठरू शकते. अनुवादकानंही आपल्या मनोगतामधून अनुवादनाच्या या पहिल्याच प्रयत्नाविषयी आपले अनुभव मांडले आहेत. पुस्तकाला असणारी "बिग बी' अमिताभ बच्चन यांची प्रस्तावना या पुस्तकाचं महत्त्व सहजच वाढवून जाते. पुस्तकाच्या उपोद्‌घातामध्ये काही ओळी ठळकपणे मांडण्यात आल्या आहेत. त्यातून जाहिरातीच्या क्षेत्राविषयीचे बारकावे अगदी मोजक्‍या शब्दांमध्ये मांडले आहेत. पुस्तकाच्या शेवटाला स्वत:ची वेगळी जाहिरात संस्था सुरू न करण्याबाबतची आपली भूमिकाही लेखकानं तितक्‍याच नेटकेपणानं मांडली आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर; अर्थात ब्लर्बवर बड्या उद्योगसमूहांमधील व्यवस्थापकीय संचालक, लेखक, उद्योगसमूहाचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, क्रिकेटपटू आदी गटांमधल्या व्यक्तींनी पुस्तकाविषयी व्यक्त केलेली मतं या पुस्तकाचं वेगळेपण आणि त्याची सर्वसमावेशकता अधोरेखित करणारी ठरतात.

माणसांमधल्या, त्यांच्या वागण्या- बोलण्यातल्या, अगदी एखाद्या सुताराकडं वा चर्मकाराकडं असलेल्या कौशल्यांना महत्त्व देणारे पांडे मार्केट रिसर्चसाठी म्हणून सर्वसामान्य माणसाला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांविषयी "अत्यंत मूर्खपणाचे' म्हणत भाष्य करतात. पूर्वग्रह दूर करणाऱ्या संशोधनाची जाहिरातींसाठीची आवश्‍यकता, ग्राहकांचं समाधान करण्याविषयीची जाहिरात क्षेत्राला म्हणून असणारी एक वेगळी गरज, बड्या ब्रॅंड्‌सच्या जाहिराती आणि त्यांचे करार हाताळताना गरजेची असणारी काळजी, "मिले सूर मेरा तुम्हारा' किंवा "राष्ट्रीय साक्षरता मिशन'सारख्या सरकारी जाहिरातींचं वेगळेपण, जाहिरातींमधली प्रतीकात्मकता, जाहिरातींसाठी संगीताचं असणारं महत्त्व, सेलिब्रिटींना घेऊन जाहिराती करण्याविषयीचे अनुभव अशा एक ना अनेक मुद्द्यांना हे पुस्तक स्पर्श करून जातं. "क्‍या स्वाद है जिंदगी में' सारखी एखादी जिभेवर रेंगाळणारी जाहिरात देण्यापासून ते झुझूच्या कृतीतून समोर येणाऱ्या विनोदापर्यंतच्या प्रवासाचे वेगवेगळे टप्पे हे पुस्तक वाचकांसमोर मांडतं. जाहिरातींसाठीचे मोजके शब्द वा समर्पक कृती चपखलपणे शोधण्याचा तो रंजक प्रवास हे पुस्तक शब्दबद्ध करतं.

वास्तविक, हे पुस्तक म्हणजे जाहिरातीमधून माणूसपणा दाखवणाऱ्या माणसाचीच गोष्ट आहे. त्यामध्ये लेखकाचे स्वत:चे वैयक्तिक अनुभव, त्याला प्रभावित करणाऱ्या गोष्टी, भारतातलं जाहिरात विश्व, लेखकाची संवेदनशीलता आणि इतरांशी संवाद साधण्याची हातोटी, लेखकाची कल्पनाशक्ती, विनोद आणि सर्जनशीलता, "देसी' जाहिरातींची परिणामकारकता अशा अनेक मुद्द्यांवर माहिती देण्यात आली आहे. पुस्तकाची मांडणी करतानाच त्यामध्ये जाहिरातींची पुष्कळ उदाहरणं वापरण्यात आली आहेत. त्यासाठीची चांगली छायाचित्रं आणि त्यांची क्रमवार मांडणी वाचकांना त्या जाहिराती आठवायला भाग पाडतात. त्यांच्या निर्मितीमागची कथा अगदी रंजकपणे नी तितक्‍याच तरलतेनं वाचकांसमोर उलगडत जाते. साधेपणा जपत मानवी भावनांना हात घालणारं काम करण्याच्या कौशल्याची कॉर्पोरेट्‌सकडं नेमकी काय किंमत होते, ते हे पुस्तक दाखवून देतं. पुस्तकातून कौटुंबिक माहिती, प्रत्येक सदस्याचं वेगळेपण आणि त्याचा व्यावसायिक क्षेत्रासाठी होणारा फायदा लेखक सहजच मांडतो. कुटुंबातला प्रत्येक जण म्हणजे "त्या- त्या क्षेत्रातलं गुगल' असं महत्त्वही लेखक अधोरेखित करतो. मात्र, त्याच वेळी पूर्ण पुस्तकात लेखक कुठंही कोणत्याही व्यक्तिपूजेमध्ये अडकत नाही, हेही या पुस्तकाचं एक वेगळेपण. अर्थातच जाहिरातीविषयी लिहिताना ते कुठंही "जाहिरात केल्यासारखं' भासवत नाहीत, हेही आपण आपसूकच समजून घेतो.

पुस्तकाचं नाव : पांडेपुराण
लेखक : पीयूष पांडे
अनुवाद : प्रसाद नामजोशी
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन, पुणे (020-29806665)
पृष्ठं : 255/ मूल्य : 320 रुपये

Web Title: prof yogesh borate write book review in saptarang