प्रश्न आणि उत्तर

आर. जे. संग्राम, ९५ बिग एफ. एम. 
Friday, 20 November 2020

माणूस ‘वाचायच्या’ऐवजी आपण त्याने आत्तापर्यंत केलेलं काम आणि त्या नोकरीसाठी लागणारं कौशल्य त्याच्यात आहे का नाही, या टेक्निकल गोष्टींवर भर दिला तर योग्य निवड करता येते.

नोकरीसाठी मुलाखतीची प्रक्रिया फार कामाची नाही, अशी मांडणी मी मागच्या लेखात केली. माणूस ‘वाचायच्या’ऐवजी आपण त्याने आत्तापर्यंत केलेलं काम आणि त्या नोकरीसाठी लागणारं कौशल्य त्याच्यात आहे का नाही, या टेक्निकल गोष्टींवर भर दिला तर योग्य निवड करता येते. यात सगळ्यात मोठी गंमत म्हणजे आपण प्रश्न एक विचारतो; पण उत्तर दुसऱ्याच प्रश्नाचं देतो. स्वतः स्वतःलाही. उदाहरणार्थ, या उमेदवाराला अमुक काम नीट करता येईल का, हा मुख्य प्रश्न. पण, एका मुलाखतीत त्याचं उत्तर सापडणं अशक्य असतं. त्यामुळे त्याऐवजी आपण शक्य आणि सोप्या अशा उपप्रश्नाचं उत्तर शोधतो आणि तेच मूळ प्रश्नाचं उत्तर आहे असं म्हणतो. जसं की, हा उमेदवार हे काम नीट करू शकेल असा तो दिसतो किंवा बोलतो का? 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याला ‘उपलब्धता पूर्वग्रह’ म्हणतात. म्हणजे डोक्याला फार त्रास न देता जे उत्तर उपलब्ध आहे ते वापरून शॉर्टकट घ्यायचा. शॉर्टकट घेण्यात काही गैर नाही; पण आपण तो घेत आहोत, याची जाणीव ठेवायला हवी. शॉर्टकटचा रोजच्या जीवनात आपल्याला फायदाच होतो.

भर उन्हाळ्यात दाराची घंटा वाजते. दार उघडल्यावर समोर टाय घातलेली थोडी कुपोषित व्यक्ती प्रकट होते. ही व्यक्ती कोण, या प्रश्नाचं उत्तर एकच असतं. मनातल्या मनात शिव्या देत या सेल्समनला आपण विनम्रपणे टाळण्यासाठी क्लृप्त्या करतो. अशाच उन्हाळ्याच्या दुसऱ्या दुपारी जर अशीच व्यक्ती टायला मॅचिंग; पण शरीरयष्टीला अजिबात नॉट मॅचिंग असा ब्लेझर घालून आलेली असेल, तर ती कोण, याचंही उत्तर लगेच आपल्याला गवसतं. ही म्हणजे एमबीएची डिग्री मिळवण्याचा प्रयत्न करणारी आपली पुढची पिढी. हे सगळं करून आपल्या आई-वडिलांचं सगळं कर्ज आपण फेडू, असा आत्मविश्वास असणारी किंबहुना आपण त्यांचा सर्व्हे भरून दिला तरच ते कर्ज फेडता येईल, असा आविर्भाव असणारी आपली पुढची पिढी. शॉर्टकटचा खरा प्रॉब्लेम होतो तो महत्त्वाच्या आणि गुंतागुंतीच्या विषयात. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मूळ प्रश्न : Regional Comprehensive Economic Partnership बद्दल कोणत्या राजकीय पक्षाचं धोरण बरोबर आहे?
ऐवजी आपण ज्या प्रश्नाचं उत्तर देतो : माझ्या मते, देशाचं हित कोणत्या पार्टीला जास्त प्रिय आहे?

मूळ प्रश्न : हा किती प्रभावी नेता आहे?
ऐवजी आपण ज्या प्रश्नाचं उत्तर देतो : हा किती प्रभावी वक्ता आहे? 

मूळ प्रश्न :  पोलिस किती लाचखोर आहेत? 
ऐवजी आपण ज्या प्रश्नाचं उत्तर देतो :  माझ्याकडून किती वेळा ट्रॅफिक हवालदाराने पैसे उकळले आहेत?

मूळ प्रश्न : हा उमेदवार माझ्या टीममध्ये चांगलं काम करू शकेल का?
ऐवजी आपण ज्या प्रश्नाचं उत्तर देतो : हा उमेदवार माझ्यासारखा किंवा माझ्या टीम मेंबर्ससारखा आहे का - बोलण्यात, दिसण्यात वगैरे? किंवा याला नोकरीवर ठेवला, तर माझे बॉस/सहकारी यांना माझ्याबद्दल काय वाटेल?

मूळ प्रश्न : संग्राम चांगला लेखक आहे का?
ऐवजी आपण ज्या प्रश्नाचं उत्तर देतो : मला संग्रामचा रेडिओ कार्यक्रम आवडतो का?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: R J Sangram article about interview

Tags
टॉपिकस
Topic Tags: