कॉमर्स 'ड्रॉप आऊट' बनला 44 हजार कोटींच्या कंपनीचा संस्थापक

Profile of Radhakishan Damani of D-Mart by Gautami Aundhekar
Profile of Radhakishan Damani of D-Mart by Gautami Aundhekar

कॉमर्सचे शिक्षण कॉलेजच्या पहिल्या वर्षात अर्धवट सोडलेले. घरचा पिढीजात व्यवसाय बॉलबेअरिंग बनविण्याचा. त्यात मन रमवायचे सोडून शेअर बाजारात दलाल म्हणून उडी घेतली. शेअर बाजारात काळाच्या पुढे झेप घेत गुंतवणूकदार बनले. फ्रँचाईजी म्हणून ज्या कंपनीची एजन्सी घेतली, तीच कंपनी अवघ्या दोन वर्षांत विकत घेऊन टाकली. स्वतःची कंपनी उभी केली आणि अवघ्या बारा वर्षांत ती देशात अव्वल बनवली.

राधाकिशन दमाणी, वय 61 या व्यक्तीची ही यशकथा. आपल्यापैकी अनेकजण कधी ना कधी घरातील दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसाठी ज्या डी-मार्ट स्टोअरला भेट देतो, त्या कंपनीचे संस्थापक. गेल्या 48 तासांत दमाणी भारतातल्या भल्या भल्या उद्योगपतींना मागे टाकून तब्बल चाळीस हजार कोटी रूपयांच्या कंपनीचा सर्वेसर्वा ठरला आहे. मात्र, या 48 तासांत झळाळलेल्या यशामागे गेल्या तीस वर्षांचा अनुभव, सातत्याने केलेले प्रयोग आणि भविष्याकडे पाहण्याचा स्वतंत्र दृष्टीकोन आहे.

डी-मार्टचा कारभार सांभाळणारी कंपनी अॅव्हेन्यू सुपरमार्ट्सने नुकताच शेअर बाजारात प्रवेश केला. इतर कंपन्यांच्या तुलनेत हा प्रवेश अधिक लक्षवेधी ठरला. शेअर बाजारात एखाद्या कंपनीच्या शेअरची किती रुपयांवर नोंदणी होईल हे ठरवण्यासाठी एक किंमत निश्चित करतात. त्याला 'इश्यू प्राइस' असं म्हणतात. डी-मार्टच्या शेअरची इश्यू प्राइसपेक्षा दुपटीने वाढीसह नोंदणी झाली. त्यामुळं अॅव्हेन्यू सुपरमार्ट्सचा प्रवेश लक्षवेधी ठरला. संघटित रिटेल क्षेत्रात अनेक मोठे व्यावसायिक कार्यरत आहेत. परंतु, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किंमती आणि योग्य व्यावसायिक धोरणाचा समन्वय साधत डी-मार्टने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. कंपनीच्या नोंदणीला एवढा मोठा प्रतिसाद मिळण्याचं आणखी एक कारण म्हणजे मालक राधाकिशन दमाणी. 'आर के दमाणी' नावाने प्रसिद्ध असणाऱ्या दमाणींनी 2000 मध्ये डी-मार्टची स्थापना केली.

प्रसिद्धीपासून नेहमी दूर राहणाऱया दमाणी यांच्याविषयी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये कमालीचा आदर आहे. भारतातील रिटेल व्यवसायाचे स्वरूप पालटून टाकण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. अत्यंत साधं राहणीमान असणाऱ्या दमाणींचा बोलण्यापेक्षा कृती करुन दाखवण्यावर अधिक भर असतो. डी-मार्टला प्राप्त झालेलं यश हा त्याचाच पुरावा आहे.

