समाजाचे भूषण असलेल्या लोकनायकांना जपूया!

प्रमोद काळबांडे
Friday, 25 September 2020

वीरा साथीदार हे मुळात एक सामाजिक कार्यकर्ते. समाजवादाचे पुरस्कर्ते. भांडवली व्यवस्थेविरुद्ध अव्याहत वैचारिक प्रबोधन करणारे. अचानक त्यांची ‘एंट्री’ सिनेजगतात झाली.

काही खूप मोठी माणसं आपल्या शहरात राहत असतात. अनेकदा या माणसांमुळे आपली शहरेही मोठी होतात. संशोधन आणि चिकित्सेला नवे आयाम बहाल करणारे नंदा खरे. जगभरात भरणाऱ्या ‘स्लम सॉकर’चे पायोनिअर विजय बारसे. आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कलावंत वीरा साथीदार. या तिघांनी नागपूर शहराच्या ख्यातीत मोलाची भर टाकली. परंतु, या शहराने त्यांची म्हणावी तेवढी दखल घेतली का, हा प्रश्न केवळ नागपूरकरांनीच नव्हे, तर वैदर्भींनी स्वतःला विचारला पाहिजे.

वीरा साथीदार हे मुळात एक सामाजिक कार्यकर्ते. समाजवादाचे पुरस्कर्ते. भांडवली व्यवस्थेविरुद्ध अव्याहत वैचारिक प्रबोधन करणारे. अचानक त्यांची ‘एंट्री’ सिनेजगतात झाली. दिग्दर्शक चैतन्य ताम्हणे यांना त्यांच्या ‘कोर्ट’ या बहुभाषिक सिनेमातील मध्यवर्ती भूमिकेसाठी एक कलावंत हवा होता. देशभरातील अनेक थिएटर ग्रुप्स, नाटक कंपन्या, कलावंतांसोबत त्यांनी संपर्क केला; परंतु त्यांचा शोध थांबला तो नागपुरात. ‘कोर्ट’ सिनेमाचा त्यानंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे. जगभरातील सर्वच महत्त्वाचे पुरस्कार या सिनेमाला मिळाले. जगातील सर्वांत प्रतिष्ठेच्या ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठीही नामांकन झाले. आपल्या देशातील सर्वांत प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली. ‘श्यामची आई’ या सिनेमानंतर सुवर्णकमळाने गौरवान्वित होणारा हा एकमेव चित्रपट.

उत्तेजित करणारे गाणे म्हटले आणि त्यामुळे एका सफाई कर्मचाऱ्याने आत्महत्या केली, या आरोपावरून लोकशाहीर नारायण कांबळे यांना पोलिस पकडतात. त्यांच्यावर कोर्टात खटला चालविला जातो. नारायण कांबळे या पात्राभोवतीच ‘कोर्ट’ सिनेमाची संपूर्ण कथा फिरते. नारायण कांबळे ही भूमिका वीरा साथीदार यांनी साकारली. अमिताभ, शाहरुखपासून नसिरुद्दीन शहा, ओमपुरीपर्यंत आणि अलीकडच्या इरफान खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाची भुरळ सिनेप्रेमींवर असताना वीरा साथीदार यांचा नैसर्गिक आणि सहज अभिनय मनाला मोहिनी घातल्याशिवाय राहत नाही. स्वभाव आणि कामाला साजेशी भूमिका मिळाली म्हणून त्यांचा अभिनय उठावदार झाला असावा, असेही त्यावेळी अनेकांनी म्हटले. परंतु , नंतरच्या अभिनयातून त्यांनी हा समज शुद्ध गैरसमज असल्याचे सिद्ध केले.

