कोरोना आणि शिस्त...! 

mask
mask

‘अमुक अमुक तारखेला तमुक तमुक गोष्टी होणार आणि लॉकडाउन उठणार,’अशा सरकारी घोषणांनंतर वैतागलेल्या नागरिकांमध्ये कमालीचा उत्साह बघायला मिळाला. आता सगळं ठीक होणार, किंबहुना ठीक झालेलंच आहे अशा आत्मविश्‍वासानं लोक घराबाहेर पडू लागले. एरवी सरकारी यंत्रणा आणि राजकारणी यांच्यावर अजिबात विश्‍वास न ठेवणाऱ्या जनतेनं या तारखा खूप गांभीर्यानं घेतल्या. अडचण एवढीच आहे, हे कोरोनाला कळवायचं राहून गेलं! 

फूटपाथवर गाड्यांची आणि रस्त्यावर माणसांची गर्दी पुन्हा बघायला मिळती आहे. सगळे नियम धाब्यावर बसवून लोक बाहेर गर्दी करत आहेत. 

नियम मोडणारे त्यांच्या कपड्यांवरून ओळखता येतात हा नवीन सिद्धांत मी कोरोना येण्याच्या आधीच ऐकला होता. तसंही गरीब आणि अडाणी लोकांना फार कळत नाही, त्यांच्यात शिस्त नाही असा आपला जुना समज आहे. मात्र, ‘वैशाली’ आणि ‘रूपाली’बाहेर अतिउच्चशिक्षित अमित आणि मंदार या माझ्या मित्रांचे कॉफीचे अड्डेदेखील पुन्हा सुरू झालेत. आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळून मित्रांबरोबर कॉफी पितो, तूसुद्धा ये एकदा, तेवढाच तुला चेंज, असं प्रेमाचे आमंत्रणदेखील मला मिळालं. श्रीमंत लोकांचं मन दुखवायचं नाही, हे मला आता चाळिशीजवळ आल्यावर कळायला लागलंय. त्यामुळं ‘वैशाली’वाल्यांना मी ‘रूपाली’वर, तर ‘रूपाली’वाल्यांना ‘वैशाली’वर असल्याचं सांगून मोकळा होतो. कारण दहा बाय दहाच्या जागेत पाच लोक एकमेकांपासून सहा फूट अंतरावर कसे उभे राहू शकतात, हे फोर डिमेन्शनल गणित काही मी सोडवू शकलेलो नाही. कार्ल मार्क्सप्रमाणं समाजात भांडवलशहा, मध्यमवर्गीय आणि कामगार असे घटक असतात. आधुनिक विचारवंत ‘कार्ल मास्क’नुसार आता समाजाला पुढीलप्रमाणे विभागता येईल. 

नो मास्क : ही मंडळी अजिबातच मास्क परिधान करत नाहीत. यात सकाळी आपल्या श्‍वानांचा कोटा साफ करायला बाहेर पडणाऱ्या व्यक्तींचा आकडा विलक्षण आहे, अशा लोकांना महापालिकेनं उचलून नेण्याची सोय करावी. 

अर्धा मास्क : खरंतर ही मंडळी जास्त खतरनाक असतात. कारण लांब असले की पूर्ण मास्क घालतात, जवळ आले की तो अर्धा खाली घेऊन नाकातून बोलायला लागतात. दुसऱ्यांच्या आयुष्यात नाक खुपसण्याची यांची जुनी खोड कोरोनामुळं गेल्याची दिसत नाही. 

क्वार्टर मास्क : हे पब्लिक मास्कचा मफलर म्हणून वापर करतात. गळ्याला ऊब मिळावी, दाढीचा आकार विस्कटू नये हे त्यांच्या मास्कचं परमकर्तव्य असतं. ही मंडळी बाईक चालवताना बरोबर हेल्मेट ठेवतात, मात्र हॅण्डलचा जीव वाचवण्यासाठी! 

वरील प्रकारातील सगळेच लोक दर सतरा मिनिटांनी आपल्या मास्कबरोबर चाळे करत असतात. कधी टाईट कर, कधी लूज कर, कधी मास्कच्या आत हात घालून खाजव, तर कधी मास्कवरूनच चिमटे काढ. मास्क खराब होऊ नये म्हणून मी एका सद्‍गृहस्थाला मास्क काढून शिंकून पुन्हा मास्क घातलेलाही बघितलंय!!! बाहेर पडल्यावर पूर्ण मास्क पूर्ण वेळ, सहा फुटाचं अंतर, इतरांना किंवा स्वतःला हात न लावणं, वैयक्तिक स्वच्छता वगैरे गोष्टी आपल्याला जमत नाहीयेत. ‘भारतीयांमध्ये शिस्त नाही,’ हे मूळ कारण आहे, असं मला वाटत नाही. आपल्याला कोरोनाशी लढता येत नाहीये ते सगळे नियम सगळ्यांना लागू होतात यावर आपला पारंपरिक सामाजिक विश्वास नसल्यामुळं आणि माझ्या एकट्याच्या क्रियेनं काही फरक पडत नाही या ठाम आधुनिक राजकीय समजुतीमुळं. एकंदरीत अवघड आहे आपलं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com