डी-मार्टचे अनेक स्टोअर्स रहिवासी भागात आहेत. प्रत्येक स्टोअरसाठी जागा भाड्याने घेण्यापेक्षा स्वतः जागा खरेदी करण्यावर कंपनीचा भर असतो. त्याचप्रमाणे, डी-मार्टचा प्रत्येक ग्राहकवर्गापर्यंत पोचण्याचा अट्टहास नाही. इतर रिटेल कंपन्यांप्रमाणे कंपनीने अन्नधान्य आणि किराणा उत्पादनांच्या विक्रीवर अधिक भर दिला आहे. त्यामुळेच कंपनीचा नफा आतापर्यंत टिकून आहे. एफएमसीजी क्षेत्रात विक्रेत्यांना (व्हेंडर्स) उशीरानेच पैसे मिळतात. मात्र, डी-मार्टकडून आपल्या विक्रेत्यांना अकराव्या दिवशी पैसे दिले जातात. यामुळेच, विक्रेते आणि कंपनीमध्ये सलोखा कायम आहे. याशिवाय, कंपनीने कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट वर्क कल्चर उपलब्ध करुन दिले आहे. एकदा कार्यपद्धती आणि तत्व समजावून सांगितल्यानंतर कर्मचाऱ्यांना कामाचे पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते.

साधारणपणे 1999 मध्ये दमाणी यांनी रिलायन्स रिटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी दामोदर माल या दोघांनी नेरळमध्ये अपना बझारची फ्रँचायझी सुरु केली. माल तेव्हा हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये ब्रँड मॅनेजर म्हणून काम करायचे. दमाणी यांनी यशस्वी उद्योजक होण्यासाठी सहा वर्षांकरिता शेअर बाजाराचा निरोप घेतला होता. सुरुवातीला संपुर्ण व्यवसायाचे स्वरुप समजावून घेण्यासाठी त्यांनी वेळ दिला. होलसेल आणि किरकोळ विक्रेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर डी-मार्टची सुरु झालेली गाडी अजून बंद पडलेली नाही. 2005 मध्ये माल यांनी फ्युचर समुहात सामील होण्यासाठी डी-मार्ट सोडायचं ठरवलं.

डी-मार्टच्या व्यवसायात आतापर्यंत सातत्याने वाढ झाली आहे. या यशामागचं रहस्य म्हणजे अशा 25 गोष्टी आहेत ज्या कंपनीकडून वेगळ्या पद्धतीने परंतु सातत्याने केल्या जातात, असे दमाणी यांनी स्वतः एकदा सांगितले होते. गुंतवणूक करत करत आयुष्यात खुप गोष्टी शिकलो असंही ते म्हणाले होते. कन्झ्युमर व्यवसायाची आवड आणि या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यानंतर आपणही या क्षेत्रात काहीतरी करावं असं त्यांनी ठरवलं आणि त्यातून डी-मार्टचा उदय झाला.

'इकॉनॉमिक टाईम्स' या दैनिकाला 2014 मध्ये दिलेल्या दुर्मिळ मुलाखतीत दमाणी यांनी व्यवसायाची त्रिसुत्री सांगितली होती. ग्राहक, पुरवठादार आणि कर्मचारी या तिनही पायांवर नेमके लक्ष देऊन व्यवसाय भक्कम उभा करता येतो, असे दमाणी यांनी म्हटले होते.

दमाणी यांच्या कन्या मंजरी चांडक आणि ज्योती काब्रा 'डी-मार्ट'च्या कामात रोजच्या रोज लक्ष घालतात. विशेषतः वस्तूंच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार त्या बघतात. शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आणि रमेश दमाणी यांच्याशी त्यांची चांगली मैत्री आहेत. हे तिघेही शेअर बाजारातील आघाडीचे गुंतवणूकदार आहेत. दमाणी यांची वैयक्तिक संपत्ती पाच हजार कोटींपेक्षा जास्त आहे. याशिवाय, अॅव्हेन्यू सुपरमार्ट्समधील हिस्सेदारीचा हिशेब वेगळाच. परंतु एवढं सगळं असूनही आपल्या कामाकडे अधिक लक्ष देत क्वचित माध्यमांसमोर येणाऱ्या दमाणी यांना भारतातील वॉरन बफे आणि डी-मार्टला वॉलमार्ट संबोधले जाऊ लागले आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com