ज्याच्या अभिनयाच्या बळावर ‘कोर्ट’ सिनेमाची दखल जगभरात घेतली गेली, त्याची या नागपूर शहराने किती दखल घेतली? वीरा साथीदार यांना याची खंत जरी नसली, तरी सल मात्र आहे. केवळ दलित कुटुंबात जन्मलो आणि स्वतंत्र राजकीय विचार घेऊन जगत आलो, त्यामुळेच ही उपेक्षा झाली, असा त्यांचा ठाम दावा आहे. परंतु, त्याचे वाईट वाटून घ्यावे एवढा कोता वैचारिक पिंड त्यांचा नाही. उलट, हे असेच होत असते, याबाबत त्यांची ठाम खात्री आहे. त्यामुळेच वैचारिक प्रबोधन आणि सामाजिक कार्याचा त्यांचा प्रवास थांबला नाही. उलट, त्यात खंड पडू नये म्हणून अनेक चित्रपटांच्या ऑफर त्यांनी नम्रपणे नाकारल्या. परंतु, चांगल्या कथा आणि सिनेमांनी त्यांचा पिच्छा पुरविलाच.

आधा चांद तुम रख लो, कोसा, टिप, दी स्केअर्ड काऊ अशा काही कथानकांना त्यांना नकार देणे जमले नाही. ‘कोसा’ फिचर फिल्म ‘कान्स’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शनासाठी निवडली गेली. ‘आधा चांद तुम रख लो’चे फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन झाले. ‘टिप’ नेदरलॅंडमधील महोत्सवासाठी निवडला गेला. यातही त्यांची मुख्य भूमिका आहे. ‘कोर्ट’चा दिग्दर्शक चैतन्य ताम्हणे, ‘आधा चांद...’चा मयंक बकोलिया, ‘कोसा’चा मोहित प्रियदर्शी, ‘टिप’चा विपुल कल्याण, ‘दी स्केअर्ड काऊ’चा शाहिद कबीर हे सर्वच दिग्दर्शक अत्यंत नावाजलेले आणि झपाटलेले आहेत.

सामाजिक भान बाळगणारे आहेत. त्यांचा प्रत्येकच सिनेमा सामाजिक प्रश्नांना उजागर करणारा आहे. ‘कोर्ट’नंतर आलेल्या चिक्कार ऑफर धुडकावत केवळ म्हणूनच या दिग्दर्शकांच्या सिनेमांमध्ये काम करण्याचा वीरा साथीदार यांनी निर्णय घेतला.
या व्यवस्थेवर पद्धतशीर प्रहार करत एक समाजवादी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, असे वीरा साथीदार यांना वाटते. हा विचारच त्यांना महान कॅटेगिरीत नेऊन बसवतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले अहोरात्र लोकोत्थानासाठी झटले. त्यांचा आदर्श सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे, अशी त्यांची सक्रिय भूमिका आहे. बेरोजगारीवर ते परखडपणे बोलतात. मूठभर लोकांकडे संपत्तीचे साठे आणि बाकी जनता भुकी कंगाल, हे त्यांना बघवत नाही. राहत्या गावात रोजगार मिळाला पाहिजे. त्यासाठी बुद्धिजीवी लोकांनी विचारांची पेरणी करावी, असे त्यांना वाटते.

जे शहर त्यांची कर्मभूमी आहे, त्या शहरातील बेरोजगारीबाबतही त्यांना चिंता सतावते. नागपुरातील एम्प्रेस मिल तोडून हजारो लोकांना बेरोजगार केले गेले. तिथे गगगचुंबी इमारती उभ्या केल्या. आता बेरोजगारीची लाट आली आहे. मुळावरच प्रहार केला तर बेरोजगारीच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकते, असे त्यांना वाटते. त्यांची ही भूमिका म्हणूनच लोकांना भिडते. वीरा साथीदार केवळ पडद्यावरचा कलावंत नाही; तर खऱ्याखुऱ्या जगण्यातलाही मनस्वी नायक आहे. सध्या त्यांचे एका वैचारिक ग्रंथाचे लेखन सुरू आहे. त्यात खंड पडू नये म्हणून रग्गड पैसे मिळणारी मुंबईच्या शूटिंगची एक ऑफरही त्यांनी नुकतीच नाकारली. जगाची चिंता वाहणाऱ्या आणि त्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या या लोकनायकाला जपणे या शहराचे कर्तव्य आहे. तुमच्या शहरातही वीरा साथीदारसारखे लोकनायक असतीलच. त्यांनाही जपूया.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Proud to be a social imeges